Thursday 26 March 2015

तो एक राजहंस - मधुसूदन कालेलकर

आज आपलेल्या जे भेटणार आहेत त्यांना लौकिक अर्थाने फक्त कवी अस म्हणता येणार नाही.. कारण त्यांनी लिहिलेल्या कवितेच कायम गीत झाल आहे.. आपण त्यांना ओळखतो ते एक कवी म्हणून नव्हे तर एक चित्रपटगीतकार म्हणून.. अगदी लहान असल्यापासून आपण त्यांच्या गीतांचा आस्वाद घेत आलेलो आहोत.. कधी त्यांनी आई बनून
"निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला बाई
आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही
गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई
परसात वेलीवर झोपल्या जाईजुई
मीट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई
देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई
रित्या पाळण्याची दोरी उरे आज माझ्या हाती
स्वप् एक उधळून गेले माय लेकराची नाती
हुंदका गळ्याशी येता गाऊ कशी मी अंगाई'"
अस म्हणत आपल्याला अंगाई गायली आहे.. तर कधी
" आई, मका
मी तुझा मामा दे मला मुका" अस म्हणत बाराखडी शिकवली आहे..
असे हे हरहुन्नरी कलाकार - मधुसूदन कालेलकर... नुकतीच त्यांची जयंती झाली.. २२ मार्च १९२४ रोजी जन्मलेल्या कालेलकरांच मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण वेंगुर्ले या गावी झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईत वास्तव्य केले. एकंदर तीसच्या वर त्यांची नाटकं प्रदर्शीत झाली. त्यांनी अनेक विषय हाताळले आहेत.. कौटुंबिक, गंभीर, विनोदी आणि सामाजिक सुद्धा... अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, आसावरी, ही वाट दूर जाते, अबोल झालीस कां, कल्पवृक्ष कन्येसाठी, चांदणे शिपीत जा, या घर आपलंच आहे, नाथ हा माझा, डार्लिंग डार्लिंग, हे फुल चंदनाचे, अमृतवेल, शिकार, आणि माधवराव पेशव्यांच्या जीवनावर आधारित ही श्रींची इच्छा ही सर्व त्यांची लोकप्रिय अशी नाटकं. नाटककार, गीतकार ,कथाकार आणि पटकथाकार अशा अनेक रूपांत समर्थपणे वावरणाऱ्या कालेलकरांची आपल्या मनातली छबी ही मात्र एक प्रथितयश गीतकार म्हणून जास्त उल्लेखनीय आहे.. जवळपास प्रत्येक सणासाठी त्यांनी गीते लिहिली आहेत.. आणि ती इतकी लोकप्रिय आहेत कि तो सण आला आणि ते गण ऐकल नाही तर सण साजरा झाला अस वाटतच नाही.. मग ते गाणं
"आली माझ्या घरी ही दिवाळी सप्तरंगात न्हाऊन आली
नक्षत्रांचा साज लेऊनी  रात्र अंगणी आली
दीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली
संगे होता हरी, जाहले बावरी मी अभिसारीका ही निराळी
आली माझ्या घरी ही दिवाळी सप्तरंगात न्हाऊन आली"
हे असो किंवा
"तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता
मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया
देवा सरू दे माझे मीपण, तुझ्या दर्शने उजळो जीवन
नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण
सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगाथा"
हे असो!!!
चित्रपट गीत म्हणलं आणि त्यात प्रेमाची भावना नाही अस होतच नाही.. प्रेम खूप सहज सुंदर आहे त्यामध्ये कळीला फुलांत रुपांतर करण्याची शक्ती आहे.. असंच पाकळी पाकळी उमलत खुलून आलेलं प्रेम अतिशय निरलस असत.. एक आगळाच छंद लाऊन जात.. हेच सगळ सांगताना ते म्हणतात,
"कळी कळी उमलते पाकळी फुलून ये आनंद
आनंदाच्या लहरी वरती जीव नाचतो धुंद
एक अनोखी आली चाहूल, भूमिवरचे सुटले पाऊल
स्वैर भरारे प्राण अंबरे तोडुन सारे बंध
उरी जागते नव संवेदन, कंप सुखाचे अंगाअंगातुन
हृदयाचे राजीव उमलले टपटपतो मकरंद
उगीच लाजते उगीच रुसते, मी माझ्याशी उगीच हसते
कळे बाई काय खुळा हा मला लागला छंद"
असा छंद लागला असताना एकच ध्यास असतो.. माझी भावना त्याला कधी कळणार... जेव्हा कळेल तेव्हा आपली लाडकी व्यक्ती कशी प्रतिक्रिया देईल.. प्रेमाचा स्वीकार होईल कि नाही.. आणि मग तेव्हा कालेलकर मदतीला धावून येतात आणि ती गाऊ लागते..
"सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला लाजणार्या फुलातला ?
जुळता डोळे एका वेळी धीट पापणी झुकली खाली
खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला"
आणि जेव्हा त्याला ही वेडी प्रीत समजते.. त्याच्याही मनात तरंग उमटू लागतात.. प्रेमाची अदलाबदल होते आणि मग तोही तिला कवेत घेऊन गाऊ लागतो..
"सूर तेच छेडीता गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य जे मला हवे
अबोल प्रीत बहरली, कळी हळूच उमलली वेदना सुखावली हासली तुझ्यासवे
एकटा तरी स्मृती तुझ्याच या सभोवती बोललो कसे किती, शब्द शब्द आठवे"
आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून ती गाऊ लागते..
"हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली धरती प्रकाश वेडी ओल्या दंवात न्हाली"
अशी परिपक्व आणि आगळीवेगळी प्रीती बहरल्यानंतर त्याचा सोहळा होणं अतिशय साहजिक आहे.. एकमेकांची भूल पडणं आपल्याला अव्यवहारी वाटल तरी अतिशय सुखावह आहे.. त्यात शत जन्माची नाती जुळली असण्याचा विश्वास आहे.. एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याच वचन आहे... हे सगळ जेव्हा कालेलकर शैलीमध्ये शब्दरूप घेऊन येत तेव्हा आणखीनच रोमांचक होऊन जात..
क्षणात कळली, क्षणात जुळली, भूल कशी पडली ?
"तुझीमाझी प्रीत जगावेगळी
शतजन्माची नाती अपुली बघताबघता अवचित जडली
किमया ही कसली प्रेमिक आपण युगायुगांचे
प्रेमा या ना बंध कुणाचे गाठ तिथे बसली
नाही ठावूक कुठे जायचे तुझ्याच मागून मला यायचे
वाट आता ठरली"
सगळ सुरळीत चालू राहणं नियतीला मान्य नसतं.. आणि म्हणूनच अशा नजर लागू नये अस वाटणाऱ्या प्रेमामध्ये विरह खोडा घालतो.. कळीला तीच फुलांत रुपांतर करणाऱ्या जादूगारापासून दूर घेऊन जातो... आणि मग राहत ते फक्त निर्माल्य...तिच्या आठवणी मध्ये मग तो गाऊ लागतो...
"रसिका गाऊ कोणते गीत ? तीही जाता रुसुनी मजवर, रुसले रे संगीत !
जुळल्या तारा पहिल्या भेटी  राग रंगले जुळता प्रीती
झरे मेघमल्हार लोचनी आठवता ती प्रीत ! तुटल्या तारा, रुसली वीणा
सूर संपले कुठल्या ताना आज बैसलो निर्माल्याला तुजसाठी फुलवीत !"
प्रेमाबद्दल इतक सारं लिहिणाऱ्या कालेलकरांनी आपल्या गीतांमधून जीवनविषयक तत्त्वज्ञानही सांगितल  आहे.. आपण ज्याकरिता संपूर्ण आयुष्य खर्च करत असतो तो अक्षय्य आनंदाचा ठेवा आपल्यामधेच असतो.. अस सांगताना ते म्हणतात...
"तुझे असून तुजपाशी तू जागा चुकलासी
कल्पतरू तो असता दारी वणवण फिरशी का बाजारी
स्वर्ग तुझा तो तव संसारी सुख त्याचे अविनाशी
कस्तुरीमृग तू, तुला कळले सुगंध शोधीत जीवन सरले
घे चाहूल सुख कोठे दडले ? ते तुझिया कर-पाशी"

अशाप्रकारे चित्रपट, नाटक, गीतलेखन या सर्वच आघाडय़ांवर आजही ज्यांच्या कलाकृती कलाप्रेमींच्या मनात अवीट ठसा ज्यांनी उमटवला ते नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर. कालेलकरांचे हे कर्तृत्व पुढील अनेक पिढय़ांनी चिरकाल आठवावे आणि मनामनामध्ये जागवावे, अशीच त्यांची अभिनंदनीय कामगिरी आहे.. आपल्याला निरंतर अनाद देत राहणाऱ्या कालेलकरांना मनाचा मुजरा!!

No comments:

Post a Comment