Friday 24 April 2015

तरुणाईचा लाडका कवी - संदीप खरे!



आज आपण अशा एका कवीला भेटणार आहोत ज्याच्या उल्लेखाशिवाय तरुणाईला माहित असलेल्या कवींची यादी पूर्ण होऊच शकत नाही!! अस्सल पुणेरी, बोलण्यात आणि लिखाणात आजच्या काळातल्या कवींना मागे टाकणारा एक इलेक्ट्रिकल इंजिनिअर! "मौनांची सुद्धा भाषांतरे" करणारा हळवा माणूस!! आता एवढं सांगितल्यानंतर खरतर नाव सांगायची गरजच नाही!! हा आहे आयुष्यावर लिहिणारा, आयुष्यावर बोलणारा आणि कवितेवर जीवापाड प्रेम करणारा प्रेमळ कवी.. संदीप खरे!!!
माझी आणि संदीपच्या कवितांची ओळख झाली ती "आयुष्यावर बोलू काही" मधूनच!! त्याचं सादारीकरण अप्रतिम आहे.. एक सांगीतिक कार्यक्रम असूनही त्यात सुरांइतकच शब्दांनाही महत्व आहे!! साधे सोपे परंतु मनाला भिडणारे शब्द!
"जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही ! चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !
उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही"
त्याला माहित आहे कि एकदा डोळ्याला डोळे भिडले कि संवादाची भाषा बदलते.. मग शब्द नसले तरी चालतात.. म्हणूनच जोवर डोळ्याला डोळा भिडला नाहीये तोवर शब्दांच्या संगतीचा आनंद घेऊ!!
"उद्या-उद्याची किती काळजी बघ रांगेतुन परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणुनी वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही!!"
असे हे शब्द... खडतर, अंधार्या वाटेवर साथ देणारे.. कधी दुसर्याने लिहिलेलं वाचून मनाला उभारी देणारे तर कधी स्वतःच्या मनातलं कागदावर उमटवायला मदत करून आपल्याला हलकं करणारे!! अशा शब्दांविषयीच हा मनुष्य कायम बोलत आलेला आहे!!
त्याच्या बर्याचश्या कविता या प्रेम कविता आहेत.. पण त्यातही अनेक पदर आहेत.. तो आणि ती.. एकमेकांबद्दल प्रेमभावना वाटत असूनही अजून व्यक्त झालेले.. ती तिच्या गावी निघाली आहे.. तो तिला निरोप द्यायला आलेला आहे.. तिला वाटत आता तो काहीतरी बोलेल.. त्याला वाटत आता ती काहीतरी काहीतरी बोलेल.. बोलेल बोलेल म्हणता म्हणता.. अखेरीस गाडी सुटते.. आणि त्याच्या मनाचा बांध सुटतो.. मनातल्या मनात तो म्हणू लागतो..
" हे भलते अवघड असते कुणी प्रचंड आवडणारे, ते दूर दूर जाताना
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना डोळ्यांतील अडवून पाणी, हुंदका रोखुनी कंठी
तुम्ही केविलवाणे हसता अन्तुम्हास नियती हसते हे भलते अवघड असते
तिच्या गाडीचा दूर जाताना होत असलेला ठिपका बघत तो परत फिरतो.. मनात फक्त तिच्या आणितिच्याच आठवणी असतात! पाय जड झालेले असतात! तिची आठवण सलत असते.. मित्रांसोबत गप्पा गोष्टी करताना मनात मात्र तीच असते.. पण दोघांमधलं अंतर संपण्यासाठी निर्माण झालेलं असत!!
"परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी ओठांवर शीळ दिवाणी बेफिकीर पण थरथरती
पण क्षणक्षण वाढत असते अंतर हे तुमच्या मधले मित्रांशी हसतानाही हे दु: चरचरत असते
हे भलते अवघड असते"
हि कविता आहे त्याचं नसलेल्या प्रेयसीची.. जिच्यापासून काहीकाळ दुरावताना त्याने तिला विचारलेल असत कि काय राणी मी दूर गेलो तर तुला माझी आठव येईल ना.. त्या आठवणीने तू दोन थेंब अश्रू तरी ढाळशील ना.. आणि म्हणलेलं असत..
"कसे सरतील सये माझ्याविना दिसं तुझे ?
सरताना आणि सांग सलतील ना !
गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यांवर
मुसूमुसू पाणी सांग भरतील ना ! .....
इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी
झडे सर ..... काचभर तडा !
तूच तूच ..... तुझ्या तुझ्या ..... तुझी तुझी ..... तुझे तुझे
सारा सारा तुझा तुझा सडा !! -
पडे माझ्या वाटेतून
आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना!!"
पण जेव्हा त्याची हक्काची ती दूर जाते तेव्हा तिच्या अस्तित्वाने मंतरलेली तिची खोली याला खायला उठते.. तिच्या गंधाला सरावलेला वारादेखील ती नसताना घरात यायला नाही म्हणतो... आणि अशावेळेस मात्र त्याची अवस्था अगदी केविलवाणी होऊन जाते.. तिच्यावाचून याचा जन्मच अडतो!!!
"नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो
नभ फाटून वीज पडावी कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते अन्चंद्र पोरका होतो
येतात उन्हे दाराशी हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन वारा तव गंधावाचून जातो
तू सांग सखे मज काय मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास माझ्यासह मिणमिण मिटतो
ना अजून झालो मोठा ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते तुजवाचून जन्मच अडतो !"
आणि हि त्याची अवस्था तिला कळावी म्हणून तितक्याच आर्ततेने तो साद घालतो..
" प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी, मला एकटेसे अता वाटताहे
कुणालाच जे सांगता येत नाही, असे काहीसे मन्मनी दाटताहे
असे वाटणे ही अशी सांज त्यात, दुरावा स्वत:शी.. तुझ्याशी दुरावा
किती फाटतो जीव सगळ्यात यात, मिठीतून देईन सगळा पुरावा
प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी, मला एकटेसे अता वाटताहे"
तिला स्मरताना त्याला रुणझुणत्या पावसाच निमित्त पुरतं.. त्याचा तो ओलेत गंध आठवणींना सोबत घेऊन येतो.. आणि मग तो कोसळता पाऊस आठवणींचा सोहळा होऊन जातो..
" पाऊस असा रुणझुणता पैंजणे सखीची स्मरली
पाऊल भिजत जाताना चाहुल विरत गेलेली
नभनको नको म्हणताना पाऊस कशाने आला ?
गात्रांतुन स्वच्छंदी अन्अंतरात घुसमटलेला !!"
पण जेव्हा त्याला खात्री पटते कि प्रेमामधला एखादा विराम नसून पूर्ण विराम आहे.. आता तो आणि ती कधीच सोबत असणार नाही.. तेव्हा मात्र ते प्रेमभंगाचे दुःख त्याला चिरत जात.. आणि तो विचारात राहतो.. ती अजूनही तशीच नाजूक, सुंदर असेल का?? जशी मला ती आठवत राहते तसाच मी तिला आठवत असेन का?? आमच्या दोघांचे सोनेरी क्षण तिला आठवत असतील का?? 
सांग सख्या रे आहे का ती अजून तैशीच गर्द राईपरी ?..
सांग जशी ती मिटली होती जरा स्पर्शता लाजाळूपरी
आणिक उमटुन गेली होती लाली अवघ्या तारुण्यावरी !
तिने ठेवला आहे का रे जपून क्षण तो मोरपिसापरी ?
अता बोलणे आणि वागणे यातील फरकाइतुके अंतर-
-पडले; तरिही जाणवते मज कवितेमधुनी तिचीच थरथर !
सांग तिला मी आठवतो का तिजवर रचलेल्या कवितेपरी ?"
तिलासुद्धा त्याची आठवण येत असते.. आणि तिकडे ती देखील गात असते..
"सूर्य डोईवर जळणारा, चांदराती झगमगणारा
दिशा दिशा तरी कशा उदास रे गमल्या
तुझ्याविना.. सखया तुझ्याविना.."
प्रेमाकावितेबरोबरच त्याने वेगळ्या धाटणीच्या कविता देखील लिहिल्या.. चाकोरीमधून बाहेर पडण्याचा कंटाळा करणार्यांसाठी "मी मोर्चा नेला नाही.. मी संपही केला नाही" लिहील... कंटाळ्याचाही कंटाळा येणाऱ्या निष्क्रिय लोकांना  "आताशा मी फक् रकाने दिवसांचे भरतो.. चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो" अस म्हणत कोपरखळी मारली.. आणि त्याच वेळेस धाडस करून तेच ते जगात राहणाऱ्या लोकांना चपराक दिली..  "नामंजूर" लिहिली.. संधी वाट बघता संधी निर्माण  करायला सांगितल..
"जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर !
अन्वार्याची वाट पाहणे - नामंजूर !
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर !"
प्रत्येक बाबाला आपल्या लेकीला जे सारं काही सांगायचं असत पण सांगता येत नाही नाही अशा सगळ्या बाबांची तो लेखणी झाला.. आणि त्याने दमलेल्या बाबाची कहाणी लिहिली..
"सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये,
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये ?" असा आर्त सवाल केला... प्रत्येक लेकीच्याच नव्हे तर तिच्या बाबाच्या डोळ्यातही पाणी आणल या कवितेने..
बर्याचदा अस होत कुठेतरी काहीतरी बोचत असत..  दिवस असे असतात कि "कोणी माझा नाही
अन्मी कोणाचा नाही .. " आणि अचानक डोळे वाहू लागतात आपल्या अशाच मनःस्थितीच वर्णन करताना संदीप म्हणतो..
"अताशा असे हे मला काय होते ?
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दांत येते"
अस सगळ नाजूक, हळवं लिहित असताना दिवसेंदिवस मानसिक खच्चीकरण करत असलेल्या या जगात आशेचा किरण कधी येणार असही तो विचारतो!!
"अजून उजाडत नाही !
दशकांमागुन सरली दशके अन्शतकांच्या गाथा !
ना वाटांचा मोह सुटे वा ना मोहाच्या वाटा !
पथ चकव्याचा, गोल, सरळ वा- कुणास उमगत नाही
प्रवास कसला ? फरफट अवघी ! पान जळातून वाही ..
अजून उजाडत नाही !"
"नेणिवेची अक्षरे.. तुझ्यावरच्या कविता" असे काव्यसंग्रह याच्या नावर आहेत!! कधीही कुठलाही पण काढावं आणि वाचावं असे.. प्रत्येक कविता आवडणारी.. आपली वाटणारी.. मनात  जपून ठेवावी अशी वाटणारी.. संदीप तुझ्या कविता अशाच खुलत राहोत.. आम्हाला अशाच आनंद देत राहोत!!