Thursday 3 October 2019

आईचं माहेरपण!


मी माझ्या आईला तिच्या माहेरी जाऊन निवांत राहिलेलं कधी पाहिलंच नाही. ती गेलीच नाही कधी. त्यामुळं आपण मोठं झालो कि आईला जरा विश्रांती द्यायची हे खूप आधीपासून मनात होतं. पण... आम्ही मोठे झालो आणि घराबाहेर पडलो. कधी काळी सुट्टीसाठी घरी गेलो कि तिला विश्रांती मिळण्याऐवजी दुप्पट काम लागायचं. आमच्या आवडीचे पदार्थ खायला घालणं, सामानाची उस्तवार करणं, चटणी, लोणची आणि असाच सटरफटर काहीतरी बांधून देणं यातच तिचा वेळ निघून जायचा. नंतर जेव्हा स्वयंपाक करायला लागले तेव्हा मी घरी पोहोचायच्या आधी 'तिकडे नेताना दाण्याचं कूट, मसाले, मेतकूट, वेगवेगळी पीठं हवी आहेत' म्हणून लिस्ट आईकडे पोहोचती झालेली असायची. आमच्या तेव्हाच्या लुटुपुटुच्या संसाराची चालिका होऊन तिने हे सगळं केलं. आता लग्न झाल्यावर तरी आईला जरा विश्रांती मिळेल असं काहीतरी करायला हवं असं वाटलं आणि मग 'आईचं माहेरपण' करायचं ठरवलं..
'लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते' असंच ऐकत मोठे झालो आपण. त्यामुळं 'आईचं माहेरपण' हे ऐकायला जरा विचित्र वाटतं. पण आपल्याकडे म्हणजे सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात, बाईची आई होते आणि माहेरची ओढ तितकीच तीव्र असूनही तिकडे जाणं होत नाही. आज काय मुलांचं आजारपण, उद्या काय परीक्षा आणि हे काहीच नसेल तर 'मी गेले तर घरातल्या लोकांच्या खायचं प्यायचं काय?' हा विचार हळू हळू तिच्यापासून तिच्या हक्काची 'माहेरची विश्रांती हिरावून घ्यायला लागतो..' मुलं मोठी होतात आणि मग एकूणच एक अलिप्तपणा येतो. कदाचित ज्या मायेच्या माणसांमुळे माहेर हे 'माहेर' असतं ती माणसं काळाच्या पडद्याआड गेलेली असतात आणि मग माहेर पूर्वीसारखं वाटत नाही. एकूणच काय तर 'माहेरी जाणं' थांबून जातं किंवा पाहुण्यासारखं भोज्याला शिवून येण्याइतपत उरतं. माहेराकडून तिच्या काही फार अपेक्षा नसतात. चार घास मायेने आयते मिळावेत, कोणीतरी केसाला तेल लावून चंपी करून द्यावी, खूप गप्पा मारता याव्यात, लहानपणी आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपता यायचं तसं कोणीतरी असावं आणि 'खूप दमलीस तू सगळ्यांचं करून. आता बस जरा. मी आहे..' असं म्हणणारं कोणीतरी असावं. एवढंच तिला वाटत असतं..
आयता चहा मिळाला तरी सुखी होणारी आई. तिच्यासाठी एवढं तर नक्कीच करू शकतो आपण. आणि हे सगळं करायला मातृदिनच हवा असं काही नाही बरं का!!

No comments:

Post a Comment