Wednesday 17 December 2014

निसर्गाची बोली जपणारा रानकवी - ना.धों महानोर!



निसर्गाची बोली जपणारा, अवघ्या रानाच्या सुख- दुःखाशी जोडलेला असणारा एक रानकवी...  शेतीत शब्द पेरून कवितांचे पीक घेणारा "शेतकवी".. आपल्या गावरान साहित्याच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा, साहित्य अकादमी ते पद्मर्शी पुरस्काराचा मानकरी कविवर्य ना.धों महानोर!!! लोकगीताचे संस्कार घेउन आलेली त्यांची कविता वाचकाला खिळवून ठेवते.. त्याच्याशी संवाद साधते.. माणसाशीच नव्हे तर रंगीन निसर्गाशी तितक्याच रंगीनपणे बोलणारा हळुवार मनाचा रांगडा कवी!!!
“ह्या शेताने लळा लावला असा असा की
सुखदु:खाला परस्परांशी इसरलो
आता तर हा जीवच असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो
ना.धों. महानोरांच्या शब्दांनी मराठी रसिकांना लळा लावला. काळ्या मातीवर, शेतीवर, गावावर जिवापाड प्रेम करणार्या या कवीने अवघ्या देशाला मोहिनी घातली. हि कविता म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, त्यांच्या निसर्गासोबत असणार्या नाजूक नात्याचे जणू शब्दरूपच आहे!!
अजिंठा लेण्यांच्या जवळपास असणार्या लहानशा खेड्यात शेतकरी म्हणून जीवन व्यतीत करणारे महानोर!! निसर्ग जणू त्यांच्या अंगात भिनलेला!!! आकाश, जमीन, वारा, पाउस, नदी, पाखरं हे त्यांच्या आयुष्याच अविभाज्य अंग आहे!!! म्हणूनच त्याचं शेत त्यांना फक्त प्रेमच देतं अस नाही तर लळा लावतं.. आणि त्यांच्या शब्दांमधून आपल्याशी बोलतं... हेच शेत त्यांच्या त्यांच्याही नकळत रान होऊन त्यांचे प्राण गुंतवून टाकत.. तेव्हा मग त्यांना नभ आणि भुई यांचा भावबंध जाणवू लागतो आणि ते लिहून जातात...
"गुंतले प्राण ह्या रानात माझे
फाटकी हि झोपडी काळीज माझे..
मी असा आनंदुनी बेहोष होता
शब्दगंधे, तू मला बहुत घ्यावे!!" काय सुरेख विचार आहे.. कल्पना तर सुचण आणि ती साकारण्यासाठी शब्द सुचण या दोन्ही गोष्टींसाठी प्रतिभा गरजेची आहे... हि प्रतिभा खचितच महानोरांकडे आहे...
केशवसुतांनी निसर्गकवितांचं बीज लावलं.. बालकवींनी त्याला रुजायला, फुलायला मदत केली आणि महानोरांच्या काळात हे बीज बहरून आलं..
"झाडे झाली हिरवीशी  शीळ घुमे रानात..
ओळ जांभळ्या मेघांची, वाहे नदीच्या पाण्यात..
वाट झुंजूमुंजू होते पीक मावेना शेतात..
लक्ष पाखरांचे थवे, खेळ मांडती पाण्यात..!!!"
चित्रकार कुंचल्यातून निसर्गचित्र निर्माण करतो तर कवी कवितेतून.. या कवितेतून हे अगदी स्पष्ट जाणवत... एखादा छोटासा गाव.. शेताने वेढलेला.. सुगीचा काळ जवळ आलेला.. अशा वेळेस स्वच्छ नितळ पाण्यात मेघांच पडणार मनोहारी प्रतिबिंब.. झुंजूमुंजू होताना पक्ष्यांच्या थव्याने आकाशाला घातलेली माळ.. सगळ कस सुंदर, चैतन्यदायी!!! या सगळ्या निसर्गचक्राचा कर्ताधर्ता असणारा सुर्य... त्याला वंदन करताना ते म्हणतात..
"सूर्यनारायणा नित्नेमानं उगवा
अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा
ओंजळीनं भरू दे गा पाखरांच्या चोची
दु:खात पंखांना असो सावली मायेची
आबादानी होवो शेत भरू दे दाण्याचे
तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे"
हे सूर्या, तुझ्या तेजाने आमच्या जीवनामाध्ला सगळा अंधार नाहीसा होउदे.. चराचरात सुखसमृद्धी नांदू दे.. मग आम्हाला बाकी काही नको...
पाऊस पडतो, बियाण रुजतं, ज्वारी पिकते आणि दाणे फुलून येतात.. किती अरसिक वाटत हे वाचताना!!! तेच जर आपण अस वाचलं
“ ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे..
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडुनी जावे..!!”
 तर किती प्रसन्न वाटत!!! वाटतं कि पाउस म्हणजे नभाने भुईला दिलेलं दान आहे आणि त्याच चैतन्याला हि धरणी पिकांच्या रूपाने पुढे देत आहे!! आणि म्हणूनच जे खरे भूमिपुत्र आहेत ते कृतज्ञता दाखवतात आणि भोळ्या शंभूचे आभार मानत गाऊ लागतात..
" आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं
या जांभर्या गर्दीत मांडुन इवले घर
या पिकल्या शेतावर तुझ्या आभाळाचा जर
या डोंगर वस्तीवर भोळ्या संभूची पाखर
त्याच्या पंखात पंखात नांदतोया संसार
आल्या बरसाती घेऊन मेघमल्हाराची धून
त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण
चांदण्या गोंदून धरलीया झालर.."
जैत रे जैत मध्ये तर त्यांनी आपल्या गाण्यांनी रसिकांना पूर्णपणे वेड लावलं आहे.. मग ते गाण
"जांभुळपिकल्या झाडाखाली, ढोल कुनाचा वाजं जी
येंधळ येडं पाय कुनाचं, झिम्मा फुगडी झालं जी
समिंदराचं भरलं गानं, उधानवारं आलं जी
येड्यापिश्या भगतासाठी पुरतं लागिरं झालं जी
मोडुन गेल्या जुनाट वाटा, हा बोभाटा झाला जी
चोचीमंदी चोच टाकुनी, दाणं उष्टं झालं जी
जांभुळीच्या झाडाखाली, कोयडं बोल बोलं जी
जांभळीचं बन थोडं, पिकून पिवळं झालं जी"
हे असो किंवा
नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात
अशा वलंस राती गळा शपथा येती
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरात" हे असो... अशा रांगड्या तरीही नाजूक शृंगाराला जेव्हा मंगेशकर घराण्याच्या  गायन वादनाची साथ मिळते तेव्हा गाण्याचं सोनं होतं..
महानोरांनी निसर्गाचं वेल्हाळ रूप आपल्यासमोर मांडलं, शृंगाराला लाडिकपणे सादर केलं... तसंच  त्यांनी कातरवेळेला येणाऱ्या उदासीनतेला आणि त्यासोबत येणाऱ्या विरहाच्या जाणीवेला अधोरेखित केलं.. ते म्हणतात,
"आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या
काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
बोलघेवडी साळुंकी कसा शब्द ही बोलंना
असा रुतला पुढ्यात भाव मुका जीवघेणा
चांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी
निळ्या आसमानी तळ्यांत लाख रूतल्या गवळणी
दूर लांबल्या वाटेला रूखी रूखी टेहाळणी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी"
अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या त्यांच्या कवितेला स्त्री हा विषय देखील वर्ज्य नाही.. त्यात मग हळद खेळणाऱ्या मुली आहेत..घन ओथंबून आल्यावर पडणारा पाऊस जणू सख्याचा स्पर्श आहे अस वाटणारी नवयौवना आहे.. पाणी भरायला आलेली गौळणी आहेत..
"सरलं दळण
ओवी अडली जात्यात
उभ्या जन्माचा उमाळा
कळ सोसून डोळ्यात.." अस म्हणणारी पहिलटकरिण आहे आणि तिचा सोशिकपणा देखील आहे...
महानोरांच्या कवितेतून कायम कृतज्ञता भाव दिसून येतो... मग ते निसर्गामधल्या विविध शक्ती असो किंवा मानवी रूपं!!! स्वतःकडे असणार्या प्रतिभेबद्दल देखील ते ईश्वराचे ऋणी आहेत..ते म्हणतात.. "हे परमेश्वरा, तुझ्याच आशीर्वादाने हा शब्दांचा खेळ आम्ही मांडला आहे.. या शब्दांमध्ये इतकी ताकद आहे कि आम्ही त्यांची आयुष्यभर सेवा करण्यास देखील तयार आहोत.. आम्हाला फक्त तुझी साथ दे.. पाठीवर विश्वासाचा हात दे..." आणि मग त्या जगत्नियंत्याला  धन्यवाद देताना म्हणतात..
शब्दांचा हा खेळ मांडला तुझ्या कृपेवर ईश्वरा
आम्हां शक्ती दे शब्द-शारदे गौरीतनया ईश्वरा
आम्ही जन्मभर भाट होऊनी शब्दांपाशी नांदतो
गंधर्वाच्या गोड गळ्याची आज प्रार्थना मागतो
तुझा शब्द दे आकाशाचा.. झांज डफावर, स्वर गहिरा
असा हा अलंकारांचा सोस नसणारा.. साधाभोळा तरी सशक्त कवितेचा जनक!!! नादमधुर शब्दांची आणि कवितांची लयलूट करणारा शब्द्शारदेचा साधक!! त्यांची कविता मराठी त्यातही ग्रामीण जीवनाशी नाळ जोडून असणारी आहे.. जुन्या परंपरांना कायम ठेवत नित्य नाविन्याचा वसा जपणारी आहे... म्हणूनच ती बर्याच काळ आपल्या मानत रुंजी घालत राहते...भोवतालच्या नितांतसुंदर निसर्गदर्शनाचा अनुभव देत राहते!!!

Sunday 16 November 2014

समाधानाचं दान देणारा कवी - आरती प्रभू!!!



आरती प्रभू!! अर्थात चिंतामणी त्र्यंबक खानोलकर!! त्यांची सहज सुंदर अशी चित्रपट गीत वाचून वाटत कि हा कवी आपल्याला कळला पण तेव्हाच अशा काही गूढरम्य कविता समोर येतात आणि वाटत हा कवी सहजसाध्य नाही.. तर ग्रेसच्या जातकुळी मधला आहे.. आत्ता समजला अस वाटेपर्यंत हातातून निसटलेला... त्यांच्या कवितांमध्ये लहानस लवलव करणार गवताच पात आहे.. न्हाऊ घालणारा, रसपान घडवणारा मेघ आहे.. नवथर तारुण्याची चाहूल आहे.. गर्भारपणाचे कुतुहूल आहे.. कातरवेळेची हुरहूर आहे.. दुसर्याचं ओझं आयुष्यभर वाहिल्याची दुखरी जाणीव आहे.. आणि आयुष्य सरताना काहीतरी द्यायचं राहून गेल्याची खंत आहे.. नवनवीन भावलन्कारांनी नटलेली त्यांची कविता सुश्राव्य आहे.. पण तरीही कळून कळल्यासारखी आहे...
"ये रे घना, ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना
फुले माझि अळुमाळु, वारा बघे चुरगळू नकोनको म्हणताना गंध गेला रानावना
टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार नकोनको म्हणताना मनमोर भर राना
नकोनको किती म्हणू, वाजणार दूर वेणु बोलावतो सोसाट्याचा वारा मला रसपाना"
ही कविता म्हणजे साक्षात पृथ्वीच्या मनःस्थितीच वर्णन आहे.. ती पावसाला सांगत आहे कि हा  सोसाट्याचा वारा  माझी नाजूक फुल चुरगळून टाकत आहे.. त्यांचा गंध दशदिशांमध्ये नेत आहे.. दूरवर वेणू वाजवत आहे.. अशा सगळ्या सजलेल्या वातावरणात तू ये आणि माझ्या मनाला न्हाऊ घाल.. आणि जेव्हा तो येतो तेव्हा गवताच्या पात्यासकट सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तिचं मन आपल्यासमोर मांडतात.. पृथ्वी जणू मानवीय स्वरुपात प्रकट होते आणि  गाऊ लागते..
"लवलव करी पात डोळं नाही थार्याला
एकटक पाहु कसं लुकलूक तार्याला
चव चव गेली सारी जोर नाही वार्याला
सुटं सुटं झालं मन धरू कसं पार्याला"
हे तर झालं उत्कट परंतु अमानवी प्रेमाचं वर्णन!! पण इथे मर्त्य जगातही प्रेमाची जादू आहे..
तो आणि ती.. दोन ग्रहांवर दोघे जण.. त्याला ही  दिसत आहे आणि तो म्हणत आहे..
"तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी,  तू बहरांच्या बाहूंची.
तू ऐल राधा, तू पैल संध्या, चाफेकळी प्रेमाची.
तू नवीजुनी, तू कधी कुणी, खारीच्या डोळ्यांची.
तू हिर्वीकच्ची, तू पोक् सच्ची, तू खट्टीमिठ्ठी ओठांची. "
आणि ती तिकडे तिच्या राजपुत्राचा शोधत आहे.. आणि म्हणत आहे..
"तो एक राजपुत्र, मी मी एक रानफूल घालीन मी, मी त्याला सहजिच रानभूल
केसात पानजाळी, कंठात रानवेल तुझी रे तुझी नटून ताई, घालील त्यास माळ"
मग काय दोघांची भेट तर ठरलेली... तो तिला त्याच्या प्रेमाची कबुली देतो.. आणि तिच्या उत्तराची वाट बघत असतो.. ती जनरीतीमुळे म्हणा काहीशी बुजलेली.. सरळ होकार देता गाण्यातून आपल्या प्रेमाची कबुली देते.. आणि लग्नासाठीच सुचवते!!!
"नाही कशी म्हणू तुला.. म्हणते रे गीत परि सारे हलक्याने आड येते रीत.
नाही कशी म्हणू तुला.. येते जरा थांब परि हिरव्या वळणांनी जायचे लांब.
नाही कशी म्हणू तुला.. विडा रे दुपारी परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी."
यथावकाश लग्न होतं आणि ती स्वतःला जणू नव्या नजरेने पाहू लागते.. त्याच्या स्पर्शाने तिला जणू कृष्णाची राधा बनवल आहे.. प्रेमाची नव्याने जाणीव करून दिली आहे..
"मीच मला पाहते, पाहते आजच का?
असा मुलायम असा देह तरी हा कसा?
माझा म्हणू तरी कसा? हा डोह जणू की कृष्ण सावळा, मी त्याची राधिका!
काठावरले तरू हळूच पाहते धरू
मोरपिशी पाखरू मज आज गवसली माझ्या मधली सोन्याची द्वारका!
पदर असा फडफडे नजर फिरे चहुकडे
नवल देखणे घडे हा तरंग मागे-पुढे जळावर हलतो का सारखा?"
आत्तापर्यंत आरती प्रभू वाचताना वाटत हा माणूस निसर्गकवी आहे एक प्रेमगीत लिहिणारा सच्चा माणूस आहे.. किती सरळ कविता आहेत यांच्या.. आणि तेव्हाच ही कविता समोर येते..
" ती येते आणिक जाते येताना कधि कळ्या आणिते
अन्जाताना फुले मागते येणेजाणे, देणेघेणे
असते गाणे जे कधी ती म्हणते.
येताना कधि अशी लाजते तर जाताना ती लाजविते
कळते काही उगीच तेही, नकळत पाही काहीबाही,
अर्थावाचुन उगीच 'नाही', 'नाही' म्हणते.
येतानाची कसली रीत गुणगुणते ती संध्यागीत
जाताना कधि फिरून येत, जाण्यासाठिच दुरुन येत,
विचित्र येते, विरून जाते जी सलते.
इथे आपल्याला नक्की वाटत कि "ती" म्हणजे प्रेयसीच.. जी येते आणि निघूनही जाते.. लाजते, नखरे करते.. होकार असतानाही नाही नाही म्हणते.. सगळ कळत असूनही कळल्यासारख दाखवते.. पण नंतर वाटत ही "ती" म्हणजे प्रतिभा आहे.. जी येताना कवितेची किंवा कथेची एखाद चिमुकली कळी घेऊन येते आणि जाताना त्या कळीच सुंदरसं फुल मागते.. आता त्या कळीच फुल होत असताना प्रतिभेची साथ तर हवीच.. ती, सोबत करताना मात्र कधी नाही म्हणते, कधी हुलकावणी देते, कधी सरळ येते तर कधी वळसे घेत स्वच्छंदीपणे येते!! येतानाही तिचा नखरा आहे. आत्ता आली म्हणजे परत फिरून येईलच अस नाही आणि जेव्हा जाते तेव्हा कधी गुणगुणारं संध्यागीत घेऊन जाते तर कधी विचित्र सल देऊन जाते.. अशी ही त्यांची सखी... मनस्वी तरीही प्राणप्रिय!!!
अशीच एक दुर्बोध कविता म्हणजे "समईच्या शुभ्र कळ्या"
समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते
केसातच फुललेली जाई पायांशी पडते.
भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे
मागे मागे राहिलेले माझे माहेरे बापुडे.
साचणार्या आसवांना पेंग येते चांदणीची
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची.
थोडी फुले माळू नये, डोळां पाणी लावू नये
पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन ये.
हसशील, हास मला, मला हसूही सोसेना
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा!
आरती प्रभूंचा शब्दन्शब्द हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरांत बुडलेला. आणि त्यात तो आशाताईंचा केळीच्या खोडाच्या तंतूसारखा आवाज... काही केल्या कवितेचा अर्थ लागत नाही.. मग मधेच वाटत ही नवे नवे लग्न झालेली, अजून माहेरची नाळ तुटलेली आणि संसारातल्या नवलाईची, त्याच्या  कडून असलेल्या आशाआकांक्षांची चाहूल लागलेली अर्थात स्वतःमध्ये एक जीव सामावून असणारी स्वप्नील मुलगी तर नसेल... आणि मग कविता थोडीशी उलगडल्यासारखी वाटते..
मार्गशीर्षी संध्याकाळ, समईचा खोलीतला पुंजक्यात मावणारा अंधुक प्रकाश.. त्या प्रकाशात समईच्या उजळलेल्या वाती दिसायला लागतात.. त्या शुभ्र वातींमधून कळ्यांगत ज्योती उजळवायला वाकलेली ती.. रोज जाईच्या कळ्यांचा गजर माळणारी.. चंद्र वर वर येत चालला तशी जाईपण फुलत गेली. पण आज गाठी काही पक्क्या बसल्या नव्हत्या.. अशामधेच सुटलेला वारा.. समई विझू नये म्हणून ती जऽरा खाली झुकली झुकली तोच सैलसर वेणी पुढे आली खांद्यावरून..आणि त्या झटक्यानं गजऱ्यातून जाईची फुलं टपटपली खाली पडलीआधीच कातरवेळ त्यात हे अवघडलेपण.. अशात माहेरची आठवण आली नाही तरच नवल... काळीज घट्ट करून लेकीला दूर पाठवणारं बापुडवाणं माहेर. तिला आईची खूप खूप आठवण येते. डोळे टच्कन भरून येतात.. पण आज ते पाणी डोळ्यांची साथ सोडायला तयार नाही.. मग काहीसा बहाणा करून ती उठते... सखीच मन जाणणारी शेजारीण तिथेच असते.. ती हिला सल्ला देते.." अगं अशी उदास कशाला बसल्येयस? जा, जरा पाणी पुसून घे डोळ्यातलं. अशी सुटी फुलं नको माळू केसांत. नीट तयार हो बरं! ऊन दूर निघून चाललंय बघ... जरा तुझ्या पदराला धरून त्यातलं थोडं ऊन घरात घेऊन ये..घरदार हसू दे" यावर स्वतःचं हसण स्वतःलाच सोसवेल कि नाही याची भ्रांत पडलेली ती मात्र म्हणते.. "मघाची आसवं मनात खोल रुतली आहेत. त्यांना निपटून टाकून हसू कसं? आणि हसून तरी काय होणार आहे? तो चंद्र का दुप्पट तेजानं आपलं चांदणं सांडत माझ्याबरोबर हसू लागणार आहे? तो  माझ्यापसून दुणा होऊ नये एवढच मला वाटत आहे.."  इतका गहनगंभीर अर्थ आणि तितकेच सुंदर शब्द!!! वाह!! क्या बात है..!!!!
इतकं हळवं लिहिणाऱ्या आरती प्रभूंनी बर्याचदा मनाला बोचणारी विषण्णतादेखील शब्दबद्ध केली आहे.. या कोडग्या जगात निरागस असं काहीच राहील नाहीये.. भोळ्या कळ्यांनादेखील कसलस दुखः सतावत आहे.. असं असताना हसायचं तरी कस आणि कुठे असं विचारताना ते म्हणतात...
"कसे ? कसे हासायाचे ? हासायाचे आहे मला
हासतच वेड्या जिवा थोपटीत थोपटीत
फुंकायाचा आहे दिवा
हासायाचे
कुठे ? कुठे आणि केव्हा? कसे ? आणि कुणापास ?
इथे भोळ्या कळ्यांनाही आसवांचा येतो वास"
हसायचं कस हेच समजणाऱ्या आपल्याला जेव्हा कोणाकडून तरी वापरलं गेल्याची, कोणाच तरी ओझं आयुष्यभर वागवल्याची जाणीव होते तेव्हा खूप विफलता जाणवते.. हे सगळ का आहे... कशासाठी आहे असं वाटू लागत.. आणि त्याच वेळेस आरती प्रभू त्यांची कविता घेऊन आपल्या मदतीला येतात..
"कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक् ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे
दीप सारे जाती येथे विरून, विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून, झडून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे
अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे"
इतकं सगळ, प्रत्येकाच्या प्रत्येक मनःस्थितीला साजेल असं लिहिल्यावरही त्यांना असं वाटत कि काहीतरी द्यायचं राहून गेल आहे.. पण आता माझ्याकडे काहीच नाही.. काळ्या होत्या.. त्याचं निर्माल्य झालं आहे... कोवळ्या मनाचा दगड झाला आहे... आणि त्यांच्या सोबतच माझ आयुष्य चालाल आहे.. आणि अशा विश्रब्ध मनाच्या कातरवेळी ते म्हणतात..
"गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने
आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्
आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा"
असे हे आरती प्रभू!!! पोटापाण्यासाठी आकाशवाणी मध्ये काम केलेले.. काही काळ खानावळही चालवलेले.. पण त्यांना साहित्यात आपला आत्मा सापडला.. बरेच काव्यसंग्रह त्यांनी लिहिले.. त्यापैकी "नक्षत्रांचे देणे" साठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला..
"पृथ्वीची फिरती कडा चाटून कवितेची ओळ येते
आणि आयुष्यातील एक दिवस दानासारखा मागून नेते." असं म्हणणाऱ्या त्यांनी आपल्याला समाधानच दान दिल आहे.. ग्रेस आणि आरती प्रभू.. एकाच परंपरेचे अनुयायी.. म्हणूनच ग्रेस यांनी आरती प्रभुंवर लिहिलेली कविता सदर करून विराम घेते..
"असा एक सूर्यास्त अंगावरी ये मला वाटते मीही भारावलो
दिवेलागणीच्या तुझ्या खिन्न वेळीच हा गाव सोडून मी चाललो"

***आजच्या लेखामध्ये internet चा वापर केलेला आहे... त्यामुळे काही श्रेय त्या अनामिकांचे देखील आहे!!