Tuesday 17 June 2014

अभिजात कवयित्री बहिणाबाई !!!



ज्या काळात अर्वाचीन महाराष्ट्रामध्ये केशवसुत, रा.ग. गडकरी आपल्या प्रतिभेने रसिकांना मोहवत होते त्या काळात जळगावात एक "अडाणी" स्त्री जात्यावर दळण दळताना, चुलीवर भाकरी भाजताना, शेतात काम करताना, सुगरणीच्या घरट्याकडे पाहताना मन मोकळ करत होती.. तेव्हा कोणाला स्वप्नातही वाटल नाही कि ह्याच कविता पुढे जाऊन ग्रामीण काव्याचा सर्वोत्तम अविष्कार ठरणार आहेत.. बालभारती- कुमारभारती मध्ये अभ्यासल्या जाणार आहेत..
अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर !
अरे, संसार संसार, खोटा कधी म्हणू नये
राउळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये
अरे, संसार संसार, नाही रडनं, कुढनं
येड्या, गळ्यातला हार, म्हणू नको रे लोढणं !
अरे, संसार संसार, दोन जिवांचा विचार
देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार
हे वाचल्यावर वाटत खरतर आयुष्याची व्याख्या किती साधी सरळ सोप्पी आहे.. पण आपण स्वतःच ते सगळ गुंतागुंतीच करून टाकतो...वरपांगी गोष्टींना भुलून निखळ सात्विक आनंद देणाऱ्या गोष्टींपासून लांब जातो.. सुखाला होकार देऊन त्याला जवळ करण्याऐवजी दुःख कुरवाळत बसतो..
एकदा विचारांची गाडी सुरु झाली कि तिला लवकर स्टेशनमध्ये आणतच नाही.. कारण त्या सगळ्या विचारांचा नियंत्रक इतका चंचल आहे, लहरी आहे कधी कधी जहरी देखील आहे त्याचच वर्णन करताना बहिणाबाई म्हणतात,
"मन पाखरू पाखरू याची काय सांगू मात ?
आता होतं भुईवर  गेलं गेलं आभाळात
मन जहरी जहरी  याचं न्यारं रे तंतर
अरे, विंचू, साप बरा  त्याला उतारे मंतर !
मन एवढं एवढं  जसा खसखसचा दाना
अन्‌ मन केवढं केवढं ?  त्यात आभाळ मायेना
देवा आसं कसं मन ?  आसं कसं रे घडलं ?
कुठे जागेपनी तुला  असं सपनं पडलं !" आणि शेवटी त्या जगतनियंत्यालाच विचारतात कि बाबारे, अस जागेपणी तुला मन निर्माण करण्याच स्वप्न कस काय पडल.. देवाला थेट प्रश्न विचारण्याएवढी त्यांच्याकडे शक्ती आहे कारण त्या शक्तीच्या मागे पांडुरंगावर असलेली अपरंपार भक्ती आहे.. म्हणूनच त्या सहज लिहून जातात,
"माझ्यासाठी पांडुरंगा  तुझ गीता-भागवत
पावसात सामावत माटीमधी उगवत.."
आणि त्या भक्तीच्या मागे त्याच पांडुरंगाने निर्माण केलेला निसर्ग आहे.. तो निसर्गच त्या निर्गुण  रूपाचा सगुण अविष्कार आहे..कारण,
"अरे देवाचं दर्सन  झालं झालं, आपससूक
हिरिदात सूर्याबापा  दाये अरूपाचं रूप
तुझ्या पायाची चाहूल  लागे पानापानांमधी
देवा तुझं येनंजानं  वारा सांगे कानामधी"
हे अस बावनकशी सोन थेट वारकरी पंथाशी आपली ओळख सांगत..ते त्यांच्या कवितेतून दिसुनी येत..
"दारी उभे भोत्रे जीव  घरी पत्राले पाखंडी
टाय मुदर्गांची धून आली पंढरीची दिंडी.."
पांडुरंगाच्या चरणी लीन होणार त्याचं मन रोजच्या शेतीच्या कामातसुद्धा कविता करण्याची प्रेरणा देत... आता शेती म्हणाल कि नांगरणी आली, त्यासाठी बैल आले, त्यांच्या कलाकलाने वागण आल, त्यांना गोंजारण आल.. अशावेळेस प्रेमळ बहिणाबाई म्हणतात,
"पाय उचल रे बैला.. कर बापा आता घाई
चालू दे रे रगडण  तुझ्या पायाची पुण्याई!!!!"
उफणणी च्या वेळेस हनुमंताच्या बाबांना त्या हाक मारतात जणू हे सगळे त्यांच्या सात जन्मांचे सोबती आहेत...
"चल ये रे ये रे वार्या ये रे मारोतीच्या बापा
नको देऊ रे गुंगारा पुरे झाल्या तुझ्या थापा..."
त्याचं कुणबी मन त्यांच्या कवितेतून सारख डोकावत.. सगळी नाती गोती त्यांना त्या शिवारात दिसू लागतात आणि त्या गाऊ लागतात,
"धरित्रीच्या कुशीमधे बियबियाणं निजली
वर पसरली माती जशी शाल पांघरली
बीय डरारे भूमीत सर्व कोंब आले वर
गहिवरलं शेत जसं अंगावरती शहारं
ऊनवार्याशशी खेळता एका एका कोंबांतून
प्रगटली दोन पानं जशी हात ती जोडून
टाळ्या वाजवती पानं दंग देवाच्या भजनी
जशी करती करुणा होऊ दे रे आबादानी
कशी वार्यारनं डोलती दाणे आले गाडी गाडी
देव अजब गारुडी देव अजब गारुडी"
पण सगळ करताना, गाताना खोलवर आत कुठेतरी एक नाजूक धागा सतत तुटत असतो.. आणि मग त्यातूनच अकाली आलेल वैधव्य शब्दरूप घेऊन येत..
"लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली..
पुसोनिया गेल कुंकू रेखा उघडी पडली.." पण त्यातूनही त्या लगेच सावरतात आणि म्हणतात,
"रडू नको माझ्या जिवा तुला रडायची सव
रडू हासव रे जरा त्यात संसाराची चव.." 
बहिणाबाईंनी आपल्या नित्य जीवनातल्या सगळ्या गोष्टी काव्यामधून मांडल्या.. आणि तस करताना क्वचित शब्दांची गम्मतही केली.." त्यातून पीठ येत त्याला जात का म्हणतात ??" ,"जमिनीत उभा आहे त्याला आड का म्हणतात??" किंवा गुढी उभारायची त्या सणाला "पाडवा" का म्हणतात..
कोणत्याही विवाहीतेसाठी माहेर म्हणजे खास जिव्हाळ्याचा विषय त्याला बहिणाबाई तरी अपवाद कशा असणार.. माहेराची थोरवी तर त्या काय सांगून गेल्या आहेत...
" अरे अरे योग्य ध्यान ऐक मी काय सांगते
लेकीच्या माहेरासाठी मे सासरी नांदते"
ही अशी माहेराची ओढ इतकी तीव्र असते कि तेव्हा मग वाटेवरची साळुंकीदेखील निरोप्याच काम करते..
"माझ्या माहेरच्या वाटे मारे सायन्की भरारी
माझ्या जायच्याच आधी सांगे निरोप माहेरी"
आपली नाती कशी असतात ना.. त्यांच्या संबोधनावर नात्यामधली जवळीक दिसून येते.. आता हेच बघा ना...
"माय ले माय म्हणता ओठले ओठ भिडे ,
चुलतीले काकी म्हणता अंतर किती पडे,
जीजीले जीजी म्हणता मिळे जीभले निवारा,
सासुले सासू म्हणता गेला तोंडातुनी वारा..."
इतक सगळ मनोवेधक तरल लिहिणाऱ्या बाईंच्या सामाजिक, भावनिक जाणीव अत्यंत तरल होत्या.. नाजूक होत्या.. म्हणूनच त्याला आपोआप यमकाची जोड मिळत गेली.. गद्याच पद्य कधी झाल समजलच नाही.. एक सुंदर रचना सौंदर्य प्राप्त झाल त्याला.. हे सगळ त्यांच्या " कशाले काय म्हणू नये मध्ये सहज दिसून येत..,
"बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हनू नही
हरीनामाईना बोले त्याले तोंड म्हनू नही
नही वार्‍यानं हाललं त्याले पान म्हनू नही
नही ऐके हरीनाम त्याले कान म्हनू नही
पाटा-येहरीवाचून त्याले मया म्हनू नही
नही देवाचं दर्सन त्याले डोया म्हनू नही
निजवते भुक्यापोटी तिले रात म्हनू नही
आखडला दानासाठी त्याले हात म्हनू नही
नही वळखळा कान्हा तिले गाय म्हनू नही
जीले नही फुटे पान्हा तिले माय म्हनू नही"
मातृत्व.. मग ते स्त्रीच असो किंवा इतर कुणाचही.. त्यात असणारा ओलावा, काळजी, मनाची गुंतागुंत शरीर कोणाच आहे ते बघत नाही.. तिथे फक्त भावना उरते.. छोट्या बाळामध्ये जीव अडकणारी स्त्री आणि पिल्लामध्ये जीव अडकणारी सुगरण पक्षीण.. तिथे असा भेदभाव उरतच नाही..आणि त्या म्हणून जातात
"अरे खोप्यामधी खोपा
सुगडिणीचा चांगला
पहा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाला टांगला
पिल्लं निजती खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिल्लांमधी जीव
जीव झाडाला टांगला " वाह!!! क्या बात ...
इतक्या सहजपणे सगळ्या भावना व्यक्त करणाऱ्या बाईंना कृतघ्नपणाची मात्र मनस्वी चीड आहे..त्याचा त्यांना अत्यंत संताप येतो.. आणि त्या म्हणून जातात..
"मानसा मानसा तुझी नियत बेकार...
तुझ्याहून बर गोठ्यातील जनावर..
मानसा मानसा कधी होशील मानूस?
लोभासाठी झाला मानसाचा कानुस..."
लौकिक अर्थाने अडाणी असणार्या बहिणाबाईंच्या कवितेतला ग्रामीण गोडवा आजही आपल्याला भुरळ घालतो.. भाषेला वैभव प्राप्त करून देतो. आपल्या या अंगभूत सामर्थ्याची त्यांना स्वतःला देखील जाणीव होती म्हणूनच त्या म्हणत,
"माझी माय सरसोती माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी किती गुपीतं पेरली !"
स्वतःच्या कवितेतून अखंडपणे निर्मळता, उत्स्फूर्तता याचा झरा वाहत ठेवणाऱ्या बहिणाबाई मराठी साहित्य प्रांगणामधला तेजस्वी तारा आहेत...अशा या अंतर्मुख करणाऱ्या कवयित्रीला माझा मनाचा मुजरा... इति लेखनसीमा..