Wednesday 31 August 2016

रेखा मावशी... !!!

साडेचार पाच फुट उंची.. डोळ्यांवर जाड काड्या असणारा चोकलेटी रंगाचा चष्मा.. फिक्कट रंगांच्या साड्या, सकाळच्या गडबडीत हाताला मिळेल तो ब्लाउज घातलेला.. तोंडात मिश्री, अगदी कायम.. आणि अत्यंत चौकस नजर.. गेली अनेक वर्ष ही बाई अशीच आहे...
माझी आणि यांची भेट कधी झाली हे मला आठवणं शक्यच नाही.. माझ्या जन्माच्या आधीपासून या आमच्या घरात येत आहेत.. तसं पाहायला गेलं तर घरात केरवारे आणि भांड्याची कामं करायला येणाऱ्या मावशी अशी त्यांची ओळख.. पण आम्हा बहिणींना न्हाऊ-माखू घालण्यापासून सगळं यांनी केलं.. घरात आज्जी-आजोबा नव्हतेच कधी.. त्यामुळं बाळंतपणानंतर आईची काळजी घेणाऱ्यासुद्धा याच होत्या.. कामं करून झाली कि आम्हाला त्यांच्या गावाकडच्या गोष्टी सांगणाऱ्यासुद्धा याच होत्या.. आणि "काय सुसरींसारखं पसरलाय ग पोरींनो, उठा, मला केर काढायचाय असं म्हणून दरडावणाऱ्यासुद्धा याच होत्या..
मला आठवतं आमच्या शाळेची वेळ झाली असेल आणि तेवढ्यात आईकडे पेशंट आला तर त्यांनी आम्हाला मऊ-मऊ पोळ्यादेखील करून वाढल्या आहेत.. लहान असताना आमचे डबे भरून दिले आहेत.. आणि हे सगळं एका नव्या पैशाची अपेक्षा न करता..
मावशींनी तशी बऱ्याच घरांत कामं केली.. काही ठिकाणी त्यांचं घरातल्या लोकांशी जमलं नाही तर काही घरांचं त्यांच्याशी जमलं नाही.. याला एकच कारण होतं.. त्यांचा फटकळ स्वभाव आणि भाषा.. बोलताना चार-पाच शिव्या आल्या नाहीत तर त्यांना बोलल्याचं समाधान मिळायचं नाही.. त्यांच्या नादाने आम्ही "आयला, मायला" च्या वाटेवर जाऊ नये म्हणून आईने अनेकदा त्यांना समजावलं होतं.. सुदैवाने त्यांनी ते ऐकलं..
आईचं आणि त्यांचं मात्र फार सख्य.. त्यांच्या घरात खुट्ट जरी झालं कि "तनुची आई, ते असं हून ऱ्हायल शनी" असं म्हणत स्वारी हजर.. मग एकातून एक विषय निघत जायचा आणि त्या काम करत असलेल्या सगळ्या घरांबद्दल आम्हाला वृतांत सादर व्हायचा.. असं सगळं असलं तरी बाई कामाला एकदम चोख आणि प्रामाणिक.. त्यासाठी आम्हीही त्यांच्या गप्पांना दाद द्यायचो.. त्यांच्यामुळं आम्हाला या लोकांच्या विश्वाबद्दल कळत गेलं.. रोज नवऱ्याचा मार खाणाऱ्या या बाया.. फक्त 'कुकवाचा धनी' म्हणून त्याच्यासोबत नांदतात.. त्याचे दारूचे शौक पुरवतात.. आणि या सगळ्यांतून आपल्या पोरांना नीट वाढवतात.. सुदैवाने मावशींचा नवरा बराच बरा होता.. मोठ्या आजारातून उठल्यानंतर भरपूर शहाणा झालेला होता.. त्या दोघांचं आम्हा चौघांवर खूप प्रेम होतं.. फारशी मिळकत नसताना त्यांनी प्रत्येक अधिक महिन्यांत आई-बाबांना छोटंसं का होईना काहीतरी वाण दिलं.. आमच्या मोठ्या परीक्षांच्या निकालानंतर बक्षीस दिलं.. भरपूर मायेने पाठीवरून हात फिरवत आशीर्वाद दिले.. अगदी नेहमी..
पाच वर्षांपूर्वी आम्ही घर बदललं.. नव्या ठिकाणी त्यांना येणं शक्य नव्हतं.. आईचा दवाखाना मात्र त्याच घरी सुरु राहणार होता.. याचा त्यांना काय तो आनंद.. "तनुची आई, तुमी जा तिकडं, म्या मात्र हिथ रोज येन्हार.. न्हाई म्हणलात तरी येन्हार" असं म्हणून त्या आजही रोज तिथे येतात.. झाडू फिरवून जातात...
नवरा गेल्यानंतर मात्र मावशींचा स्वभाव कडक झाला.. कारणही तसंच होतं म्हणा.. यांचे आणि नवऱ्याचे जे काही थोडेफार पैसे होते ते सगळे नातेवाईकांनी परस्पर लाटले.. तरीही न बिथरता बाईंनी शून्यातून सुरुवात केली.. बँकेत FDs काढून पैसे साठवले.. आजच्या घडीला कामं न करता पुढचं आयुष्य जगता येईल एवढे पैसे त्यांच्या गाठीला आहेत.. मुलीचा सुखी संसार आहे... अत्यंत गोड अशी नात आहे.. तिचं आज्जीवर खूप प्रेम आहे.. आता कायमसाठी मुलीकडे जाऊन राहायचा त्यांचं ठरत आहे.. परवा अगदी डोळ्यांत पाणी आणून आईला म्हणत होत्या,"तनुची आई, पोरींच्या लग्नात मला विसरू नगा.. जिथ असन तिथन बिगी यीन बगा.. पोरींना बी सांगा.. मन्हाव, मावशी जीत्ती हाय त्यांची तवर कसलीबी फिकीर करू नगा"

हे लिहिलेलं त्यांना वाचता येईलच असं नाही.. पण आमच्या भावना मात्र नक्की पोहोचतील.. मावशी, जशा आहात तशाच राहा.. आणि एक लक्षात असुद्या.. "तुमच्या या पुरी तुम्हास्नी कंदी बी इसारणार न्हाईत.."

No comments:

Post a Comment