Wednesday 31 August 2016

आताशा असे हे मला काय होते...!!

'बघितलंत कशी वागली ही सकाळी. आजकाल तिला काही सांगायची चोरीच झाली आहे. हल्ली माझं डोकं दुखतं, म्हणजे जरा जास्तच दुखतं. तिला सांगितलं तर म्हणाली, 'आई, तुझ्या मनाचे खेळ आहेत हे. सगळे रिपोर्ट्स ठीक आहेत तुझे. काही झालं नाहीये तुला..' म्हणजे मी काय खोटं बोलते का? तुम्ही गेलात आणि नंतर स्वतःकडे लक्ष न देता मी पोरीला वाढवलं. काय कमी खस्ता खाल्ल्या का मी.. आणि आज एवढी मॅनेजर झाली तरी आईशी चार शब्द प्रेमाने बोलावेत हे समजत नाही तुमच्या मुलीला..' शुभांगी हार घातलेल्या फोटोसमोर पदराला डोळे पुसत बोलत होती.. 'परवा मी बाथरूममध्ये होते. कपडे विसरले म्हणून खूप हाका मारल्या तिला. आलीच नाही. कसा कोण जाणे पाय घसरला माझा आणि पडले मी. तो आवाज ऐकू आला तिला. मग आली. आल्या आल्या 'लागलंय का तुला वगैरे नाहीच लगेच अशी कशी गं आई तू' म्हणून चिडली माझ्यावर. मी काय मुद्दाम करते का? पण नाही तुमच्या मुलीला आईचं प्रेम समजेल तर ना...' एवढ्यात 'शुभांगी काकू, मी आलेय ग.. पटकन काहीतरी खायला दे' अशी हाक आली आणि शुभांगी उठली.

'वाह मीना, आलीस तू... बरं झालं गं. आमच्या विभाला आईची काही काळजीच नाही. तू येतेस, चार शब्द प्रेमाने बोलतेस. बरं वाटतं' असं म्हणत शुभांगी किचनमध्ये पोहे करायच्या तयारीला लागली. नंतर दोघींच्या भरपूर गप्पा झाल्या. शुभांगीने मन भरेपर्यंत विभाच्या तक्रारी केल्या. शेवटी रात्रीचे साडेआठ होऊन गेले, विभाच्या येण्याची चाहूल लागली तशी मीना उठली. विभा यायला आणि मीना जायला एकच गाठ पडली.. विभाकडे 'एवढी प्रेमळ आई असून किंमत नाही तुला असा कटाक्ष टाकून मीना निघून गेली. काय झालं असावं याचा विभाला अंदाज आला. ती काही न बोलता रूममध्ये निघून गेली आणि किचनमधून भांडी आपटण्याचे आवाज यायला लागले...
त्या आवाजांकडे दुर्लक्ष करत विभा तशीच पडून राहिली. खरंतर आज तिला बोनस मिळाला होता. बऱ्याच दिवसांनी ती खुश होती. पण घरी आल्यावर जे झालं त्यामुळे तिचा मूडच गेला. बऱ्याच वेळाने आई झोपल्याची खात्री पटल्यावर ती बाहेर आली. दहा वाजून गेलेले. आईने आमटी भात काढून ठेवलेला. तो ओव्हन मध्येच गरम करून ती बाबांच्या फोटोसमोर जाऊन बसली. बाबांकडे बघितलं आणि तिचे डोळे भरून आले. 'असं का हो वागते तुमची बायको. तिच्यासाठी कितीही करा, तिला आनंद नाहीच. मध्ये एकदा मला सहज म्हणाली होती, 'तुझे बाबा अकाली गेले, माझी हॉटेल वगैरेची ऐश कधी झालीच नाही.' म्हणून हौसेने तिला तिच्या वाढदिवशी मस्त रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेले. तर सगळ्यांसमोर 'मला कशाला आणलंस इथे, त्यापेक्षा घरी मस्त वरणभात खाल्ला असता. इथे यांच्या डोक्यावर एवढे पैसे ओतायची काय गरज आहे तुला. माझ्याकडे नव्हते पण तुझ्याकडे रग्गड पैसे आहेत माहित आहे मला. पण म्हणून असं दाखवून द्यायची काय गरज होती' हे आणि ते.. नको नको ते... कसंबसं खाल्लं आणि निघालो तिथून. आजकाल तिला वाटतं मला तिची काळजीच नाही. मग मुद्दाम पडायचं, सारखं डोकं दुखतंय म्हणायचं. डॉक्टरकाका सुद्धा म्हणाले की हे सगळं मानसिक आहे. बाबा, मला नाही जमत हो हे आता. तिकडे कोर्टात तारखांवर तारखा पडत आहेत. पाच वर्षांचा संसार मोडतोय माझा. ती पाच वर्षं कशी गेली माझं मला माहित. सुरुवातीला बरं होतं. नंतर मात्र रोज शिव्या आणि मारहाण. मी तरी किती सहन करू. आईने जमवलेली सोयरीक ती. तिला वाईट वाटत राहील, लोकही तिलाच दोष देतील म्हणून सहन करत राहिले मी. जेव्हा असह्य झालं तेव्हा आले निघून. आता इकडे येऊन हे असं. माझ्यात ताकद उरली नाहीये आता. अशातच ती मीना येते, आईला काय काय सांगते. आईचाही पोटच्या मुलीपेक्षा तिच्यावर जास्त विश्वास. कायम माझी आणि मीनाची तुलना. त्रास होतो हो. बरोबरीच्या सगळ्या आपापल्या संसारात आहेत, त्यांना माझी दुखरी कहाणी सांगायला आणि त्यांची खरी/खोटी सहानुभूती मिळवायला नको वाटतं. अशात आई नाहीतर कोणाकडे मन मोकळं करू. आता तीही जागा हक्काची राहिली नाही. तुम्ही एवढ्या लवकर का गेलात बाबा, निदान आज, अशा हळव्या वेळेस तरी तुम्ही हवे होतात.." विभा हमसून हमसून रडत होती..
आणि दूरवर कुठेतरी हळुवार आवाजात गाणं वाजत होतं..
"कशी ही अवस्था कुणाला कळावे ?
कुणाला पुसावे ? कुणी उत्तरावे ?
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे ?"..............

No comments:

Post a Comment