Thursday 3 October 2019

Generalizing things - एक विकृत मानसिकता!


अलीकडचीच गोष्ट. एक काकू मला म्हणत होत्या, 'तू आयटी मध्ये ना गं. मग काय बाहेरचंच खात असाल ना. आज वडापाव, उद्या भेळ. आणि नंतर नवऱ्याकडे बघून 'काय रे, बायको करते का काही घरी का तुलाच करावं लागतं सगळं..?'
वयाचा मान ठेवून म्हणा किंवा कुठे नादाला लागायचं म्हणून म्हणा मी बोलणं टाळलं. पण तेव्हापासून हा विचार आहे मनात. आयटी मधली सून म्हणजे तिला कशाचंच काही सोयर सुतक नसणार हे गृहीतच धरलंय लोकांनी. आणि हा आय टी मध्ये असणाऱ्या सुनांचा नवीन प्रॉब्लेम आहे. तस पाहिलं तर त्यांचे १२ तास ऑफिस आणि प्रवासात जातात. ७ तासांची झोप. सकाळी दोन तास स्वयंपाक करणं, नाश्ता बनवणं, खाणं आणि स्वतःचं आवरणं यात जातात. मुलं असतील तर आणखी जास्त वेळ. संध्याकाळी दीड तास स्वयंपाक आणि जेवण. सणवार असतील तर मग झालंच. हातात असणारा वेळ कसा, कुठं जातो ते कळतही नाही. त्यात सुद्धा दोन घरी बोलायचं असतं, स्वतःसाठी निदान अर्धा तास तरी हवा असतो. पण हे समजूनच घेतलं जात नाही.. [घरांत वरच्या कामांना बाई आहे आणि घरात सासूसासरे नाहीत हे गृहीत धरून हे वेळापत्रक सांगितलं आहे. तशी मदत नसेल तर मग २४ तास पण अपुरे पडतात..]
सून आहे ना मग तिने घरचं सगळं करून मगच बाहेर पडायला हवं. नवऱ्याला काय हवं नको ते बघायला हवं अशा अपेक्षा असतात. [हो. अजूनही बऱ्याच घरात आहेत] घरचे समजूतदार असतील तरी आजूबाजूच्या मंडळींना सुनेनं केलं'' पाहिजे असं वाटत असतं. ते चूक आहे असं म्हणत नाही मी. पण कालानुरूप त्यात बदल व्हायला हवा ना. सोमवार ते शुक्रवार वेळेशी जुळवून घेताना त्रेधा तिरपीट उडते. अशावेळेस मग 'आम्ही केलंच ना..' असा सूर असतो या मंडळींचा. माझा एक मित्र यावर म्हणाला होता, 'पूर्वीचे बरेचसे जॉब्स क्लेरिकल होते. जॉब जाण्याची तितकीशी भीती नव्हती, कामाच्या वेळा अशा विचित्र नव्हत्या, आजच्या एवढी जीवघेणी स्पर्धाही नव्हती..' पटलं मला त्याचं. पण हे जर एखादी सून म्हणाली असती तर ती उद्धट ठरली असती..
माझी एक मैत्रीण आहे. अगदी वर सांगितलं तसंच वेळापत्रक असणारी. फक्त सासू-सासरे सोबत असतात तिच्या. तिने एकदिवस [एकच दिवस] ऑफिसला जायला उशीर होत होता म्हणून नवऱ्याला धुवून झालेले कपडे वळत घालशील का म्हणून विचारलं तर सासूबाई म्हणाल्या, 'नवऱ्याला कामं सांगू नयेत. आणि पुरुषांनी बायकांचे कपडे बघायचे नसतात.. [येस, एकविसावं शतक आहे हे..]' आणि हे फक्त प्रातिनिधिक आहे. अशी अनेक मजेशीर उदाहरणं आहेत आजूबाजूला.
सगळ्या गोष्टी जनरलाईझ करतात ही आजूबाजूची मंडळी. आयटी मधली सून आहे ना म्हणजे रोज बाहेरचं खात असणार, अधून मधून दारू-सिगारेट यांतसुद्धा रमत असणार. तिला स्वयंपाक म्हणजे काय हे माहित नसणार. मग काय, अंडा भुर्जी करताना ती 'दोन अख्खी अंडी, एक टोमॅटो आणि एक कांदा तव्यावर परतत आहे' असे व्हिडीओज बनवून सगळीकडे पसरवले जातात.. वाईट गोष्ट म्हणजे हे चुकीचं आहे असं कोणालाच वाटत नाही. 'चेष्टा केली गं..' म्हणत सगळंच हसण्यावारी नेलं जातं. 'आजकालच्या मुली' या सदरात याही गोष्टी येत आहेत हल्ली. अशामुळे होतंय काय ना, माझ्या वयाच्या अनेक अविवाहित मुलींना वाटतं, 'हे एवढं सगळं ऐकून घ्यायचं असेल, स्वतःसाठी जगायला वेळच मिळणार नसेल तर लग्नच कशाला करायचं.' तर्कशुद्ध उत्तर देता येत नाही या आजूबाजूच्या मंडळींना. मग ते काय करतात तर आजकालच्या मुलींमुळे लग्नसंस्था मोडीत निघत आहे वगैरे भाषणं ठोकतात. पण बदललेल्या युगात आपण आपले विचारही बदलायला हवेत हे काही त्यांना समजत नाही..
या सगळ्या पार्श्वभूमीवर मी फार फार भाग्यवान आहे. मुलगी म्हणून आणि सून म्हणून सुद्धा.. ऑफिसमधून खूप उशिरा आल्यावर 'कशाला स्वयंपाक करत बसलीस, खिचडी टाकायची पटकन किंवा मागवायचं' असं म्हणणारी घरची मंडळी आहेत. 'या आपल्या परंपरा आहेत आणि त्या पाळायलाच सगळं करायलाच पाहिजे' म्हणणारं सासर नाही आणि तू केलं नाहीस तर लोक आम्हाला नावं ठेवतील म्हणणारं माहेर नाही. 'तुला जमेल तसं कर, फक्त मनापासून कर.' एवढीच त्यांची अपेक्षा आहे. आणि तेवढं करणं मला काही जड जात नाही.
त्यामुळं वर सांगितलं तसं माझ्या घरात होत असेल असा विचार करून कोणीही सहानुभूती वगैरे दाखवू नये..
-तन्मया

No comments:

Post a Comment