Thursday 3 October 2019

अस्तु!!!


कालच अस्तु पाहिला. बरेच दिवस पाहायचा होता पण मुहूर्त लागत नव्हता.
अस्तु.. सो बी इट. आपल्या मराठीत असो!!
अस्तु पाहिला आणि आयुष्यभर 'अस्तु'च्या चालीवर जगलेले अण्णा आठवले. त्यांना स्मृतीभंश नव्हता. पण ते कायम वर्तमानात जगले म्हणून आठवले.
अण्णा परांजपे. त्यांना साऱ्या जगाने ओळखावं एवढं मोठं नाव असण्याचं काहीच कारण नव्हतं. अण्णांच्या हाताखालून गेलेली मुलं गणितं करताना कॅल्क्युलेटर वापरत नाहीत हीच काय ती त्यांची ख्याती. त्याला कारणही तसंच होतं म्हणा. गावात असलेल्या एकमेव शाळेत छत्तीस वर्ष गणित शिकवलं त्यांनी. वैदिक गणितापासून अबॅकसपर्यंत सगळं. अण्णांच्या वर्गात पोराला घातलं की तीसापर्यंत पाढे, वर्ग, घन, वर्गमुळं, प्रमेयं, क्लृप्त्या, सूत्रं वगैरे सगळं सगळं पोरांना येतं हे अख्या गावाला माहित होतं. त्याकाळी गावात मॅथ्स ऑलिम्पियाडचा एवढा बोलबाला नव्हता नाहीतर अण्णांची खास अकादमी निघाली असती.
मुलं सहावीत गेली की खास हुशार मुलांची म्हणून एक स्कॉलर बॅच काढली जायची शाळेत. सातवीच्या स्कॉलरशिपची तयारी म्हणून. 'अनलर्न अँड रिलर्न' वगैरे प्रकार आमच्या लहानपणी नव्हते. विषय शिकवतानाच त्याचा पाया पक्का केला जायचा. पावकी, दिडकीचा जमाना गेलेला. पण पाढे होते. त्या अखंड चौकोनांच्या वहीत दोन ते तीस पाढे लिहिले नाहीत म्हणून कित्येक मुलामुलींना वर्गाबाहेर जावं लागलेलं आहे. चुकीला माफी नाही हे तत्व होतं. फक्त अण्णांचं नाही तर त्या पिढीचंच. पालकदेखील मुलाच्या अभ्यासात 'पोरगं यत्ता पुढं जात आहे ना म्हणजे बरं चालू आहे' इतपतच लक्ष देणारे होते. तेव्हचा काळच तसा होता म्हणा.
तर, त्या खास स्कॉलर बॅचला पंढरीनाथ राण्यांचं क्लृप्त्या आणि सूत्रे घेऊन अण्णा वर्गात यायचे. वास्तविक ते सगळं पुस्तक त्यांना पाठ होतं. त्यामुळं केवळ आम्हाला गरज लागली तर नाव सांगता यावं यासाठीच ते आणलेलं असावं असंच आम्हाला वाटायचं. अण्णा शिकवायचे मात्र फार छान, मृदू आवाजात. एखाद्याच्या ऋजुतेचासुद्धा धाक असतो. म्हणजे असायचा. तसं होतं अण्णांचं. त्यांचा शांतपणा हीच त्यांची सगळ्यांत मोठी ताकद होती. ते शिकवायला लागले की पंचेचाळीस मिनिटांची तासिका कधी संपायची ते समजायचंच नाही. त्यामुळं इतरांना सगळीकडे गळके हौद, भिंत चढता न येणाऱ्या पाली आणि कामचुकार मजूर दिसत असायचे आणि आम्ही मात्र इतक्या मुद्दलाची, इतक्या टक्के दराने किती वर्षात दामदुप्पट होईल हे चुटकीसरशी सांगायचो. अण्णांमुळेच पुढे अकाउंटला त्रास झाला नाही. त्यांचे कितीतरी विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात CA झाले. अण्णांचा घोकंपट्टीवर विश्वास नव्हता. मुलांना समजेपर्यंत ते वेगवेगळ्या पद्धतीने समजवायचे. आणि मग जे समजलंय ते लिहायला सांगायचे. मध्येच एखाद्याला, 'पाठक, काय लिहिलंय ते जरा वर्गाला सांगा बरं..' म्हणत सामूहिक उजळणी करून घ्यायचे. ते म्हणायचे, 'तर्जनी आणि अंगठ्यात पेन/पेन्सिल/खडू काहीही धरून तुम्ही एखादी गोष्ट गिरवलीत की ती मेंदूत फिट्ट बसते.' परवा एका शोधनिबंधात 'सर्वेक्षणाअंती' निघालेला हाच निष्कर्ष वाचला आणि अण्णांची शिकवण्याची पद्धत अत्यंत योग्य होती याची खात्री पटली.
अण्णांनी या शिक्षण कार्याला आयुष्य वाहून घेतलेलं. त्यांनी माझ्या आत्याला शिकवलं, बाबांना शिकवलं आणि मलाही शिकवलं. बाबांनी नाटकात वगैरे काम केलेलं होतं. ते कदाचित अण्णांना आवडलं नसावं. त्यामुळंच की काय 'त्या नाटकवाल्या वासूची ना गं तू..' असं म्हणतच आमची ओळख झाली. अत्यंत साधे राहायचे अण्णा, त्यांच्या स्वभावाला साजेसं. स्वच्छ, पांढराशुभ्र शर्ट, करड्या रंगाची पॅन्ट, काळ्या रंगाचा जाड फ्रेमचा चष्मा, बारीक कापलेले केस आणि पायात चामड्याच्या चपला. बाबांनी त्यांचं जसं वर्णन केलं होतं तसेच ते होते. बाबांच्या वेळेस सायकलने शाळेत यायचे, आमच्यावेळेस लुना आली हाच काय तो फरक.
आम्ही शाळा सोडली, काही वर्षातच मुलांच्या ज्ञानार्जनाचा उत्साह कमी झाला आणि शाळेच्या ध्येयामध्ये अर्थार्जनाचा नंबर वर लागायला लागला. तेव्हा मात्र अण्णांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि अत्यंत माफक दरात मुलांसाठी शिकवण्या सुरु केल्या. मला आठवतंय, कित्येक वर्षं अण्णांनी एखाद्या गरीब मुलाला स्वतःच्या घरी ठेवून घेतलेलं. त्याचं सगळं शिक्षण होईपर्यंत. ते म्हणायचे, 'या समाजाचं फार मोठं देणं लागतो आपण. जितक्या पद्धतीने ते चुकवता येईल तेवढं चांगलं!' अण्णा कायम वर्तमानात जगायचे. कोणी त्रास दिला तरी वैषम्य नाही, नातेवाईकांनी लुबाडलं तरी त्रागा नाही. खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञ. त्यांच्या या मानसिकतेची बऱ्याचदा चेष्टा व्हायची. 'स्वतःच्या मुलांना खायची भ्रांत असताना हे विकतचं दुखणं कशाला हवंय म्हणून..' पण करत असलेल्या पुण्याची कुठेतरी नोंद होतं असावी. म्हणूनच आज त्यांच्या दोन्ही मुलांचे सांसार उत्तमरीतीने सुरु आहेत. अत्यंत गुणी सुना आहेत. तीन संसार तीन घरात पण एकाच कुटुंबात सुरु आहेत.
माझी शाळा संपून इतकी वर्षं झाली पण अजूनही गावी गेलं की अण्णांची भेट घेतल्याशिवाय मन भरत नाही. त्यांचा तो हळुवार आवाज, शांत डोळे आणि एकूणच समतोल देहबोली आश्वस्त करतात. त्याच्याकडचा तो तासभर पुढच्या भेटीपर्यंत पुरतो.
मध्ये एकदा गेलेले त्यांच्याकडे तेव्हा ते TV बघत होते. Byju's learning Appची जाहिरात लागलेली. मला बघून TV बंद करत अण्णा म्हणाले, 'बघितलंस, काय काय तंत्रज्ञान आहे. चांगलंच आहे म्हणा. पण फक्त हातचा चुकला म्हणून रडणाऱ्या पोरांना समजवायला जमलं की झालं..' माझेच डोळे पाणावले. जराजीर्ण नाही पण वार्धक्याकडे झुकणाऱ्या त्या हाडाच्या शिक्षकाला बघताना मला अभिमानही वाटत होता आणि वाईटही वाटत होतं.
अण्णांची आणि माझी आता वीसेक वर्षांची ओळख. त्यांची स्वतःपुरती एक जनरीत आहे असं मला कायम वाटत आलेलं आहे. कोणी गेलं म्हणून अण्णांनी कधी फार शोक केल्याचं आठवत नाही. ते म्हणायचे, 'येणारा जीव, जाणारच. गेला तो. त्याचा झाला भूतकाळ. येणारा जीव भविष्य घेऊन येत असतो त्याचं कौतुक करायला हवं.' मुलगी जन्माला आली तर त्यांना विशेष आनंद व्हायचा. ते म्हणायचे, 'विश्वाची कूस आहे मुलगी म्हणजे. मुलगा पोशिंदा म्हणता तर मुलगी पालनकर्ता आहे. असा विचार सगळ्यांनी केला तर काय बहार येईल.. अस्तु!!!!'
हा एक अस्तु ह्या एवढ्या आठवणींना घेऊन आला. आता पुन्हा जाईन तेव्हा इराची आणि अण्णांची गाठ घालून द्यायला हवी. तिला भेटल्यावरसुद्धा अण्णा म्हणतील, 'त्या नाटकवाल्या वासूची नात ना गं तू..?' आणि गुरु-शिष्येचं हे नातं असंच अभंग राहील. ते बघताना डोळे टिपायला एखादा रुमाल मात्र आठवणीने न्यायला हवा.. अस्तु!!!
-तन्मया..


No comments:

Post a Comment