Sunday 25 September 2016

पुरुषामधल्या माणसाला सलाम!


पिंक पाहिल्यानंतर नंतर मनात खूप विचार आलेले, बरेचसे वाईटच विचार. 'त्या' विषयावर लिहायचं असं बरेच दिवस वाटत होतं. सिनेमामुळे मुहूर्त लागला. संपूर्ण आठवडा तोच विषय डोक्यात होता. किती सहन करायचं, का करायचं वगैरे वगैरे.. अशावेळेस मग अचानक आयुष्यात 'माणूस' म्हणून भेटलेले अनेक पुरुष आठवले आणि आपोआप शांत वाटायला लागलं..

आजची ही पोस्ट अशाच सगळ्या परिचित, अपरिचित पुरुषांना ज्यांनी, कळत-नकळत आम्हांला मदत केली आहे आणि स्वतःमधील माणूसपण जिवंत ठेवलं आहे..
खूप लहान होते मी, नुकतीच शाळेत जायला लागले होते. घराला लागूनच शाळा होती आमची. त्यामुळे शाळेतून न्यायला-आणायला सहसा कोणी यायचं नाही.. शिपाई काका मात्र शाळेच्या गेटजवळ उभे राहायचे. मी वाड्यातून आत गेलेली दिसले कि मग शाळेत परत जायचे.

वालचंदमध्ये मेसचं खाताना ज्या दिवशी फीस्ट असायची तो दिवस खास असायचा. मेसचे काका आम्हा चार-पाच मुलींसाठी त्या दिवशीचा स्पेशल पदार्थ वेगळा काढून ठेवायचे, उन्हाळ्यात तर आईस्क्रिमचे दोन स्कुप जास्त मिळायचे.

मुंबईत तर अनेक चांगली माणसं भेटली. सगळ्यांत पहिल्यांदा तिथे गेले तेव्हा सायन कुठे? भांडुप कुठे? काsssही माहित नव्हतं.. वाशी गेल्यावर मी कंडक्टर काकांना विचारलं, 'मला भांडुपला जायचंय, कुठे उतरू?' त्यांनाही फारसं माहित नव्हतं.. तेव्हा एक जण म्हणाला, 'काळजी करू नका. मी सांगतो. मीही तिकडेच जाणारे.' त्यानंर त्याने आम्ही बस मधून उतरून, तिकीट काढून, प्लॅटफॉर्मवर जाईपर्यंत सगळी मदत केली.. 'कसलीही' अपेक्षा न करता..

पुढे ठाण्यात असताना एकदा साधारणतः पहाटे साडेपाच-सहाला पोहोचणारी बस साडेचारलाच पोहोचली.. बाहेर तुफान पाऊस.. आसपास रिक्षा, टॅक्सी काहीच नव्हतं. तसं स्टॉपपासून घर जवळच होतं पण माझ्याकडे सामान बरंच होतं.. ते सगळं सावरत हळू हळू मी जात होते.. तेवढ्यात एक रिक्षा थांबली, चालक पचकन थुंकला.. नाही म्हणलं तरी मला भीती वाटली. त्याने विचारलं, 'कुठे जायचंय?' मी सांगितल्यावर 'बसा' म्हणाला.. घराजवळ आणून सोडलं.. 'किती पैसे झाले असं विचारलं तेव्हा म्हणाला,'ताई, मी घरीच जात होतो आत्ता.. तुम्ही दिसलात.. एकटीने असं जाणं धोक्याचं वाटलं.. माझी बहीण असती तर मी तिच्याकडून पैसे घेतले असते का!!' फार छान
वाटलं ते ऐकून..

बसमधून जाताना वारा लागला कि झोपणं हा माझा लाडका छंद आहे.. माझं घर म्हणजे ऑफिसच्या बसचा शेवटचा स्टॉप होता.. तिथे सगळे उतरले कि दोन किलोमीटर पुढे एका मैदानात बसेस लावल्या जायच्या.. एक दोन वेळा माझ्या झोपेच्या नादात मी स्टोपवर उतरायची विसरूनच गेले, बस थांबली आणि गरम व्हायला लागलं तशी मला जाग आली.. ड्रायव्हर काका, उतरून निघतच होते.. त्यांनी मला पाहिलं, परत गाडी सुरु केली आणि मला घरी आणून सोडलं..

नंतर आत्ता अगदी परवाची गोष्ट.. एका गार्डन मध्ये गेलेले.. तिथे एक आजोबा आले.. माझी चौकशी केली आणि जाताना, 'You're a brave girl, God bless you my child' असा आशीर्वाद देऊन गेले..

आम्ही लहान असताना आई एक गोष्ट सांगयची.. त्याचा अर्थ काहीसा असा होता कि जगात 36 प्रकारची चांगली माणसं आहेत.. आणि त्यांच्या पुण्याईमुळेच जग चालू आहे.. ती 36 प्रकारची माणसं दीर्घायू व्हावीत हीच बाप्पाकडे प्रार्थना.. __/\__ 

No means No!!

पिंक-- कायम मुलींशी निगडित असणारा रंग.. कदाचित म्हणूनच सिनेमाचं नावही पिंक!! यात असा एक विषय आहे जो प्रत्येक मुलीने आयुष्यात एकदातरी बघितला खरंतर अनुभवला आहे.. शारीरिक, मानसिक, वाचिक किंवा केवळ नजरेने केलेला लैंगिक अत्याचार.....

जी अजूनही यातून वाचली आहे ती प्रचंड भाग्यवान आहे किंवा या प्रकाराला लैंगिक अत्याचार म्हणतात हे तिला माहितच नाहीये.. भाग्यवान मुलगी अशीच भाग्यवान राहूदे.. मात्र जी अज्ञानी आहे तिने ते अज्ञान दूर करून घेतलं पाहिजे.. कारण आज घराबाहेर पाऊल टाकलं कि स्वत्व जपायचं कि स्वतःला जपायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे..

एखाद्या मुलीला पाहिलं कि काही लोकांचे हात त्यांच्या पँटकडे जातात, नको तिथे खाज सुटते त्यांना, अगदी तेव्हाच.. मग ती मुलगी जवळून जाऊ लागली कि कोपरं बाहेर काढली जातात, मुद्दाम धक्का मारला जातो.. त्या मुलीला नको तिथे हात लावला जातो.. अगदीच हलकट आणि प्रचंड घाणेरड्या वृत्तीची ती जनावरं चेन उघडून आपलं तथाकथित पौरुषत्व दाखवतात.. बसमधून जाताना अशा कोनात उभे राहतात हे लोक कि स्पर्श झालाच पाहिजे.. किळसवाणा स्पर्श.. शेजारी येऊन बसणं, कोपर रुतवणं हे तर अगदीच सर्रास चालू असतं..
रात्रीच्या वेळी चालत किंवा गाडीवरून जाणारी मुलगी म्हणजे 'आज रात्रीची सोय झाली' असं वाटतं यांना.. मग गाडीच्या काचा खाली करून ' काय म्याडम येणार का?' असं गलिच्छ ऐकायला मिळतं.. तिला बघताना आपापसात ते नीच लोक 'ती बघ कलिंगडं..'असं म्हणत तिला न्याहाळतात.. शिट्टी वगैरे प्रकार फार जुने झाले म्हणे आता.. एकटी मुलगी बाहेर दिसली कि 'तुम्ही असं इथे एकटं राहणं सुरक्षित नाही, माझ्याबरोबर चला.. तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात' असं म्हणणाऱ्या तोंडातून वासना टपकते.. बहीण-भावाच्या नात्याची लक्तरं वेशीवर टांगली जातात..

आणि हे सगळं फक्त घराबाहेरच होतं असंही नाही.. ज्या मुलींना स्वतःच्या घरात हे असलं सहन करावं लागतं त्यांच्यासारख्या बिचाऱ्या त्याच..

एखादा चांगला मित्र आजकाल स्वतःहून सांगतो.. 'तुला सांगायला काही हरकत नाही.. बऱ्याचदा मुलींशी बोलताना काही मुलांच्या डोक्यात कुठे ना कुठे तरी हिच्या सोबत शय्यासोबत करायला मिळावी असाच विचार असतो.. त्यामुळं जपून..' अशावेळेस सगळ्या पुरुषजातीबद्दलच घृणा वाटायला लागते.. अशा लोकांमुळे जे पुरुष खरंच खूप चांगले आहेत.. आयुष्यभर चांगलंच वागत आले आहेत अशांवरही संशय घेतला जातो किंवा पटकन विश्वास टाकता येत नाही.. तेव्हा मात्र मुलींबद्दल वाईट तर वाटतच पण या चांगल्या पुरुषांबद्दलसुद्धा खूप वाईट वाटतं..

हे सगळं उघडपणे लिहावंसं वाटलं कारण एक चांगला मित्र, काका, आजोबा, बॉस, शेजारी असणं किती महत्वाचं आहे हे माहित असूनसुद्धा अशा काही चिंधी लोकांमुळे माणुसकीवरचा विश्वास उडत चाललाय.. आणि एक गोष्ट वारंवार अधोरेखित होत चालली आहे, ‘We are not safe out here'.. 'My girls, my ladies, we are not safe out here!!'

P.S. - माझेही खूप चांगले मित्र आहेत, अगदी सगळ्या वयोगटामधले.. त्यांच्यासोबत असताना मी मुलगी असल्याची मला भीती वाटत नाही.. किंवा कमीपणाही वाटत नाही!!
ही पोस्ट अशा काही नराधमांबद्दल आहे ज्यांना अजूनही मुलगी, स्त्री केवळ उपभोग्य वस्तू वाटते.. बाकी, कोणत्याही सुज्ञ, विचारी, विवेकी पुरुषाने मनाला लावून घेऊ नये.. या बाबतीत 'All men are not same' हे आम्हांला नक्की माहित आहे!!! 

Sunday 11 September 2016

एक संवाद रोजचाच!!

फोन वाजतो..
(तिकडून)आई : हेल्ल्लो... कशी आहेस??
मी: मस्त, तू कशी आहेस..
आई: मी व मजेत.. काय जेवलीस?
मी: नेहमीचंच. पोळी भाजी आणि कोशिंबीर.. तुम्ही?
आई: भाकरी, आमटी, कोबीची भाजी आणि वरण भात..
मी: वाह.. बाकी बरी आहेस ना..
आई: हो.. तू ठीक आहेस ना..
मी: हो.. चल, झोप तू आता..
आई: हो, तू पण.. गुड नाईट..
मी: गुड नाईट..

आता यात वेगळं असं काहीच नाही. बऱ्यापैकी सगळ्या घरात होणार संवाद आहे.. तरीही हा खूप अर्थपूर्ण संवाद आहे.. कारण यातलं खरं संभाषण काहीसं असं असतं..
फोन वाजतो..

(तिकडून)आई : हेल्ल्लो... कशी आहेस??
(तिचा आवाज ऐकून मला कळावं कि ती आनंदात आहे(कधी कधी नसली तरीसुद्धा), म्हणून ती अतिशय उत्साहाने हॅल्लो म्हणते.. आम्हाला 'कशी आहेस' हे विचारणं म्हणजे एक बहाणा असतो आमचा आवाज ऐकण्याचा.. दिवसभर दोघींच्या कामाच्या व्यापातून बोलायला सवड झालेली नसते.. म्हणून हा रात्रीचा कॉल..)

मी: मस्त, तू कशी आहेस..
(आमचा मूड किंचितही ठीक नसेल तर तिला कसं काय कळतं देवच जाणे, त्यामुळं आजकाल आम्हीसुद्धा गरज पडल्यास खोटं अवसान आणून हे आनंदाने बोलतो.. बऱ्याचदा म्हणायचं असतं, "आई, खूप आठवण येते ग तुझी.. सगळं एकटीने करताना दमायला होतं." पण मग आमच्याएवढी असताना अख्खा संसार सांभाळलास तू हे आठवून आम्ही 'मस्त'च आहोत असं सांगतो..)

आई: मी पण मजेत..
(मुली बाहेर असतात मग काय, दोघांचा राजाराणीचा संसार असं वाटतं लोकांना. पण पोरींनो, दिवसरात्र काळजी वाटते. कशा राहत असाल, काय खात असाल, कोणाकोणाच्या नजरा झेलत असाल असं वाटत राहतं दिवसभर.. काम नसेल तर दिवस खायला उठतो. आजकाल पेशंट्स जास्त आहेत तेच बरंय. टाच दुखते सतत उभं राहून. पण कामात असलेलंच बरं.. नसते विचार नकोतच..)

काय जेवलीस?
(जेवलीस तरी का गं नीट. बाहेरचं खाऊ नकोस बाळा जास्त. पर्याय नसतो माहित आहे मला पण तब्येतीला जप.. तुमची पिढी सगळ्यांत जास्त दुर्लक्ष करते शरीराकडे.. असं नाही चालत.. नीट खात पीत जा.. दुधा-तुपाने वजन वाढत नाही. ते गरजेचं असतं आपल्याला..)

मी: नेहमीचंच. पोळी भाजी आणि कोशिंबीर.. तुम्ही?
(आजसुद्धा उशीरच झाला घरी यायला. आल्यावरसुद्धा काम होतं.. आवरेपर्यंत दहा वाजले.. मग पटकन जे सुचलं ते केलं. जवळपास 30 वर्ष स्वतःचे सगळे व्याप सांभाळून इतका सुग्रास स्वयंपाक कसा केलास तुझं तुलाच माहित.. आम्हाला कधी जमेल का गं असं???)

आई: भाकरी, आमटी, कोबीची भाजी आणि वरण भात..
(आजकाल फार होत नाही गं.. आणि दोघांसाठी काय काय करणार.. त्यात आम्ही खाणार चिमणीएवढं.. पिठलं करून काळ लोटला.. तू नसतेस ना खायला आता. आणि बाबांना आवडत नाही.. तू आलीस कि मस्त दही-भेंडी, पिठलं, घुटं असं खाऊ आपण..)

मी: वाह.. बाकी बरी आहेस ना..
(एवढ्या लांबून फक्त हेच विचारू शकतो आम्ही.. काल बाबा सांगत होते, तुला दम लागतो अधून मधून.. तू काही हे सांगणार नाही मला स्वतःहून.. आणि मी ही तुला विचारणार नाही.. काळजी घे फक्त.. चहा कमी पी.. तेल-चुरमुरे खाऊ नको..)

आई: हो.. तू ठीक आहेस ना..
(मी ठीकच.. पूर्वी-इतका उत्साह नाहीये आता.. तुम्हीसुद्धा दमून येता.. तुम्हाला काय कमी व्याप आहेत. आमच्या कथा सांगून उगाच आणखी टेन्शन द्यायला नको वाटतं.. एकेकट्या राहता.. काळजी घ्या.. जग तितकंसं चांगलं राहिलं नाहीये..)

मी: हो.. चल, झोप तू आता.. गुड नाईट..
(ज्याचे त्याचे टेन्शन्स..तुम्हाला सांगून एवढ्या लांबून तुम्ही तरी काय करू शकणार आहात.. त्यापेक्षा नाहीच बोलत मी.. आठवण येतेय खूप.. रडायला यायच्या आधी गुड नाईट..)

आई: हो, तू पण.. गुड नाईट..
(काम करून दमताय तर फेसबुक कमी करा जरा.. जीवाला शांत झोप मिळूदे.. आमची काळजी करू नका.. तुम्ही ठीक असलात कि आम्ही मजेत असतो..)

तमाम आई-बाबांना या पोस्टद्वारे a big thank you !!

*असा हा संवाद मांडायची मूळ कल्पना माझी नाही.. कोरावर या प्रकारची एक पोस्ट होती.. मी मराठीत लिहिली.. थोडा स्वतःकडचा मसाला टाकून...

Friday 9 September 2016

नांदा सौख्यभरे!!

असाच अनेक रविवार सारखा एक रविवार. पुण्यातली दुपारची वेळ. सगळी कामं व्यवस्थित आवरून रेवा आपल्या 2BHK flat मध्ये आरामशीर पडली होती. नीरज नेहमीप्रमाणे office च्या कामासाठी जपानला गेला होता. तो परत येईपर्यंत तिच्या हक्काच्या निवांतपणाला कोणी त्रास देणार नव्हतं. सकाळच्या कामातून आत्ता जरा मोकळं झाल्यावर तिने Times उघडला. ती आधी काम करत असलेल्या कंपनीने एका competitor company ला takeover केलं होतं. तिला कंपनीमधले जुने दिवस आठवले. एकदम up to date असणारी रेवा सुरुवातीपासूनच smart Performer होती. तिचा स्मार्टनेस फक्त कपडे आणि looks पुरताच नव्हता. त्यामुळं संपूर्ण team मध्ये रेवा उठून दिसायची. काहींच्या विशेष नजरेत भरायची. तिच्या गुणांवर, रूपावर भाळलेला नीरज तिला विशेष निरखत असायचा. तिचं फक्त “असणं” त्याच्यासाठी Job motivation असायचं. रेवासुद्धा हे सगळं जाणून होती. सुरुवातीला team सोबत lunch ला जाणारे दोघं काही काळाने lunch time झाला की कामाचे बहाणे शोधायला लागले होते. दोघांनाच breakfast, lunch साठी जाता यावं म्हणून गनिमी कावा करायला लागले होते. ऑफिस संपल्यानंतर कधी CCD तर कधी Barista च्या फेऱ्या वाढू लागल्या होत्या. सगळ्यांना हे कळत होतं.
अथर्वला मात्र हे पचवणं थोड जड जात होतं. तो आणि रेवा college मध्ये असल्यापासून एकमेकांचे मित्र होते. त्यांचं चांगल जमायचंदेखील. आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी एकमेकांना सांगितल्या होत्या. ऑफिसमध्ये आल्यावर अथर्व आणि नीरजसुद्धा एकमेकांचे चांगले मित्र बनले होते. रेवा मैत्रीपलीकडे जाऊन अथर्वचा विचार करत नव्हती परंतु अथर्वला मात्र रेवा आवडायला लागली होती. अशा परिस्थितीमध्ये त्याला नीरज आणि रेवाला सोबत बघणं जड जात होतं. असे बरेच महिने गेले. अथर्वची मुंबईला बदली झाली. साहजिकच त्याचा आणि रेवाचा contact कमी झाला. रेवा आणि नीरज भावी आयुष्याची स्वप्नं रंगवण्यात दंग होते. दोघंही सुशिक्षित, सुसंस्कृत आणि मनमिळाऊ असल्याने दोन्ही घरांनी लग्नाला संमती दिली. “Neeraj weds Reva” चा समारंभ थाटामाटात पार पडला आणि ते सुखाने नांदू लागले.
जसा जसा काळ पुढे सरकत होता तसा दोघांच्याही कामाचा ताण वाढत होता. रेवाने कंपनी बदलली होती. नवीन ठिकाणी ती business development manager होती. नीरजनेदेखील जुनी कंपनी सोडून स्वतःचा business सुरु केला होता. त्यात बरकत होत होती. बँक account फुगत होतं. meetings च्या निमित्ताने नवनवीन देशांना भेटी देता येत होत्या. अधेमध्ये सुट्टी घेऊन long vacation ला जाता येत होतं. या सगळ्याची एक मोठी किंमत मात्र त्यांना मोजावी लागत होती. लग्नाआधी आणि नंतरच्या गुलाबी दिवसात एकमेकांशिवाय चैन न पडणारे ते दोघं आता एकमेकांना फक्त “reporting” करत होते. “आज यायला उशीर होईल गं, वाट बघू नको, जेवून घे, उद्या ६:०५ ची flight आहे, हे आणि ते. रेवाला हे सगळं खूप त्रासदायक वाटत होतं. तिने एकदोनदा नीरजशी बोलण्याचा प्रयत्नही केला आणि तिच्या लक्षात आलं कि नीरजला फारसा फरक पडत नाहीये. त्याची कंपनी स्वतःचं valuation वाढवत होती आणि नीरजला तेच जास्त महत्वाचं वाटत होतं.
एवढ्यात तिचा मोबाईल वाजला आणि ती वर्तमानात आली. तिला फेसबुकवर एक मेसेज आला होता. त्यात हाय हेल्लो काहीच नाही. फक्त एवढंच, “काय ग मुली, प्रेमात पडलीस, लग्न केलंस आणि जवळच्या मित्राला मात्र विसरून गेलीस ना.” जवळपास वर्षभराने अथर्वचा मेसेज आला होता. अशा मेसेजेसची रेवाला आताशा सवय झालेली होती. सेंटी सुरुवात करून काहीतरी काम सांगणारे मेसेजेस तिला नवीन नव्हते. पण अथर्व जुना मित्र आहे, बघू तरी काय म्हणतो म्हणून तिने बोलायला सुरुवात केली. मग फेसबुकवरून बदललेल्या नंबरची देवाण-घेवाण झाली. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी भेटायचं ठरवलं. रेवाने हे सगळं अतिशय उत्साहाने नीरजला सांगितलं. त्यावर त्याचं दोन शब्दांत उत्तर आलं, “अरे वाह!” नाही म्हणलं तरी ती थोडी हिरमुसली.
दुसऱ्या दिवशी रेवा मस्त आवरून अथर्वला भेटली. दोन एक तास बोलले दोघंजण. सुरुवातीला जरा अवघडलेपण होतं. पण जशा जशा जुनी आठवणी निघाल्या, कॉलेजचे दिवस आठवले तसं दोघंही मोकळेपणाने बोलू लागले. आणि मग वेळ कसा गेला कळलचं नाही. उशीर व्हायला लागल्यावर रेवा जायला निघाली. गप्पा मारून पोट भरलं होतं. बऱ्याच महिन्यांनी ती कोणाशीतरी एवढ्या मोकळेपणाने बोलली होती. तो आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.
असेच काही दिवस गेले. रेवा आणि अथर्वची पुन्हा एकदा घट्ट मैत्री झाली. एकटेपणाला कंटाळलेली रेवा आता मात्र खुश होती. तिला हवं तेव्हा तिच्याशी बोलणारं कोणीतरी तिला मिळालं होतं. तिच्यातला हा बदल अथर्वनेसुद्धा ओळखला होता. मात्र या सगळ्या गोष्टी घडत असताना नीरज फक्त आणि फक्त काम करत होता. तो कधीही रेवाबरोबर अथर्वला भेटायला आला नाही कि रेवाकडे त्याची चौकशी केली नाही. नीरज संपूर्ण नीरस होऊन जगत होता. या पार्श्वभूमीवर अथर्वचा जिवंतपणा, त्याचा जगण्याचा दृष्टीकोन, work-life balance याचं रेवाला खूप कौतुक वाटायचं. तिने कधी बोलून नाही दाखवलं पण अथर्वला तिच्या नजरेत हे दिसायचं.
एकेदिवशी whats app वर गप्पा मारता मारता रेवा पटकन बोलून गेली, “अथर्व, कुठे होतास रे इतके दिवस. थोडं आधी भेटायला हवा होतास बघ” त्या बोलण्यामागे जी व्याकुळता होती ती अथर्वला समजली. तो रेवाला सहानुभूती देऊ लागला. साहजिकच रेवाचा अथर्वकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला लागला. आणि हे सगळं नीरजच्या गावीही नव्हतं.
एका रात्री नीरज उशिरा घरी आला, त्याने packing केलं, दुसऱ्यादिवशीच्या flightचं timing सांगून तो झोपला. सकाळी रेवाला न सांगताच तो निघून गेला. रेवा उठली, नीरज गेलेला लक्षात आल्यावर, “रोबो झालाय याचा, लग्नाचा पहिला वाढदिवससुद्धा लक्षात असू नये माणसाच्या.. याच्यापेक्षा अथर्व किती lively आहे... असो!” असं म्हणत एक उसासा टाकून तिने आवरायला घेतलं. एवढ्यात बेल वाजली. कपडे सावरत, केस ठीक करत ती hall मध्ये आली. दार उघडलं आणि आश्चर्याचा धक्का बसून दोन पावलं मागे आली. हातात गुलाब, आणि तिची लाडकी Cadbury silk घेऊन तो दारात उभा होता.
“तू??? तू इथे काय करत आहेस? तुझी तर मीटिंग होती ना. सकाळीच गेलास न तू. नक्की काय झालंय? तू परत का आला आहेस? सगळं ठीक आहे ना?”
“अगं राणी हो हो.. किती प्रश्न विचारशील? नवऱ्याला घरात तरी घेशील की नाही.” असं म्हणत तिला मिठीत घेतच नीरज घरात आला. तिच्या चेहऱ्यावरचे असंख्य प्रश्न बघून त्याला मजा येत होती. तिची आणखी मजा न घेता त्याने बोलायला सुरुवात केली, “रेवा, सगळ्यांत आधी मला माफ कर. कंपनीच्या कामात मी एवढा गुंतून गेलो कि मला कशाचंच भान राहिलं नाही. तुझ्या तक्रारींकडेसुद्धा ‘झालं हिचं सुरु परत’ म्हणत मी दुर्लक्ष केलं. पण एका मेसेजने माझे डोळे उघडले. मागच्या आठवड्यात मला अथर्वचा मेसेज आलेला. “काय रे, ***! तुझी बायको नकोय का तुला. बघ, माझं अजून लग्न व्हायचंय.” खरं सांगायचं तर मला त्याचा प्रचंड राग आलेला. त्याच्या प्रश्नाला उत्तर न देता मी त्याला भेटायला बोलावलं आणि काय सांगू तुला, गड्याने मला पूर्णपणे जिंकलं. तुमचं रोज बोलणं होतं हे सांगितलं. तू एकटी पडत चालली आहेस याची अतिशय “प्रेमळ” शब्दांत जाणीव करून दिली. माझी चूक दाखवून दिली. मी भेटायला बोलवावं म्हणूनच ‘तसा’ मेसेज केल्याचं कबूल केलं. तू समोर असूनही मला जे दिसत नव्हतं ते त्याच्या त्या मेसेजने आणि बोलण्याने समजलं. तुझं असणं कायम गृहीत धरत गेलो मी. पण त्याच्या त्या मेसेजने मला जाणवून दिलं की तुला कोणी माझ्यापासून हिरावून नेलेलं मला चालणार नाही. सहन होणार नाही. तेव्हाच ठरवलं तुला सॉरी म्हणायचं. मग सरळ सरळ येऊन बोलण्यापेक्षा जरासं नाटक! असो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राणीसरकार.”
आता रेवाकडे बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. घट्ट मैत्रीने एक संसार परत सावरला होता. एका नव्या सहजीवनाची सुरुवात झाली होती...

Saturday 3 September 2016

एका गणेशोत्सवाची गोष्ट!!

तो शेवटचा स्वतःच्या घरात राहिला त्याला आता बरेच महिने उलटले होते. जगभरात फिरत, मिटींग्समध्ये कंपनीचं प्रतिनिधित्व करत, डील्स खिशात घालत त्याने या half year चं टार्गेट वेळेआधीच पूर्ण केलं होतं. लीड मिटींग्स मध्ये मि. अवधूत घाणेकर हे नाव star performers च्या यादीत बरेच महिने स्थान टिकवून होतं.

नुकताच जुलै संपला आणि दरवर्षीप्रमाणे अवधूतला गणेश चतुर्थीची आठवण आली. नोयडामधल्या त्या कंपनीने दिलेल्या घरात कालनिर्णय किंवा महालक्ष्मी वगैरे असायचं काही कारण नव्हतं. त्यामुळे त्याने गूगलला विचारलं, ' Ganesh Chaturthi 2016 ' त्यानेही तत्परतेने सगळी माहिती पुरवली. ते 'mantra', 'shloka' वगैरे वाचताना उगाचच काहीतरी चुकतंय असंही त्याला वाटून गेलं पण ते तेवढ्यापुरतंच. अचानक त्याला आठवलं 'काही वर्षांपूर्वी पुण्यात असताना सगळं कसं हौसेने व्हायचं. छोट्या गणपतीची प्रतिष्ठापना व्हायची, 'दास रामाचा वाट पाहे सदना' म्हणत आरत्या व्हायच्या, चतुर्थीला अथर्वशीर्षाची आवर्तनंदेखील व्हायची. अनुजासुद्धा सगळं अतिशय भक्तिभावाने करायची. स्वतःचा जॉब सांभाळत तिने सगळं केलं. अनुजाची आठवण त्याला आणखी जुन्या काळात घेऊन गेली. लग्नाचा डाव मांडून चार वर्षं झाली होती. दोघंही आता तिशी पार करून बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेले होते. जबाबदाऱ्या वाढल्या होत्या, त्या पेलण्याची ताकदही आलेली होती. दोघंही आता आई-बाबा व्हायला मानसिक दृष्ट्या तयार झाले होते. वाढत्या स्पर्धेला त्यांनी यशस्वीरितीने तोंड दिलं खरं पण वाढत्या वयाकडे मात्र त्यांचं दुर्लक्ष झालं होतं. अनुजाचं शरीर आता आई होण्यासाठी साथ देणार नव्हतं. मग बरेच उपाय झाले, सगळ्या पॅथीज आजमावून झाल्या, शेवटी IVF करायचं ठरलं आणि सुदैवाने तो प्रयत्न यशस्वी झाला. आता नऊ महिने वाट बघायची मग घरात एक छोटा जीव येणार होता. बघता बघता सहा महिने संपले आणि अनुजाची रजा सुरु झाली. बऱ्याच गुंतागुंतींनंतर घरात बाळ येणार म्हणून अनुजाची विशेष काळजी घेणं सुरु होतं. अवधूत आणि अनुजा दोघांचे आई बाबा घरी आले होते. बाळ आल्यावर काय काय करायचं याच्या प्लॅनिंगमध्ये काळ पुढे जात होता. आठवा संपला आणि अनुजाला खूप त्रास होऊ लागला. सी-सेक्शन करायचं ठरलं. पण दैव कसं विचित्र बघा. बाळाच्या जन्माची बातमी सांगणाऱ्या नर्सना अनुजा आणि बाळ दोन्ही गेल्याची बातमी सांगावी लागली. अवधूत पूर्णपणे हादरून गेला. त्याच्या आणि अनुजाच्या आई बाबांनी त्याला सावरलं. काही दिवस गेल्यानंतर मात्र त्याने स्वतःला पूर्णपणे कामात गाडून घेतलं. पुणे सुटलं, घर तर शिकायला बाहेर पडला तेव्हाच सुटलं होतं. तीन चार वेळा परदेशवारी झाली, हळूहळू स्वतःच्या घरी राहणं कमी होऊ लागलं. आई बाबांना फोनही होईनासे झाले. एवढ्या कष्टांचा परिणाम म्हणून प्रत्येक ‘perforance cycle’ च्या वेळेस अवधुतचं प्रोमोशन ठरलेलं होतं. मागच्या वर्षी अनुजा जाऊन दहा वर्षं होऊन गेली होती. ती गेल्यानंतर त्याने दुसऱ्या कोणाचा विचारही केला नव्हता, त्याला तसा वेळही मिळाला नव्हता म्हणा. कायम फिरतीवर राहणारा अवधूत किमान सणावारी तरी घरी असावा ही त्याच्या आई बाबांची इच्छा आता एक स्वप्न बनून राहिलं होतं. एवढ्यात इ-मेल नोटिफिकेशनची टिंग वाजली आणि अवधूत वर्तमानात आला. समोर स्क्रीनवर 'Ganesh Chaturthi - 5 September 2016' दिसत होतं. त्याने काहीतरी विचार आणि निर्णय घेतला..

2 सप्टेंबरला सकाळी गुहागरच्या व्याडेश्वराच्या मंदिरात एक डिरेक्टर चपलांबरोबर आपल्या सगळ्या व्यावसायिक जबाबदाऱ्या बाहेर सोडून प्रवेश करत होता. गाभाऱ्यात जाऊन त्याने मनोभावे दर्शन घेतलं आणि तो वरच्या पाटाकडे निघाला. तो घाणेकर वाड्याजवळ आला तेव्हा ओसरीवर विनायकराव झोका घेत सामना वाचत होते. 'याही वर्षी अवधूत नाही. शेजारी मेहेंदळेंकडे गोकुळ नांदतंय कालपासून आणि आमचा कान्हा आम्हाला भेटून युगं लोटली असा विचार करत उमाबाई भिजवून वाळवलेले तांदूळ डब्यात भरत होत्या. नैवेद्यासाठी मोदकांच्या पिठीची तयारी सुरु होती. एवढ्यात अंगणामधलं दार वाजलं आणि चष्म्यावरून बघत विनायकरावांनी विचारलं 'कोण आलंय??' साध्या टी-शर्ट आणि पॅन्ट मधला अवधूत समोर उभा आहे हे समजायला त्यांना जरा वेळच लागला. जेव्हा ते समजलं तेव्हा मात्र घाणेकरांचं अंगण प्रेम, आनंद, खूप वर्षांच्या विरहानंतरच्या भेटीच्या सुखाने भरून गेलं. भेटीचा पहिला बहर ओसरला. आणि गप्पांना सुरुवात झाली. दिवस कसा संपला कोणालाही कळलं नाही. खूप वर्षांनी अवधूतला त्या खाली घातलेल्या गादीवर आणि अंगावर घेतलेल्या गोधडीमध्ये शांत झोप लागली.

यावर्षी बाप्पा येताना खूप काही घेऊन आले होते. डिरेक्टर मि. घाणेकर मधला अव्या पुन्हा एकदा जिवंत झाला होता. विनायकराव आणि उमाबाईचा अवि खूप वर्षांनी घरी आला होता. झोपलेल्या अविच्या डोक्यावरून हात फिरवताना उमाबाईंच्या आणि त्या माऊलीच्या कृतार्थ चेहऱ्याकडे बघताना विनायकरावांच्या डोळ्यांना मात्र आनंदाच्या धारा लागल्या होत्या....