Thursday 3 October 2019

शेवरीच्या काळजाची पमा आज्जी!


आठवणींचा गोफ कसा बांधला जातो आणि कधी तो अचानक सुटून सगळ्या आठवणी मोकळ्या होतात काssही सांगता येत नाही. काल सुपरमार्केट मध्ये एका बुटक्या, गुटगुटीत, हसऱ्या आजीला पाहिलं आणि पमा आजीची आठवण आली. साडेचार-पाच फुटाची उंची, मूळचा गव्हाळ पण उन्हात राबून रापलेला काळसर वर्ण, कपाळावर गोंदून घेतलेलं भलंमोठ्ठ कुंकू, बसकं नाक, त्यात एक चमकी, पांढरेशुभ्र दात आणि या सगळ्याच्या जोडीला सतत भिरभिरती नजर. पक्ष्याने श्वास घेतला तरी हिच्या नजरेतून ते सुटायचं नाही.
पमा आजीची आणि आमची गाठ पडली ती आम्ही नव्या घरी आलो तेव्हा. नववीत वगैरे असेन मी. आमचा गृहप्रवेश झाला आणि एक पन्नाशीची बाई एका हाताने डोक्यावरचा पदर सावरत शिरा घेऊन हजर. 'तुम्ही आलेले दिसलात, म्हणलं चला, मुहूर्ताला काहीतरी गोड न्यावं. त्यानिमित्ताने ओळख होते.. काय!!' पमा आजी जेव्हा पहिल्यांदा भेटली तेव्हा शेजार आणि सोबत हे समानार्थी शब्द होते. जग फार विस्तारलेलं नव्हतं. बरंच होतं म्हणा एका अर्थी.
पमा आजीची ओळख झाल्यानंतर आजी जवळ नसल्याचा सल बराच कमी झाला. मला आठवतंय, धनत्रयोदशीच्या दिवशी पमा आजी उटणं आणि तेलाची वाटी घेऊन यायची, सकाळी सकाळी. 'पोरींनो, आज बायकांची न्हाणी. चला तेल लावून घ्या पटापट.' म्हणत आमची मालिश करून द्यायची. काय सायीसारखे मऊ हात होते तिचे. एवढं काम करूनही ते इतके मऊ कसे असायचे देवच जाणे. ती म्हणायची, 'पोरींनो, दिवाळी हा असा एकच सण असावा कदाचित ज्यात प्रत्येकाच्या वाटणीला एकेक दिवस आहे. काल गरीब गाईचा झाला, आज आपला आहे.' पमा आजीमुळं आईला सासरीच एक माहेर मिळालं होतं. आम्हा बहिणींना मालिश करून दिलं कि ती आम्हाला खोलीच्या बाहेर काढायची. 'सुधा, चल गं. वर्षभर राबतो आपण आजचा दिवस लाड करून घेऊ.' म्हणत आईलासुद्धा मालिश करून द्यायची. नवीन घरी पहिल्या दिवाळीला हे झालं तेव्हा आईला रडू आवरलं नव्हतं. पमा आजी जे काही बोलायची त्यामागे कुठेतरी, काहीतरी खुपतंय हे आम्हाला जाणवायचं पण काय ते विचारायची कधी हिम्मत व्हायची नाही.
मध्यंतरी, मी बारावीत असताना आमच्या कामवाल्या मावशीने पमा आजीची थोडीफार माहिती आम्हाला सांगितली होती. 'बाई फार धीराची. नवरा कामासाठी म्हणून कायम दुसऱ्या गावी असायचा. शनिवार-रविवार यायचा इकडे. नवरा नाही त्यामुळं सासूने मन भरेपर्यंत सासुरवास लावला तिच्यामागे. पमाचा नवरा घरापासून लांब होता, घरवालीपासून नाही. या एकाच कारणासाठी पमा सगळं सहन करायची. चौकाच्या तोंडावर तिचं किराणामालाचं छोटं दुकान होतं. दिवसभर ती तिकडे राबायची. रात्र व्हायला लागली कि बापे यायचे दारू ढोसून. त्यांना बाईच्या स्पर्शाची भूक असायची. दोन चार चाकलेटं घेऊन हात लावता आला तर बरंच म्हणून ते संधी शोधायचे. पमा गपगुमानं काम करायची. एकदा एकानं जास्तच सलगी करायचा प्रयत्न केला तेव्हा समोर जो होता तो डबा त्याच्या डोक्यावर उलटा करून आरडाओरडा केला तिनं. तेव्हा बाईच्या अब्रूची किंमत होती समाजात. लोक आले धावत आणि त्या बाप्याला बेदम मारलं त्यांनी. तेव्हापासून पमाच्या वाट्याला कोणी गेलं नाही. दुकान आणि घर सांभाळत पमानं पोराला शिकवलं, साहेब बनवलं. संतोष कितीदा बोलावतो हिला नगरला, पण ही जात नाही. म्हणते, 'नवरा कधी नव्हे ते बरोबर आहे राहायला, सासुरवाससुद्धा संपलाय. तुम्ही पोरं राहा सुखानं.' सासू-सुनेचं दुष्टचक्र तोडलं हिनं म्हणून सूनसुद्धा फार प्रेमाने वागते हिच्याशी.'
पुढे मी शिक्षणासाठी म्हणून घर सोडलं आणि पमा आजीचा व माझा संबंध फक्त जेव्हा घरी जाईन तेव्हाच यायला लागला. तिची आठवण मात्र कायम यायची. खास करून पौर्णिमेचा चंद्र बघताना. नवीन घरांत गेल्यावर काही महिन्यातच गावात लोडशेडींग सुरु झालं. अशाच एका पौर्णिमेला गावात दिवे नव्हते, चंद्र नुकता उगवत होता, चांदणं पसरायला सुरुवात झालेली. पमा आजी आली आणि सगळ्यांना अंगणात घेऊन गेली. 'पोरींनो, पौर्णिमेचं, पहिल्या पावसाचं, पानगळीचं आणि तान्ह्या बाळाचं सौंदर्य न बघण्याचं पाप करू नका.' पाप-पुण्याच्या तिच्या कल्पना फारच वेगळ्या होत्या. ती दृष्ट काढायची, मन शांत व्हावं म्हणून स्तोत्र म्हणायची, तुळशीला नमस्कार करायची पण तिने कधी भरमसाठ उपास तापास करून स्वतःला त्रास करून घेतला नाही, मारुतीला, शनीला तेल वाहिलं नाही की कुठे दुधाचा अभिषेक केला नाही. तिच्या घरात आलेल्या कोणालाही उपाशी पोटी मात्र कधीच झोपू दिलं नाही.
पमा आजी आणि आजोबा पत्ते खेळायचे. कोणी आलं साथीला तर त्याला घेऊन नाहीतर दोघंच. २४ तास कमी पडतील असं काम करून थकलेले जीव ते. आता २४ तास खायला उठायचे त्यांना. मग रम्मी, अठ्ठीडाव, डमी खेळाडू घेऊन लॅडीस वगैरे वगैरे.. आम्ही गेलो कि हक्काने आमच्याबरोबर चॅलेंज खेळायचे. आजोबांची जीत ठरलेली. 'जन्मभर खरं बोलला नाहीत. जिंकणारच कि चॅलेंजमध्ये..' हे आजीचे टोमणेही ठरलेले असायचे. एकदा या ठरलेल्या संवादात अचानक आजोबा म्हणाले, 'थांब, आज खरं सांगतो.. 'मला फार आवडतेस तू..'' आजीला कुठं तोंड लपवू असं झालेलं..
मध्ये घरी गेले तेव्हा आई म्हणाली, 'राजा राणीचा डाव अर्ध्यावरतीच मोडला. भातुकलीच्या खेळात राणी गेली, इथे राजा सोडून गेला..' मला फार वाईट वाटलं. आयुष्यभर मधू इथे अन चंद्र तिथे असं जगलेलं जोडपं. 'चालायचं गं, त्याच्यापुढे आपलं काही चालत नसतं..' पमा आजी मलाच समजावत होती. 'आता मी ना, संतोषकडे जावं म्हणते. तो बोलावतोय कधीपासून. तिकडे जाईन, पुस्तकं वाचेन, बागकाम करेन पण इथे नाही राहू शकत. हे घर, हे अंगण, हा पत्त्यांचा कॅट खायला उठेल मला. मला भेटायला येशील ना नगरला?' फार फार आतून भरून आलं मला.
पमा आजी नगरला गेली आणि आमच्या गप्पा फोनवर सुरु झाल्या. विषय तेच. पण माझी फिरकी घ्यायला, मला 'मग, कधी करताय लग्न?' म्हणून त्रास देण्यात तिला मजा यायची. यथावकाश माझं लग्न ठरलं आणि तिला पत्रिका द्यायला मी नगरला गेले. नमस्कार करताना म्हणलं, 'आजी नक्की यायचंय लग्नाला.. तुझ्या लेकीची लेक आहे मी.' कधी नव्हे ते फार शांत आवाजात ती म्हणाली, 'पोरी, वय झालं माझं. आत्ता इथे गाठ पडली. लग्नाचं काही सांगता येत नाही बघ.' तेव्हा हा निरोप शेवटचाच असू शकतो हे जाणवलं आणि माझेच डोळे भरून आले. ते बघून पमा आजी म्हणाली, 'अगं, वेडी का काय, तुझ्या लेकीला न्हाऊ-माखू घातल्याशिवाय कुठे जात नाही मी.' सुदैवाने पमा आजी लग्नाला आली आणि मला हायसं वाटलं. तिने आम्हाला मनापासून आशीर्वाद दिला. आणि नवऱ्याला म्हणाली, 'जावईबापू,' मध्येच माझ्याकडे बघत, 'हसू नको गं, ज्याचा मान त्याला द्यायलाच हवा..' तर जावईबापू, जरा आगाऊ आहे, पण पोरगी गुणी आहे. संसार चांगला करील. फक्त घरात उंचावर काही ठेवणार असाल तर आधीच एक-दोन स्टूल्स आणून ठेवा. पोरीची साथ मात्र कधी कधी सोडू नका. सुखाने नांदा!
आज तीन वर्षं झाली पमा आजीला भेटून. सुदैवाने, तिच्या घरचा गंगाजलाचा गडू सीलबंदच आहे. तिची आणि माझी आता कधी गाठ पडेल देवच जाणे. देवसुद्धा अशा माणसाच्या फार कमी आवृत्त्या काढतो, लोकांना उगाच गोडाचं अजीर्ण नको व्हायला!
-तन्मया

No comments:

Post a Comment