Thursday 3 October 2019

Generation Gap - Positive vibes only!!

रात्री साडेआठची वेळ. आम्ही, म्हणजे मी आणि माझी भाच्ची, आमच्याच घरासमोर उभे होतो. आमचे हे दार उघडायची वाट बघत होतो. तेवढ्यात ती आली. एका हातात भाजीची पिशवी आणि एका हातात दूध. फार दमलेली दिसत होती. तशी कपड्यांवरून वगैरे बरी वाटली म्हणा. बोलावं की नाही असा विचार करत होते. आजकालच्या मुलींचं काही सांगता येत नाही हो.परकं माणूस बोललेलं आवडेल, न आवडेल. त्यात ती हिंदीभाषिक असेल तर, आमची हिंदी म्हणजे 'तेरा नाव क्या है?' टाईपची. ओळख व्हायच्या आधीच 'काय खोचक म्हातारी आहे! ' असं वाटायचं तिला. हे असे सगळे विचार सुरु असतानाच ती म्हणाली,
'काय म्हणताय काकू?'
आवाज गोड होता पोरीचा. आणि मला आजी न म्हणता काकू म्हणाली म्हणून आवडलीच मला ती पटकन.
'तू इथे राहतेस? '
'हो ना, सहा सात महिने झाले.'
'दिसली नाहीस कधी. एक कोणीतरी दिसतो घरात अधून मधून. मला वाटलं कोणी बाप्या एकटाच राहतो की काय.'
'तो नवरा माझा.'
नवरा आहे म्हणल्यावर जरा बरं वाटलं मला. नाहीतर काही सांगता येत नाही हो. सुलु म्हणत होती परवा, 'अगं नीट, हल्ली गळ्यांत मंगळसूत्र असतं पण लग्न झालेलं असेलंच असं नाही. फक्त फॅमिलीला जागा देतात ना, मग जागेसाठी हे असं चालतं.'
'अच्छा.. इतके दिवस राहताय इथे. खरं आज दिसलीस तू. ये ना चहा प्यायला..'
'नको काकू, परत येईन कधीतरी.' असं म्हणून ती गेली.
अहोंनी दार उघडलं होतं. मीही आत गेले. थोडक्यात काय, तिची आणि माझी अशी भेट झाली. आणि नंतर होतच राहिली.
कधी 'काकू, माझं एक पार्सल येणार आहे. इथल्या पत्त्यावर. पण आम्ही तर नसतो घरी. ठेवून घ्याल?' म्हणत. किंवा
'काकू, सुरळीच्या वड्या केल्यात. आईला करताना पाहिलं होतं. स्वतःहून पहिल्यांदा केल्या. जरा चव बघता??' म्हणत
तर कधी 'एकतारी पाक करायचा आहे. साखर आणि पाणी ठेवलाय गॅसवर. जरा सांगायला येता? असं म्हणत
पोर लाघवी आहे. कधी त्यांच्या घरातून काय ते 'बद्रीकी दुल्हनिया' ऐकू येतं तर कधी 'अवघा रंग एक झाला'. नवल वाटतं या पोरांचं. एक मात्र आहे कायम हसतमुख असतात दोघं. एकंदरीत सुखी चालू आहे संसार. आमची नेत्रा ऑस्ट्रेलियाला गेली आहे तेव्हापासून घरात माणसांचं येणं जाणं कमीच झालंय. उत्साहाचा झरा आहे माझी नेत्रा. हिला पाहिलं कि नेत्राचीच आठवण येते मला. तशीच आहे ही. बरं झालं शेजारी आहेत. मध्ये ती काय बातमी वाचली ना 'आईच्या हाडांचा सापळा झाल्याचासुद्धा पोराला पत्ता नाही..' तेव्हापासून जरा अस्वस्थच वाटतंय. असो.. तुमच्याशी काय बोलत बसले. खालील गेलेले हे येतील एवढ्यात. चहा टाकते. येते बरं का!!!
---------------------------------------------------------
सहा सात महिन्यांपूर्वी शेजारी कधी नव्हे ते लवकर आले तेव्हा शेजारच्या दारात एक काकू दिसल्या. इथे राहायला आल्यापासून पहिल्यांदा कोणीतरी हसून बघितलं. तशी बरीच दमलेले मी. पण ओळख करून घ्यावी म्हणून म्हणलं,
'काय म्हणताय काकू?'
त्यांनी मग त्यांची जरा माहिती वगैरे सांगितली. निषाद एकटाच राहतो की वाटलं होतं त्यांना. त्यांची काय चूक म्हणा. जिथं एका घरात राहून आम्ही दोघं एकमेकांना वीकएंडशिवाय भेटत नाही तिथं त्यांना भेटायला कधी वेळ मिळणार? तर, असंच टाईमपास काहीतरी बोलून मी तेव्हा बाय म्हणलं. नंतर भेटत राहिलो म्हणा आम्ही तसं.
कधी त्यांच्याकडचा गॅससिलेंडर संपला तो बदलून द्यायला तर कधी त्यांच्या चष्म्याची काच तुटली ती दुरुस्त करून आणायला तर कधी झोपाळ्याच्या गजांना तेल पाणी करायला..
मस्त आहेत काका काकू. साठीचे असतील. पण एकदम टुकटुकीत आहेत. काकांना डायबेटीस आहे जरा. तेवढं चालायचंच.
मध्ये मी पुरण घातलं होतं. युट्युब वर 'अशी कन्सिस्टन्सी हवी.' म्हणून सांगत होती ती शेफ. तेव्हाच काकू आल्या. एकीकडे कढई, एकीकडे युट्युब असं बघून म्हणाल्या. ' बंद कर ते आधी. अगं सोपं असतं पुरण घालणं. डाव हा अस्सा उभा राहिला न की समजायचं पुरण झालं.' आईची फार आठवण आली तेव्हा. इतके वर्ष झाली घराबाहेर आहोत. आता दोन घरं आहेत पण जायला वेळ नाही. सणांचीसुद्धा कुठल्या घरी कधी अशी विभागणी झालेली आहे. या काका-काकूंना पाहिलं की आई-बाबांची आठवण येते. माझ्या आणि निषादच्यासुद्धा. शेजार चांगलं आहे दोन्हीकडे म्हणून बरं. नाहीतर कायम आम्हाला काळजी. वयं झालीत चौघांची. BP मागं लागलंय. जरा कुठे दुखलं खुपलं की आमचा जीव वर खाली होतो. जाताही येत नाही आणि राहवतही नाही असं सगळं विचित्र झालंय. बरं झालं निदान हे काका-काकू तरी आहेत. आमच्यापरीने आम्ही त्यांची काळजी घेतो. आमच्याही आई-बाबांची कोणीतरी काळजी घेतच असतं ना. झालीच त्याची परतफेड तर बरं.....
असो... गप्पा मारण्यात कसा वेळ गेला कळलंच नाही. माझ्या झुंबा क्लासची वेळ झाली. निघते मी. बाय!!!!!

No comments:

Post a Comment