Tuesday 4 April 2017

पॉंडिचेरी बस नाम ही काफ़ी है..

मी तशी लहानच होते तेव्हा. मोठ्या शाळेत येऊन काहीच महिने झालेले. आणि आईने दिवाळीत हैद्राबादला जाऊया असा प्रस्ताव मांडला. गृहमंत्र्यांचा प्रस्ताव नाकारण्याची हिम्मत आजही आमच्या कोणामध्येच नाही, तेव्हा तर सवालच नव्हता. ती आमची पहिली लॉन्ग टूर. त्यानंतर जी टूर-टूर सुरु आहे ती आजतागायत. तर, जेव्हा नवीन ठिकाणी फिरायला जायचो तेव्हा एक गोष्ट सगळीकडे कायम दिसायची ती म्हणजे पाठीवर एखादी सॅक, हातात मॅप(तेव्हा गूगल मॅप्स नव्हते) आणि गॉगल्स घातलेली परदेशी मंडळी. ही मंडळी एकेकटी एवढ्या लांब येतात, दुसऱ्या देशात राहतात, सगळं म्हणजे सगळं नवीन असूनही मस्त मजा करतात. ते बघून या अशा ट्रॅव्हलर्सबद्दल एक कुतूहल होतं. आयुष्यात एकदा तरी हे असं करायचं असं तेव्हाच कुठेतरी मनात घर करून बसलेलं. परवा त्याला मुहूर्त लागला आणि पॉंडिचेरीला जाणं झालं.

            बंगलोरमध्ये असताना माणूस पॉंडिचेरीला गेला नाही म्हणजे घाटावर राहणाऱ्या आणि फिरायची आवड असणाऱ्या माणसाने कोकणात न जाण्यासारखं आहे. इथून पूर्वेकडचा जवळचा आणि सुंदर समुद्रकिनारा असणारं शहर म्हणजे पॉंडिचेरी. इतकं साधं सोपं गणित आहे हे.

इथून निघून एखाद्या वीकेंडला संपूर्ण पॉंडिचेरी बघता येतं. शुक्रवारी रात्री निघालं कि शनिवारी पहाटे पहाटे माणूस पॉंडिचेरीमध्ये येतो. आपलं नशीब चांगलं असेल तर नुकतं तांबडं फुटत असताना आपण तिथे पोहोचतो. बसने जात असू तर बसस्टॅन्डपाशीच एखादी रिक्षा करायची (मीटरने मिळायची शक्यता कमीच)आणि सरळ बीच रोड गाठायचा. रोडच्या २०-२५ मीटर अलिकडे रिक्षा थांबते कारण संध्याकाळी पाच ते सकाळी नऊ हा रस्ता गाड्यांसाठी बंद असतो. रिक्षातून उतरत असताना आकाश उजळत असतं. थोडंसं चाललो कि एकदम मऊ मऊ वाळूत पोहोचतो आपण. आपल्या स्वभावाला साजेल अशी जागा शोधायची आणि सूर्योदय बघायचा. मधेच एखादा ढग सूर्याशी लपाछपी खेळत असतो. आयुष्यात बऱ्याचदा समुद्रावरचा सूर्यास्त बघणाऱ्या पश्चिम किनाऱ्याकडच्या आपल्यासाठी हा फार सुखद अनुभव असतो. जर आपण सप्टेंबर ते फेब्रुवारीच्या आसपास गेलो तर साडे सात-आठ वाजेपर्यंत किनाऱ्यावर बसू शकतो. चक्कर मारू शकतो. रोडच्या टोकाशी चहावाले असतात, तिथे १० रुपयांत सुंदर चहा पिऊ शकतो किंवा किनाऱ्यावर शांतपणे बसू शकतो....

            पॉंडिचेरीमध्ये बघायलाच हव्यात अशा ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे ऑरोविले, अरबिंदो आश्रम, पॅराडाईज बीच, सेरेनिटी बीच, Basilica of the Sacred Heart of Jesus .आणि वेळ उरलाच तर मग बोटॅनिकल गार्डन, सायंटिफिक गॅलरी, Immaculate Conception Cathedral, ऑरोविले बीच, म्युझियम्स आणि जितकी हवी तितकी मंदिरं.  स्टॅन्डजवळच टू व्हीलर्स भाड्याने मिळतात, दिवसाला चारशे रुपये.मी विजय आर्या नावाच्या दुकानामधून गाडी भाड्याने घेतली होती. आपल्या आवडीची, सोयीची गाडी घ्यायची आणि पॉंडिचेरी फिरायला निघायचं.


            पॉंडिचेरीपासून साधारण ११ किलोमीटरवर असणारी ऑरोविल ही अशी जागा आहे जिथे जवळपास पन्नास देशांतून ५०,००० लोक येऊन राहत आहेत. ही खऱ्या अर्थाने 'वसुधैव कुटुंबकम' आचरणात आणणारी जागा आहे. कुणीही या, स्वयंसेवक व्हा, राहा आणि इथलेच होऊन जा असं त्यांचं तत्व आहे. योगी अरविंदांच्या साथी मीरा अल्फासा ज्यांना सगळे माताजी किंवा मदर म्हणतात त्यांनी या अनोख्या टाऊनशिपची संकल्पना मांडली. २८ फेब्रुवारी १९६८ जवळपास ५००० लोकांनी एका वडाच्या झाडाखाली(जे अजूनही तिथे आहे) भूमिपूजन केलं आणि या जागेच्या जन्माची कथा मांडायला सुरुवात झाली. आता मात्र खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा विस्तार झालेला आहे. मातृमंदिर हे तिथे असणारं एक अनोखं ध्यानकेंद्र आहे. त्यात ध्यानासाठी १२ खोल्या आहेत. प्रत्येक खोलीचा रंग वेगळा आहे. खूप विचार करून हे केंद्र बांधण्यात आलेलं आहे. त्याची संपूर्ण माहिती बुकिंग बूथजवळ मिळते. मातृमंदिरात आतमध्ये जाण्यासाठी किमान एक दिवस आधी परवानगी घ्यावी लागते. आणि रविवारी हे केंद्र बंद असतं. त्यामुळे फक्त शनिवार-रविवार जाणाऱ्या लोकांना ते बघायला मिळत नाही. पण त्याचा विडिओ मात्र बघता येतो आणि दुरूनच ते केंद्रदेखील बघता येतं. त्यावरून साधारणपणे अंदाज येतो.

            ऑरोविल मध्ये आपल्याला पाठीवर सहा महिन्याच्या बाळाला बांधून अव्हेंजरवरून जाणारी एखादी जर्मन बाई दिसेल. पोटावर एक बाळ आणि मागे सीटवर एक असं घेऊन सायकलवरून मातृमंदिराकडे जाणारी एखादी कोरियन बाई दिसेल. किचनमध्ये ऑर्डर देणारा एखादा चिनी पुरुष दिसेल. आणि असे बरेच लोक दिसतील. एकमेकांची भाषा येत नसूनही इथे लोकांनी खूप शांत वसाहत वसवली आहे.त्यामुळेच कदाचित इथून बाहेर पडताना आपल्यालाही खूप शांत वाटल्याशिवाय राहत नाही.

            ऑरोविल मधून परत येताना तिथला बीच बघायचा. पॉंडिचेरीमध्ये एखादा बीच सोडला तर बाकीचा कुठलाही बीच खेळण्यासाठी अनुकूल नाही. त्यामुळं वेडं धाडस करू नये. मग तिथून निघून सरळ सेरेनिटी बीचवर यायचं. अथांग समुद्र, मागे मावळतीला निघालेला सूर्य आणि आपण. केवळ सुख. इथे कितीही वेळ बसलं तरी निघावंसं वाटत नाही. आजूबाजूला सुंदर कॅफे आहेत. खायची-प्यायची(प्यायची विशेष) चैन आहे. एवढं होईपर्यंत संध्याकाळ संपून जाते. फ्रेंच डिनर किंवा स्पेशल तामिळ डिनर करावा आणि बीच रोडवर येऊन बसावं. खऱ्या मुंबईकराला मरीन ड्राइव्ह म्हणल्यावर कसं वाटतं तसं आपल्याला इथे वाटतं. रोडच्या टोकाशी GMT आईस्क्रिम शॉप आहे. 'नो वन शुड मिस धिस..' नंतर मग वाटलं तर रात्रभर बीचरोडवर बसता, फिरत येतं.

            दुसऱ्यादिवशी पॅराडाईज बीच आणि अरबिंदो आश्रम बघायचा. पॅराडाईज बीचला दोन प्रकारे जाता येतं. रस्त्याने गेलो तर आपण थेट बीचवर पोहोचतो. नाहीतर मग 'चुन्नाम्बर' जवळ गाडी पार्क करायची आणि बोटीने बीचवर जायचं. दोन्ही अनुभव सुरेखच आहेत. बोटने जायचं असेल तर सकाळी ९ ची पहिली फेरी गाठायची आणि बीचवर धमाल करायची. नावाला साजेसा असा बीच आहे हा. एवढं होईपर्यंत १२ वाजून जातात. मग मस्त जेवण करायचं. म्युझिअम्स आणि चर्चेस बघायची. रविवार असेल तर 'मास' म्हणजे काय असतं तेही अनुभवता येतं. खूप देखणी आणि व्यवस्थित राखलेली चर्चेस आहेत ही. वाटलं तर बोटॅनिकल गार्डन बघायची, जिथे टॉय ट्रेनमध्ये बसता येतं. पुन्हा लहान होता येतं...

            नंतर साधारण दोनच्या आसपास अरबिंदो आश्रमात जायचं. हा आश्रम ९-१२ आणि २-६ पर्यटकांसाठी खुला असतो. तिथे कितीही वेळ बसता येतं. अट मात्र एकच. अज्जिबात आवाज करायचा नाही. योगी अरविंदांच्या कथा प्रचंड रोमहर्षक आहेत. त्याबद्दल तिथल्या लायब्ररीमध्ये विपुल साहित्य उपलब्ध आहे. आश्रमातून बाहेर पडताना खूप शांत आणि समाधानी वाटतं.

            मग पुन्हा एकदा बीचरोड वर जायचं. सनसेट अनुभवायचा. गार वारा खात चक्कर मारायची. अनेक महिन्यांची ऊर्जा मिळते इथे. मनसोक्त भटकून झालं कि मग गाडी परत द्यायची आणि परतीच्या प्रवासाला निघायचं..

            इथे अजूनही फ्रेंच प्रशासनाच्या खुणा आहेत. पॉंडिचेरी आणि पुदुच्चेरी मध्ये इंडिया आणि भारतात जसा फरक आहे तसा फरक जाणवतो. भाषेची थोडीफार अडचण होऊ शकते पण सगळं निभावून नेता येतं अशी जादू आहे इथे. खूप सच्ची माणसं आहेत. सगळ्यांत समाधानाची गोष्ट म्हणजे कमी कपड्यांतल्या मुली असूनही कोणी कोणाला वखवखलेल्या नजरेने बघत नाही, कुत्सित शेरे मारत नाही. त्यामुळं सगळीकडे एक आश्वासक सुरक्षितता आहे जी आजकाल क्वचितच अनुभवायला मिळते. खूप कमी ठिकाणी गेल्यावर वाटतं कि आपण इथे कितीही वेळा येऊ शकतो. तसंच काहीसं झालं इथे. फारच प्रेमात पडले मी या शहराच्या.. After all, life is great by the sea, toes in the sand and waves rolling in feeling the breeze!!!

P.S. Special thanks to google maps and headphones!

Thursday 2 February 2017

गोष्ट तिची- प्रत्येकीची!!

अगं रश्मी, आजसुद्धा बोलणार नाहीस का तू? दुसऱ्यांदा भेटतोय आपण. पहिल्या वेळेस मला वाटलं अजिबातच ओळख नाही म्हणून बोलत नसवीस तू. पण अगं, न सांगता मनातलं ओळखता यावं तेही बायकांच्या असं कुठलंही शास्त्र अजून विकसित झालेलं नाहीये. सांग बरं काय झालंय नक्की.' रश्मीच्या डोळ्यांतली तेवढ्यापुरती आलेली चमक नाहीशी झाली. डॉ. राधाने पुन्हा एकदा सुरुवातीपासून बोलायला सुरुवात केली. 'रश्मी, मागच्या सेशनच्या वेळेस राजेश होता. आज तोही नाहीये. कसलं एवढं टेन्शन आहे तुला?' नंतर जवळपास पंधरा-वीस मिनिटे राधा रश्मीला बोलतं करायचा प्रयत्न करत होती. पण सगळं व्यर्थ. शेवटी दुसरा सेशनही लवकरच संपवून राधाने तिला जायला सांगितलं. त्या दिवशी जास्त पेशंट्स नव्हते त्यामुळे राधाकडे तसा बराच वेळ होता. तिने लगेचच रश्मीच्या केसवर विचार करायला सुरुवात केली. पहिल्या वेळेस जेव्हा राजेश आणि रश्मी आलेले तेव्हा राजेशने प्रॉब्लेम सांगितला होता, ‘मी जवळ आलो कि रश्मीला घाम फुटतो आणि ती प्रचंड बिथरून जाते. लग्नाला चार महिने होऊन गेले पण अजूनही तिची अवस्था अशीच आहे. We have not yet consummated our marriage. गायनेकोलोजीस्टकडेसुद्धा जाऊन तिच्या सगळ्या तपासण्यादेखील करून घेतल्या आहेत. शारीरिकदृष्ट्या रश्मी अत्यंत सुदृढ आहे. तरी पण हे असं का होत असावं काही कळत नाही.’ हे सगळं आठवल्यावर राधाला एकूण परिस्थितीचा जरा अंदाज आला. पुढच्या सेशनला आता डायरेक्टच काय ते विचारू असं म्हणत राधाने रश्मीची फाईल बंद केली.

पुढचा आठवडा आला आणि ठरलेल्या वेळेस राजेश-रश्मी दवाखान्यात हजर झाले. राजेशची विचारपूस करून राधाने त्याला जायला सांगितलं. आता कन्सल्टिंग रूममध्ये त्या दोघीच होत्या. रश्मीकडे बघत राधा म्हणाली, ‘आज मी तुला एक गोष्ट सांगते. मी सहावीत होते. बाबांची फिरतीची नोकरी होती. दर दोन वर्षांनी आम्हांला एका शहरातून दुसऱ्या शहरात जायला लागायचं. अर्थातच एका ठिकाणी ओळख होऊन मैत्री होईपर्यंत आम्हाला ते ठिकाण सोडावं लागायचं. मी सहावीत असताना आम्ही इथे आलो. शाळा नवीन, क्लास नवीन. सुदैवाने सगळं घराशेजारी होतं. पहिले दोन-तीन दिवस आई आली सोडायला. मग मला माहित झाल्यावर मी एकटी जायला लागले. क्लासच्या समोर एक छोटी गल्ली होती. अंधार झालं कि भीती वाटायची तिथून येताना. त्या गल्लीचं तोंड म्हणजे काही लोकांनी मुतारीच करून ठेवलेली. एकेदिवशी क्लास संपवून मी घरी येत होते. एकटीच होते. एक माणूस तिथे उभा होता. त्याने त्याचं काम आटपलं आणि प्यांटची चेन बंद न करता माझ्या दिशेने यायला लागला. सुरुवातीला मला समजलंच नाही नक्की काय होतंय ते. पण जेव्हा कळल तेव्हा उलट पावली पळत मी क्लासमध्ये गेले. बरंच वेळ तिथे बसून राहिले. नेहमीची वेळ झाली तरी मी घरी पोहोचले नाही म्हणल्यावर बाबा क्लासमध्ये आले. त्यांना बघून मला रडायलाच आलं...’ राधा बोलता बोलता थांबली. रश्मीच्या डोळ्यांतून पाणी येत होतं. हुंदके देत देत रश्मी बोलायला लागली. राधाचा अंदाज खरा होता. रश्मी ‘सेक्शुअल अब्युझ’ची शिकार झालेली होती. तिच्या मनातलं ती कुठे बोलूच शकली नव्हती. या सगळ्याची सुरुवात झालेली ती सात वर्षाची असताना. तिच्या रिक्षेवाल्या काकांकडून. तेव्हा जे ती बिथरली ते कायमचीच. मग नंतर बसमधून जाताना छुपे स्पर्श झाले. ट्रेनमधून जाताना, तिचे आई-बाबा सोबत असताना त्यांचं लक्ष नाही हे बघून तिला नको तिथे दाबलं गेलं. आणि त्यामुळं तिला पुरुषस्पर्शाची शिसारी येऊ लागली. हे सगळं ऐकताना राधाला तिच्या अनेक पेशंट्सचे चेहरे आठवले. त्यांच्या कहाण्या आठवल्या. रश्मीच्या पाठीवरून हळुवारपणे हात फिरवत राधाने तिला शांत केलं. त्यांचा तिसरा सेशन संपला होता.

त्या सेशननंतर एक आठवडा संपत आला, दुसऱ्यादिवशी राजेश-रश्मीची अपोइन्ट्मेन्ट होती आणि राधाला राजेशचा फोन आला. तो सांगत होता. ‘मागच्या सेशननंतर रश्मीमध्ये बराच बदल झाला आहे.’ वीस मिनिटांच्या भेटीत ठरलेलं आणि महिन्यात झालेलं लग्न होतं त्यांचं. त्यामुळे दोघांनाही फारसं मोकळेपणाने बोलता आलं नव्हतं. तो म्हणाला, ‘काल पहिल्यांदा रश्मी माझ्याशी स्वतःहून बोलली. खूप वेळ नाही पण ठीक आहे, सुरुवात तरी छान आहे.’ राधाला बरं वाटलं. आपला पेशंट सुधारत आहे हे पाहिल्यावर ती खुश झाली. सेशनची वेळ झाली आणि रश्मी दवाखान्यात आली. आज फारशी प्रस्तावना न करता ती स्वतःच बोलायला लागली, ‘मॅडम, मागच्या वेळेस मी तुम्हाला जे सांगितलं त्यातल्या जवळपास सगळ्याच गोष्टी आई बाबांना माहित नाहीयेत त्यामुळं राजेशला माहित असायचा प्रश्नच येत नाही. माझ्याबाबतीत हे असं घडतंय यात माझीच चूक आहे असंच मला कायम वाटत राहिलं त्यामुळे मी कधीच कोणाशीच हे बोलू शकले नाही. आणि त्या दाबाखाली माझी मानसिक स्थिती विचित्र होत गेली. माझं बदललेलं वागणं आईच्या लक्षात आलेलं पण तिने ते फार मनावर घेतलं नाही. एकदा मी सांगायचा प्रयत्न केला तर ती म्हणाली, ‘प्रत्येक बाईला यातून जावंच लागतं. तू उगाच बाऊ करतेस.’ झालं. बोलणंच खुंटलं. मग यथावकाश माझं लग्न झालं. राजेश खूप चांगला मुलगा आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री मी comfortable नाही हे कळल्यावर तो खोलीत सोफ्यावर जाऊन झोपला. पण माझी घालमेल कधी कमी झालीच नाही. तो जवळ आला कि त्याच्या चेहऱ्यात मला ते सगळे चेहरे दिसतात ज्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली आहे आणि त्यामुळं......’ रश्मीला आता रडणं आवरेना. ती शांत झाल्यावर राधाने तिला काही औषधं दिली. या विचारांतून बाहेर पडण्यासाठी काय काय करता येईल ते सांगितलं. आणि रश्मी तेवढ्यापुरती सावरली.

पुढचा सेशन फक्त राजेश आणि राधामध्ये झाला. राधाने त्याला सगळी कल्पना दिली आणि धीर धरायला सांगितलं. कारण सध्या रश्मीला त्याच्या आधाराची खूप गरज होती. असेच अनेक सेशन्स होत गेले. रश्मी मात्र म्हणावी तशी प्रगती करत नव्हती.

असंच अचानक एका सेशनच्या वेळेस राजेश रश्मी दोघही आले. राजेशच्या हातात डिवोर्स पेपर्स होते. त्या दोघांनी म्युचुअल कन्सेंटने डिवोर्स फाईल केला होता. जीवापाड प्रयत्न करूनही रश्मी त्या विचित्र मानसिकतेतून बाहेर पडू शकत नव्हती. आणि ती राजेशला पत्नी म्हणून सुखही देऊ शकत नव्हती. ही कोंडी फोडायचा एकच पर्याय तिला दिसत होता. तो म्हणजे डिवोर्स. तिने राजेशला तयार केलं. स्वतःमुळे राजेशला दुःख सहन करावं लागू नये या प्रामाणिक हेतूने तिने डिवोर्स पेपर्सवर सही केली. आता ती परत लग्न करणार नव्हती. मात्र राधाशी बोलल्यामुळे तिची अपराधीपणाची भावना कमी झाली होती. आता सेशन सुरु ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता. राधाचा रश्मी आणि राजेशशी असणारा व्यावसायिक संबंध संपला होता.

ती दोघं गेल्यावर राधा विचारात पडली. दिसताना जो त्रास क्षणिक दिसतो त्याचे किती दूरगामी परिणाम होत असतात. आणि रश्मी ही काही अशी तिची पहिलीच केस नव्हती. प्रत्येक केसमध्ये एक मुद्दा मात्र समान होता. आपल्या मुलाची/मुलीची बदलत जाणारी मनःस्थिती पालकांच्या लक्षात येऊनही त्यावर गांभीर्याने विचार झाला नव्हता. ‘हे असंच असतं.’ म्हणून त्याकडे दुर्लक्ष झालं होतं. काही पेशंट्स सेशन्स, ट्रीटमेंट नंतर सावरले तर काही अजूनच कोशात गेले. असे अजून किती बळी जाणार असा विचार करत अत्यंत विमनस्क अवस्थेत तिने दवाखाना बंद केला. आणि ती घरी गेली. तिच्या दवाखान्यामधल्या ड्रोवरमध्ये आतल्या बाजूला मात्र एक जुना डिवोर्स पेपर तसाच निपचित पडून होता........