Thursday 3 October 2019

आधुनिक दुर्गा - उर्मिला!!


उर्मिलेचा जन्म झाला तो एका अत्यंत कर्मठ घरात. तीन मुलींवर झालेली ती चौथी मुलगी. अर्थातच तिच्या जन्माचा आनंद वगैरे साजरा झालाच नाही. त्यांचे वडील व्यापारी होते. पैशामागून पैसा येत असतो एवढंच त्यांना माहित होतं. त्यामुळं ते सतत कामात असायचे. इतर घरात जसं कुटुंब एकत्र बांधलेलं असतं तसं त्यांच्या घरात कधी झालंच नाही. त्यांचा बायकोशी संबंध फक्त रात्रीपुरता. तेसुद्धा त्यांना वाटेल तेव्हा आणि वाटेल तसा. अगदी सर्वसामान्य खेड्यांत जसं असतं तसं वातावरण होतं तिच्या घरी.
त्या चारही बहिणींवर प्रचंड बंधनं असायची. केस किती कापायचे, कपडे कुठले घालायचे इथपासून अगदी कोणाशी बोलायचं आणि कोणाशी नाही इथपर्यंत. भरतपूरसारख्या छोट्या गावात पोरीची बदनामी झाली तर तिच्याशी लग्न कोण करणार हा विचार होता त्यामागे. पोरीला उजवलं म्हणजे आपली जबाबदारी संपली या अत्यंत दुर्दैवी विचारामुळे त्या सगळ्या बहिणी सज्ञान होण्याआधीच त्यांच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात झाली.
मिस्टर ननावरे बघायला आले तेव्हा उर्मिला अकरावीत होती. बँकेत बऱ्यापैकी कमावणारा मुलगा या एका निकषावर लगेच सगळं ठरलं. खरंतर खूप शिकायचं होतं तिला, छोट्या शहरात राहूनही काहीतरी करून दाखवायचं होतं. पण ती स्वप्नं पूर्ण होण्याआधीच तिचं लग्न झालं. खूप शिकणं राहिलं बाजूलाच, बारावीसुद्धा पूर्ण करू शकली नाही ती.
लग्न झालं आणि काही काहीच दिवसातच तिला दिवस गेले. स्वतःला कसं सांभाळायचं हे शिकायच्या आधीच आणखी एका जीवाची जबाबदारी अंगावर पडली. 'आता एकदा मुलं झाली की आपण आयुष्यात काहीच साध्य करू शकणार नाही' या विचाराने ती पूर्णपणे गळून गेली. मिस्टर ननावरे दिवस दिवस घरी नसायचे. बायकोला पैशाच्या बाबतीत फार कळू देऊ नये या विचारांचा तो नवरा असल्याने ते नक्की किती कमावतात, किती खर्च होतो याबद्दल तिला कधी काही कळलंच नाही. घरी सासूबाई नव्हत्या. त्यामुळं आला गेला, पै-पाहुणा सगळं तिलाच बघावं लागे. तरीही तो सगळं खर्च भागवून ती पै पै साठवत राहिली.
या सगळ्या परिस्थितीत एक दिलासा मात्र होता. तो म्हणजे उर्मिलेचे सासरे. त्यांना तिची घालमेल समजत होती. एकदिवस ती अतिशय अस्वस्थ असताना ते म्हणाले, 'बेटा, मुलं झाली म्हणजे सगळं संपत नसतं. मी बघतोय तुला. काहीतरी करून दाखवायची धमक आहे तुझ्यात. तू बारावी पूर्ण कर म्हणजे अनेक संधी मिळतील तुला पुढे आयुष्यात.' त्यांनी प्रेरणा दिल्यामुळंच तिने बारावीकरता प्रवेश घेतला. पण बाळंतपणामुळं तेव्हाही बारावी पूर्ण झाली नाही. आणि तिला नैराश्याने ग्रासलं.
दरम्यानच्या काळात तिची मुलगी, सावरी मोठी होत गेली आणि उर्मिलेचं जग मात्र छोटं होत गेलं. सावरी सहावीत वगैरे असेल तेव्हा मिस्टर ननावरेंची नोकरी गेली आणि ते तिघं मुंबईत आले. स्वप्ननगरी, इथे आल्यावर जे पाहिजे ते मिळतं अशी ख्याती असलेली मुंबई. इथं आल्यावर उर्मिलेला मात्र गुदमरायलाच झालं. एवढी गर्दी, सतत धावपळ, बोलायला कोणी नाही अशा सगळ्या परिस्थितीत तिच्या नैराश्याने पुन्हा एकदा उचल खाल्ली. 'आपण आयुष्यात काहीच केलं नाहीये', 'आपली कोणालाच गरज नाहीये मग जगून तरी काय फायदा?' अशा विचारांनी तिचं काळीज पोखरून निघायचं. सावरीला ते जाणवायचं. पण ती काहीच करू शकायची नाही. मिस्टर ननावरेंना त्याच्या काळजीतून उर्मिलेकडे बघायला सवडच नसायची. इतर कोणाकडे मदत मागावी तर आजूबाजूला ओळखीचं कोणीच नव्हतं. शेवटी तिने ठरवलं, 'जे काही करायचं आहे ते मलाच करायचं आहे.' मग पहिली पायरी म्हणून मग तिने बारावी पूर्ण करायची ठरवलं. डॉनबॉस्कोमध्ये प्रवेश घेतला आणि अखेरीस तिची बारावी पूर्ण झाली.
मुंबईमध्ये राहून एव्हाना एक गोष्ट तिच्या लक्षात आलेली होती. इथे सगळं सेल्फ मेड आहे. सगळ्यांची आपापली स्वप्नं आहेत. लोक तुम्हाला जगायला मदत करतात, पण तुमची स्वप्नं तुमची तुम्हालाच पूर्ण करावी लागतात. तिची बारावी तर झाली होती. पण पुढे काय? हा प्रश्न मात्र कायम होता.
एकेदिवशी अशाच विमनस्क मनःस्थितीत करी रोड वरून घरी येताना तिने पाहिलं एका लहान मुलीला एक मवाली पोरांचा घोळका त्रास देत होता. सगळे दारू पिऊन तर्रर्र होते. कशाचंच भान नव्हतं त्यांना. त्या मुलीला प्रतिकार करायची संधीच नव्हती. आजूबाजूचे पुरुष नुसते बघत होते. काहींनी तर व्हिडीओदेखील काढायला सुरुवात केली. तिला प्रचंड राग आला, चालू असलेल्या प्रकारची तिडीक डोक्यात गेली आणि हातात असलेली पर्स गरागरा फिरवत ती त्या घोळक्यावर चालून गेली. तिचा तो आवेश बघून आजूबाजूच्या चार बायासुद्धा मदतीला आल्या. एवढ्या बायका अचानक अंगावर आलेल्या बघून तो घोळका पांगला आणि ती लहानगी वाचली.
तेव्हा अचानक उर्मिलेच्या लक्षात आलं. हे काहीतरी नवीन घडलंय आज. कुठलंही ट्रेनिंग नसताना, म्हणावा तेवढा आत्मविश्वास नसताना फक्त अन्यायाची चीड आली म्हणून ती करू शकत असेल तर थोडं ट्रेनिंग आणि काही साधनं हातात असतील तर आपल्या पोरी-बाळींना कुठलाही त्रास सहन करावा लागणार नाही. हा विचार मनात आला आणि दुसऱ्याच दिवशी तिने त्या अनुषंगाने माहिती गोळा करायला सुरुवात केली. सर्वांत आधी कराटे क्लास लावला, स्व-संरक्षणाची वर्कशॉप्स केली. इतके वर्ष पै पै साठवून ठेवलेला पैसा या कामात खर्ची घातला. कराटे शिकत असतानाच स्वतःच्या घरात आजूबाजूच्या मुलींना स्व-संरक्षणाच्या युक्त्या सांगायला लागली. त्यासाठी नाममात्र फी घ्यायला सुरुवात केली. हे सगळं मिस्टर ननावरेंना न सांगता सुरु होतं. न जाणो ते परवानगी देतील की नाही.
बघता बघता शिकायला येणाऱ्या मुलींची संख्या एवढी वाढली की तिचं घर पुरेनासं झालं. आणि तिचे हे उपद्व्याप मिस्टर ननावरेंना समजले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी उर्मिलेला पाठिंबा दिला. आर्थिक मदतही केली. स्वतःला मुलगी असल्यामुळं कदाचित बापाच्या जीवाची काळजी तिच्या मदतीला धावून आली.
मग काय, तिने घराजवळच एक हॉल भाड्याने घेतला आणि व्यावसायिकरित्या या शिकवणीला सुरुवात झाली. आज तिच्या 'स्त्री-शक्तीच्या' तीन शाखा आहेत. हजारो मुली स्व-संरक्षणात पारंगत झालेल्या आहेत. एकेकाळी शून्यात असणारी तिची नजर आता स्वप्नं पुरं होताना बघत आहे. कोणत्याही मुलीला स्वतःला अत्याचारापासून वाचवण्यासाठी आत्महत्या करावी लागू नये, चालत्या ट्रेन मधून उडी घ्यावी लागू नये, घरात कोंडून बसावं लागू नये हे उर्मिलेच्या संस्थेचं ध्येय आहे.
संस्थेत शिकणाऱ्या मुली जेव्हा त्यांना आलेल्या वाईट अनुभवांवर त्यांनी कशी मात केली हे सांगायला उर्मिलेकडे येतात तेव्हा तिला आठ-दहा वर्षांची परकरी उर्मिला आठवते, काही कळायच्या आत तिच्याभोवती पडलेला हातांचा विळखा आठवतो. नको नको तिथे झालेले स्पर्श आठवतात. तेव्हा आपण असहाय्य होतो पण आज या मुली तशा नाहीत हे जाणवतं, त्यांना कवेत घेते, कुरवाळते आणि मनापासून आशीर्वाद देते...
-तन्मया (२७ ऑक्टोबर १७)
**कथा आणि पात्रं काल्पनिक आहेत.

No comments:

Post a Comment