Wednesday 31 August 2016

रेखा मावशी... !!!

साडेचार पाच फुट उंची.. डोळ्यांवर जाड काड्या असणारा चोकलेटी रंगाचा चष्मा.. फिक्कट रंगांच्या साड्या, सकाळच्या गडबडीत हाताला मिळेल तो ब्लाउज घातलेला.. तोंडात मिश्री, अगदी कायम.. आणि अत्यंत चौकस नजर.. गेली अनेक वर्ष ही बाई अशीच आहे...
माझी आणि यांची भेट कधी झाली हे मला आठवणं शक्यच नाही.. माझ्या जन्माच्या आधीपासून या आमच्या घरात येत आहेत.. तसं पाहायला गेलं तर घरात केरवारे आणि भांड्याची कामं करायला येणाऱ्या मावशी अशी त्यांची ओळख.. पण आम्हा बहिणींना न्हाऊ-माखू घालण्यापासून सगळं यांनी केलं.. घरात आज्जी-आजोबा नव्हतेच कधी.. त्यामुळं बाळंतपणानंतर आईची काळजी घेणाऱ्यासुद्धा याच होत्या.. कामं करून झाली कि आम्हाला त्यांच्या गावाकडच्या गोष्टी सांगणाऱ्यासुद्धा याच होत्या.. आणि "काय सुसरींसारखं पसरलाय ग पोरींनो, उठा, मला केर काढायचाय असं म्हणून दरडावणाऱ्यासुद्धा याच होत्या..
मला आठवतं आमच्या शाळेची वेळ झाली असेल आणि तेवढ्यात आईकडे पेशंट आला तर त्यांनी आम्हाला मऊ-मऊ पोळ्यादेखील करून वाढल्या आहेत.. लहान असताना आमचे डबे भरून दिले आहेत.. आणि हे सगळं एका नव्या पैशाची अपेक्षा न करता..
मावशींनी तशी बऱ्याच घरांत कामं केली.. काही ठिकाणी त्यांचं घरातल्या लोकांशी जमलं नाही तर काही घरांचं त्यांच्याशी जमलं नाही.. याला एकच कारण होतं.. त्यांचा फटकळ स्वभाव आणि भाषा.. बोलताना चार-पाच शिव्या आल्या नाहीत तर त्यांना बोलल्याचं समाधान मिळायचं नाही.. त्यांच्या नादाने आम्ही "आयला, मायला" च्या वाटेवर जाऊ नये म्हणून आईने अनेकदा त्यांना समजावलं होतं.. सुदैवाने त्यांनी ते ऐकलं..
आईचं आणि त्यांचं मात्र फार सख्य.. त्यांच्या घरात खुट्ट जरी झालं कि "तनुची आई, ते असं हून ऱ्हायल शनी" असं म्हणत स्वारी हजर.. मग एकातून एक विषय निघत जायचा आणि त्या काम करत असलेल्या सगळ्या घरांबद्दल आम्हाला वृतांत सादर व्हायचा.. असं सगळं असलं तरी बाई कामाला एकदम चोख आणि प्रामाणिक.. त्यासाठी आम्हीही त्यांच्या गप्पांना दाद द्यायचो.. त्यांच्यामुळं आम्हाला या लोकांच्या विश्वाबद्दल कळत गेलं.. रोज नवऱ्याचा मार खाणाऱ्या या बाया.. फक्त 'कुकवाचा धनी' म्हणून त्याच्यासोबत नांदतात.. त्याचे दारूचे शौक पुरवतात.. आणि या सगळ्यांतून आपल्या पोरांना नीट वाढवतात.. सुदैवाने मावशींचा नवरा बराच बरा होता.. मोठ्या आजारातून उठल्यानंतर भरपूर शहाणा झालेला होता.. त्या दोघांचं आम्हा चौघांवर खूप प्रेम होतं.. फारशी मिळकत नसताना त्यांनी प्रत्येक अधिक महिन्यांत आई-बाबांना छोटंसं का होईना काहीतरी वाण दिलं.. आमच्या मोठ्या परीक्षांच्या निकालानंतर बक्षीस दिलं.. भरपूर मायेने पाठीवरून हात फिरवत आशीर्वाद दिले.. अगदी नेहमी..
पाच वर्षांपूर्वी आम्ही घर बदललं.. नव्या ठिकाणी त्यांना येणं शक्य नव्हतं.. आईचा दवाखाना मात्र त्याच घरी सुरु राहणार होता.. याचा त्यांना काय तो आनंद.. "तनुची आई, तुमी जा तिकडं, म्या मात्र हिथ रोज येन्हार.. न्हाई म्हणलात तरी येन्हार" असं म्हणून त्या आजही रोज तिथे येतात.. झाडू फिरवून जातात...
नवरा गेल्यानंतर मात्र मावशींचा स्वभाव कडक झाला.. कारणही तसंच होतं म्हणा.. यांचे आणि नवऱ्याचे जे काही थोडेफार पैसे होते ते सगळे नातेवाईकांनी परस्पर लाटले.. तरीही न बिथरता बाईंनी शून्यातून सुरुवात केली.. बँकेत FDs काढून पैसे साठवले.. आजच्या घडीला कामं न करता पुढचं आयुष्य जगता येईल एवढे पैसे त्यांच्या गाठीला आहेत.. मुलीचा सुखी संसार आहे... अत्यंत गोड अशी नात आहे.. तिचं आज्जीवर खूप प्रेम आहे.. आता कायमसाठी मुलीकडे जाऊन राहायचा त्यांचं ठरत आहे.. परवा अगदी डोळ्यांत पाणी आणून आईला म्हणत होत्या,"तनुची आई, पोरींच्या लग्नात मला विसरू नगा.. जिथ असन तिथन बिगी यीन बगा.. पोरींना बी सांगा.. मन्हाव, मावशी जीत्ती हाय त्यांची तवर कसलीबी फिकीर करू नगा"

हे लिहिलेलं त्यांना वाचता येईलच असं नाही.. पण आमच्या भावना मात्र नक्की पोहोचतील.. मावशी, जशा आहात तशाच राहा.. आणि एक लक्षात असुद्या.. "तुमच्या या पुरी तुम्हास्नी कंदी बी इसारणार न्हाईत.."

आताशा असे हे मला काय होते...!!

'बघितलंत कशी वागली ही सकाळी. आजकाल तिला काही सांगायची चोरीच झाली आहे. हल्ली माझं डोकं दुखतं, म्हणजे जरा जास्तच दुखतं. तिला सांगितलं तर म्हणाली, 'आई, तुझ्या मनाचे खेळ आहेत हे. सगळे रिपोर्ट्स ठीक आहेत तुझे. काही झालं नाहीये तुला..' म्हणजे मी काय खोटं बोलते का? तुम्ही गेलात आणि नंतर स्वतःकडे लक्ष न देता मी पोरीला वाढवलं. काय कमी खस्ता खाल्ल्या का मी.. आणि आज एवढी मॅनेजर झाली तरी आईशी चार शब्द प्रेमाने बोलावेत हे समजत नाही तुमच्या मुलीला..' शुभांगी हार घातलेल्या फोटोसमोर पदराला डोळे पुसत बोलत होती.. 'परवा मी बाथरूममध्ये होते. कपडे विसरले म्हणून खूप हाका मारल्या तिला. आलीच नाही. कसा कोण जाणे पाय घसरला माझा आणि पडले मी. तो आवाज ऐकू आला तिला. मग आली. आल्या आल्या 'लागलंय का तुला वगैरे नाहीच लगेच अशी कशी गं आई तू' म्हणून चिडली माझ्यावर. मी काय मुद्दाम करते का? पण नाही तुमच्या मुलीला आईचं प्रेम समजेल तर ना...' एवढ्यात 'शुभांगी काकू, मी आलेय ग.. पटकन काहीतरी खायला दे' अशी हाक आली आणि शुभांगी उठली.

'वाह मीना, आलीस तू... बरं झालं गं. आमच्या विभाला आईची काही काळजीच नाही. तू येतेस, चार शब्द प्रेमाने बोलतेस. बरं वाटतं' असं म्हणत शुभांगी किचनमध्ये पोहे करायच्या तयारीला लागली. नंतर दोघींच्या भरपूर गप्पा झाल्या. शुभांगीने मन भरेपर्यंत विभाच्या तक्रारी केल्या. शेवटी रात्रीचे साडेआठ होऊन गेले, विभाच्या येण्याची चाहूल लागली तशी मीना उठली. विभा यायला आणि मीना जायला एकच गाठ पडली.. विभाकडे 'एवढी प्रेमळ आई असून किंमत नाही तुला असा कटाक्ष टाकून मीना निघून गेली. काय झालं असावं याचा विभाला अंदाज आला. ती काही न बोलता रूममध्ये निघून गेली आणि किचनमधून भांडी आपटण्याचे आवाज यायला लागले...
त्या आवाजांकडे दुर्लक्ष करत विभा तशीच पडून राहिली. खरंतर आज तिला बोनस मिळाला होता. बऱ्याच दिवसांनी ती खुश होती. पण घरी आल्यावर जे झालं त्यामुळे तिचा मूडच गेला. बऱ्याच वेळाने आई झोपल्याची खात्री पटल्यावर ती बाहेर आली. दहा वाजून गेलेले. आईने आमटी भात काढून ठेवलेला. तो ओव्हन मध्येच गरम करून ती बाबांच्या फोटोसमोर जाऊन बसली. बाबांकडे बघितलं आणि तिचे डोळे भरून आले. 'असं का हो वागते तुमची बायको. तिच्यासाठी कितीही करा, तिला आनंद नाहीच. मध्ये एकदा मला सहज म्हणाली होती, 'तुझे बाबा अकाली गेले, माझी हॉटेल वगैरेची ऐश कधी झालीच नाही.' म्हणून हौसेने तिला तिच्या वाढदिवशी मस्त रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेले. तर सगळ्यांसमोर 'मला कशाला आणलंस इथे, त्यापेक्षा घरी मस्त वरणभात खाल्ला असता. इथे यांच्या डोक्यावर एवढे पैसे ओतायची काय गरज आहे तुला. माझ्याकडे नव्हते पण तुझ्याकडे रग्गड पैसे आहेत माहित आहे मला. पण म्हणून असं दाखवून द्यायची काय गरज होती' हे आणि ते.. नको नको ते... कसंबसं खाल्लं आणि निघालो तिथून. आजकाल तिला वाटतं मला तिची काळजीच नाही. मग मुद्दाम पडायचं, सारखं डोकं दुखतंय म्हणायचं. डॉक्टरकाका सुद्धा म्हणाले की हे सगळं मानसिक आहे. बाबा, मला नाही जमत हो हे आता. तिकडे कोर्टात तारखांवर तारखा पडत आहेत. पाच वर्षांचा संसार मोडतोय माझा. ती पाच वर्षं कशी गेली माझं मला माहित. सुरुवातीला बरं होतं. नंतर मात्र रोज शिव्या आणि मारहाण. मी तरी किती सहन करू. आईने जमवलेली सोयरीक ती. तिला वाईट वाटत राहील, लोकही तिलाच दोष देतील म्हणून सहन करत राहिले मी. जेव्हा असह्य झालं तेव्हा आले निघून. आता इकडे येऊन हे असं. माझ्यात ताकद उरली नाहीये आता. अशातच ती मीना येते, आईला काय काय सांगते. आईचाही पोटच्या मुलीपेक्षा तिच्यावर जास्त विश्वास. कायम माझी आणि मीनाची तुलना. त्रास होतो हो. बरोबरीच्या सगळ्या आपापल्या संसारात आहेत, त्यांना माझी दुखरी कहाणी सांगायला आणि त्यांची खरी/खोटी सहानुभूती मिळवायला नको वाटतं. अशात आई नाहीतर कोणाकडे मन मोकळं करू. आता तीही जागा हक्काची राहिली नाही. तुम्ही एवढ्या लवकर का गेलात बाबा, निदान आज, अशा हळव्या वेळेस तरी तुम्ही हवे होतात.." विभा हमसून हमसून रडत होती..
आणि दूरवर कुठेतरी हळुवार आवाजात गाणं वाजत होतं..
"कशी ही अवस्था कुणाला कळावे ?
कुणाला पुसावे ? कुणी उत्तरावे ?
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे ?"..............

आईचं रक्षाबंधन....!!

"तसे मला सगळे सण आवडतात. एक रक्षाबंधन सोडला तर.." समोर दिसलेल्या राख्यांच्या माळा बघून ती स्वतःशीच पुटपुटली. 'आता सगळ्या मैत्रिणी राख्या घेतील, कुठल्या कुठल्या भावांना पाठवतील. भावांकडून मिळालेल्या भेटी आनंदाने मिरवतील. आणि मी. राखी बांधायला हक्काचं मनगटच नाहीये माझ्याकडे... असो..' विचारांना आवर घालत ती घरात आली. बाईसाहेबांचा मूड जागेवर नाही हे आईच्या लक्षात आलं. आईच ती! तिच्यापासून काही लपून राहू शकतं का! समोरच्या दुकानात राख्या पाहिल्यावर आईला काय झालं असेल याचा अंदाज आलाच. पण उगाच विषय काढला तर खपली निघायची म्हणून आई शांत बसली.

दिवसभराच्या सगळ्या गोष्टी आईला सांगून झाल्यावर तीच म्हणाली, 'आई, किती गं लकी आहेस तू. तुला भाऊ आहे. म्हणजे रक्षण करायला भाऊ हवा असं मला वाटत नाही. तरीही हक्काने बोलायला, मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायला, मित्रांच्या तक्रारी करायला आणि त्याच्याकडे बोट दाखवून 'तो आहे ना तो 'माझा' दादा' असं अभिमानाने म्हणायला कोणीतरी हवं होतं गं! दादा असता तर मस्त बाईक वरून फिरले असते, त्याच्या खास मैत्रिणींना भेटले असते. भरपूर भटकले असते. तो सोबत असताना कुठल्याही कोंडाळ्यातून जाताना कोणाची काही बोलायची हिम्मत झाली नसती. एक भाऊ हवाच होता मला.

'तो मुलगा चांगला नाहीये, त्याच्या नादाला लागू नकोस असं सांगणारा.. 'अगं, तू सासरी गेलीस कि परत तुला या घरात घेतच नाही बघ' म्हणून चिडवणारा पण मी जाणार या कल्पनेने हळवा होणारा.. मी रडले,पडले कि चेष्टा करायला पण भक्कमपणे आधार देणारा.. एक दादा हवाच होता मला आई!

बिचारी आई! हळव्या झालेल्या आपल्या पोरीला बघून तिलाच गलबलून आलं. तिला शांत करून झाल्यावर आईने एक नंबर फिरवला. पण फोनवर बोलायला जमेल कि नाही असं वाटून कट केला आणि व्हाट्सअपवर मेसेज केला.. 'परवा फारच तोडून बोलले मी तुला. अगदी आयुष्यात परत माझ्याशी बोलू नको वगैरे म्हणलं. आज सॉरी म्हणायला मेसेज केलाय. वहिनीचा जरा राग आलेला, तो तुझ्यावर निघाला. पण तुझं असणं किती महत्वाचं असतं हे आज जाणवलं. आजवर फारवेळा गृहीत धरलं तुला. तू नसतास तर मला काय काय मिळालं नसतं हे आज लक्षात आलं. बघ जमलं तर माफ कर.'

दुसऱ्याच मिनिटाला आईचा मोबाईल वाजला. 'मन्यादादा Calling ' तिने कॉल घेतल्यावर आवाज आला, 'काय गं भवाने, एवढी मोठी कधी झालीस तू.. दादाशी एवढं फॉर्मल होऊन बोलायला लागलीस..' तेवढ्या एका वाक्याने आई मधली छोटी बहीण पुन्हा एकदा आपल्या दादाच्या प्रेमात पडली!!  

एक नजर....!!

नजर...

एक नजर.. नुकत्याच जन्मलेल्या बाळाकडे मन भरून बघणारी.. सोज्वळ... सात्विक.. मायेने भरलेली..

एक नजर.. डोळ्यात बघून 'हे करू नकोस' सांगणारी.. सजग पालकत्व जगणारी...

एक नजर.. तिच्या वाढदिवसादिवशी 'ही इतकी मोट्ठी कधी झाली' असा विचार करत तिला न्याहाळणारी.. अतीव कौतुकाने भरलेली..

एक नजर.. 'चुकलास तू.. असं करायला नको होतंस' सांगणारी.. निखळ मैत्रीची.. आयुष्यभर साथ देणारी..

एक नजर.. 'मी पूर्णपणे प्रेमात आहे गं तुझ्या.. कधी हो म्हणशील मला??' विचारणारी.. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाने अनुभवलेली..

एक नजर.. 'तो माझा आहे, चुकूनही त्याच्याकडे पाहायचं नाही' सुचवणारी.. काहीशी चिडलेली.. काहीशी मालकी सांगणारी..

एक नजर.. 'नको जाऊस ना मला सोडून.. तू नसताना माझं कसं होईल.." म्हणणारी.. व्याकुळ.. दुःखाने ओलेती झालेली..

एक नजर.. 'क्या चीज है ये.. एक बार मिल जाये..' म्हणत वरपासून खालपर्यंत न्याहाळणारी.. अत्यंत किळसवाणी.. वासनेने भरलेली..

एक नजर.. 'बाळा, घाबरू नकोस.. मी आहे तुझ्याबरोबर.. सगळं ठीक होईल..' सांगणारी.. भक्कम आधार देणारी..

एक नजर.. 'मला जगायचंय.. इतक्यात नाही जायचं' म्हणणारी.. खूप आर्त.. बघणाऱ्याच्या काळजाला घरं पडणारी..

एक नजर.. बस्स एक नजर!!!