Monday 25 July 2016

एक अनोखी प्रेमकहाणी!

तिचं B.A. झालं आणि आई-बापाविना पोर किती दिवस आपल्या घरी ठेवायची म्हणून काकाने तिच्या लग्नाचं बघायला सुरुवात केली. आईच्या वळणावर गेलेली शामल दिसायला अगदी सुरेख होती. लांबसडक रेशमी केस, गोबरे-गोबरे गुलाबी गाल, डाळींबी रंगाचे नाजुक ओठ आणि पाहताक्षणी भुरळ पडावी असे विलक्षण बोलके डोळे. अशा या सर्वांगसुंदर शामलला कोणीही पटकन हो म्हणालं असतं. पण का कोण जाणे तिचं लग्न काही ठरेना. सगळ्या गोष्टी मनासारख्या आहेत म्हणून दोन्हीकडची मंडळी आनंदाने बोलणी करायला बसली कि शामल अचानक मलूल होऊन जायची. तिला खूप अस्वस्थ वाटायचं आणि ती रडायला लागायची. अर्थातच अशामुळे बोलणी तिथेच थांबायची. जो मुलगा बघायला यायचा तो म्हणायचा, ”मुलगी सुंदर आहे हो पण......” या “पण.....”मध्ये “आम्हांला वाटतंय तिला इतक्यात लग्न करायचं नाहीये” इथपासून “तुम्हाला माहित नसेल पण तिची बाहेर कुठेतरी भानगड सुरु असणार” इथेपर्यंत सगळे भाव असायचे. पाच सहा वेळा असं झालं. शेवटी काकाने कंटाळून तिच्या लग्नाचा नाद सोडला. बरं तिला कोणी याचं कारण विचारलं तर शामलकडे काही उत्तर नसायचं.
हा विषय सोडला तर बाकी सगळं सुरळीत सुरु होतं. दुःख नाही आणि विशेष आनंदही नाही अशा स्थितप्रज्ञपणे आयुष्य सुरु होतं. पण फार काळ स्थिर राहणं आयुष्याच्या प्रकृतीला मानवत नाही. काहीतरी बदल हवाच असतो त्याला आणि म्हणूनच कि काय शामलच्या आयुष्यात सौरव आला. तिच्याच ऑफिसमध्ये नवीन ऑफिसर म्हणून. फार काही मोठ्ठा नव्हता तो वयाने. पण प्रगल्भ होता. बारा गावचं पाणी पिऊन त्याचे कान आणि डोळे तीक्ष्ण झालेले होते. अफाट निरीक्षण शक्ती असलेला हा सौरव शामलचा बॉस म्हणून रुजू झाला होता. सुरुवातीला कामापुरतं बोलणारा तो आता मुद्दाम शामलकडे काहीतरी काम काढू लागला. त्याला ती आवडली होती म्हणून नव्हे तर तिच्या त्या टपोऱ्या डोळ्यांत काहीतरी दडलंय आणि आपण त्याचा छडा लावायचाच या भावनेने. अशावेळेस आधीच अबोल असलेली शामल आणखीनच शांत होऊन जायची. सौरव काही ना काही कारण काढून तिला बोलतं करायचा प्रयत्न करायचा परंतु त्याला म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. असं हे बरेच दिवस सुरु होतं. शामल स्वतः काही बोलत नाही म्हणल्यावर मग त्याने बाकीच्यांकडून तिच्याबद्दल माहिती काढायला सुरुवात केली. एवढ्याशा त्या गावात एका सुंदर मुलीची माहिती मिळणं त्याला काही अवघड गेलं नाही.
“शामल लहान असतानाची गोष्ट आहे बघ.” शामलच्या शेजारच्या आज्जीबाई सांगत होत्या. “तिचा बाप, रघुनाथराव, दूर कुठल्यातरी गावात नोकरीसाठी होता आणि त्या दिवशी तिचा वाढदिवस म्हणून खास तिला भेटायला येणार होता. ही छोटी पोर फार आनंदात होती. संध्याकाळ उलटून रात्र व्हायला लागली तरी रघु आला नाही तशी मात्र सगळ्यांना काळजी वाटू लागली. कोणाचाच डोळा लागेना. अतिशय धाकधुकीतच सकाळ झाली आणि पलीकडच्या गावातून सांगावा आला. रघुनाथरावांना घेऊन येणारी बस नदीत उलटली होती. एकाही माणसाच्या देहाचा पत्ता नव्हता. सगळा गाव दुःखात बुडाला. शामल तर शांतच झाली. कोवळी पोर होती रे शामल तेव्हा. बापाचं जाणं त्या बिचाऱ्या जीवाला सहन नाही झालं. तिने तेव्हाच ठरवून टाकलं, “आता इथून पुढे वाढदिवस साजरा करणे बंद”. नंतर काही दिवसातच ऐन दिवाळीत तिची आई वडलांना साथ द्यायला निघून गेली. अचानक पोरकी झाली ती. काकानं लाडानं वाढवली तिला. हवं नको ते सगळं केलं. पण पोरीच्या डोळ्यांतली चमक काही परत आली नाही. दुःखावर खपली बसली होती एवढ्यातच तिच्या धाकट्या भावाला काळ घेऊन गेला. तिच्या दहावीच्या निकालादिवाशीच पेढे आणायला म्हणून गेलेला तो, ट्रकखाली सापडला आणि आईबाबांना निकाल सांगायला निघून गेला. तेव्हापासून शामलला खळखळून हसताना कोणी पाहिलंच नाही. काकाने हरतऱ्हेने तिची समजूत काढून पहिली पण सगळं व्यर्थ. तिला शेवटचं आनंदात असताना मी कधी पाहिलं हे काही मला आठवत नाही बघ.”
मानसशास्त्राचा थोडाफार अभ्यास असणाऱ्या सौरवच्या सगळं लक्षात आलं. शामल cherophobic होती. म्हणजेच ती आनंदाला घाबरत होती. आपल्यापाशी येणारा आनंद सोबत भलंमोठ्ठ दुःख घेऊन येतो हे तिच्या मनात पक्कं बसलं होतं. ती कायमची मानसिक रुग्ण होण्याआधी काहीतरी हालचाल करणं गरजेचं होतं. तो एकटा हे काम करू शकत नव्हता म्हणून त्याने शामलच्या काकांना विश्वासात घेतलं. सगळी परिस्थिती समजावून सांगितली. काकांना सुरुवातीला काही पटेचना. पण मग नंतर त्यांना आठवत गेलं जेव्हा जेव्हा घरात आनंदी वातावरण असायचं तेव्हा तेव्हा शामल आजारी पडायची. तिचा श्वास अडकायचा, तिला अस्वस्थ वाटायचं. पण त्यामागे असं मानसशास्त्रीय काही कारण असेल असं काही त्यांना वाटलं नव्हतं. आता सगळ्या गोष्टी स्पष्ट होत्या. काका-काकूंना फक्त एक काम करायचं होतं. शामलला या सगळ्या प्रकारची कल्पना द्यायची. बाकी सगळं काम सौरव करणार होता. पुतणीच्या काळजीने काकांनी ते काम करायचं धाडस केलं. शामलला धक्का बसला. काका-काकूंनी मात्र तिला सावरलं. सौरवच्या दृष्टीने ही खूप मोठी गोष्ट होती. कारण या सगळ्या प्रकारांत माणसाला स्वतःच्या स्थितीची कल्पना असणं आणि त्याने ती स्वीकारणं खूप महत्वाचं असतं. ते झालं कि मग पुढच्या गोष्टी सोप्या होतात.
काही दिवस असेच गेले. आता सौरव आणि शामल कामाव्यतिरिक्त बोलायला लागले होते. दिसायला सुंदर असणारी शामल मनानेसुद्धा सुंदर आहे हे सौरवला समजलं आणि हा माणूस आपल्याला समजून घेत आहे, आपल्याशी बॉसच्या नव्हे तर मित्राच्या नात्याने बोलत आहे हे तिच्याही लक्षात आलं. आता ते निव्वळ सहकारी राहिले नव्हते. हळूहळू ऑफिस झालं कि एखाद्या कॅफेत भेटी होऊ लागल्या. सौरव बोलघेवडा होताच. शामलला आवडेल अशा गोष्टी बोलून तिला बोलतं करणं त्याला जमू लागलं होतं. शामलही मोकळी होऊ लागली. आपणही हसू शकतो, आनंदी होऊ शकतो याच्यावर तिचा विश्वास बसायला लागला. अनोळखी-सहकारी-मित्र-खास मित्र या प्रेमाच्या राजरस्त्यावरून त्यांची गाडी पुढे जात होती. आताशा शामल मनापासून हसायला लागली होती, तिच्या डोळ्यांतली चमक परत आली होती. तिच्याभोवतीचं ते गूढ वलय नाहीसं होत होतं. आणि या मागे सौरवची अफाट मेहनत होती. यथावकाश सौरवने तिला मागणी घातली. आपल्याला नैराश्यातून बाहेर काढणारा माणूसच आपला जोडीदार होणार या कल्पनेने शामल मोहरली. दोघांच्या घरूनही होकार आले आणि कु. शामलची सौ शामल झाली.
आज त्यांच्या लग्नाला तीन वर्षं पूर्ण झाली. लग्नानंतर आजतागायत शामल आनंदाला घाबरलेली नाही. काका-काकूंचे आशीर्वाद आणि सौरवचं प्रेम यांच्या आधारावर एक नवीन शामल खंबीरपणे आयुष्याला तोंड द्यायला तयार आहे. तिच्या या नवीन आयुष्यात आता मात्र कुठल्याही भीतीला जागा नाही. आणि पुन्हा एकदा निर्व्याज प्रेमाने cherophobiaला हरवलं आहे....
-तन्मया (१५/७/१६)