Saturday 17 May 2014

ग्रेस नावच कोड!!!!

माणिक शंकर गोडघाटे म्हणजेच कवी ग्रेस… उत्कट… उत्फुल्ल… अर्थवाही शब्दांचे कवी… ग्रेसांच्या कविता समजत नाहीत.. जाणवतात..! स्वत:च्या संपूर्ण मालकीची आणि अत्यंत सुंदर भाषा, लयकारीचा नखरा आणि प्रतिमांची गूढ आणि नितांत रम्य मांडणी म्हणजे ग्रेस.. त्या कविता वाचकासाठी नसतात... फक्त आणि फक्त ग्रेस साठी असतात.. त्यामध्ये त्यांचे अत्यंत आतले, व्यक्तिगत अनुभव दडलेले असतात.. जस एखादा देखावा बघून चित्रकार स्वतःच्या कुन्चल्यामधून त्याला भावणारा अर्थ व्यक्त करतो.. आपल्याला त्यातून काय जाणवत हे आपली बौद्धिक क्षमता, कलावंताशी तादात्म्य पावण्याची पातळी यांवर अवलंबून असत... तसंच काहीस आहे ग्रेसच...
"ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता"
हे एवढंच वाचू तेव्हा अस वाटत कि कोणी प्रियकर आपल्या सखीच्या विरहामुळे व्याकूळ झाला आहे... तिच्या जाण्यामुळ व्यथित झाला आहे.. पण त्याच वेळेस दुसर्या ओळीचा अर्थ नीटसा लागत नाही.. पुढे जेव्हा आपण
"ती आई होती म्हणुनी घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता
अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता" हे वाचतो तेव्हा कळत यामधली जी 'ती' आहे, ती आई आहे.. तिच्या जाण्याने अतीव दुखः होऊन ग्रेस रडत आहे.. मातृत्वाचा आधार गेल्यावर अकाली प्रौढपणा आल्यामुळ बालपण संपल्याची काटेरी जाणीव त्यांना होत आहे..कंदील धुरकट दिसत आहे तो तिच्या आठवणींमध्ये डोळ्यात आलेल्या पाण्यामुळे असेल किंवा तिचा वास्तल्यावूर्ण हात त्या कंदिलावर फिरला नाही आणि तो काजळला आहे त्यामुळ असेल.. अस वाटू लागत.. पण तरीही कवितेचा एकसंध अर्थ काही लागत नाही..मग अस वाटत कदाचित पूर्ण पार्श्वभूमी अशी देखील असू शकेल कि "मुलाबाळांचा भरला संसार सोडून आई दुस-या पुरूषाबरोबर निघून गेली आहे.. त्या वेळी वडिलांची अवस्था ही अशी हताश, खचलेली आहे.. जसा पराक्रमी सूर्य स्वतःची पावसाळी मेघात अडकली किरणं सोडवण्यात गुंग आहे.. हतबल आहे.., त्याचा नाईलाज आहे.. आणि म्हणूनच हि कविता हे नैराश्याचं, पराभवाचं आणि हतबलतेचं वर्णन आहे.." एका ओळीतून असे अनंत अर्थ निघतात.. अशा वेळेस आपण काय करायचं तर शब्दांचा गुंता सोडून द्यायचा.. कवितेचा अर्थ लावायच्या भानगडीतच पडायचं नाही.. फक्त तिच्या मध्ये स्वतःला विसरत जायचं.. तिला जाणवत राहायचं..
ज्या वेळी मराठी कविता बंधनातून मुक्त होऊ पाहत होती त्याच वेळी जुनी वृत्त घेऊन ग्रेस आपले दु:खं कवितेच्या माध्यमातून व्यक्त करत होते. दु:ख व्यक्त करत होते यापेक्षा सुद्धा दु:खाचा सोहळा करत होते.. त्यातलं सौंदर्य शोधत होते.. ग्रेसच्या कवितेत प्राचीन जाणिवा दिसतात.. निसर्गातील प्रत्येक प्रतीकला स्वतःच्या जाणीव आहेत अस वाटू लागत.. जस..भरती किंवा ओहोटी नसलेला शांत समुद्र धीरगंभीर, स्थितप्रज्ञ वाटतो.. आपल मन शांत असेल तेव्हां समुद्राचं हे रूप आठवतं. उत्साहासाठी, जल्लोषासाठी भरतीचा समुद्र आठवतो. पण ओहोटीचा समुद्र कुणालाच आवडत नाही.तेव्हा तो समुद्र एकाकी, दु:खाने आतल्या आत कुढत असणारा वाटतो..कुणी न ठरवता हे होतं. आपोआपच.. अशा प्रतिमा वापरल्यामुळ ग्रेसची कविता दुर्बोध वाटते.. यामागे कारण अस असाव की ती कविता शब्दसौंदर्य आणि लयकारीशी नि:संशय इमान राखते पण संपूर्ण कविता एक सुंदर मनोहारी एकसंध चित्र निर्माण करत नाही..
आता हेच बघा
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते
इथेपर्यंत कवितेचा अर्थ लागतो.. कि तिच्या आठवणींमध्ये तिची, तिने शिकावेलेली गीते मी गात आहे.. तरीही पुन्हा ती कोण हे अनुत्तरीतच आहे.. पण पुढे
"ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे" यांतून नेमका अर्थ गवसत नाही.. आणि ग्रेस आपल्या हातून सुटत जातो.. पण एकदा हि दुर्बोधता मान्य केली.. तर मग ग्रेसची सौंदर्यदृष्टी, त्याच्या शब्दांची आणि रूपकांची मोहवणारी दुनिया, त्यांची नादमयता थक्क करते.. अंर्तमनात लपलेल्या कवितेला जागं करते.. आणि तीच ग्रेसची खरी जादू आहे.. त्यांच्या कविता बर्याचदा अतिवास्तववादी आहेत.. झोम्बणाऱ्या आहेत.. त्यांच्या 'डार्लिंग' कवितेत ते म्हणतात..
"‘वाळवंटे फक्त वाळूचीच नसतात डार्लिंग!
फुलांची असतात, झाडांची असतात..
घरांची असतात, शहरांची असतात..
आणि अनाथ अंतरिक्ष तर नव्या
सौंदर्यजटिल साक्षात्कारी वाळवंटाचा
एक साधा प्रारंभच असतो..’’
वाळूच वाळवंट ठीक आहे हो पण फुलांचे वाळवंट?? झाडाचं वाळवंट??
मग कदाचित कुठल्याही गोष्टीची भावनाशुन्य गर्दी म्हणजे वाळवंट, विश्वोत्पत्तीनंतर पसरत जाणारी देखणी, तारकाविश्व म्हणजे ‘वाळवंट’ अस म्हणलं तर कविता पटू लागते... जाणवू लागते..या वाळवंटाची उत्पत्ती सुद्धा सृजनाचा अवतार होता, पण परिणीती भयाणतेमध्ये झाली असा विचार भयव्याकुळ करतो..त्यांची हि कविता परस्परभिन्न संचांतल्या प्रतिमांमुळे वास्तवाच्या आत असलेले वास्तव नेमकेपणाने दाखवीत जाते. पण फुले, आकाश, वाळू अशा रोमँटिक प्रतिमांमुळे रसिकाची फसगत होते..
"तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायांतुनी रंग गळतात
या वृक्षमाळेतले सावळे !
तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली
मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते ?
जसे संचिताचे ऋतु कोवळे
अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद तार्याउप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा"
हि कविता म्हणजे अस वाटत कि ते म्हणत आहेत.. "तू मला फक्त दिसत आहेस.. जाणवत आहेस... तुझ असण मनी स्पंदन निर्माण करत आहे.. तुझ अस्फुट दर्शन या अथांग अंधारात सुखाची चहूल आणत आहे.. पण तरीही तुझा सहवास माझ्या नशिबी नाही.. त्याच अपर दुक्ख मला आहे.. तुझ्या असण्या-नसण्याच द्वंद्व माझ्या उरी आकांत मांडत आहे.." पण हे सगळ ते प्रेयसीसाठी नसून प्रतिभेसाठी आहे अस मानल तर या कवितेला आभाळाएवढी उंची मिळून जाते..
"पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने.
अशा ओळींच्या रिमझिम पावसात ‘भरून’ जायला आवडतंच.. पण कातरवेळी हि पावसाची रिमझिम स्वतःसोबत एकटेपणा , दुखः घेऊन येते.. अशावेळेस डोळे भरून येतात.. वारा धावतो.. आकाश भाग पाडत त्याला त्यासाठी.. आपल्याला स्वतःच्या मनासारखं जगता येत नाही.. आणि जगताना देखील ते कुठलेसे चार डोळे पहारा करतात.. आणि मग ग्रेस म्हणतात..
"संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्याचवरती लाटांचा आज पहारा !
वाह.. अशा शब्दांनी उपमा घ्याव्या तर ग्रेसच्या लेखणीमधूनच!!!
"वार्या ने हलते रान
तुझे सुनसान
हृदय गहिवरले
गायीचे डोळे करुण उभे की
सांज निळाईतले
डोळ्यांत शीण
हातात वीण
देहात फुलांच्या वेगी
अंधार चुकावा म्हणून
निघे बैरागी..
वाळूंत पाय
सजतेस काय ?
लाटान्ध समुद्राकाठी
चरणात हरवला गंध
तुझ्या की ओठी ?
शून्यात गर्गरे झाड
तशी ओढाळ
दिव्यांची नगरी
वक्षात तिथीचा चांद
तुझा की वैरी ?
हि सगळी एक कविता.. पण प्रत्येक अंतरा वेगळा वाटावा इतका स्पष्ट.. त्यात मूर्तिमंत कारुण्य आहे.. जसा वारा रान हलवतो तशी एखादी आठवण हृदय ढवळून काढते.. असा दुखी भाव आहे.. बैरागी असला तरी माणूसच तो... त्यागी असला तरी भोग सुटत नाही, आसक्ती सुटत नाही.. अशी अगतिकता आहे.. वाळूसारखा बिनभरवशी आधार असताना देखील सजण्या-सजवण्याचा मोह सुटत नाही.. याची खंत आहे.. एकुणातच काय.. अनेक भावना पण काव्य एकच.. या कविता म्हणजे असे अनंत चकवे.. पण हवेहवेसे वाटणारे! वेड लावणारे!
कवितेच्या ज्या वाटांवर सहसा कुणी फिरकत नाही अशा मार्गांवर आपल्याला नेऊन सोडणारा हा कवी अक्षरांना अमर करून गेला.. मनाच्या कानाकोपर्यात जायला लावणारा कवी टीकाकारांना चोख उत्तर देऊन गेला.. मनापासून त्याची कविता समजण्याचा प्रयत्न करणार्यांना वेड लाऊन गेला.. खरतर गेला अस कस म्हणू.. त्यांच्या भावनेने ओथंबणार्या कवितेतून अजरामर होऊन गेला.. कवितेला कवितेनेच सजवून गेला... सलाम तुम्हाला ग्रेस.. मनापासून सलाम...

**या लेखात आंतरजालावरील काही माहितीचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे लेखाचे संपूर्ण श्रेय माझे नाही!! 

Tuesday 6 May 2014

आधुनिक वाल्मिकी -- गदिमा!!



आज जे आपल्याला भेटणार आहेत त्यांच्या कवितेने, भावगीताने स्वरांची लेणी लेऊन अनेक पिढ्यांचं आयुष्य सुमधुर केल आहे.. जन्मतःच गेयगद्याची सिद्धी घेऊन आलेला हा अजरामर कलावंत.. कवितेशी जीवाभावाचं नात सांगणारा
"ज्ञानियाचा व तुक्याचा| तोच माझा वंश आहे ||
माझिया रक्तात काही| ईश्वराचा अंश आहे||
अस म्हणून संत-परंपरेचा वारसा अभिमानाने मिरवणारा अत्यंत प्रतिभावान कवी, साक्षात आधुनिक वाल्मिकी "ग दि मा" अर्थात अण्णा माडगुळकर...
गडकरी गेल्यानंतर
"मायबोलीचा किल्ला आता द्यावा कोण करी,
तेवढे सांगा न गडकरी...
दिक्कालातुनी बघा शाहिरा, दिसतो का तो तरी,
आपुला वारस गादीवरी!!!"
असा प्रश्न विचारात व्याकूळ होणारे गदिमा स्वतःच्याही नकळत त्यांचे वारसदार बनले...
अतिशय सहजतेने त्यांनी त्या असीम कवित्वाच प्रतिनिधित्व केल...
माणदेशातील एका छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म झाला.. आजुबाजूच वातावरण तसं निरक्षरच!! पण पोथ्या, कथा-कीर्तन, भजन यांमधून झालेले संस्कार.. आजूबाजूच्या निसर्गसौन्दर्याने आलेली रसिकता, आणि भाबड्या लोकांच्या संगतीमुळे आलेली निरागसता हे सगळ सगळ त्यांच्या कवितेमधून व्यक्त होत..
ते
"प्रभातसमयो पातला, आता जाग बा विठ्ठला !
दारी तव नामाचा चालला गजरू
देव-देवांगना गाती नारद-तुंबरू
दिंड्या-पताकांचा मेळा, तुझिया अंगणि थाटला !
दिठी दिठी लागली तुझिया श्रीमुखकमलावरी
श्रवणिमुखी रंगली श्रीधरा, नामाची माधुरी
प्राणांची आरती, काकडा नयनी चेतविला !
अस म्हणत प्रत्यक्ष विठ्ठलाला भूपाळी म्हणतात आणि त्याच वेळेस
" ये निद्रादेवी
तुझे सावळे हात प्रियाच्या पाठीवर ठेवी
घाव घेऊनी शोककथांचे
अंगावरती वण मुक्या व्यथांचे
वत्सलतेचे लेप मुलायम तूच हळू लावी
दु:खभागल्या या डोळ्यांवर
चंदनशीतल घालुन फुंकर
थकलेल्या या दिठिस उद्याची सुखस्वप्‍ने दावी
कृष्णे तुझिया मांडीवरती
लाभु देत या लव विश्रांती"
साद सुगंधित तुझा तूच या अंगाई गावी" अस म्हणत पालकत्व घेऊन अंगाई देखील म्हणतात...
छोटस गाव, रम्मीचा डाव, खेड्यातून लग्नानंतर होणारा 'गोंधळ', जागरण यासारखे साधे विषय सुद्धा त्यांच्या कवितेतून सुंदर होऊन येतात..
मुळातच सृजनशील असणारा पाऊस यांच्या लेखणीला नवे आयाम देतो..
वळीवाचा पाऊस आला कि गदिमा म्हणतात..
"माउलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार
भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार!!!"
पडणार्या पावसात सुद्धा त्यांना कविता दिसते, त्याला मल्हार रागाचा साज चढतो आणि एक अमीट गोडी असणार गीत तयार होत..
"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा
कालिंदीच्या तटी श्रीहरी तशात घुमवी धुंद बासरी
एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधारा
वर्षाकालिन सायंकाळी लुकलुक करिती दिवे गोकुळी
उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा
कृष्णविरहिणी कोणी गवळण तिला अडविते कवाड, अंगण
अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा"
असा हा पाऊस पडून गेला कि जमीन पेरणीसाठी तयार होते हा झाला आपला सरळ-साधा विचार.. पण गदिमा याची सुद्धा कविता करतात.. ते म्हणतात,
"स्नान झाले धरणीचे पडे सोन्याचा प्रकाश
आता बसेल माउली अन्नब्रह्माच्या पूजेस.." वाह !!!! उपमा अलंकार वापरावा तर गदिमांनीच...
एखादी कल्पना सुचावी आणि तिला सगुण रूप देणारे शब्द सहज समोर उभे राहावेत अशी हातोटी होती या माणसाची..असा कुठलाही गद्य-पद्य अविष्कार नाही ज्याला यांच्या लेखणीचा परिस स्पर्श झाला नाही...
आपल अख्ख आयुष्य त्यांनी गाण्यात मांडलं 'झुक झुक आगीनगाडी' म्हणत येणार बालपण असो, किंवा 'गोरी गोरी पान फुलासारखी छान' म्हणून दादाला चिडवण..
 'हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी !'म्हणणारा प्रियकर असो
किंवा 'धुंद मधुमती रात रे, नाथ रे' म्हणणारी विवाहिता..
'चला सख्यांनो हलक्या हाते नखांनखांवर रंग भरा ग, नखांनखांवर रंग भरा म्हणणारी' सौभाग्याकांक्षीणी असो
किंवा 'आठव येतो मज तातांचा मम मातेच्या मृदू हातांचा' अस म्हणून हळवी होणारी माहेरवाशीण.. आणि शेवटी 'एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे' म्हणत येणारी तिन्हीसांज!!
अस एकदाही झाल नाही कि 'पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक त्याचेच त्या कळले तो राजहंस एक' ऐकताना अंगावर काटा आला नाही!!! याचं नाट्यगीत ऐकताना सुरावटीबरोबरच शब्द किती प्रभावी असतात हे कळत..
अनेक बोलकी शब्दचित्रे रेखाटणाऱ्या अण्णांनी फक्त मधुर रसातच रचना केल्या अस नाही तर
"हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन्‌ तथागताचे
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे" यासारखी अनेक स्फूर्ती गीते लिहिली..
राष्ट्रप्रेमाची प्रेमाची शिकवण देत असतानाच त्यांनी श्रमाची महती देखील सांगितली.. "तुझ कल्याण तूच करू शकतोस, मी रिक्त हस्त होण्यासाठी तयार आहे तू फक्त कष्ट कर, तुझी झोळी मोठी कर" अस म्हणत जणू श्रम-देवताच त्यांच्या तोंडून आपल्याला सांगते,
"मज नकोत अश्रू घाम हवा हा नव्या युगाचा मंत्र नवा !
अपार लक्ष्मी माझ्या पोटी का फिरसी मग माझ्या पाठी
एक मूठभर अन्नासाठी जगतोस तरी का भ्याड जीवा ?
मोल श्रमाचे तुला कळू दे हात मळू दे, घाम गळू दे
सुखासिनता पूर्ण जळू दे दैन्यास तुझ्या हा एक दवा !"
आणि अस करत असतानाच अहोरात्र कष्ट करणाऱ्या थकल्या भागल्या जीवांना जरा विसावा घेण्यासही सांगते,
"चला जाउ द्या पुढे काफिला
अजुनी नाही मार्ग संपला
इथेच टाका तंबू !
जाताजाता जरा विसावा
एक रात्र थांबू-
इथेच टाका तंबू !"
प्रत्यक्ष पु.ल. म्हणून गेले आहेत, "अण्णा कविता लिहायला लागले कि प्रत्यक्ष वाल्मिकी त्यांना सांगत जातात आणि हा 'गजानन' त्या आपल्यासाठी उतरत जातो..
कवितेची नक्कल करताना सुद्धा तिला अस्सल बनवण्याचं कसब गदिमांकडे होत..
म्हणूनच मीराबाईंच "माई मैने गोविंद लीनो मोल" हे भजन " बाई मी विकत घेतला श्याम " मध्ये रुपांतरीत होत 
तर "झुमका गिरा रे" च्या वळणावर "बुगडी माझी सांडली ग" तयार होत...
या सगळ्यांतून त्यांचा अफाट व्यासंग, शब्दप्रभुत्व, मात्रा आणि वृत्त बद्ध रचनेवरील हुकुमत दिसून येते.. बालगीत म्हणू नका कि प्रेमगीत, लावणी म्हणू नका कि भजन आणि सगळ्याचा कळसाध्याय म्हणजे 'गीतरामायण'.. सारे रस येथे आकळले!!!
त्यांच्या विपुल लेखनाबद्दल थोडक्यात लिहिण म्हणजे कसरतच आहे खर.. कारण या महान विभूती बद्दल लिहाव तेवढ कमीच!!!!
पण शेवटी काय हो,
'मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे !
या वस्त्रा ते विणतो कोण ? एक सारखी नसती दोन कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्याचे!'
हा असा ग.दि. माडगुळकर नावाचा अविष्कार निर्माण करणाऱ्या त्या असीम विणकर्याला माझ त्रिवार वंदन.. ____/\____

**या लेखाची प्रेरणा म्हणजे आजवर वाचलेली ग. दि. मांची, ग. दि. मांवर लिहिलेली असंख्य पुस्तकं आणि लेख.. आणि अर्थातच इंटरनेट!!