Thursday 26 March 2015

प्रतिभावान साहित्यिक - गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर

मराठी साहित्यामध्ये असे खूपच कमी कादंबरीकार आहेत ज्यांनी ललित लेखन केलं, प्रवास वर्णनं लिहिली, दुर्ग भ्रमंती केली आणि त्यावर विपुल प्रमाणात लेखनही केलं.. त्यांच्या छायाचित्रांमुळे अनेक गड-किल्ले लोकांपर्यंत पोहोचले... असे हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणजे - गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर अर्थात आप्पा दांडेकर... मराठी रसिकांचे लाडके गोनीदा!!
गोनीदांनी १९४७ मध्ये लेखन रसिकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली... आणि तो प्रवास चालू राहिला १९८२ पर्यंत.. म्हणजे ३५ वर्षांचा सृजनकाळ..!! `बिन्दूची कथाते `तांबडफुटीया त्यांच्या लेखनाच्या प्रदीर्घ प्रवासात मराठी कादंबरीचे क्षेत्र संपन्न आणि समृद्ध होण्यासाठी गोनीदांनी अविरत परिश्रम घेतले..
संस्कारक्षम कथा म्हणाल कि डोळ्यांसमोर येतात ते सानेगुरुजी.. परंतु आपल्या गोनीदांनी देखील त्यांच्या समर्थ लेखणीतून अनेक संस्कारकथा लिहिल्या.. त्याचं संकलन म्हणजे "आईची देणगी" लहान मुला-मुलींबरोबरच मोठ्यांनीही वाचाव्यात अशा या कथा. आईने मुलाला सांगाव्यात किंवा वाचून दाखवाव्यात अशा. आपल्या देशात राम, कृष्णाबरोबरच शिवरायांसारखे पराक्रमी राजे, तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ यांच्यासारखे संत, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे थोर सेनानी होऊन गेले. या थोर व्यक्तींच्या गोष्टी गोनीदांनी रसाळ, ओघवत्या भाषेत सांगितल्या आहेत. या एकूण ४२ कथांमध्ये साहस, पराक्रम, धैर्य, उदात्तता, चातुर्यम गुरुभक्ती, मातृ-पितृभक्ती, कर्तव्यपरायणता आदी गुणांचा समुच्चय दिसून येतो. सुबोध, सुलभ भाषा हे या कथांचं वैशिष्ट्य!! हा उपदेश नाही, तर संवाद आहे!! बोधप्रद प्रेरणा देणाऱ्या या कथा मोठ्यांनाही गुंतवून ठेवतात...
गोनीदांनी विपुल प्रमाणात लेखन केलं!! त्यांच्या प्रतिमेचा आविष्कार जरी साहित्याच्या सर्व प्रकारांत स्वतःचा ठसा उमटविणारा असला तरी ते प्राधान्याने कादंबरीकारच आहेत.. आम्ही शाळेत असताना त्यांची "शितू" वाचलेली.. बेदरकार वृत्तीचा, पण प्रेमळ अंत:करण असलेला विसू.. आणि त्याने बंदुकीतून मारलेली गोळी स्वतःच्या पंज्यातून जाऊनदेखील तक्रार करणारी शितू.. सात्विक वृत्तीची बालविधवा'!! या दोघांच्या विफल प्रीतीची ही करुणोदात्त शोककथा. दोघांचे प्रेममय आंतरजीवन, त्यांचं भावविश्व हाच या कादंबरीचा गाभा आहे. त्यांच्या आर्त, व्याकूळ मनोवस्थांच भावोत्कट चित्र म्हणजे 'ही कादंबरी.. गोनीदांच्या हळुवार लेखणीचा उत्कट प्रत्यय!! ओघवती भाषा.. असीम निरागसता आणि ग्रामीण जीवनाचा रसरसता अविष्कार म्हणजे शितू!! शेवट सुखद कि दुखःद असा विचार वाचावी अशी..  शेवटचा विचार करत बसलो तर तिथे पर्यंत नेण्यासाठी गोनीदांनी जी सुंदर वाट निवडली आहे त्याचं सौंदर्य आपण लुटू शकत नाही... जेव्हा ही कादंबरी देव कुटुंबीयांनी रसिकांसमोर कथाकथनाच्या रूपातून मांडला तेव्हा शितू आणखीनच अर्थगर्भ आणि श्रवणसुंदर अनुभव देणारी ठरली... अशीच अजरामर कथा म्हणजे "जैत रे जैत" नाग्या आणि चिंधी ची गोष्ट!! ठाकर लोकांच्या आयुष्याची गोष्ट.. एकूणच गोनिदांना ग्रामीण जीवनाची ओघ असावी अस वाटत म्हणूनच त्यांनी "रानभुली" लिहिली.. "पवनाकाठचा धोंडी" लिहिली..बदलत्या परिस्थितीच्या पुराबरोबर वाहत जावयाचे नाकारणाऱ्या एका झुंजार माणसाची ही कथा. आपल्या देशात असे अनेक धोंडी इतस्तत: विखुरले आहेत... त्याचं कौतुक करण्यासाठी लिहिलेली ही कथा..
हा माणूस जितका शब्दप्रेमी होता तितकाच दुर्गप्रेमी होता..म्हणूनच दरदर झरत्या पावसांत काकडत्या थंडीत भाजणार्या उन्हांत रात्रीं, दिवसां, पाहाटेंस, सायंकाळी तो किल्ले चढला-उतरला... पांच तपे उलटून गेलीं किल्ल्यागडांचा वेध घेत तो त्यांच्या वाटा तुडवीत राहिला, कधीं आनंदाने थिरकला, कधीं प्रमादाच्या पुराबरोबर वाहात गेला.. गडकिल्यांवर त्याचं असणारं प्रेम त्यांच्या साहित्यात नुसत डोकावत नाही तर त्याचा एक अविभाज्य भाग बनून राहत! "दुर्गदर्शन" मध्ये , 'एका मनस्वी परीभ्रामकाच्या मनावर उठलेली प्रतिबिंबे दिसून येतात.. त्यांनी आणि त्यांच्या दुर्गप्रेमी मित्रांनी मित्रांनीउन्हापावसांचे घाव कसे सोसले याच्या नोंदी आढळतात.. पण म्हणून हे पुस्तक एक फक्त एक प्रवास वर्णन नाही तर त्यांनी केलेल्या दुर्गभ्रमणातील काही दिवसांची अतिशय सुंदर, लालित्यपूर्ण, नजाकतदार वर्णने असणारी ही दैनंदिनी आहे.. दुर्गप्रेमी माणसासाठी रायगड म्हणजे साक्षात गंगाघाट!! त्याबद्दल ते लिहिणार नाहीत अस कस होईल.. अत्यंत रसाळ भाषेत त्यांनी गडाधीराजाच वर्णन केलं आहे.. १९६५ मध्ये लिहिलेल्या या पुस्तकातून मिळणारा आनंद आजही टिकून आहे. रायगडच्या आणि गडावरील बारीक सारीक गोष्टी त्यांच्या लेखनातून दृश्यमान होतात. रायगडाकडे जाणारी वाट, परिसर, शिवपूर्वकालीन रायगड, घेरा आणि तटबंदी, बालेकिल्ला, समाधी, दारूची कोठारे यांच्या तपशीलामुळे रायगड जणू आपल्याशी बोलत आहे अस वाटू लागत.. गोनिदांच दुर्गप्रेम पहायचं असेल तर "दुर्ग भ्रमणगाथा" वाचायलाच हव..हे पुस्तक म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळी किल्ल्यांसाठी गायलेली भैरवीच जणू!!
गोनीदा नर्मदेचे पुत्र!! नर्मदेवर त्यांची भक्ती होती.. परिक्रमा करण्याचा त्यांचा संकल्प देखील होता.. नर्मदेच्या विविध रूपांबद्दल त्यांना मनस्वी आकर्षण होत.. त्यांच्या "नर्मदेच्या तटाकीं आणि दक्षिणवारा" मध्ये ते दिसून येत.. नर्मदेच्या सान्निध्यात राहून लेखकाच्या मनात उमटलेल्या विचारतरंगाचे दर्शन पुस्तकातील नऊ लेखांमधून घडते.. दक्षिणेकडील राज्यांचे सांस्कृतिक दर्शन त्यात घडते. त्याला निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे.. लालित्यपूर्ण, ओघवती, चित्रमय भाषा हे पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे...
कधी त्यांनी "मृण्मयी" मधून मीरेची आरती गायली तर कधी "मोगरा फुलला" मधून ज्ञानेश्वरांना शब्द्वंदना दिली.. त्यांचा लेखनातील विविधता खरोकारच थक्क करणारी आहे!!

या माणसानं बालवयापासूनच प्रचंड जिद्द उरात घेऊन जीवनाच्या धकाधकीत उडी घेतली.. कडूगोड, भीषण भयानक, क्वचित जीवघेण्या अनुभवांच्या आगीत त्याच्या श्रद्धा तावूनसुलाखून निघाल्या. त्याच्यातला माणूस स्वातंत्र्यपूर्व भारतात इंचाइंचाने वाढतच गेला आणि त्यामुळे गोपाल नीलकण्ठ दांडेकर कधी कलंदर वाटला, कधी अवलिया वाटला!! तरीही मूलतः ज्याने स्वतःविषयी खूप काही सांगावे आणि ज्याच्याविषयी तुम्ही-आम्ही खूप काही ऐकावे, असा निखळ, हाडामासाचा, छाती आणि काळीज दोन्ही असलेला, असा माणूस राहिला.. `स्मरणगाथेच्या सहाशे पानांतून या माणसाचे संपन्न व्यक्तिमत्त्व संपूर्णपणे फुलून आलेले आहे... असे हे गोनीदा!! शरीररूपाने नाही परंतु अपर ग्रंथसंपदेच्या माध्यमातून कायम आपल्यासोबत राहणारे प्रतिभावान साहित्यिक!

No comments:

Post a Comment