Wednesday 11 February 2015

सामान्य माणसाचा बहुआयामी साहित्यिक - वि.स. खांडेकर..!!



आजवर आपण अनेक साहित्यिकांना भेटलो.. त्यांच्या कलाकृतीना रसिकांनी फक्त कपाटातच नव्हे तर हृदयात जागा दिली.. त्यांमध्ये निसर्ग होता.. पहिल्या प्रेमाचा नाजूक अविष्कार होता.. कधी आईबद्दल वाटणारं प्रेम होतं तर कधी मातृभूमीबद्दल वाटणारी ओढ!! संयत शृंगार होता, क्वचित विरक्ती देखील होती.. पण आज आपण अशा एका साहित्यिकाला भेटणार आहोत ज्यांच्या कादंबरीने मराठी शब्दशारदेला "ज्ञानपीठाची" कवाडे उघडी करून दिली.. विनोदी साहित्याने लेखन प्रारंभ करणाऱ्या यांनी कालांतराने थोर विचारवंत, समीक्षक म्हणून लोकप्रियता मिळवली.. कथा, पटकथा, काव्य, कादंबरी, नाटक अशा अनेक साहित्य प्रकारांत त्यांनी विपुल लेखन केल.. अनेक ग्रंथाचं संपादन केल.. पत्रकारितादेखील केली.. असे हे बहुआयामी साहित्यिक - वि.. खांडेकर..!!
भाऊसाहेब खांडेकरांच्या अनेक कादंबर्या प्रसिद्ध आहेत परंतु ज्या कादंबरीने अखिल साहित्य विश्वाला मराठी साहित्याच सौंदर्य दाखवून दिल ती कादंबरी म्हणजे "ययाती"!! खांडेकरांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील 'ययाति'चे स्थान मेरुमण्यासारखे आहे.. पुराणकथांत जे भव्य-भीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच ते दुसर्या दृष्टीने चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते. त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच 'ययाति'च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे...
एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत.. कामुक, लंपट, स्वप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति! अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी! स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत...
ययाती वाचणारा वाचक प्रगल्भ हवा.. शृंगारापलीकडे जाऊन प्रेमाला उदात्त भावनेने पाहणारा हवा..  स्त्री - पुरुष संबंध फक्त कामावसानेतूनच निर्माण होऊ शकतात अशा कोत्या मनाचा नसावा.. काम, संसार, भक्ती आणि मोक्ष या पायऱ्यांची जाणीव असणारा हवा.. अजाणपाणी वाचायची हि कादंबरी नाही.. उथळपणे वाचायची तर नक्कीच नाही... शब्दारचनेचा आनंद घेऊ शकणार्या माणसानेच हि कादंबरी वाचावी.. खुद्द खांडेकरांनीच अस  प्रकटपणे म्हणलं आहे "ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी"
प्रेम हा त्यांच्या अनेक कादंबर्याचा गाभा होता.. त्यांच्या "पहिलं प्रेम मध्ये ते म्हणतात, " प्रत्यक्ष आयुष्यात प्रीतीच्या मार्गावर पारिजातकाची पुष्पे पसरलेली असावीत, असे आपण म्हणत असतो. पण गमतीची गोष्ट अशी की, वाङ्मयात मात्र मार्गावरल्या काट्याकुट्यांनी पदोपदी रक्तबंबाळ होणारी प्रीतीची मूर्तीच आपल्याला अधिक मनोहर वाटते; आणि शेवटी मनुष्याला जगात जो अनुभव येतो, त्यात फुलेही नसतात आणि काटेही नसतात. सामान्य मनुष्याच्या प्रीतिमार्गावर फक्त खडे असतात. ते त्याला मधून मधून चांगलेच बोचतात. त्या दु:खाने प्रसंगी तो अगदी रडकुंडीला येतो. पण त्याच वेळी कुठून तरी येणार्या शीतल वायुलहरी त्याचा शीण नाहीसा करून त्याला उल्हसित करीत असतात. तो पुन्हा शीळ घालीत पुढे चालू लागतो.."
आयुष्यात प्रेमाची जागा किती महत्वाची असते हे त्यांना जाणवलं होत आणि वाचकांनादेखील ते जाणवून द्यावं याचा त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केला.."अमृतवेल"सुद्धा अशीच सुरेख कादंबरी.. इथे ते प्रेमाला प्रीती म्हणतात.. मला वाटत हा शब्दच इतका नाजूक आहे ना कि त्यामागे असणारी भावना आपोआप नाजूकच प्रतीत होते.. यामध्ये ते म्हणतात..
" प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. सार्या संसाराचा आधार आहे ती! पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करूणा उमटते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हा - जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा -- प्रीतीचा खरा अर्थ जाणवतो." अशी हि प्रीती थोड्या काळाच्या सहवासे फुलत नाही.. बहरत नाही.. त्यासाठी आयुष्यभराची सोबत लागते.. परंतु केवळ कामतृप्ती हे या सहवाच साध्य अथवा साधन होऊ शकत नाही..  ते म्हणतात.. "तरुण स्त्री-पुरुषांनी प्रेमजीवनात शरीरसुखाचा भाग अतिशय महत्त्वाचा मानला पाहिजे, परस्परांच्या आनंदसंवर्धनाकरता आपण एकमेकांचे हात हातात घेतले आहेत, याचा त्यांनी स्वत:ला कधीही विसर पडू देऊ नये.. आकाशातल्या चंद्राला हात लावण्याच्या धडपडीत माणसाचे पृथ्वीवरले पाय सुटले, तर तो तोंडघशी पडतो. तो चंद्र योग्य वेळी अनेकांच्या हाती लागतो; असे नाही; पण त्याचा लाभ संसाराच्या सुरुवातीला होत नाही. दहा-वर्षे संकटे आणि सुखे यांची चव जोडीने घेतल्यावरच त्या चांदण्याची वृष्टी होऊ लागते. त्या दृष्टीने उदात्त प्रीती हा शुक्ल पक्षातला चंद्र नाही; तो वद्य पक्षातला आहे. .."
या प्रेमभावनेला अजून उदात्त करताना ते म्हणतात प्रेम फक्त त्याच आणि तीच नसत.. तर  निसर्ग, मानवता, कला, कलाकृती या सर्वांवर आपण प्रेम करू शकतो.. फक्त त्यात समर्पण भाव हवा.. आत्मकेंद्रीपणा नको.. तो संकुचित विचार प्रेमाच्या झर्याला खंडित करतो.. आणि मग प्रेमाची अमृतवेल विषारी बनते.." या बाहेरच्या विश्वात रौद्र - रम्य निसर्ग आहे, सुष्टदुष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत, आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्रं आहेत. पण हीच नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं झालं, म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही; तो स्वत:चाही वैरी बनतो ! मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकू लागतात... "
 कादंबरीवर प्रभुत्व असणार्या खांडेकरांनी अनेक लघुनिबंध लिहिले.. "धुके"  हा त्यांच्या 'मंझधारया मूळ बृहद्संग्रहातून वेगळ्या काढलेल्या एकवीस लघुनिबंधाचा संग्रह आहे... काव्य, विनोद तत्त्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न या संग्रहात संकलित केलेल्या लघुनिबंधांत दिसतो... खांडेकरांच्या लघुनिबंधात तत्त्वदर्शन, भावनाविहार आणि कल्पनाविलास हे तीन गुण प्रकर्षानं आढळतात... त्याच्या लघुनिबंधांमधली सौंदर्यस्थळे मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी आहेत.. विनोद पोट धरून हसवणारा नसून, गालावर खळी पडणारा आहे.. आणि त्यातून व्यक्त होणारे तत्वज्ञान बोजड वाटता क्षितिजावर नुकत्याच चमकू लागलेल्या चांदण्याप्रमाणे सुंदर वाटतं..
खांडेकरांनी आपल्या लेखनातून सामाजिक विषमतेवर देखील हल्ला चढवला.. आपल्या "दोन ध्रुव" या कादंबरी मध्ये त्यांनी धर्म आणि संस्कृती यांच्या नावाने केलेल्या पद्धतशीर पिळवणुकीची लक्षणांवर प्रकाश टाकला आहे.  ते म्हणतात..
"मानवी समाज हा एकरूप किंवा एकजीव नाही तर या समाजाचे दोन विचित्र भाग आहेत. एका भागाची चैन दुसर्या भागाच्या कष्टांवर उभारली आहे; इतकी या भागांमध्ये विषमता आहे. ही दोन सर्वस्वी भिन्न विश्वे आहेत. या दोन विश्वांतील माणसे कितीही जवळजवळ वावरत असली, तरी त्यांच्यामध्ये दोन ध्रुवांचे अंतर आहे. स्त्री आणि दलित या दोन्हींवर होणारे अन्याय हे अशाच विषमतेचा भाग आहेत..."
याच संवेदनशील विषयाला काव्यरुपामधूनदेखील त्यांनी वाचकांच्या समोर मांडला आहे.. माणसाला पंख असतात या चित्रपटातील एका गीतामध्ये ते एक नवीन आशावाद घेऊन येतात..
"उभवू उंच निशाण !
नव्या युगाचे नव्या जगाचे, उभवू उंच निशाण !
दीन दीन जे, दलित दलित जे
त्या सर्वांना ध्वज हा देईल सदैव छाया छान
उभवू उंच निशाण !
अंध अमानुष रूढी घालिती अखंड जगी थैमान
त्या क्रुरांना हे क्रांतिचे मूर्तिमंत अव्हान
ताठ ठेविती मान झुंजुनी भीमदेव धीमान
शूर शिपाई आम्ही त्यांचे व्यर्थ ते बलिदान"
सामान्य माणसाला आपल्या साहित्याचा नायक करून खांडेकरांनी त्याच्या हृदयात मानाच आणि हक्काचं स्थान निर्माण केल.. दूर गेलेल्या भावाला बोलावणारी सुंदर कविता त्यांनी लिहिली..
"येशिल कधी परतून ?
जिवलगा, येशिल कधी परतून ?
भाऊबिजेचे हे निरांजन बघते वाट अजून
ये लवकरी ये, भाऊराया, जाऊ नको विसरून !
जिवलगा, येशिल कधी परतून ?"
भौतिक जगात कितीही सुख- दुखः भोगली तरी सर्वात शेवटी काय हो सगळा भर त्या भगवंतावर असतो.. आयुष्याच्या संध्याकाळी किंवा आपले जेव्हा परके होऊन जातात अशा वेळी आयुष्यात एक अंधार दाटून येतो.. तेव्हा एक तो ईश्वरच आधार वाटू लागतो.. हि देखील सामान्य माणसाचीच भावना.. तिला खांडेकरांनी किती सुंदररीतीने शब्दबद्ध केले आहे..
 "ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता
वेढुनि मज राहसि का दूर दूर आता
रे सुंदर तव तीरी जग हिरवे धुंद उरी
पातेहि गवताचे शोभवि मम माथा
चमचमती लखलखती तव मंदिरी दीप किती
झोपडीत अंधारी वाचु कशी गाथा
ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता!! "
असे हे शब्दप्रभू.. आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व भावभावनांना शब्द्स्पर्श करणारे सिद्धहस्त साहित्यिक!! " पूर्ण सत्य सांगता आलं नाही, तरी मर्यादित सत्याला स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करावा.. जीवन व्यस्त आहे, निरर्थक आहे, अर्थशून्य आहे, लहरी सृष्टीची अंध क्रीडा आहे, हे तत्त्वज्ञान कवटाळण्याकडे तरुण पिढीचा कल वळला असताना, आयुष्याचा आपण जो अन्वयार्थ लावला, तो मोकळेपणानं त्यांच्यासमोर मांडावा.. " असं वाटू लागल्यामुळ त्यांनी आत्मचरित्र लिहील.. "एका पानाची कहाणी" !!  त्यांच्या संपूर्ण साहित्याचा आढावा घेण ही एक-दोन लेखांच्या आवाक्यातील गोष्ट नाही.. एका संपूर्ण लेखमालेचा विषय आहे.. म्हणूनच त्यांच्या असीम शब्द्प्रतीभेला वंदन करून इथेच थांबते!! इति लेखनसीमा!!

5 comments:

  1. apratim, more than extra ordinary analysis :)

    ReplyDelete
  2. >>> आकाशातल्या चंद्राला हात लावण्याच्या धडपडीत माणसाचे पृथ्वीवरले पाय सुटले, तर तो तोंडघशी पडतो. तो चंद्र योग्य वेळी अनेकांच्या हाती लागतो; असे नाही; पण त्याचा लाभ संसाराच्या सुरुवातीला होत नाही. दहा-वर्षे संकटे आणि सुखे यांची चव जोडीने घेतल्यावरच त्या चांदण्याची वृष्टी होऊ लागते. त्या दृष्टीने उदात्त प्रीती हा शुक्ल पक्षातला चंद्र नाही; तो वद्य पक्षातला आहे. .." <<<

    मस्तच :)

    ReplyDelete
  3. एक कादंबरीकार म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच त्यांना महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही अफाट लोकप्रियता मिळाली. १९३० मध्ये ‘हृदयाची हाक’ ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली.



    ..............................................
    More: http://goo.gl/CLSS75

    ReplyDelete
  4. यथार्थ वर्णन ... हा लेख म्हणजे आनंदयात्री शृंखलेतला मेरुमणीच वाटतो.

    ReplyDelete
  5. खूप सुंदर विवेचन आणि ब्लॉगही

    ReplyDelete