Sunday 16 March 2014

गझल सम्राट "सुरेश भट"!!!!



आज मी सुरुवात करतानाच अडखळले आहे.. कारण ज्या कवीचा परिचय करून घ्यायचा आहे त्यांच्या साहित्य प्रकारामध्ये एवढी लोकप्रियता आहे, काय निवडाव काय वगळाव कळेना झाल आहे..
कवितेला घेतलं तर गझल नाराज होईल.. त्यातही प्रेम कवितेला निवडल तर आत्म-मग्न कविता नाराज होईल... ज्यांच्या कवितेचा प्रांत थोडासा उपेक्षेमधून जात नंतर विस्तारला अशा गझल सम्राट "सुरेश भट" यांना आजची मानवंदना!!!
अमरावतीच्या कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबातल्या डॉक्टर श्रीधर भटांच हे प्रथम अपत्य!! लौकिक अर्थाने अपयशी परंतु कवितेच्या जगात इतका मान मिळवून गेले कि त्यांची
"लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी"
हि कविता आज मराठी अभिमान गीत झाल आहे..
त्यांचे तीनच कविता संग्रह त्यांना मोठ्ठ बनवून गेले आहेत..
अडीच वर्षांचे असताना पोलिओ मुळ पाय निकामी झाला तरीदेखील त्यांची इच्छाशक्ती लुळी पडली नाही. उलट वाढत राहिली आणि त्यांचा काव्यावरचा विश्वास वाढवत राहिली.. म्हणूनच ते त्यांच्या "एल्गार" मध्ये म्हणतात ''जोपर्यंत मानवजात ह्य़ा पृथ्वीतलावर शिल्लक आहे तोपर्यंत लय, ताल आणि सूर शिल्लक राहतील आणि म्हणूनच वृत्तबद्ध गेय कविता कधीही कालबाह्य़ होणार नाही. जे काव्य मूलभूत मानवी मूल्यांशी इमान राखते, जे मानवाच्या सुखदु:खांविषयी, त्याच्या स्वप्नांविषयी, त्याला हव्या असलेल्या न्यायासाठी उत्कटपणे व परिणामकारकपणे बोलते ते काव्य कधीही कालबाह्य़ होत नाही.''
त्यांना स्वतःच्या वेगळेपणाचा सार्थ अभिमान होता या अभिमानापोटीच ते म्हणतात,
"रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !"
आणि तरीही लिहितं करणाऱ्या त्या प्रतिभेच्या आणि कवितेच्या ऋणाईत राहताना म्हणतात,  "लिहिणारा माणूस कवितेत लपत नसतो. तो आपल्या कवितेत लपूच शकत नाही. कविता आरशाचे काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि लबाड व घाणेरडे चेहरेही दाखवते. केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते." मनातल्या भावगंधाने कविता मोहरायला हवी, सुगंधित व्हायला हवी हेच तत्व ते कायम जगात राहिले..
माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या मातृभूमीशी त्याने एकनिष्ठ राहायला हव, तिचे पांग फेडायला हवेत अस सांगताना ते म्हणतात,
"गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.
आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा.
आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला !
मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी,
माझी ललाटरेषा बनते प्रयाग... काशी !
आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी !"
शब्दांची निवड हे भटांचं बलस्थान आहे, म्हणूनच त्यांची कविता रसिकांच्या काळजाला थेट भिडते.
गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !
हे वाचताना एक वीरश्री संचारते..
तर
"आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी !
तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढुनी खुशाल रंग टाकतो
रंगवून रंगुनी गुलाल फासतो
सांगते अजूनही तुला परोपरी !" हे वाचताना मधुराभक्तीचा अनुभव येतो..
भटांनी कविता लिहिल्या, पद, गवळण, भूपाळी अशा पारंपारिक रचना देखील लिहिल्या पण त्याचं मनापासून प्रेम होत ते मात्र गझलेवर!! त्यातही प्रेमाचा वेगवेगळा अविष्कार करणाऱ्या गझलेवर..
मग ती गझल कधी धीट शृंगार व्यक्त करणारी होती,
"आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली
उरले जराजरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली
अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्याजचा
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ? "
तर कधी
"मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!जेव्हा तू नाहशील,
दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल!
जेव्हा रात्री कुशीत
माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतून गुणगुणेल!
मग सुटेल मंद मंद
वासंतिक पवन धुद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल" अस म्हणत वियोगानंतर तिच्या आठवणींमधली व्याकुळता व्यक्त करणारी होती..
कधी
"सजण दारी उभा, काय आता करू ?
घर कधी आवरू ? मज कधी सावरू ?
मी न केली सखे, अजुन वेणीफणी,
मी न पुरते मला निरखिले दर्पणी
अन्‌ सडाही न मी टाकिला अंगणी
राहिले नाहणे ! कुठुन काजळ भरू ? " अस म्हणत नवथर प्रेम व्यक्त करणारी होती..
तर कधी
"देखावे बघण्याचे वय निघून गेले
रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले
हृदयाचे तारुणपण
ओसरले नाही पण
झंकारत झुरण्याचे वय निघुन गेले
एकटाच मज बघून
चांदरात ये अजून
चांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले
आला जर जवळ अंत
कां हा आला वसंत?
हाय,फुले टिपण्याचे वय निघून गेले " अस म्हणत प्रेम करायचं वयच निघून गेल्याची खंत करणारी होती...
भटांच्या शब्द्सामर्थ्याला जेव्हा मंगेशकर कुटुंबियांच्या स्वराच, संगीतच कोंदण लाभत तेव्हा रसिक तृप्त होतात.. "उषःकाल होता होता काळरात्र झाली", "मेंदीच्या पानांवर मन अजून झुलतय ग", "चांदण्यात फिरताना माझा धरलास हात", "केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली", "तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे", "मी मज हरपुन बसले ग ", "मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे", "मालवून टाक दीप चेतवून अंग अंग", "उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे" किती नाव घ्यावीत...
भट कुणालाही न कळणारे अजब रसायन होते. आपल्याच मस्तीत एका कलंदरासारखे जगत राहिले. आयुष्याच्या काही अवघड, कठीण वाटांवर कवितेलाच सखी मानून जगात राहिले.. कधी अंतर्मुख होऊन जीवनाला प्रश्न विचारात राहिले,
"सूर मागू तुला मी कसा ?
जीवना तू तसा, मी असा !
तू मला, मी तुला पाहिले
एकमेकांस न्याहाळिले
दुःख माझातुझा आरसा !
एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा
खेळलो खेळ झाला जसा! "
काहीसा स्पष्टवक्ता आणि त्यामुळच फटकळ वाटणारा हा शब्द-सुरांचा जादुगार, रसिकांचा लाडका कवी!!! त्यांची कविता या हृदयीचे त्या हृदयी अशी शिरते आणि तिथेच राहते अगदी कायमसाठी! अगदी रेशमाचे बंध बनून!