Thursday 15 January 2015

अर्वाचीन मराठी कवितेचे जनक - केशवसुत !!!



      आज नवीन वर्षाच्या पहिल्या वहिल्या लेखात आपण भेटणार आहोत अशा एका कलावंताला ज्याच्या साहित्याने अर्वाचीन मराठी कवितेचं रंगरूप पालटलं.  त्यांच्या कवितेत आत्मनिष्ठाता जाणवते.. सामाजिक रूढींवर असणारा मनस्वी राग जाणवतो.. म्हणूनच आज इतक्या वर्षांनंतरही त्यांची कविता ओजस्वी आणि तेजस्वी वाटते..!! असे हे अर्वाचीन मराठी कवितेचे जनक - केशवसुत अर्थात कृष्णाजी केशव दामले!!
" एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी "
     अस म्हणत सामाजिक क्रांतीची उद्घोषणा करत केशवसुतांनी मराठी साहित्याभूमिवर आगमन केल..
"अवकाशाच्या ओसाडीतले पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी फुंक मारीता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल?
     आजवर मुके असणार्या, असमानातेमध्ये जगणाऱ्या जीवांना आधार म्हणून त्यांची तुतारी उदयास आली.. स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुता यांचा पुरस्कार करत त्यांनी सामाजिक रूढींवर हल्ला चढवला..
"रुढी,जुलूम यांची भेसूर संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही हतवेला जल्शाची का? पुसा मनाला!
तुतारीने या सावध व्हा तर!"
     अस म्हणत त्यांनी 'अन्याय करणार्याप्रमाणेच अन्याय सहन करणारा देखील दोषी आहे' अस सांगितल.. 'पीडित लोकांनी मदतीसाठी स्वतः सज्ज व्हायला हवं' अस म्हणत अनेक लाचार मनांना जागं केलं..
     आजमितीला त्यांच्या उपलब्ध असणार्या कवितांमध्ये 'तुतारी' हि अतिशय उल्लेखनीय कविता आहे.. या कवितेच्या नावावरून तेव्हा तुतारी मंडळ स्थापन झाले होते. गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी, रेंदाळकर यांसारखे नावाजलेले कवीसुद्धा स्वत:ला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत.
     केशवसुतांच्या आधीच्या कवितेचा काळ म्हणजे परमेश्वरभक्ती, ओव्या, पोवाडे, पौराणिक काव्य, वीर-शृंगाररसयुक्त रचना यांचा होता.. पण त्यांनी या सगळ्यात रंगून जाणार्या मराठी कवितेला सर्वसामान्य माणसांच्या जगात आणलं. चाकोरीबद्ध कवितेला स्वच्छंद, मुक्त रूप दिलं. सर्वसामान्य माणसांची सु्खदु:खे, भावभावना, वासना-विकार यांना कवितेत मानाचे, जिव्हाळ्याचे स्थान दिलं.. कवितेला वास्तवतेचे भान दिलं.. त्यांच्या कविता प्रखर व्यक्तिवादी आहेत.. आत्मनिष्ठ जाणीव आणि सौंदर्यवादी दृष्टीकोन देणाऱ्या आहेत.. कवीला कविता कशी स्फुरते, तिचं सौंदर्य कशात आहे.. हे सांगायचा त्यांनी प्रयत्न केला.. कवितेचे प्रयोजन सांगताना ते म्हणतात,
"द्या उत्तेजन हो कवीस,   करा गाणे त्याचे मुके..
गाण्याने श्रम वाटतात हलके.. हेही नसे थोडके.!!"
     वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकारसुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत रूढ केला.. आशय-विषय-रचना या तिन्ही गोष्टीमध्ये बदल करून त्यांनी मराठी कवितेचा चेहरा मोहराच बदलून टाकला!!
" अशी असावी कविता फिरून, तशी नसावी कविता, म्हणून
सांगावया कोण तुम्ही कवीला आहात मोठे?? पुसतो तुम्हाला...
करुनिया काव्य जनात आणणे, मुख्य हा हेतू तदीय मी म्हणे.."
     अस म्हणत त्यांनी कवीच्या स्वातंत्र्याचा उद्गार केला.. कविता कशी असावी हे सामान्य लोकांनी प्रतिभावंताला सांगायची गरज नाही असाही त्यांनी ठणकावून सांगितलं..
शब्दांनी क्रांती करणाऱ्या केशवसुतांनी कायमच सर्वसमावेशकतेचा पुरस्कार केला.. त्यांच्या 'तुतारी', 'शिपाई', 'गोफण', 'निशाण' या कविता आजही तितक्याच आवडीने वाचल्या जातात, वाचणार्याच्या मनाला उभारी देतात..
" जुने जाऊद्या मरणालागुनि जाळुनि किंवा पुरुनि टाका,
सडत एका ठायी ठाका, सावध ऐका पुढल्या हाका..
खांद्यास चला खांदा भिडवुनि "
     अशा कठोर शब्दात कानउघाडणी करणाऱ्या केशवसुतांची हि कविता आजही जनमानसावर राज्य करून आहे.. इतिहासाला विसरू नका पण म्हणून त्या गुंतून राहू नका. तसं झाल तर तुम्ही तुमचा उज्ज्वल भविष्यकाळ घडवू शकणार नाही अस म्हणत ते युवकांना सांगतात,
"प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी त्यात खोदा..
निजनामे त्य्वर्ती नोंदा.. बसुनी का वाढविता मेदा..
विक्रम काही करा चला तर...!!!"
कल्पनारूपी नावेत बसून आकाशरूपी समुद्रात जावे.. तेथून नक्षत्रांची रत्ने पृथ्वीवर फेकून तिला श्रीमंत करावे हि या कवीची कल्पनाभरारी!!
"काठोकाठ भरू द्या पेला.. फेस भराभर उसळू द्या..
प्रश्न करिता रंग जगाचे.. क्षणोक्षणी ते बदलू द्या..
क्र्लूप्तीची मग करूनि नौका  व्योमासागारावरि जाऊ..
उडुरत्ने या गरीब धरेला  तेथुनि फेकुनिया जाऊ!!!"
     त्यांनी आपल्या कवितांमधून सामाजिक दु:, अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, कविकल्पना हे विषय जसे आणले तसेच व्यक्तिगत स्नेहसंबंध, स्त्रीपुरुषांमधील प्रेमभावना, त्या प्रेमभावनेचा प्रांजळ नितळ अविष्कारही आणला.. आपल्या पतीचे कुशल विचारणार्या पत्नीला ते म्हणतात ;
"करा अपुल्या तू पहा चाचपून,  उरा अपुलिया पहा तपासून
प्रकृती माझीही तिथे तुज कळेल,  विकृती माझी तुज तिथे आढळेल."
आपल्या घराची, पत्नीची आठवण काढताना ते म्हणतात;
"श्वासांनी लिहिली विराम दिसती  ज्यांमाजि बाष्पीय ते,
प्रीतीचे बरवे समर्थन असे  संस्पृत्य ज्यांमाजि ते,
कांतेची असली मला  पवन हा पत्रे आता देतसे,
डोळे झाकुनि वाचिता त्वरित ती सम्मूढ मी होतसे."
अशा प्रकारे प्रेमाचे विशिष्ट तत्त्वज्ञानही त्यांनी फार सूक्ष्म रीतीने मराठीत तर प्रथमच आपल्या कवितेतून मांडले...
     केशवसुतांच्या काही गूढरंजनात्मक कवितादेखील प्रसिद्ध आहेत.. काव्यप्रतिभा जेव्हा कविमनाला स्पर्श करते तेव्हा कवी एक अलौकिक अवस्थेमध्ये जातो..जणू त्याची समाधी लागते!! याच अवस्थेला ते "झपूर्झा' म्हणत!!
"हर्ष खेद ते मावळले.. हास्य निमाले! अश्रू पळाले..
कंटकशल्ये बोथटली.. मखमालीची लव वठली..
काही दिसे दृष्टीला.. प्रकाश गेला! तिमिर हरपला,
काय म्हणावे या स्थितीला...?? झपूर्झा गडे झपूर्झा!!! "
     आज इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या कविता एक मानदंड म्हणून ओळखल्या जातात यातच त्याचं चिरंजीवित्व दिसून येत!! ज्या काळात राजकीय क्षेत्रात लोकमान्य टिळक; सामाजिक क्षेत्रात आगरकर क्रांतिकारी भूमिका पार पाडत होते, त्याच काळात तशीच भूमिका मराठी कवितेच्या क्षेत्रात केशवसुत यांनी यशस्वीपणे पार पाडली..  काव्यविषयक दृष्टीकोन, तिचा अविष्कार या सार्याच बाबतीत त्यांनी क्रांती घडवून आणली... कवितेलाच आपले जीवनसर्वस्व मानणार्या या कलावंताला अवघ्या ३९ व्या वर्षी मृत्यूने गाठले हे मात्र मराठी साहित्याचे आणि महाराष्ट्राचे दुर्दैव!!! परंतु, मराठी कवितेला बंधनांतून मुक्त करून चौफेर रचना करणाऱ्या या महान कवीचे ऋण मात्र फिटणारे आहे!! त्यांना सदर प्रणाम!!!