Monday 25 August 2014

प्रखर राष्ट्राभिमानी - स्वा. सावरकर



आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांची वेगळी ओळख करून देण्याची गरजच नाही. या महान माणसाने आपल नाव सार्थ करत स्वतःच्या हाताने, लेखणीने भारतवर्षाला सावरलेलं आहे.. क्रांतीची ज्योत पेटवली आहे.. फक्त भारतातच नाही तर जगभरात.. त्यांच्या कविता आपल्याला सांगत राहतात की या इथे एक उत्कट देशभक्त, जहाल क्रांतिकारक, तेजस्वी लेखक, कुसुमकोमल कवी, प्रभावी वक्ता, क्रियाशील समाजसुधारक होऊन गेला.. त्यांच्या कार्याला सीमा नाही, त्यांच्या क्रियाशीलतेला सीमा नाही आणि देशभक्तीला तर नाहीच नाही.. असा हा असीम भारतपुत्र "स्वा. सावरकर "
अर्थात विनायक दामोदर सावरकर.. !!
लहानपणापासून या महामानवाबद्दल आपण ऐकत आलेलो आहोत.. त्याच्या घणाघाती वक्तृत्वाची
जाज्वल्य देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली ध्वनीफित ऐकुन वेळोवेळी अंगावर रोमांच उभे राहिले आहेत..
जस आभाळाच्या विस्ताराला मर्यादा नाही, सागराच्या खोलीला पार नाही, हिमालयाच्या उत्तुंगतेला थांग नाही तसच यांच्या असामान्य प्रतिभेला काळाची, स्थळाची, वेळेची बंधन नाहीत.. 
वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य देवीचे स्तोत्र लिहिलं
"जयोस्तु ते श्रीमहन्मंगले । शिवास्पदे शुभदे  स्वतंत्रते भगवती । त्वामहं यशोयुतां वंदे
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं, नीति संपदांची स्वतंत्रते भगवती । श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी स्वतंत्रते भगवती । चांदणी चमचम लखलखशी
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली  स्वतंत्रते भगवती । तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची स्वतंत्रते भगवती । अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे
मोक्ष-मुक्ति  ही तुझीच रूपे तुलाच वेदांती  स्वतंत्रते भगवती । योगिजन परब्रह्म वदती
जे जे उत्तम उदात्त उन्न्त महन्मधुर तें तें  स्वतंत्रते भगवती । सर्व तव सहचारी होते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे"
भारतमातेच इतक ओजस्वी रूप शब्दात मांडण्यासाठी लेखणीमध्ये प्रचंड ताकद असावी लागते आणि मनामध्ये प्रखर देशभक्ती...
" हे अधम रक्तीरंजिते । सुजन पूजिते । श्री स्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन तुजविण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्री स्वतंत्रते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे "
हे वाचताना आपल्या अंगात अचानक दिव्यत्वाचा संचार होतो अस वाटत..  राष्ट्रासाठी काहीतरी करायला हव अशी आस निर्माण होते...
तीव्र बुद्धिमत्ता, आक्रमी व साहसी वृत्ती, हृदयातील मानव्य अन् सर्जनशील कवित्व लाभलेले सावरकर स्वतःच्या आदर्श स्थानांबद्दल अतिशय कृतज्ञ होते.. आणि या कृताज्ञातेमधुनच शिवरायांच्या आरतीचा जन्म झाला.. शिवराय म्हणजे पाच शाहींना उध्वस्त करण्यासाठी देवी भवानीने घेतलेला मानवी अवतार.. हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार.. रामदासभक्त आणि बरच काही..
अशा शिवरायांची थोरवी गाताना ते म्हणतात,
" हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाज राजा
जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी जी बुद्धि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे ती बुद्धि भाबड्या जीवां । लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थें तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा "
लोकमान्यांना स्वतःचे गुरु मानणारे सावरकर त्यांच्या क्रांतीची ज्योत आणखी तेजस्वी आणि जहाल करते झाले.. १९०६ मध्ये टिळकांचा आशीर्वाद घेऊन ते लंडनला गेले.. आणि तिथेच भविष्यात होणार्या अमानवीय कार्याची सुरुवात झाली.. सावरकरांनी लंडनहून पाठवलेल्या पिस्तुलानेच हुतात्मा अनंत कान्हेरे या क्रांतिकारकाने जॅक्सनचा वध केला. याबाबत त्यांना अटक झाली. पुढे पॅरिसहून लंडनला येताना मार्सेलीस बंदरात समुद्रात उडी टाकून निसटण्याचा ऐतिहासिक, धाडसी प्रयत्न त्यांनी केला. जणू जल महाभूताचे भेदन केले.  दोन जन्मठेपी एकाच वेळी भोगत अंदमानच्या सेल्युलर जेलरच्या काळकोठद्यांना देखील थरथरायला लावले.. उत्स्फूर्त काव्यपंक्तिंनी रोमरोमात राष्ट्रभिमानची ज्योत चेतवली.. अंदमानात जेव्हा त्यांना काव्य स्फुरू लागले. तेव्हा जवळ कागद तर नव्हते मग त्यांनी सरळ उष:कालच्या आभाळाला विचारले, 'माझा कागद होतोस काय?' तेव्हा आभाळ उत्तरले,
"मी मुक्तामधले मुक्त - तू कैद्यांमधला कैदी।
माझे नि तुझे व्हायाचे - ते सूर कसे संवादी?
माझ्यावर लिहिती गीते - या मंद-समीरण लहरी।
माझ्यावर चित्रित होते - गरूडाची गर्द भरारी।।
जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार?
माझ्याहून आहे योग्य - भूमीला प्रश्न विचार।।
आभाळ म्हणाले 'नाही' - भूमिही म्हणाली 'नाही'
मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही।।
दगडाची पार्थिव भिंत - तो पुढे अकल्पित सरली।
'मी कागद झाले आहे - चल ‍‍‍‍‍‍लिही' असे ती वदली।" आणि मग इथेच ते ऐतिहासिक कमला काव्य रचल गेल.. भारतवर्षाच्या दुर्दैवाने ते महाकाव्य पुसून टाकण्याचे प्रयत्न झाले.. पण म्हणून त्याची थोरवी खचितच कमी होत नाही..
मातृभूमीच्या विरहामुळे व्याकूळ झालेलं मन जेव्हा काव्य रचू लागत तेव्हा ते काव्य केवळ प्रसिद्धच नाही तर अजरामर होऊन जात..
" ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू
त‍इं जननीहृद्‌ विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी जगद्‌नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे, कथुनि सोडिले तिजला
सागरा, प्राण तळमळला"
 जगभरात कितीही सुख असलं, कितीही ऐश-आराम असला तरी देखील मला माझ्या भारतमाते पेक्षा काहीही प्रिय नाही काहीही सुखद नाही.. तुला जसा तुझ्या प्रिय सरितेचा विरह सहन होत नाही तसाच  मलादेखील हा दुरावा सहन होत नाही, माझा प्राण तळमळत आहे' अस सांगताना ते लिहून गेले...
" नभि नक्षत्रे बहुत, एक परि प्यारा  मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिया साचा वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता, रे बहु जिवलग गमते चित्ता, रे
तुज सरित्पते जी सरिता, रे त्वद्‍अविरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला...
अवघ काव्य म्हणजे जणू विरह अगतिकता आणि विमनस्कता यांचा उच्च कोटीचा संगम आहे.. ते वाचल्यावर आपल्याही नकळत आपण नतमस्तक होऊन जातो..
सावरकरांचं व्यक्तिमत्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पाश्र्वभूमीवर आधारित कादंबर्‍यांचा लेखक ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत..त्यांच्या अनेक वीर रसपूर्ण कविता आहेत.. आपणा सर्वांना त्या माहित आहेत.. पण काही अशा कविता आहे की ज्या वाचल्यावर हा इतका जहाल माणूस इतका प्रेममय कसा काय होऊ शकतो अस वाटत.. वानगीदाखल घ्यायचं झाल तर
"शत जन्म शोधितांना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्यमालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥
तेव्हां पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी ।
सुख साधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥
हा हाय जो न जाई । मिठि घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणात गेला । सखि हातचा सुटोनी ॥" हि  कविता त्याची आर्तता दाखवते, एका क्षणी जेव्हा विरहानंतर एकमेकांची भेट होते तेव्हा त्याची अवस्था किती घेऊ किती देऊ अशी होऊन जाते... आणि जेव्हा वाट पाहून जीव शिणून जातो तरीही सखा येत नाही तेव्हा ती म्हणते,
" समयी सखा न ये । मी जात फसुनि आतां गे ।
बघत वाट थकलें । मी दारिं बसुनि आतां गे ॥
मानि ना आता गोडी गुलाबी पुन्हा ।
सख्याशीं मांडिलें मी युद्ध रुसुनि आतां गे ॥
गांठ होतांचि त्‍या । शत्रुकंठी पाश हा ।
आलिंगनाचा । फेकीन कसुनि आतां गे ॥
दूति जा सांग । आलांत जा तसेची ।
प्रिया रडवीनची । मी हसुनि हसुनि आतां गे ॥"
या कविता वाचताना वाटत या माणसाच्या सर्वच भवता अतिशय उत्कट होत्या तरल होत्या.. कुठलाही विषय त्यांना वर्ज्य नव्हता.. या महामानावानं मागं ठेवलेल्या लखलखीत प्रकाशरेषेवरून आपण किती काळ चालत आलेलो आहोत..अगदी ‍अलगद आणि विनासायास.. आणि कदाचित म्हणूनच त्यांच्या कामगिरीला काहीस गृहीत धरल गेल.. निसर्गनियमांना आपण जसं गृहित धरतो तसं.. पण आज मला म्हणावस वाटत आहे कधी अजाणता तर कधी जाणूनबुजून अवहेलना ज्यांना अवहेलना सहन करावी लागली त्यांचे खरेखुरे अनुयायी मात्र अव्याहत क्रांतीचा झरा वाहता ठेवणाऱ्या या  महामानवाचा समृद्ध वारसा घेऊन पुढे जात आहेत.. स्वतंत्र भारतात वैचारिक श्रीमंती उपभोगत आहेत.. सावरकरांबद्दल लिहीण्यासारख खूप काही आहे, आज लिहिताना वेळोवेळी जाणीव होत आहे त्यांच्या पुढे आपण अत्यंत खुजे आहोत.. भविष्यात कधी त्यांच्या सर्व साहित्याचे रसग्रहण करण्याचा मानस आहे.. तोपर्यंत मात्र इति लेखनसीमा..