Sunday 13 April 2014

शब्दप्रभू - सुधीर मोघे!!

आज जे आपल्याला भेटणार आहेत त्या अवलियाला काय म्हणावं.. गीतकार, कवी, निवेदक, कीर्तनात रमणारा साधक नक्की काय... माझ्या साठी तरी ते शब्दप्रभू आहेत.. "मुक्तछंद" मध्ये राहणारे नव्हे तर कायम "मुक्तछन्दातच" जगणारे!!! कवितेला सखी मानून काव्यरसिकांना मोहवणारे.. "फिरुनी पुन्हा नव्याने जन्मणारे", कवी असणारे आणि कवीच दिसणारे, साहित्याच्या जगातले मुशाफिर "सुधीर मोघे!!"
कीर्तनकार हा स्वधर्म असणार्या राम मोघ्यांचे हे चिरंजीव, श्रीधर मोघ्यांचे बंधुराज.. लहानपणापासूनच कीर्तांच्या माधमातून नवनवीन रचना, त्याचं सादरीकरण याचं बाळकडू मिळालेलं.. मोठ्या मोठ्या रचना मुखोद्गत असण्याच वरदान मिळालेलं.. अशात जेव्हा अलौकिक प्रतिभेची साथ मिळते तेव्हा सुंदर काव्य जन्म घेत...
"एक कृती, एक शब्द, एकच निमिष चुकतं-हुकतं
उभ्या जन्माच्या चुकामुकीला तेवढं एक निमित्त पुरतं.."
अस जोरदार काव्य सलामीला टाकून साहित्य भूमीवर आगमन करणाऱ्या मोघ्यांनी नंतर मागे वळून कधी पहिलच नाही.. खरतर निमिष म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहित आहे पण त्या निमिषाची जादू तेव्हा पसरते जेव्हा मोघे त्याला शब्दबद्ध करतात..
" सर्वागातून जणू उसळली रस-गंधांची लाट
त्या एका निमिषात
दिवेलागणीची 'ती' वेळा
माजघरातील 'तो' झोपाळा
झोपाळय़ावर झुलणारी 'तू'
ठसलीस खोल मनात
श्रावण हिरवा आद्र्र कोवळा
तुझ्याभोवती लपेटलेला
हरित कांकणांचा गजबजता घट्ट पकडला हात
मऊ मुलायम लालस ओळी
ती भाषा मी प्रथम वाचली
एक अनोखी नवखी ओळख वीज भरे गात्रांत
उलटून गेली वर्षे अगणित
अल्प उरे श्वासांचे संचित
सुखमय क्षण ते कसे परतले अवचित पाठोपाठ
त्या एका निमिषात.."
वाह क्या बात है!!!!
मोघे मुळचे किर्लोस्कर वाडीचे.. ६९-७० च्या दरम्यान पुण्यातल्या डेक्कन जिमखान्यावरच्या भोंडे कॉलनीत आले. ७१ मध्ये "स्वरानंद"च्या "आपली आवड" साठी निवेदक म्हणून काम करू लागले..
ते चित्रपटातल्या त्या गीतांमधलं काव्य अलगदपणे उलगडून सांगायचे आणि त्याबरोबर मधूनमधून आपल्याही कवितांचा आस्वाद घडवायचे. त्यांच्या कवितांना पुणेकरांनी दिलेली ती पहिली दाद होती.. त्यावेळी त्यांच्या
"दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन येतं,
तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम होतं"
किंवा
"न्हाऊनिया उभी मी, सुकवीत केस ओले, वेडय़ा मुशाफिराने त्याचेच गीत केले" या कविता म्हणजे तरुणांसाठी "love anthem" होत्या...
काळाच्या ओघात मोघ्यांच्या आयुष्यात अनेक माध्यमं, क्षेत्रं सामोरी येत राहिली..पण त्यांचा मूळ धर्म कधीही हरवला नाही.. त्यामुळे या स्वैर भटकंतीत ते कवी-गीतकार झाले, कवी संगीतकार, कवी-गायक, कवी-सादरकर्ता झाले आणि कवी-दिग्दर्शकही.. मोघे या सगळ्यात खूप रमले पण एकाही प्रकारात गुंतून पडले नाहीत.. मुशाफिराच्या ठायी असते ती अलिप्तता त्यांच्याकडे होती कवितेशी एक बांधिलकी होती.. आपण आणि आपली कविता नावाची सखी तिच्यातच ते मग्न राहिले..
कीर्तनकार सुधीर मोघ्यांनी
"तूच मायबाप बंधू तूच प्राणसखा
दीन दुःखितांचा एक तूच पाठीराखा
सज्जनांचा कैवारी तू दुर्जनांचा वैरी
अनाथांच्या नाथा तुझी रूपे नानापरी
तुझ्याविना उभा जन्म होईल पोरका"
अस म्हणून आपल्या भक्तीला शब्दरूप दिल
तर प्रेम कवी सुधीर मोघ्यांनी
"गुज ओठांनी ओठांना सांगायचं
एका पावसात दोघांनी भिजायचं
तसं कधीचं आभाळ आलंय भरून
जळ ढगांत सांकळे केव्हापासून
वेडं उधाण कशाला रोखायचं"
अस म्हणून प्रीतीला भावरूप दिल.
आपल जीवन म्हणजे काय तर एक झोका, अस म्हणत त्यांनी त्याचीही कविता केली..
"एक झोका,चुके काळजाचा ठोका,एक झोका
उजवीकडे डावीकडे डावीकडे उजवीकडे
जरा स्वतःलाच फेका
नाही कुठे थांबायचे मागेपुढे झुलायचे
हाच धरायचा ठेका
जमिनीला ओढायचेआकाशाला जोडायचे
खूप मजा, थोडा धोका"
आणि अस म्हणताना याच झोक्याचा "रासझुला" देखील केला.. तिच्या कृष्णावरच्या प्रेमाचं गीत झाल..
"झुलतो बाई रास-झुला
नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा
प्राणहीन भासे रासाचा रंग
रंगहीन सारे नसता श्रीरंग
चोहीकडे मज दिसे हरि सांवळा"
पहिल्या वहिल्या प्रेमात सगळीकडे तीच दिसत असते, पण जेव्हा ती खरचं प्रत्यक्ष भेटते तेव्हा सगळा निसर्ग जणू आपल्यासाठी खुलला आहे सगळे ऋतू फक्त आपल्यासाठीच फुलले आहेत अस वाटत..आणि तो गाऊ लागतो...
"दिसलीस तू, फुलले ॠतू उजळीत आशा हसलीस तू
उरले न आंसूं विरल्या व्यथाही सुख होऊनिया.. आलीस तू
जाळीत होते मज चांदणे जे ते अमृताचे.. केलेस तू
मौनातुनी ये गाणे दिवाणे त्याचा अनामी.. स्वरभास तू
जन्मात लाभे क्षण एकदा हा ते भाग्य माझे.. झालीस तू"
त्याच्या प्रेमाची प्रचीती आल्यावर तीदेखील त्याला आश्वासित करते आणि म्हणते
"दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !
स्वप्‍नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे
आनंदाची अन्‌ तृप्‍तीची शांत सावली इथे मिळे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे ! "
त्या दोघांचा आयुष्यात नवीन अंकुर खुलण्याची चाहूल लागते, आपले कष्ट संपणार अस वाटू लागत आणि मग दोघही गाऊ लागतात
" ढगावानी बरसंल त्यो, वार्‍यावानी हसवंल त्यो
फुलावानी सुखवील, काट्यांलाबी खेळवील
समद्या दुनियेचं मन रिझवील त्यो
असंल त्यो कुनावानी, कसा ग दिसंल
तुज्यामाज्या जीवाचा त्यो आरसा असंल
दिसं जातील, दिसं येतील
भोग सरंल, सुख येईल"
सांजवेळेला आपल्या शब्दकवेत घ्याव ते मोघ्यानीच
काय लिहून गेलेत ते!!
"सांज ये गोकुळी, सांवळी सांवळी
सांवळ्याची जणू साउली
माऊली सांज अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वार्‍यावरी वाहते बांसरी
अमृताच्या जणू ओंजळी" यात 'अंधार-पान्हा' हि उपमा सुचण हेच किती महान आहे!!!
" तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो
मी बीज सावल्यांचे पेरीत चाललो
वैराण माळ उघडा बेचैन तळमळे
मी दान आसवांचे फेकीत चाललो " अस म्हणत स्वतःच्या दुखातही दुसर्यासाठी सुखाची सावली शोधणारे मोघे हे दुखः दूर होऊन सुखाचा प्रकाश पसरल्यावर गाते न होते तरच नवल...
" फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
दरीखोर्‍यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश
दंव पिऊन नवेली झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास "
मोघे विलक्षण प्रतिभावान होते.. प्रज्ञा, मेधा, प्रतिभा सगळ त्याच्यात ठासून भरल होत.. "नक्षत्रांचे देणे' , जागतिक मराठी परिषदेत गाजलेला "स्मरण यात्रा' 'माडगूळ्याचे गदिमा' किंवा "मी विश्‍वाचा' या सगळ्या गोष्टी याच्याच द्योतक आहेत...आणि यावर कडी म्हणजे "कविता पानोपानी' हा काव्य सादारीकारणाचा रंगमंचीय आविष्कार!!
असा हा रसिकांचा लाडका कवी काही दिवसांपूर्वी अनंताच्या प्रवासाला गेला.. तरीही त्यांच्या गाण्यातून, कवितेतून आणि सर्वात महत्वाच शब्दांमधून ते कायम आपल्यात राहणार आहे..कारण तेच सांगून गेले आहेत...
" सप्तस्वरांनो लयशब्दांनो जगेन तुमच्यासाठी
तुमच्यासाठी मरेनही मी, जगेन तुमच्यासाठी
तुम्हीच माझे मायतात हो तुम्हीच माझे गुरू
अनंत हस्ते अखंड दाते समूर्त कल्पतरू
तुम्हीच माझे सात सूर्य अन्‌ तुम्हीच माझी धरती
तुमच्यासाठी मरेनही मी, जगेन तुमच्यासाठी"
सलाम!!! ___/\___