Friday 24 April 2015

मुशाफिर - अच्युत गोडबोले



आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांना लौकिक अर्थाने कदाचित साहित्यिक म्हणता येणार नाही. परंतु त्यांनी लेखन केलेल्या विषयांचा आवाका एवढा प्रचंड आहे कि "आनंदयात्री" या सदरात त्यांचा उल्लेख व्हायलाच हवा.. सोलापूरमधील शाळेपासून आयआयटीपर्यंत प्रवास केलेल्या एका मुशाफिराशी आज आपली गाठ पडणार आहे.. त्यांनी आयुष्याने घेतलेल्या सर्व परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवलं.. अनेक मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये उच्च पदावर काम करून महत्वाच योगदान दिलं! गणित,  मानस-शास्त्र, व्यवस्थापन, संगीत, संगणक, अद्ययावत तंत्रज्ञान, साहित्य अशा अनेक विषयांमध्ये लेखन करून त्यांनी खर्या अर्थाने "आनंदयात्री" या विशेषणाला न्याय दिला आहे.. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. अच्युत गोडबोले!!!
मी त्यांचं वाचलेलं पाहिलं पुस्तक म्हणजे "किमयागार". आपल्याकडे संशोधन हा विषय फार गंभीर आणि जगावेगळा मानला जातो.. आणि म्हणून त्यावर बोलताना किंवा लिहिताना तो विषय बर्याचदा रसहीन होऊन जातो.. मात्र या "किमयागार" मध्ये गोडबोलेंनी जग बदलून टाकणारे अनेक शोध कसे लागले त्यामागे त्या संशोधकाचे किती अथक परिश्रम होते हे सगळ अगदी सहज सध्या पद्धतीने सांगितल आहे.. पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला, ती माणसं, त्यांचे विषय विशेष यांचा तपशीलवार वृत्तांत या पुस्तकात आहे. एकाच व्यक्तीनं लिहिलेली अशी कलाकृती मराठीमध्ये फार क्वचितच असेल. वेगवेगळया विषयांतले किमान चार नावाजलेले लेखक जे लिहू शकतील ते सारं यांनीन एकहाती लिहील आहे.. हे पुस्तक म्हणजे अवैज्ञानिकांसाठी विज्ञान कसं लिहावं, याचा वस्तुपाठ आहे!!! या पुस्तकाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे निसर्गनियम शोधून काढण्यामागची ऊर्मी, संशोधनातील निर्मितीचा आनंद या वैचारिक साहसातील थरार! तो लेखकाला स्वत:ला भिडलेला असल्यामुळे ते लेखन जिवंतपणे वाचकांपर्यंत पोचते... आणि कायमस्वरूपी लक्षात राहत!!
संशोधनानंतर ज्या विषयाचा बागुलबुवा करण्यात आलेला आहे तो म्हणजे गणित!! मुलांना गणित म्हणजे जणूकाही राक्षस वाटावा असा त्या विषयाचा लौकिक आहे.. हेच दूर करण्यासाठी म्हणून कि काय गोडबोलेंनी "गणिती" लिहील.. या मध्ये त्यांनी या विषयाची भीती घालवून त्याची गोडी वाढविली आहे, त्याची मूलतत्त्वं आणि इतिहास अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजावून सांगितला आहे..  या पुस्तकात प्राचीन संस्कृतीपासून गणिताचा वापर कसा सुरू झाला हे तर आहेच, पण त्याचबरोबर आर्यभट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, पायथागोरस, युक्लिड, आर्किमिडीज, न्यूटन, गाऊस, रीमान, ऑयलर, रामानुजन यांच्यासारखे अनेक महान गणितज्ञ देखील आहेत.. या सगळ्यांच्या संघर्षाबद्दल, त्यांच्यातल्या वादविवादांबद्दल, चढाओढीबद्दल आणि आशा-निराशेबद्दल हे पुस्तक एक अनोखं भावविश् उभं करतं. एवढंच नाही, तर अंकगणित, भूमिती, बीजगणित, कॅल्क्युलस, ग्राफ थिअरी, वक्र स्पेस, टोपॉलॉजी, चौथी मिती, नॉन-युक्लिडियन जॉमेट्री, सेट थिअरी, ग्रुप थिअरी, मॅट्रिक्स, तर्कशास्त्र, संभाव्यताशास्त्र, शून्य आणि अनंत अशा अनेक कल्पना हे पुस्तक सोप्या भाषेत समजावूनही सांगतं..
मराठी मध्ये आणखी एक दुर्लक्ष केलेला विषय म्हणजे मानस शास्त्र!! आपल्या इतिहासामध्ये याचा अभ्यास केला गेल्याची नोंद जरूर आहे.. पण जशा अनेक गोष्टी कालौघात लुप्त झाल्या तशीच बर्याच विषयांमधील आपली रुची देखील कमी होऊन गेली.. रामदासांनी आपल्या मनाने कसं वागायला हवं हे त्यालाच सांगत मानस शास्त्राला पुन्हा एकदा रुजवण्याचा प्रयत्न केला.. त्याच मनाच्या श्लोकांमधून प्रेरणा घेऊन गोडबोलेंनी एक अभ्यासपूर्ण पुस्तक लिहील.. त्याच नावच आहे - "मनात".. मन म्हणजे काय, मनाचा शोध घेताना प्रचीन संस्कृतीपासून ते शास्त्रीय शोधांपर्यंत मनाचा प्रवास त्यांनी उलगडून दाखवला आहे. मनाचं गूढ उलगडताना सॉक्रेटिसपासून, ऍरिस्टॉटल, प्लेटो, बुद्ध ते एलिसपर्यंत - एका तत्त्वज्ञानापासून ते संशोधकापर्यंतचा आढावा या पुस्तकात आहे. सोपी, सुलभ, सुटसुटीत वाक्यरचना आणि सर्व प्रकारच्या वाचकांना कळेल अशी ओघवती, खुसखुशीत भाषा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. वाचायला सुरवात करताच आपण त्यात पूर्ण बुडून जातो. पुस्तक हातावेगळं केल्याशिवाय चैन पडत नाही...  मन एक शोध, मेंदू : शोध आणि रचना, फ्रॉईडपर्यंतची वाटचाल, फ्रॉईड आणि युंग, एक्सपरिमेंटल सायकॉलॉजी, बिहेविअरिझम, गेस्टाल्ट सायकॉलॉजी, डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी, सोशल सायकॉलॉजी, ह्युमॅनिस्टिक सायकॉलॉजी, बुद्धी, व्यक्तिमत्त्व, भावना-प्रेरणा, कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी, पर्सेप्शन सायकॉलॉजी, तसंच मनोविकार आणि मानसोपचार अशा 17 भागांतून आणि जवळपास 600 पृष्ठांतून हा खजिना वाचकांसमोर गोडबोले यांनी रिता केला आहे. जवळपास 87 संदर्भग्रंथांच्या संदर्भानं "मनात' हा ग्रंथ समृद्ध झाला आहे.. त्यात केवळ वरवरची आणि साधी सोपी माहिती नाही तर तिच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा शोध घेण्याचा अतिशय गंभीरपणे केलेला यशस्वी प्रवास आहे,ती उत्कटता जाणवल्याशिवाय राहत नाही...
आपल्या आयुष्यात तसं पाहायला गेल तर अर्थ नसेल तर अर्थ नाही!! तरीदेखील अर्थशास्त्र म्हणाल कि लोक जांभया देतात!! शाळेत नागरिक शास्त्र आणि अर्थशास्त्र हे विषय झोप आणण्यासाठीच शिकवले जातात!! अशी ख्याती असणारा हा विषय यांनी मात्र अगदी हसत खेळत मांडला आहे.. "अर्थात" मध्ये अर्थशास्त्राच्या उगमापासून ते वर्तमानकाळपर्यंतचा हा इतिहास आहे. हे पुस्तक अर्थशास्त्राकडे सर्वसमावेशक दृष्टीनं पाहायला शिकवतं. अवघड कल्पना सोप्या उदाहरणांमधून त्यांनी उलगडल्या आहेत. संकल्पना, तात्विक भूमिका, प्रत्यक्ष प्रयोग आणि धोरणं या सर्वांचा सखोल अभ्यास पुस्तकातून केला आहे.. अर्थशास्त्राचं जगाच्या इतिहासाशी, संस्कृतीशी आणि जीवनाशी असलेलं नातंही त्यातून उलगडलं आहे.. सखोल आणि वैचारिक ठेवा वाचकांसमोर रंजक पद्धतीनं खुला करण्याची लेखकाची हातोटी याही पुस्तकामधून पुन्हा एकदा सिद्ध झालेली आहे... 
त्याचं मला आवडलेलं आणखी एक अत्यंत सुंदर पुस्तक म्हणजे "नादवेध"!! अमूर्तातून मिळणारा आनंद शब्दात सांगता येत नाही. अभिजात संगीत असाच अमूर्त आनंद मिळवून देते. या आनंदाला शब्दात पकडण्याचा प्रयत्न सुलभ पिशवीकर आणि अच्युत गोडबोले यांनी या पुस्तकात केला आहे. या नादवेड्या लेखकद्वयीने संगीतात स्वच्छंद मुशाफिरी केली आहे. संगीताच्या मैफली ऐकताना रागाच्या मांडणीतील आणि सुरांचे सौंदर्य त्यांनी शब्दांत पकडले आहे. तरीही रागाच्या तांत्रिक आणि शास्त्रीय बाजूवर भर देता ख्याल, भावगीत, नाट्यगीत, सिनेगीत या सर्वांमधून रागाची कशी ओळख होते, हे सांगण्याचा प्रयत्न पुस्तकात केला गेला आहे..
व्यापास्थापन शास्त्रावर लिहिलेलं बोर्डरूम, इंग्रजी साहित्यिकांच्या खाजगी आणि साहित्यिक आयुष्यावर लिहिलेलं झपूर्झा.. संगणकाच्या नांदीपासून आज जे त्याचं महाकाय(शब्दशः नव्हे तर व्याप्तीनुसार) रूप झाल आहे त्याबद्दल माहिती सांगणार "संगणक युग" किंवा राजाचा रंक आणि परत रंकाचा राजा असं सनसनाटी आयुष्य जगणाऱ्या स्टीव जॉब्स बद्दल असणार "स्टीव जॉब्स" ही सगळी पुस्तक आपल्याला शब्दांनी बांधून घालतात.. गोडबोले स्वतः आपल्याशी समोरासमोर बसून बोलत आहेत अस वाटायला भाग पडतात.. कधीही किंचित सुद्धा 'तोच तो' पणा येत नाही!! सगळ कायम उत्कंठावर्धक आणि नाविन्यपूर्ण असत!!
एकीकडे  बेकारी, गरिबी,जातीव्यवस्था, कॉ. डांगे, चळवळ, झोपडपट्टी तर दुसरीकडे आयबीएम, पटणी, सिंटेल, अमेरिका, चीनी व्यावसायिक अशा अनेक प्रांतांमधून फिरून आलेला हा "मुशाफिर" त्याच्या विचार, बुद्धिमत्ता, उर्जा आणि चिंतनाने सकारात्मक जगण्याचे मंत्र देतो.. आणि सतत काहीतरी नवनवीन वाचायचं बळ देतो!!
*** त्यांच्या लेखनाचे रसग्रहण करणे हा लेखाचा उद्देश नाही तर त्यांच्या साहित्याचा वाचकांना परिचय करून देणे हा आहे..

1 comment: