Friday 24 October 2014

वपुर्झाकार - व.पु. काळे



" एक मनुष्यजन्म!! सगळे म्हणतात तस ८४ लक्ष फेर्यानंतर मिळालेला... अर्थात मला याच्याशी कर्तव्य नाही.. मला दिसतो तो जिताजागता माणूस.." अस म्हणून कायम माणसाभोवती साहित्य निर्माण करणारे लेखक आज आपल्याला भेटणार आहेत..  त्यांच्या कथांचा, कादंबरीचा विषय एकच - "माणूस"! कधी तो उच्चवर्गीय तर कधी मध्यम! कधी बाईलवेडा तर कधी संन्यस्त! कधी मनातली गरळ ओकून टाकणारा बडबड्या तर कधी सगळ मनात साठवून कुढत राहणारा एकलकोंडा! कधी पुरुष तर कधी स्त्री! प्रसंग साधा, सरळ, छोटासा! पण त्याची कथा करण्याच कसब यांना लाभल होत.. माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदुःख, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्न हे सगळ तर आपणही रोज बघत असतो, जगत असतो. पण आपल्याला ते सगळ शब्दबद्ध करण जमतच अस नाही.. जमलच तर ते वाचणार्याला आपलस वाटतच अस नाही.. पण यांच्या लेखणी मध्ये ती जादू आहे... वाचकाला तो जे वाचतोय ते प्रत्यक्ष जगतोय अस वाटायला लावणार कसब आहे.. आणि म्हणूनच यांच्या कथा मनाला भिडतात, आपल्याशा वाटतात.. हे आहेत कथाबीजाला फुलवत त्याच हळुवार, भावस्पर्शी कथेत रुपांतर करणारे, सहज सध्या शब्दांतून आयुष्याच तत्वज्ञान सांगणारे व.पु,!!!!
" माणसाच्या तारुण्याचा काळ... जास्तीत जास्त सुख उपभोगण्याचा काळ... संततीच्या रूपाने माणूस परत एकदा बालपण अनुभवू शकतो.. पण वार्धक्यात तारुण्य अनुभवू शकत नाही क्वचित अनुभवत आल तरी उपभोगू शकत नाही.. जाणीव जाग्या झाल्यापासून माणूस वाट बघतो ती तारुण्याची.. " किती साधे शब्द आहेत पण त्यात किती सच्चाई आहे.. व.पुं.च्या लेखनात कधीही स्वतःबद्दल, स्वतःच्या साहित्याबद्दल अहंकार डोकावत नाही.. त्यात असतो तो मानवी भावभावनांचा कल्लोळ.. एका भावनेचा दुसर्या भावनेशी चाललेला निरंतर खेळ... आपल्याला वाटत आपण शांत आहोत.. कसलाही विचार करत नाही.. ज्यांना हि अवस्था लाभली ते भाग्यवान!! बाकी सगळे कायम एकतर भूतकाळात नाहीतर भविष्यात रमलेले.. आपल्याला कळत असत कि "सौख्याचा कुठलाही क्षण चिरंजीवी नाही.. त्याचं अमरत्व फक्त आठवणींच्या राज्यात!! आणि आठवणी कधीच सुखद नसतात.. दुःखाच्या असतील तर त्यापायी वाया गेलेला भूतकाळ आठवतो आणि आनंदाच्या असतील तर गेले ते क्षण म्हणून काहीतरी निसटून गेल्याच्या त्रासाचा असतो... " पण तरीही आपण वर्तमानात जगायचं टाळतोच...!!
आठवणी हा जसा जगण्याचा अविभाज्य भाग तसाच एकाकीपणादेखील.. व.पु. म्हणतात, "एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा. परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण. एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं. अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्या वर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल."  खरय!!! भरलेल्या मैफिलीमध्ये अचानक डोळे झरू लागतात.. तेव्हाचा एकाकीपणा हा आजूबाजूला असणार्या माणसांवर अवलंबून नसतोच.. कदाचित तो एकटेपणा हवा तो माणूस सोबत नसल्याच्या जाणीवेतून आलेला असतो.. असे डोळे झरू देण्याला मोठ धैर्य लागत.. बर्याचदा गळा भरून येतो पण डोळे वाहत नाहीत.. "मी कणखर आहे" या जाणीवेचा बांध ते पाणी अडवत असतो.. पण खरतर जेव्हा हा बांध नाहीसा होतो, तेव्हाच आपण मोकळे होतो, हलके होतो... मला स्वतःला मनमोकळेपणाने हसणारी माणस जेवढी आवडतात त्याहीपेक्षा मनापसून रडणारी (पण अर्थात रडकी नव्हे) माणस काकणभर जास्त आवडतात!!! एखाद पुस्तक वाचताना, सिनेमा बघताना तल्लीन झाल्यावर, पात्राशी एकरूप झाल्यावर एखाद्या हळुवार क्षणी डोळ्यातून पाणी येण हे अतिशय संवेदनशील असल्याच लक्षण आहे..
वपुंची "दोस्त" वाचली तेव्हा जाणवलं कि माणसाच्या मनात शिरण्यासाठी भव्य दिव्य अस काही लिहाव लागत नाही.. "कर्त्या पुरुषाचा नाकर्तेपणा, जगाला दाखवण्यासाठी आणलेला उसना मोठेपणा इथपासून ते अगदी घरात धाकट पिल्लू येणार या एका बातमीने तो, ती आणि त्याच पहिलं पिल्लू या सगळ्यांच्या मनावर होणारे परिणाम असा कुठलाही विषय चालतो"!! गरज आहे ती सजग वाचकाची! मोठ्या मानाने नाही तर मोकळ्या मनाने वाचणार्या संवेदनांची!!
"महोत्सव" देखील अशीच!! याच सौम्य पठडीमाधली... वडिलांनी घालून दिलेल्या नियमांप्रमाणे चालणारी सद्गुणी मुलगी.. लग्न झाल्यावर सासर मिळत ते अगदी विरुद्ध चालीच!! तिच्या लवकर उठण्याची, नीटनेटकेपणाची अवहेलना करणार... अशा वेळेस जेव्हा आईवडील देखील म्हणतात, " बेटा, आता तेच तुझ घर आहे" या प्रसंगी तिचं तुटणार मन व्यक्त करायला व.पुं.चीच लेखणी हवी...
वयाने आणि अकलेने जरा शहाणे झालो तेव्हा त्याचं पार्टनर वाचल, "पार्टनर म्हणजे नक्की कोण हे समजेपर्यंत पुस्तक कळलचं नाही.. आपलाच आपल्याशी चालत असलेल्या संवादाच मूर्त रूप किंवा शब्द रूप म्हणजे पार्टनर.. त्यातली काही वाक्य म्हणजे अजरामर म्हणावीत अशी आहे..
" तुला मी कशी हक मारू? पार्टनर ह्याच नावाने.. आपल्याला खरतर नावच नसत, बारशाला नाव ठेवतात ते देहच..." हा जो पार्टनर आहे ना अगदी सहज खूप गहिरं बोलून जातो..   "आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाण हाच नरक.."                                                                   
आपल्या सगळ्या गोष्टी नाही म्हणाल तरी आत्मकेंद्रित असतात म्हणूनच हा पार्टनर म्हणतो, "लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस.." हे अस बरच काही भन्नाट बोलून वेड लावणारा पार्टनर...!!!
आयुष्याला नाहीतर अनुभवला क्षणभंगुरता असते अस सांगून ते म्हणतात,
"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते.  कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पण पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं.  म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत." म्हणूनच जगण्याचा महोत्सव करायला आपण शिकायला हव..
जीवनविषयक तत्वज्ञान हा जसा त्यांचा लाडका विषय तसाच स्त्री आणि तिचं भावविश्व हा देखील.. पुरुषाच्या नजरेतून ती - "पोरगी म्हणजे एक झुळुक. अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही." पण त्याला तिच्या पहिल्या हास्याची, नजरेची भीती वाटते.. कारण, त्या दोन्ही गोष्टीत त्या समोरच्या व्यक्तीला ओळखतात हे कळून येत.." स्त्रीच पाहिलं हास्य, पहिली नजर लोहचुम्बकाने लोखंडाचे कण वेचून घ्यावेत त्याप्रमाणे स्त्रिया पुरूषाच मन वाचतात... आणि मग त्याच क्षणी आपल्यातल अंतर किती ठेवायचं ह्याच गणित मांडतात.. मग त्या दिलखुलास हसतात तरी किंवा 'राखून' तरी!!! किती सुंदर मांडलं आहे!!! यातला एक आणि एक शब्द खरा आहे!!!! "सखी" हाही एक गाजलेला कथासंग्रह!! स्त्रीला जवळून पारखून जन्माला घातलेल्या कथा आहेत यात!!!
पत्नी गेल्यानंतर एखदा आधार जावा तसा तो विधुर काहीसा खचून जातो.. त्यातूनच मग काहीसा हळवा, काहीसा गंभीर होऊन जातो.. तारुण्यात रोमांटीक वाटणारा चंद्र आता मात्र वेगळाच वाटू लागतो.. ". चंद्राइतकं औदार्य माणसांना मिळवता येईल का? अमावस्येला स्वत:चं अस्तित्वही न दर्शवण्याचा निरहंकार फ़क्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो! माणसं चंद्रासारखी शीतल का होत नाहीत? एकच कारण.  ती चंद्राची उपेक्षा करतात. रात्री झोपा काढतात. एका चतुर्थीत सगळं देणं चुकवतात. त्यातही भक्ती किती? आणी अहंकार किती? उपवास करणार्यांचा परिवारावर एक अनामिक पगडा असतो. दडपण असतं. चंद्राची शीतलता उचलणं हेच व्रत. त्याच्या शीतलतेचं अनुकरण केलं तर घरात चांदणं पहुडेल. पण त्या शीतलतेशी घनिष्ठ मैत्री हवी. ती झोपून कशी मिळणार? त्यासाठी हे असं चांदण्यांशी संधान जुळवलं पाहिजे. समुद्रासारखा जीवही चंद्र दिसला की झेपावतो. मिठाला जागतो. मग माणसं अशी थंड का? ती शांत असतील तर उत्तम. पण ती थंड म्हणजे निर्विकार असतात."!!!
त्यांच्या तात्विक कादंबर्यांपैकी माझी आवडती कादंबरी म्हणजे तू भ्रमत आहासी वाया... बरीचशी अनाकलनीय तरीही मनाच्या अंतरमनाचा ठाव घेणारी..  आपण सारे अर्जुन हि तशीच..  आपण सारे कुरुक्षेत्रातल्या अर्जुनासारखे आहोत.. ज्यांना कृष्ण भेटतो ते पैलतीरी जातात बाकीचे असतात तसेच संघर्ष करत आजचा दिवस उद्यावर ढकलणारे.. संसार चालू ठेवणारे... याच पुस्तकात ते म्हणतात,
         "संसार खरंच इतका अवघड आहे का? माणसाला नेमकं काय हवंय? संपूर्ण आयुष्य संगीतमय करता येणार नाही का? एखाद्या मैफिलीसारखं रंगवता येणार नाही का? आपल्या जन्मापूर्वी हे जग होतंच. आपण मेल्यानंतरही जगाचा कारभार हा असाच चालू राहणार आहे. ह्या अवाढव्य रंगमंचावर आपली 'एंट्री' मध्येच केव्हातरी होते आणि 'एक्झिट'ही. हे नाटक किती वर्षांचं, ते माहित नाही. चाळीशी, पन्नाशी, साठी, सत्तरी.... सगळं अज्ञात. घडधाकट भूमिका मिळणार, की जन्मांधळेपणा, अपंगत्व; बुद्धीचं वरदान लाभणार की मतिमंद? भूमिकाही माहित नाही. तरी माणसाचा गर्व, दंभ, लालसा ... किती सांगावं? कृष्णानं बासरीसहित आपल्याला पाठवलं; पण ह्या सहा छिद्रांतून संगीत बाहेर येत नाही. षड्रिपूंचेच अवतार प्रकट होतात. स्वत:ला काही कमी नाही. स्वास्थ्याला धक्का लागलेला नाही. तरी माणसं संसार समजू शकत नाहीत. "आपण सारे अर्जुनच."
जसा संसार आपल्याला नवखा, तसाच मृत्यू देखील.. या दोन्ही गोष्टी एकदाच आपल्या आयुष्यात येतात.. मृत्यू बद्दलच त्याचं मत आपल्याला थक्क करून सोडत.. ते म्हणतात, " दुःख-आनंद, जय-पराजय, हसू-आसू, विरह-मिलन सगळ तसंच असत.. प्रत्येक क्षणी मांसाच मन नवा जन्म घेतं एवढाच काय ते नवीन.. पुनःपुन्हा जन्म घेण्याची हि क्रिया थांबण हेच मरण!!किती उदात्त कल्पना आहे!!
"वपुर्झा" हे असाच उदात्त पुस्तक.. कधीही, कुठलाही पण काढून वाचा.. काही घरात अत्तराच्या बाटल्या टेबलावर मांडून ठेवलेल्या असतात.. ज्याच्या त्याच्या मूड प्रमाणे जो तो अत्तर काढून लावत असतो.. तसंच काहीस या पुस्तकाचं आहे.. आणि म्हणूनच त्याला अनुक्रमणिका, संदर्भ, क्रमांक अस काहीही नाही!!!
वपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले. पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा, याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती रसरसून येतात. त्यांच्या कथा अर्थवाही व भावनाप्रधान आहेत पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी आद्रतेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातली माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्‍या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौदर्य आहे, तोरा आहे.. म्हणूनच हे लेखन कागदांपेक्षा मनात जास्त वेळ जतन करून ठेवलं जात आहे.. आणि जात राहील....