Thursday 3 October 2019

विरणाऱ्या नात्याची कविता!


दोघं भेटतात.. त्यांचं मैत्र जडतं.. आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या जातात.. मनात अगदी खोलवर असलेल्या गोष्टींची देवाणघेवाण होते.. आणि अचानक काहीतरी बिनसलं आहे असं वाटतं.. म्हणजे खटके उडून भांडणं होतात असं नाही पण कुठेतरी काहीतरी चुकतंय असं दोघांनाही जाणवतं.. विरु पाहणारं वस्त्र असतं ना तसं.. ते फाटलेलं नसतं पण त्यात कुठलीही गोष्ट धरून ठेवण्याची ताकदच नसते.. तरीही ते वस्त्र टाकवत नाही.. अशावेळेस मग सुरू होते ती असलं-नसलं नातं टिकवण्याची जीवघेणी धडपड..
दोघं भेटायचं ठरवतात.. भेटतात.. आणि त्यांच्या लक्षात येतं, आपल्याकडे बोलण्यासारखं काही राहिलंच नाहीये.. हे 'शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले' असं नाहीये तर एक रितेपणा आहे.. ज्या व्यक्तीशी बोलताना विषयांची जरूरही नव्हती त्या व्यक्तीच्या डोळ्याला डोळा भिडवता येत नाहीये.. मग कधी एकदा इथून बाहेर पडू याची असोशीने वाट पाहिली जाते.. आणि जेव्हा वाटा वेगळ्या होतात तेव्हा जाणवतं.. अजून एक प्रयत्न व्हायला हवा.. नातं टिकवण्यासाठी आणखी एकदा भेटायला हवं..
खरंतर त्या दोघांत जे होतं ते आता नाहीये हे दोघांनाही जेव्हा जाणवतं तेव्हा निमूटपणे बाजूला झालं तर दोघंही सुखी होतात.
"We love each other. But we do it better when are not together.. "
असं म्हणून बाजूला जाणं श्रेयस्कर असलं तरी तो क्षण कोणता असतो हे समजणं फार कठीण आहे.. ज्याला ते जमतं तो या नात्यांच्या गुंत्यात अडकत नाही.. निसटतं पकडून ठेवण्याची वृथा धडपड करत नाही.. असे क्षण माणसाला प्रौढ बनवतात हे मात्र खरं.. त्या क्षणांसाठी ही कविता...
बोलायला निवांत काही हॉटेलामध्ये शिरलो आपण..
आणि कुठल्या उत्साहाने मागावलेही पदार्थ खच्चून...
बोलावे तो तशी नेमकी जाणीव झाली..
कशी विसंगत..
नव्हते काहीच बोलायला..
डोळे होते डोळा चुकवीत...
न्याहाळीत मी जपानी तरुणी..
तूही काढली नोट खिशातून..
अर्धा कपही चहा न सरला..
निमुटपणाने उठलो तेथून...
नकळत वळली दूर पावले..
कशातून तरी सुटलो वाटुनि...
नकळत वळले बाजूस डोळे..
परतायची ओढ लागुनि...
-इंदिरा संत!!


No comments:

Post a Comment