Saturday 17 May 2014

ग्रेस नावच कोड!!!!

माणिक शंकर गोडघाटे म्हणजेच कवी ग्रेस… उत्कट… उत्फुल्ल… अर्थवाही शब्दांचे कवी… ग्रेसांच्या कविता समजत नाहीत.. जाणवतात..! स्वत:च्या संपूर्ण मालकीची आणि अत्यंत सुंदर भाषा, लयकारीचा नखरा आणि प्रतिमांची गूढ आणि नितांत रम्य मांडणी म्हणजे ग्रेस.. त्या कविता वाचकासाठी नसतात... फक्त आणि फक्त ग्रेस साठी असतात.. त्यामध्ये त्यांचे अत्यंत आतले, व्यक्तिगत अनुभव दडलेले असतात.. जस एखादा देखावा बघून चित्रकार स्वतःच्या कुन्चल्यामधून त्याला भावणारा अर्थ व्यक्त करतो.. आपल्याला त्यातून काय जाणवत हे आपली बौद्धिक क्षमता, कलावंताशी तादात्म्य पावण्याची पातळी यांवर अवलंबून असत... तसंच काहीस आहे ग्रेसच...
"ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता"
हे एवढंच वाचू तेव्हा अस वाटत कि कोणी प्रियकर आपल्या सखीच्या विरहामुळे व्याकूळ झाला आहे... तिच्या जाण्यामुळ व्यथित झाला आहे.. पण त्याच वेळेस दुसर्या ओळीचा अर्थ नीटसा लागत नाही.. पुढे जेव्हा आपण
"ती आई होती म्हणुनी घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता
अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता" हे वाचतो तेव्हा कळत यामधली जी 'ती' आहे, ती आई आहे.. तिच्या जाण्याने अतीव दुखः होऊन ग्रेस रडत आहे.. मातृत्वाचा आधार गेल्यावर अकाली प्रौढपणा आल्यामुळ बालपण संपल्याची काटेरी जाणीव त्यांना होत आहे..कंदील धुरकट दिसत आहे तो तिच्या आठवणींमध्ये डोळ्यात आलेल्या पाण्यामुळे असेल किंवा तिचा वास्तल्यावूर्ण हात त्या कंदिलावर फिरला नाही आणि तो काजळला आहे त्यामुळ असेल.. अस वाटू लागत.. पण तरीही कवितेचा एकसंध अर्थ काही लागत नाही..मग अस वाटत कदाचित पूर्ण पार्श्वभूमी अशी देखील असू शकेल कि "मुलाबाळांचा भरला संसार सोडून आई दुस-या पुरूषाबरोबर निघून गेली आहे.. त्या वेळी वडिलांची अवस्था ही अशी हताश, खचलेली आहे.. जसा पराक्रमी सूर्य स्वतःची पावसाळी मेघात अडकली किरणं सोडवण्यात गुंग आहे.. हतबल आहे.., त्याचा नाईलाज आहे.. आणि म्हणूनच हि कविता हे नैराश्याचं, पराभवाचं आणि हतबलतेचं वर्णन आहे.." एका ओळीतून असे अनंत अर्थ निघतात.. अशा वेळेस आपण काय करायचं तर शब्दांचा गुंता सोडून द्यायचा.. कवितेचा अर्थ लावायच्या भानगडीतच पडायचं नाही.. फक्त तिच्या मध्ये स्वतःला विसरत जायचं.. तिला जाणवत राहायचं..
ज्या वेळी मराठी कविता बंधनातून मुक्त होऊ पाहत होती त्याच वेळी जुनी वृत्त घेऊन ग्रेस आपले दु:खं कवितेच्या माध्यमातून व्यक्त करत होते. दु:ख व्यक्त करत होते यापेक्षा सुद्धा दु:खाचा सोहळा करत होते.. त्यातलं सौंदर्य शोधत होते.. ग्रेसच्या कवितेत प्राचीन जाणिवा दिसतात.. निसर्गातील प्रत्येक प्रतीकला स्वतःच्या जाणीव आहेत अस वाटू लागत.. जस..भरती किंवा ओहोटी नसलेला शांत समुद्र धीरगंभीर, स्थितप्रज्ञ वाटतो.. आपल मन शांत असेल तेव्हां समुद्राचं हे रूप आठवतं. उत्साहासाठी, जल्लोषासाठी भरतीचा समुद्र आठवतो. पण ओहोटीचा समुद्र कुणालाच आवडत नाही.तेव्हा तो समुद्र एकाकी, दु:खाने आतल्या आत कुढत असणारा वाटतो..कुणी न ठरवता हे होतं. आपोआपच.. अशा प्रतिमा वापरल्यामुळ ग्रेसची कविता दुर्बोध वाटते.. यामागे कारण अस असाव की ती कविता शब्दसौंदर्य आणि लयकारीशी नि:संशय इमान राखते पण संपूर्ण कविता एक सुंदर मनोहारी एकसंध चित्र निर्माण करत नाही..
आता हेच बघा
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते
इथेपर्यंत कवितेचा अर्थ लागतो.. कि तिच्या आठवणींमध्ये तिची, तिने शिकावेलेली गीते मी गात आहे.. तरीही पुन्हा ती कोण हे अनुत्तरीतच आहे.. पण पुढे
"ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे" यांतून नेमका अर्थ गवसत नाही.. आणि ग्रेस आपल्या हातून सुटत जातो.. पण एकदा हि दुर्बोधता मान्य केली.. तर मग ग्रेसची सौंदर्यदृष्टी, त्याच्या शब्दांची आणि रूपकांची मोहवणारी दुनिया, त्यांची नादमयता थक्क करते.. अंर्तमनात लपलेल्या कवितेला जागं करते.. आणि तीच ग्रेसची खरी जादू आहे.. त्यांच्या कविता बर्याचदा अतिवास्तववादी आहेत.. झोम्बणाऱ्या आहेत.. त्यांच्या 'डार्लिंग' कवितेत ते म्हणतात..
"‘वाळवंटे फक्त वाळूचीच नसतात डार्लिंग!
फुलांची असतात, झाडांची असतात..
घरांची असतात, शहरांची असतात..
आणि अनाथ अंतरिक्ष तर नव्या
सौंदर्यजटिल साक्षात्कारी वाळवंटाचा
एक साधा प्रारंभच असतो..’’
वाळूच वाळवंट ठीक आहे हो पण फुलांचे वाळवंट?? झाडाचं वाळवंट??
मग कदाचित कुठल्याही गोष्टीची भावनाशुन्य गर्दी म्हणजे वाळवंट, विश्वोत्पत्तीनंतर पसरत जाणारी देखणी, तारकाविश्व म्हणजे ‘वाळवंट’ अस म्हणलं तर कविता पटू लागते... जाणवू लागते..या वाळवंटाची उत्पत्ती सुद्धा सृजनाचा अवतार होता, पण परिणीती भयाणतेमध्ये झाली असा विचार भयव्याकुळ करतो..त्यांची हि कविता परस्परभिन्न संचांतल्या प्रतिमांमुळे वास्तवाच्या आत असलेले वास्तव नेमकेपणाने दाखवीत जाते. पण फुले, आकाश, वाळू अशा रोमँटिक प्रतिमांमुळे रसिकाची फसगत होते..
"तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायांतुनी रंग गळतात
या वृक्षमाळेतले सावळे !
तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली
मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते ?
जसे संचिताचे ऋतु कोवळे
अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद तार्याउप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा"
हि कविता म्हणजे अस वाटत कि ते म्हणत आहेत.. "तू मला फक्त दिसत आहेस.. जाणवत आहेस... तुझ असण मनी स्पंदन निर्माण करत आहे.. तुझ अस्फुट दर्शन या अथांग अंधारात सुखाची चहूल आणत आहे.. पण तरीही तुझा सहवास माझ्या नशिबी नाही.. त्याच अपर दुक्ख मला आहे.. तुझ्या असण्या-नसण्याच द्वंद्व माझ्या उरी आकांत मांडत आहे.." पण हे सगळ ते प्रेयसीसाठी नसून प्रतिभेसाठी आहे अस मानल तर या कवितेला आभाळाएवढी उंची मिळून जाते..
"पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने.
अशा ओळींच्या रिमझिम पावसात ‘भरून’ जायला आवडतंच.. पण कातरवेळी हि पावसाची रिमझिम स्वतःसोबत एकटेपणा , दुखः घेऊन येते.. अशावेळेस डोळे भरून येतात.. वारा धावतो.. आकाश भाग पाडत त्याला त्यासाठी.. आपल्याला स्वतःच्या मनासारखं जगता येत नाही.. आणि जगताना देखील ते कुठलेसे चार डोळे पहारा करतात.. आणि मग ग्रेस म्हणतात..
"संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्याचवरती लाटांचा आज पहारा !
वाह.. अशा शब्दांनी उपमा घ्याव्या तर ग्रेसच्या लेखणीमधूनच!!!
"वार्या ने हलते रान
तुझे सुनसान
हृदय गहिवरले
गायीचे डोळे करुण उभे की
सांज निळाईतले
डोळ्यांत शीण
हातात वीण
देहात फुलांच्या वेगी
अंधार चुकावा म्हणून
निघे बैरागी..
वाळूंत पाय
सजतेस काय ?
लाटान्ध समुद्राकाठी
चरणात हरवला गंध
तुझ्या की ओठी ?
शून्यात गर्गरे झाड
तशी ओढाळ
दिव्यांची नगरी
वक्षात तिथीचा चांद
तुझा की वैरी ?
हि सगळी एक कविता.. पण प्रत्येक अंतरा वेगळा वाटावा इतका स्पष्ट.. त्यात मूर्तिमंत कारुण्य आहे.. जसा वारा रान हलवतो तशी एखादी आठवण हृदय ढवळून काढते.. असा दुखी भाव आहे.. बैरागी असला तरी माणूसच तो... त्यागी असला तरी भोग सुटत नाही, आसक्ती सुटत नाही.. अशी अगतिकता आहे.. वाळूसारखा बिनभरवशी आधार असताना देखील सजण्या-सजवण्याचा मोह सुटत नाही.. याची खंत आहे.. एकुणातच काय.. अनेक भावना पण काव्य एकच.. या कविता म्हणजे असे अनंत चकवे.. पण हवेहवेसे वाटणारे! वेड लावणारे!
कवितेच्या ज्या वाटांवर सहसा कुणी फिरकत नाही अशा मार्गांवर आपल्याला नेऊन सोडणारा हा कवी अक्षरांना अमर करून गेला.. मनाच्या कानाकोपर्यात जायला लावणारा कवी टीकाकारांना चोख उत्तर देऊन गेला.. मनापासून त्याची कविता समजण्याचा प्रयत्न करणार्यांना वेड लाऊन गेला.. खरतर गेला अस कस म्हणू.. त्यांच्या भावनेने ओथंबणार्या कवितेतून अजरामर होऊन गेला.. कवितेला कवितेनेच सजवून गेला... सलाम तुम्हाला ग्रेस.. मनापासून सलाम...

**या लेखात आंतरजालावरील काही माहितीचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे लेखाचे संपूर्ण श्रेय माझे नाही!! 

1 comment: