Thursday 3 October 2019

घर: वस्तू नव्हे भावना!

आम्ही लहान असताना निबंधाचे ठरलेले विषय असायचे. माझी आई, किंवा माझा आदर्श किंवा माझं घर वगैरे.. तेव्हा मग त्यात ठरलेल्या कवितेच्या ठरलेल्या ओळींनीं निबंधाची सुरुवात किंवा शेवट व्हायचा. म्हणजे आईवर निबंध लिहायचा असेल तर "स्वामी तिन्ही जगाचा" हे पाहिजेच. "माझा आदर्श" मध्ये एकदातरी "दिव्यत्वाची जेथ प्रचिती.. वगैरे" यायचं. आणि माझं घर म्हणल्यावर घराचं चित्र डोळ्यांसमोर येण्याआधी "घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती.." याच ओळी यायच्या. नंतर अनेक वर्षांनी विंदा करंदीकरांची हिमयोग वाचली. घराविषयीची हे इतकी सुंदर कविता शाळेत असताना का नाही वाचली असं वाटलं तेव्हा.
तीन छोट्या कवितांची एक मोठी कविता. साठच्या दशकात लिहिलेली. आज त्याचे अनेक संदर्भ नाहीसे झालेत. पण घर जेव्हा केवळ वास्तू न राहता त्याची भावना होते त्या भावनेची ही कविता..

घराकडच्या आठवणी: दाराच्या कडीच्या, घातल्या न घातल्याचा..
न्हाणीतल्या साबणाच्या सवयीच्या वासाच्या. चौघांच्या श्वासाच्या..
चड्डीच्या नाडीचे टोक आत गेल्याच्या. गालफुगव्या आवळ्याच्या..
खिडकीवरील कावळ्याच्या, थर्मामीटर फुटल्याच्या, एकदाची गाठ सुटल्याचा..
भांडल्याच्या, शेजारणीच्या उखळामध्ये रेशनची करड कांडल्याच्या..
बटणे हरवल्याच्या, हरवल्यावर सापडल्याच्या, सापडून पुन्हा हरवल्याच्या..
बीटाच्या, थीटाच्या. केरसुणी बांधल्याच्या, फुटकी काच सांधल्याच्या..
आमसुलाचे साराच्या, लोणच्याच्या खाराच्या, गौरीच्या, गणपतीच्या..
आरशावर पडलेल्या तेलाच्या डागाच्या, रुसलेल्या रागाच्या..
"आम्ही-म्हणजे-अडचणी"च्या, "सगळी सोंगे" वगैरेंच्या, "पावडर-दिसते-आहे-का"च्या..
बाटलीमध्ये अडकलेले सबंध बूच काढल्याच्या, हातावर वाढल्याच्या..
आशेच्या, निराशेच्या, रद्दीमध्ये फसल्याच्या. संडास बंद असल्याच्या..
चेंडू हरवून झाल्याच्या, खिडकीपाशी काढलेल्या कानांतल्या मळाच्या..
संथखोल पाण्यामधील नियतीच्या गळाच्या एकटीच्या बळाच्या...
आमचं घर म्हणजे एक वाडा होता. तीन बिऱ्हाडकरू एकत्र राहत होते त्यात. बाहेरची खोली, मधली खोली, स्वयंपाकघर, आणि मागची खोली अशी रचना. बाहेरच्या खोलीत आई-बाबांचा दवाखाना. त्यामुळं राहायला म्हणून तीनच खोल्या मिळायच्या. त्यात मग पाहुणे आले की कोणी कुठं झोपायचं यावरून प्लॅनिंग. लहानपणी स्क्वेअर फूट वगैरे समजत नव्हतं ते बरं होतं एका अर्थी. बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या त्यामुळं..
त्या वाड्यात सगळ्यांत मिळून तीन संडास होते, आणि दोन दिवे. त्यावर काजळी जमायची, मग त्याचा प्रकाश कमी व्हायचा. सकाळी शाळेच्या वेळा, मोठ्यांच्या कामाच्या वेळा असं एकत्र आल्यावर सगळी बोंबा-बोंब. बाहेरचा कोणी माणूस आला आणि त्याला जावं लागलं तर आम्हालाच अगदी लाज गेल्यासारखं वाटायचं. सुरुवातीला पुरेसा पैसा नव्हता म्हणून आणि नंतर मुलींच्या शाळा जवळ आहेत म्हणून आम्ही ते घर बदललंच नाही. आज वाटतं आई बाबांनी कसं निभावलं असेल ते सगळं. कसं राहिलो असू आम्ही त्या घरात.
तिथे आम्ही पाढे गिरवले, प्रमेय शिकलो, स्पेलिंग्स गिरवली, अनेकवेळा घोकंपट्टीदेखील केली, क्वचित मारही खाल्ला.
तिथंच आम्ही आरत्या म्हणाल्या, मखरी सजवल्या, सत्यनारायण घातले, आकाशकंदील बनवले, पठण ऐकलं आणि अनेकदा महामृत्युंजयाचा जपही केला, तो कधी फळला, कधी नाही..
तिथंच आमची बारावीपर्यंतची शिक्षणं झाली. नंतर मात्र शिक्षणासाठी घर सोडावं लागलं. आणि आता तर काय घराचं माहेर झालं. तरीही जशी घरच्यांची आठवण येते तशी मला घराचीसुद्धा आठवण येते. आणि घर म्हणलं की मला तो वाडाच आठवतो. ते का होतं असेल याचं उत्तर देणारी ही विंदांची कविता..
तुम्ही म्हणलं पूर्वी हे सगळं होतं आता कालबाह्य झालंय. असेलही कदाचित. पण प्रचंड दमल्यानंतर "कधी एकदा घरी जाईन असं झालंय" या वाक्याची जागा दुसरं काही घेत नाही तोपर्यंत घर ही भावना कालबाह्य होणार नाही. जोपर्यंत घराविषयी, आपल्या माणसांविषयी हा हळवेपणा आपल्या मनात आहे तोपर्यंत विंदांच्या या कवितेला मरण नाही!

No comments:

Post a Comment