Monday 8 February 2016

अंदमान- एक नयनरम्य अनुभव!!


                            अंदमान- एक नयनरम्य अनुभव!!

काही ठिकाणं अशी असतात ना कि जिथे गेल्यावर इतर स्थळ काळाचा विसर पडतो.. ते ठिकाण सोडून परत यावंसंच वाटत नाही.. आपण त्या ठिकाणाबद्दल एक कल्पना करून जातो आणि ते ठिकाण आपल्या अपेक्षांना पूर्ण करून आपला आनंद द्विगुणीत करत मनात कायमच स्थान मिळवून जातं.. अशाच काही खास ठिकाणांपैकी एक म्हणजे अंदमान.. आख्यायिका सांगतात कि हंडुमान [हनुमानाच्या] नावावरून ही बेटं ओळखली जायची आणि नंतर त्यांचा अपभ्रंश होत होत आज अंदमान म्हणून प्रसिद्ध आहेत.. अत्यंत isolated अशी ही tourist place.. technology addiction rehabilitation center आहे.. आपण whatsapp, FB, Gmail वगैरे शिवाय जगू शकत नाही असं सांगणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा माणसात यायला भाग पडणारा निसर्ग आहे इथला..
आमच्यासाठी अनेक वर्षांपासून आम्ही ३ कुटुंब ज्याची वाट बघत होतो अशी ही ट्रीप होती... ६ गावी असणारी ९ लोकं ५ दिवसांसाठी एकत्र आणायची म्हणजे सोप्पी गोष्ट नाही.. तीन महिने आधी सगळा प्लान तय्यार होता.. कुठून कसं जायचं, कुठे राहायचं, काय काय करायचं.. फक्त तारखा पडायला मुहूर्त लागत नव्हता.. अखेरीस सगळ्यांनी आपापले व्यवसाय, कॉलेजेस, हास्य क्लब, भजनी मंडळ या सगळ्यांतून सुट्टी घेतली आणि १-५ फेब्रुवारी आमची अंदमान ट्रीप बुक झाली.. Whatsapp Group वर काय काय shopping करायचं, कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वस्तू कशा माववायाच्या, काय काय खायचं अशा चर्चा होऊ लागल्या.. Tour manager म्हणजे आई आणि commute coordinator म्हणजे मामा.. अशा उत्तम leadersच्या हाताखाली आमचा प्रवास सुरु झाला.. पुणे-चेन्नई-पोर्टब्लेअर असा flight Journey होता.. त्यात मग window seat साठी भांडण, तिथे बसल्यावर aisle seat वर असणाऱ्याला चिडवणं, भरपूर फोटोस काढणं असे सगळे सोपस्कार पार पडल्यावर उगाच झोपायचा प्रयत्न करून झाला.. आणि या सगळ्या दंग्यात आम्ही तीन बहिणी तर होतोच पण आमच्या जोडीला आज्जीआजोबा सुद्धा होते.. त्यांचा उत्साह बघून संपूर्ण ट्रीपमध्ये कोणालाही "मला कंटाळा आला" असं म्हणायची हिम्मतच झाली नाही.. 
पहिल्या दिवशी म्हणजे एक तारखेला संध्याकाळी ४ वाजता आम्ही पोर्ट ब्लेअर मध्ये आलो.. हॉटेल्स बुक झालेली होतीच.. आणि दिमतीला दोन गाड्या देखील होत्या.. मस्त फ्रेश होऊन सगळे सेल्युलर जेल मध्ये गेलो.. ७ विंग्स असणारं, ६९३ कैद्यांना एकावेळेस पोटात सामावून घेणारं हे प्रचंड जेल.. आज त्याच्या ३ विंग्स शिल्लक आहेत..आणि एक central tower ही.. जिथून सातही विंग्स वर लक्ष ठेवता येऊ शकत होतं.. इथे एक पिंपळाचे झाड आहे जे या जेलच्या उभारणीपासून, क्रांतिकारकांवर झालेल्या अनन्वित अत्याचाराचा एकमेव साक्षीदार आहे.. १९३८ मध्ये हे जेल बंद झालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचं राष्ट्रीय स्मारकामध्ये रुपांतर करण्यात आलं.. सरकारने या स्मारकाची अत्यंत नीट निगा राखली आहे.. प्रत्येक संध्याकाळी तिथे एक light and sound show असतो.. त्यामधून जेलची कहाणी  सांगितली जाते.. ते ऐकताना, कोलू पाहताना, फाशीगृह पाहताना, स्वा. स्वराकारांची कोठडी पाहताना आपोआपच मनात "जयोस्तुते" चे शब्द घुमू लागतात आणि अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.. कोणा एका नेत्यामुळे/घराण्यामुळे भारत स्वतंत्र झाला म्हणणाऱ्या लोकांसाठी एक सणसणीत चपराक आहे हा show म्हणजे..
अंदमानात दिवस लवकर सुरु होतो आणि अंधारही लवकर पडतो त्यामुळं साधारण ६-६:१५ लाच ८ वाजल्यासारखे वाटतात.. त्यांच्या कामाचे तास साधारण सकाळी साडेसात ते दुपारी दोन.. एकदा सूर्य कलायला लागला कि under water activities करणं शक्य होत नाही.. अर्थातच आम्हा सगळ्यांना रोज लवकर उठणं भागच होतं.. इथे ५७२ छोटी छोटी बेटे आहेत..पैकी चाळीसच्या आसपास बेटांवर वस्ती आहे.. त्यातही बरीचशी बेटे defense च्या अमलाखाली आहेत.. त्यामुळं तिथे दोन अडीच तासांपेक्षा जास्त वेळ थांबता येत नाही.. असंच एक बेट म्हणजे Ross Island.. ब्रिटीश काळातील अंदमानची राजधानी.. इथे क्लब हाउस आहे, चर्च आहे.. गोड्या पाण्याचा विहिरी आहेत... थोडक्यात दैनंदिन गरजांपासून मनोरंजनापर्यंत सगळं आहे.. दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्याने केलेल्या आक्रमणामुळे त्याचा संहार झालाय ही गोष्ट वेगळी पण तरीही त्या काळच्या वैभवाची साक्ष पटवून देण्यासाठी ते पुरेसा आहे..
नंतरचे ३ दिवस मग scuba diving, snorkeling, jet skiing, sea walking आणि पाण्यात डुंबत राहणं यात कधी निघून गेले कळालच नाही.. पर्यटकांना जाता येईल अशा अनेक बेटांवर आम्ही जाऊन आलो.. Havelock, North Bay, Light house, राधानगर, कला पत्थर असे अनेक किनारे मनात साठवून आलो.. पोर्ट ब्लेअर पासून या बेटांवर जाण्यासाठी छोट्या बोटी किंवा क्रुझचाच पर्याय आहे.. खूप कमी बेटांवर जाण्यासाठी रस्ते आहेत..Havelock हे त्यातलंच एक बेट.. तिथून परत येताना क्रुझवर आमच्यातली सगळी मोठी मंडळी एकदम तरुण झालेली.. त्यांच्या डान्सने क्रुझचा डेक गाजवला.. मामीसोबत तर बाकीच्या मंडळींनी फोटोजसुद्धा काढून घेतले.. तेव्हा आम्हाला परत एकदा जाणवलं कि नेहमीच्या routine मधून बाहेर पडल्यावर आपलेच लोकांचे नवनवीन गुण कळतात.. आपण आणखी जवळ येतो..
एवढी सगळी धमाल केली तरीसुद्धा वेळेअभावी काही गोष्टी बघायच्या राहून गेल्या.. दिगालीपूर, जिवंत ज्वालामुखी, आणि निकोबार ही त्या राहिलेल्या ठिकाणांपैकी काही ठिकाणं.. सगळं अंदमान निकोबार बघायचं असेल तर १२-१४ दिवसांची ट्रीप असायला हवी..
काळेपाणी, सेल्युलर जेल आणि आदिवासी हि एवढीच अंदमानची ओळख आता राहिलेली नाही.. अत्यंत सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारे, तिथे होणाऱ्या water activities, समुद्रतळाशी असणारं अनोखं आणि अत्यंत आकर्षक सागरी विश्व अशी एक हवीहवीशी ओळख या ठिकाणाला मिळत आहे.. परदेशातील समुद्रकिनाऱ्यांच्या तोडीचे किनारे सगळ्यांनाच भुरळ घालत आहेत.. अत्यंत मनमिळाऊ आणि मदतीला तत्पर असणारी स्थानिक मंडळी अंदमान tourismचं नाव मोठ्ठ करत आहेत.. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी या बेटाला जपानी लोकांच्या ताब्यातून परत मिळवलं आणि त्यानंतर दोनच वर्षात आपण स्वतंत्र झालो.. ब्रिटिशांनी जर अंदमान परत घेतला नसत तर आज हे सुंदर ठिकाण जपानच्या ताब्यात असतं.. नाही म्हणलं तरी क्षणभर ब्रिटीशांचा आपल्यावर हा एक उपकार आहे असं वाटल्याशिवाय राहत नाही.. आयुष्यात परत एकदा तरी नक्की यायचं इथे असा विचार पक्का करूनच आम्ही ५ तारखेला परतीचा प्रवास सुरु केला..