Tuesday 3 May 2016

गोष्ट एका विकासची!



प्रत्येक गावात असे काही अवलिया असतात ज्यांना विशेष कर्तृत्व नसूनही अख्खा गाव ओळखत असतो.. अशाच काही अवलीयांपैकी एक म्हणजे विकास ऊर्फ विक्या.. नावाच्या अर्थाच्या अगदी उलट जगत आलेला.. वडील, काका, आत्या आणि बाकीची भावंडं एकाच शाळेत शिकून मोठ्ठी होण्याच्या काळातला एक सर्वसामान्य मुलगा.. शाळेतले शिक्षक सगळ्या घराण्याला ओळखतात म्हणूनच, नापास होता एक एक इयत्ता वर चढवलेला हा विक्या.. जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा, "काय मग शेठ, कसं चाललंय आयुष्य?" असं विचारून बोलायला सुरुवात करणारा.. वास्तविक पाहता तो राहतो ती पेठ आणि पाय एका दिवसात नेउन आणतील इतक्या लांबचा प्रदेश हेच याचं जग.. त्यात नाविन्य असं कितीसं असणार.. परंतु तोरा मात्र असा कि मागच्या जन्मी हा जणू सिकंदरच होता..
अशा या विक्याचे वडील लहानपणीच गेले त्यामुळं कोणाचा धाक म्हणून नाही.. पोटच्या दोन आगाऊ पोरांना सांभाळताना आई खंगून गेलेली, त्यांची उस्तवार करून दमेकरी झालेली.. एकत्र कुटुंब पद्धतीचा आशीर्वाद म्हणून विक्याच्या काकाच्याच घरी राहणारी ती तिघं, एक दिवस विकी शेठने घरातच चोरी केल्यामुळे काकापासून वेगळी झाली.. तसं पाहिलं तर विक्याने आयुष्यात खूप उद्योग केले, दारू झाली, सिगारेटी झाल्या, विडिओ गेम्सचा नाद झाला, त्यापायी काकासाठी कर्जही करून झालं.. मात्र कशाचा पश्चात्ताप म्हणून नाही.. पोटापाण्यासाठीही त्याने विशेष काही केलेलं कोणाच्या स्मरणात नाही.. संध्याकाळी कट्ट्यावर बसून पोरी टापताना मात्र अनेकांनी पाहिलंय त्याला.. कधी तरी धोब्याच्या दुकानाच्या आसपास दिसायचा तो.. कारण एकच, कोणाच्या खिशातून आलेले पैसे लाटता आले तर बरं.. धोब्याला जेव्हा हे कळलं तेव्हा विक्याची झाली हकालपट्टी.. मग कुठे सलोन मध्ये काम कर, दुकानात काम कर असं सुरु झालं.. तरीही धरसोड मात्र कायमचीच..
पोराचं लग्न झालं म्हणजेतरी तो सुधारेल अशा भाबड्या आशेपायी एका गरिबाघरची पोर विक्याच्या गळ्यात मारली गेली.. बिच्चारी ती.. रोजचे अत्याचार सहन करून एक दिवस कंटाळून निघून गेली कायमचीच आणि मग विक्याची गाडी आणखी खड्ड्यात गेली.. सुनेचं वाटोळं केल्याचं शल्य मनात धरून त्याच्या आईने राम म्हणला.. असला अतरंगी माणूस आपला भाऊ आहे असं सांगायची लाज वाटून भावानेही संबंध तोडून टाकले.. विक्या अगदी एकटा पडला..
मध्यंतरी कोणाच्यातरी आशीर्वादाने तो दुचाकी चालवायला शिकला..एके दिवशी मित्राची गाडी घेऊन, दारूच्या नशेत बेभान होऊन high way वर गेला.. एका क्षणी तोल गेला आणि त्याला जोरदार अपघात झाला.. जुनं सगळं विसरून काकाने प्रचंड मदत केली.. त्याच्या ऑपरेशनचा सगळा खर्च केला.. बरा होईपर्यंत जातीने त्याची काळजी घेतली.. विक्या शरीराने तर बरा झाला पण त्याच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला.. आजारपणात काकाच्या घरी असताना स्वतःच्याच बहिणीला त्रास देताना काकूने पाहिलं आणि विक्याला काकाच्या घरचे दरवाजेही कायमसाठी बंद झाले..
नंतर मग काय सोबतीला रोज हातभट्टीची असायची, रस्तावरून शुद्ध नसलेल्या अवस्थेत विकी साहेब अर्वाच्य बरळत यायचे तेव्हा संपूर्ण पेठेला जाग यायची.. लहान मुलांच्या आया मुलं झोपत नसतील तर भीती दाखवायला म्हणायच्या, "चिंगे, झोप मुकाट्याने, विक्या येईल हा नाहीतर.." पण विक्याला मात्र या कशाचीच शुद्ध नसायची.. आईचे होते नव्हते तेवढे दागिने विकून खाईस्तोवर हे असंच सुरु राहिलं.. नंतर विक्याचा मुक्काम गावच्या मंडईमध्ये हालला.. काहीतरी कच्चं खात त्याचे दिवस जाऊ लागले.. दिवसाउजेडी रस्तावर फिरून चार आणे मिळवून दारूची सोय होत होती.. विक्या जिवंत होता.. काकाच्या कानावर हे सगळं येत होतं पण आता विक्यासाठी काहीही करायची इच्छा आणि ताकद उरली नव्हती..
मागच्या रविवारी नगरपालिकेच्या कार्यालयातला फोन वाजला.. "साहेब, मंडईमध्ये फार घाण सुटली आहे.. कोणीतरी मरून पडलंय.. आमच्या धंद्याचे बारा वाजत आहेत.. लवकर वासलात लावा बरं.." साहेबांनी शववाहिकेला फोन केला, प्रेताची व्यवस्था केली आणि डोळे पुसत आकाशाकडे हात जोडून म्हणाले,"दादा, पोरगा सुटला एकदाचा.. स्वतःच्या कर्माने मेला रे.."