Thursday 26 February 2015

मृत्युंजयकार "शिवाजी सावंत"!!



आयुष्यात इतिहासाने पाहिलं पाउल टाकल ते आईने सांगितलेल्या गोष्टींमधून.. तेव्हा कोण कोणाशी कशाप्रकारे वागल हे काही कळाल नव्हत... महाभारत का घडल हेही कळाल नव्हत.. नंतर अभ्यासक्रमात आलेल्या इतिहासाने क्रमिक पुस्तके तयार करणार्यांच्या मनातला इतिहास सांगितला.. कृष्णाला देवत्व बहाल केल.. अर्जुनाला कृष्णाचा शिष्य आणि कर्णाला एक दानशूर, तरीही वाईट मनोवृत्तीचा कौरव-मित्र म्हणून दर्शविल गेल.. पुढे जेव्हा थोडफार कळायला लागल, स्वतःची मत बनवता येऊ लागली तेव्हा हातात अस एक पुस्तक आल कि ज्यामुळ कर्ण एक नायक बनला.. अर्जुनच नव्हे तर सारेच पांडव कृष्ण आणि कुंती यांना मार्गदर्शक समजून समजून आदर्श जीवन जगले अस वाटू लागल.. या पुस्तकाबद्दल मलाच नव्हे तर हजारो मराठी वाचकांना असच वाटत... माझ्या मते हे पुस्तक कुठल हे सांगण्यासाठी अजून प्रस्तावनेची गरज नाही... हि अजरामर कादंबरी आहे "मृत्युंजय!!" आणि तिचा निर्माता आहे "शिवाजी सावंत"..
“मृत्युंज” या पहिल्याच कादंबरीमुळे सिद्धहस्त लेखक आणिमृत्युंजयकारही उपाधी मिळवलेल्या शिवाजी गोविंदराव सावंत यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९४० रोजी कोल्हापूर जिल्हय़ातील आजरा या गावी झाला. “आजऱ्यातील निसर्गाने माझे साहित्यजीवन फुलवले” असे सावंत नेहमीच म्हणत..  
शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर शिकण्याची परिस्थिती नसल्याने टायपिंग, शॉर्टहँडचा कोर्स करून कोर्टात नोकरीला लागले. पण तिथे रमले नाहीत. पुढे कोल्हापूरच्या राजाराम प्रशालेत अध्यापकाच्या नोकरीत मात्र ते रमले. सावंत उत्कृष्ट कबड्डीपटू होते, ही त्यांची आणखी एक ओळख!!!
“माझा भारत म्हणजेच महाभारत” हे समीकरण बालवयातच पौराणिक गोष्टी ऐकून त्यांच्या मनात पक्के रुजले होते. यातूनच त्यांना वेध लागले ते सूर्यपुत्र कर्णाचे!! या कर्ण कथेला मूर्त रूप देण्यासाठी अभ्यास म्हणून त्यांनी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रात मुक्काम ठोकला. प्रदीर्घ संशोधन, चिंतन आणि मनन यातून रससंपन्न अशा वास्तववादीमृत्युंजयया कादंबरीचा जन्म झाला.. हि कादंबरी मला स्वतःला अतिशय जवळची आहे.. हिने मला माणस ओळखायला शिकवलं.. भाषा किती आणि कशी खुलवता येते हे शिकवलं.. हि नुसती ऐतिहासक कादंबरी नाही. तर एक जीवनगाथा आहे.. जिचा महानायक आहे कर्ण.. त्याचा त्याग, त्याने भोगलेल्या यातना, सोसलेले कष्ट, त्याचं निखळ मित्रप्रेम, त्याचा आदर्शवाद आणि अर्थात त्याच व्यक्त- अव्यक्त सूर्यप्रेम, सूर्यनिष्ठा!! सावंतांनी अत्यंत रसरशीत भाषेत ते सर डोळ्यांसमोर उभ केल आहे..  हि कथा बोजड भाषेच्या साखळदंडांना सहज तोडून पुढे उभी राहते!! वाचून मन क्षुब्ध करून टाकते, कर्णासाठी डोळ्यांत अश्रू उभी करते!! क्वचित पांडवांबद्दल विद्वेष देखील !!अशी ही  प्रभावी, प्रेरक, हृदयद्रावक, जिवंत कर्णकथा! या कादंबरीने एक नवीन प्रघात पडला.. कादंबरी मधील पात्रे आपल्याशी संवाद साधू शकतात असा विचार आधी कोणी केलाच नव्हता.. जेव्हा कर्ण त्याचा उद्वेग, त्याची अगतिकता व्यक्त करतो तेव्हा डोळ्यांना पाणी आवरण कठीण होऊन जात!! संस्कृत प्रचुर भाषा अक्षरशः आपल्याला महाभरत काळात घेऊन जाते!! कर्णाबरोबर हस्तिनापुरात, त्याच्या वाड्यात, राहतो आहोत, फिरतो आहोत, गंगाकिनारी नाहतो आहोत अस वाटत..!! मृत्युंजय मधून त्यांनी निसर्ग, मानवी भावभावना, कपटी वृत्ती एवढच दाखवलं नाही तर जीवनविषयक तत्वज्ञानदेखील सांगितल!! निसर्गातल्या गोष्टींच्या आधारे कधी रूपक अलंकारातून, तर कधी उपमेच्या मदतीने जीवनाच्या विविध अंगाची सांगड घालून सांगितलेलं हे तत्वज्ञान!! यामुळ मृत्युंजय एक प्रगल्भ ललितकलाकृती बनली..  शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले... “मृत्युंजय”ला मुर्तीदेवी पुरस्कार देखील मिळाला!!  नंतर तिला महाराष्ट्र शासन, . चिं. केळकर, पूनमचंद भुतोडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिचे इंग्रजीसह अनेक भाषांत अनुवाद झाले.. १९९० सालीनोबेलपुरस्कारासाठी ही कादंबरी नामांकित झाली होती!!! यातूनच सावंतांच भाषाप्रभुत्त्व दिसून येत!!!
मला अनेकदा वाटत आमच्या पिढीला इतिहास शिकवण्याच काम अशाच ऐतिहासिक कथा, कादंबर्या लिहिणाऱ्या लोकांनी केला आहे.. सावंतांनी महाभारत शिकवलं.. आधी मृत्युंजय मधून कर्ण नंतर युगंधर मधून कृष्ण समजावून सांगितला.. श्रीकृष्णहा तमाम भारतीयांचा चिंतनाचा विषय!!!  तब्बल २० वर्षांच्या प्रदीर्घ चिंतनातून श्रीकृष्णाच्या जीवनावरयुगंधरही कादंबरी साकारली...  "आपल्या प्रत्येकात अंशरूपाने तो प्रभू नांदत असतो" याची जाणीव करून दिली.. हा आकृतिबंध समोर आणतानादेखील त्यांनी श्रीकृष्णाच्या तोंडूनच त्यांनी आत्मकथा वदविली.. मथुरा, उज्जैन, जयपूर, कुरुक्षेत्र, द्वारका, प्रभास असा शोधक प्रवास करताना ते स्वतः कृष्णरुपात नाहून गेले आणि नंतर ही कथा कृष्णार्पणमस्तु करून आपल्यालाही तोच अनुभव दिला..!!
नंतर ते घेऊन आले प्रत्येक मराठी माणसाला देवतुल्य वाटणाऱ्या सिंहाच्या छाव्याला!! छावा हे संभाजीराजांचे हे स्फूर्तिदायक चरित्र. लेखक शिवाजी सावंत यांच्या या पुस्तकानं मराठी मनाला वेड लावलं. १९७९ साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. आजतागायत संभाजीमहाराजांच्या पराक्रमाच्या वर्णनाची मोहिनी कायम राहिली आहे... छावा वाचताना शिवाजी महाराज-सईबाई एकमेकांशी खरच इतका प्रेमाने बोलत असतील अस दृश्य समोर उभ राहत!! सोयराबाईंच कट-कारस्थान वाचताना एक अतीव चीड येते.. संभाजीराजांचे तामसी, अविचारी रूप पुसलं जात आणि संवेदनशील, हळवं, करारी आणि देशप्रेमी रूप या चरित्रातून दृगोचर होतं. "संभाजीराजे खरच व्यसनांध असते, तर शेवटच्या कठोर साजेच्या प्रसंगी पारच ढासळले असते. कारण ती सजाच तेवढी क्रूर आणि अमानवी होती" हे सावंत दाखवून देतात. शिवाजीराजांचे पुत्र त्यांना शोभणारे वीर, साहसी होते, यावर ते प्रकाश टाकतात... सावंत यांची रसाळ, ओघवती शैली ऐतिहासिक प्रसंग उभे करताना अधिकच खुलते. पानोपानी उत्कंठा वाढत जाते... या कादंबरीचा शिरोमणी म्हणता येईल असा प्रसंग म्हणजे संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली तो!! या प्रसंगाला सावंतांनी इतकं अचाटरीतीने सादर केल आहे कि बस्स!! शिवाजी राजे तर आपल्या मराठी माणसाच्या मनामनात आहेतच परंतु संभाजी राजे काहीसे अनोळखी आहेत..म्हणूनच आपण हे पुस्तक एकदा तरी वाचायला हव!! हिंदवी स्वराज्य कस उभाराव आणि नंतर मराठ्यांनी कसे जगावे हे शिवाजी राजांनी सांगितलं.. परंतु नऊ-नऊ शत्रूंना तोंड देत मिळालेलं स्वराज्य अबाधित कसं ठेवावं, त्यासाठी प्रसंगी कसं बलिदानही द्याव हे संभाजी राजांनी सांगितलं..
इतिहास हा जरी सावंतांचा लाडका विषय असला तरी त्याचबरोबर  सहकार कामगार हे त्यांच्या जिव्हाळय़ाचे विषय होते..  याच क्षेत्रातील एक दिग्गज पद्मश्री विखे पाटील यांच्या जीवनावरलढत’, कामगारनेते भाई कोतवाल यांच्या जीवनावरसंघर्ष’, त्याशिवायमोरावळा’, ‘अशी मने असे नमुनेही व्यक्तिचित्रे लिहून त्यांनी मराठी भाषा समृध्द केली!! ‘अशी मने असे नमुनेमध्ये त्यांच्या आजऱ्यामधी घाटोळी माणसांबद्दल वाटणारा आपलेपणा व्यक्त झाला आहे..
सावंतांनी कथा, कादंबर्या याचबरोबर विविधरंगी ललितलेखनदेखील केल.. अशाच निवडक लेखनच संकलन म्हणजेशेलका साज”!! यात सावंतांच्या खास रसश्रीमंत शैलीत वेध घेतलेले महाराष्ट्रवैभव कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जसे भेटतील, तसेच लेखकाला चकवा देऊ बघणारा वाचक अशी झूल पांघरलेला लफंगाही भेटेल. . शिवराय, शंभूराजे, महाराणी येसूबाई, सरलष्कर संताजी घोरपडे यांच्या जीवनझुंजीतील आजवर मराठी वाचक मनाला अज्ञात राहिलेल्या मनामनांच्या कंगोर्यांना केलेला रसबाळा, तरल ललितस्पर्श भेटेल.. इथं आर्य चाणक्याच्या वेगळ्याच दृष्टीनं केलेला विचार दिसेल, तसंच, दीनदलितांना 'आधारवडझालेल्या राजर्षी शाहूंचं क्षणदर्शन घडेल... 'मुकीही कथा तर अल्बर्ट कामूची आठवण करून देईल.. आणि सर्व शेलक्या कथा आपल्या कथासंग्रहाच नाव सार्थ करतील!! शेलकासाज बरोबरच त्यांनीकांचनकण’,‘कवडसेहे ललित लेख लिहील आणि मराठी साहित्य संपन्न केले. ‘छावा आणि मृत्युंजयया कादंबऱ्यांवरील नाटकांचेही मराठी रसिकांनी स्वागत केले!! एक उत्तम वक्ता म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले.. याव्यतिरिक्त रसिक वाचकाच्या मनात त्यांना आढळ स्थान मिळाल ते वेगळच!!!
७६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कऱ्हाड येथे होणार होते.. त्यासाठी अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या प्रचारार्थ दौऱ्यावर गेले असता हृदयविकाराच्या झटक्याने मडगाव-गोवा येथे त्यांचे निधन झाले. तो दिवस होता १८ सप्टेंबर २००२!!  काळाने यांना आपल्यामधून काढून घेतलं परंतु इतिहासाला रोमांचक आणि रसभरीत बनवणाऱ्या या "मृत्युंजयकारा"ला आपल्या मनामधून काढून नेण आजही कोणाला शक्य झालेलं नाही!!