Thursday 3 October 2019

गोऱ्या रंगाची काळी जादू!


लग्न झालं आणि पडद्यामागच्या अनेक गोष्टी ऐकू यायला लागल्या.
'हिने चांगला गोरागोमटा जावई पटकावलाय.'
'लव्ह मॅरेज होतं म्हणूनच तिला एवढा गोरा नवरा मिळाला.'
'एवढा गोरा आणि उंच जावई कुठे शोधलास गं, मला पण सांग, माझ्या भाची/पुतणीसाठी स्थळ बघणं सुरु आहे?'
त्या सगळ्यांचा होरा एकच होता, 'ती सावळी आणि बुटकी' असूनही तिला वरचढ(?) नवरा कसा काय मिळाला.
लग्नाच्याआधी दोन एक वर्षांपूर्वी आईला एकीने सांगितलं होतं, 'बघ हा, ती काळी आहे, बुटकी असल्याने आणखी जाड दिसते. लग्नाचं बघायला लाग. अशा मुलींचं लग्न ठरला वेळ लागतो.' शब्दाने शब्द वाढतो म्हणून आई काही बोलली नाही तेव्हा.
लग्नाच्या वेळेस अनेक जणींनी मला विचारलं 'ब्लिच कर. गोरी दिसशील.'
आईला सुद्धा तिच्या लग्नात नवरा किती गोरा, देखणा आहे आणि मुलगी त्याच्या मानाने डावीच आहे हे अनेकांनी ऐकवलं होतं..
मला प्रश्न पडतो 'रंग आणि उंची तथाकथित प्रमाणात नसेल तर व्यक्तीची गुणवत्ता कमी असत नाही.' ही एवढी साधी गोष्ट लोकांना का समजत नाही? अजूनही आपल्याला जी गोऱ्या रंगाची भूल चढलेली आहे ती का उतरत नाही? गोरं आणि उंच असणं म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता झाली ही समजूत अजूनही का जात नाही?
माझ्या लहानपणी एक गौळण लागायची रेडिओवर
'गोराही म्हणतो गोरी पाहिजे, काळाही म्हणतो गोरी.. आता तुमीच सांगा पाव्हणं कुठं जातील काळ्या पोरी....' आज इतकी वर्ष झाली तरी परिस्थिती तशीच आहे.
मध्ये एक नवीन प्रकार सुरु झालेला.
एखाद्या काळ्या रंगाच्या, फारशा सुबक नसणाऱ्या बाईच्या फोटोखाली 'शादी करुंगी तो अंकितसे. टॅग अंकित फॉर हर'
आणि एखादी गोरी गोमटी, आकर्षक बाई असेल तर 'राखी बांधुगी तो सुमितको, टॅग सुमित फॉर हर' हे उलट होत नाही. आपल्या डोक्यातून गोरं म्हणजे श्रेष्ठ, दुष्प्राप्य आणि काळं म्हणजे कनिष्ठ सहजसाध्य ही भावना जातच नाही.
माझी एक मैत्रीण आहे. सुंदर, निरोगी केस, प्रसन्न चेहरा आणि निरागस हसू यामुळं ती खरंच खूप छान दिसते. पण... हा पण येतो तो तिच्या रंगामुळे. आजवर अनेकदा गम्मत म्हणून असेल किंवा मुद्दाम असेल तिच्या रंगांची प्रचंड चेष्टा होत आलेली आहे. वाईट वाटतं तिला पण किती वेळा आणि मुख्य म्हणजे कोणाकोणाची तोंडं बंद करणार.
या पार्श्वभूमीवर मला माझे बाबा फार खमके वाटतात. मध्यंतरी कोणीतरी त्यांना आमच्यासमोर विचारलं, 'तुझ्या मुली सावळ्या आहेत. उठून दिसणार नाहीत त्या.' बाबांनी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले, 'माझ्या मुली सुंदर आहेत. उठून दिसण्यासाठी त्यांना गोऱ्या रंगाची गरज नाही.' ही इतकी साधी गोष्ट समजायला इतकी कठीण आहे का? बाबा 'माझ्या मुली सुंदर आहेत' हे इतक्या ठामपणाने म्हणाले की समोरचा माणूस गप्पच झाला.
कोणी USA, UK किंवा तत्सम प्रदेशात जाऊन आला/आली की आपण कौतुकभरल्या नजरेने म्हणतो, 'वॉव, किती गोरा/गोरी झाला/झाली आहेस. मस्तच!!' आणि कोणी उष्ण प्रदेशात फिरून आला की, 'शी.. किती टॅन झाला/झाली आहेस..' गोरं म्हणजे वॉव आणि काळं म्हणजे शी.. कोणी ठरवलं हे. आणि अजूनही का पाळतो आपण ते??
बायका गर्भवती राहिल्या की आईकडे येतात. 'गर्भसंस्कारांमुळे माझं बाळ गोरं कसं होईल ते सांगा' हे विचारायला. वास्तविक बाळ निरोगी, सुदृढ, तजेलदार त्वचेचं असणं जास्त महत्वाचं आहे. पण हे त्या कुटुंबियांच्या खिजगणतीत नसतं. त्यांना गोरं बाळ त्यातही मुलगा हवा असतो.
फेअर अँड लव्हली नंतर फेअर अँड हँडसम आलं, तशीच असंख्य क्रीम्स आली. त्यांचा खप प्रचंड आहे. त्याने काहीही फरक पडत नाही हे माहित असूनही.
आम्हाला विचारी व्हायचं नाहीये, आम्हाला फक्त गोरं व्हायचंय. आपल्या त्वचेचा रंग आपल्याच फायद्यासाठी आहे ही गोष्ट अनेकांनी अनेकवेळा सांगूनही आम्हाला कळत नाही. आम्ही उघडपणे वर्णद्वेष दाखवणाऱ्या परदेशी लोकांना नावं ठेवतो. पण प्रत्यक्षात मात्र तेच करत असतो आणि त्याची आम्हाला जराही लाज वाटत नाही. अर्थार्थी गुलामगिरी गेली आहे फक्त. वैचारिक गुलामगिरी कधी जाणार काय माहित...
P.S. - मला माझ्या रंगामुळे अज्जिबात न्यूनगंड वाटत नाही. वाटणरही नाही. मानसिकतेची चीड़ आली म्हणून पोस्ट लिहिली!!

No comments:

Post a Comment