Thursday 3 October 2019

मेरा वो सामान लौटा दो!!!


त्यांचं लग्न होऊन साधारण सहा महिने झाले असतील. लग्नाआधी दोघांच्या नोकऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी होत्या त्यामुळे ती जुळवाजुळव करून एका शहरात राहण्यासाठी त्यांना सहा महिने लागलेच. तरी कमीच म्हणायचे. तसं बघता लग्नाच्या आधीपासून ते दोघे ओळखायचे एकमेकांना, पण जोडीदार म्हणून राहताना कळू लागलेल्या एकमेकांच्या अनेक सवयींशी जुळवून घेणं नवीन होतं. 'तू असा/अशी आहेस' असे साक्षात्कार बऱ्याचदा होत होते.
आधी लग्न, मग हनीमून, नंतर ही उस्तवार या सगळ्यांत तिला माहेरी जायला जमलंच नव्हतं. असंच एकदिवस तिला एक लॉन्ग वीकएंड जवळ आलेला जाणवला. आजुबाजुचे लोक घरी जायचं प्लांनिंग करू लागले आणि तिने माहेरी जायचं ठरवलं. आधी जे घर होतं ते एका क्षणात माहेर झालेलं. 'मुलांचं हे असं होत नाही. लग्न झाल्यावर मुलांच्या आयुष्यात ज्या अनेक गोष्टी तशाच राहतात त्यातली ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट. असो.....' असा विचार करतच तिने घरी फोन लावला. 'आई, सोमवारी सुट्टी आहे. मी येऊ का गं घरी? एकटीच येईन. त्याला काम आहे त्यामुळं तो नाही येऊ शकणार'. आई म्हणाली, 'तुझंच घर आहे राणी. कधीही ये.' तेव्हढ्यानेसुद्धा हिचे डोळे पाणावले. आवाज जड झाला. आईच ती. तिला लगेच कळलं. लगेच विषय बदलत ती म्हणाली, 'आल्यावर गव्हाचा चीक करू हा.' पुढे मग गप्पांचे अनेक रूळ बदलत तो कॉल सुरूच राहिला.
एकदाचा तो लॉन्ग वीकएंड आला आणि ती घरी आली. माहेरवाशीण म्हणून नाही तर त्या घरची मुलगी म्हणून. लग्नाच्या धांदलीत आणि नंतरही आई-बाबांशी निवांत गप्पा झाल्याच नव्हत्या तिच्या. त्यामुळं गप्पांना, हसण्या-खिदळण्याला ऊत आलेला. दोन दिवस कसे गेले कोणालाच कळलं नाही. उद्या आता परत जायचं. परत मोठठं होऊन वागायचं त्याआधी आईच्या मांडीवर डोकं ठेवून तिने स्वतःचे लाड करून घेतले. आणि झोपायला स्वतःच्या खोलीत आली. अजून घरात सून आली नसल्याने ती रूम तिचीच राहिली होती. अनेक आठवणींनी मनात पिंगा घालायला सुरुवात केलेलीच होती. रूमच्या भिंतींवरून ती हळुवारपणे हात फिरवत होती. उगाचच एखादं कपाट उघडून, जुना ड्रेस घालून बघत होती. कधी काळची प्रशस्तीपत्रकं घेऊन एकटीच हसत होती. पुस्तकांच्या कपाटावरून तर तिची नजर हटता हटेना. बऱ्याच वेळाने ती पलंगावर येऊन पडली. पुढे तिची उशी कधी भिजली, कधी डोळा लागला हे तिचं तिलाच कळलं नाही. दुसऱ्यादिवशी जायची वेळ आली तशी आई-बाबांना नमस्कार करून ती निघाली. भावाच्या पाठीत गुद्दा घालताना उगाचच तिचे डोळे पाणावले.
ती स्वतःच्या घरी आली आणि दोन घटकेचं माहेरपण विसरूनही गेली. काही दिवसांनी तिला भावाचा फोन आला. 'ताई, तुझी रूम रिकामी करायची आहे. तुझं काय हवं नको ते सामान घेऊन जाशील? हवं तर मी पाठवून देतो. तुझ्याकडे राहिलं तर नीट राहील..' दोन मिनिटं तिला काय बोलावं सुचेनाच..
भरल्या आवाजात ती 'हो' म्हणाली. तिच्या डोक्यात मात्र आशाताई गात होत्या.......
'गीला मन शायद बिस्तरके पास पडा हो.. वो भिजवादो.....
मेरा वो सामान लौटा दो.. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है...'
-
तन्मया (२१/०६/१७)


No comments:

Post a Comment