Friday 29 April 2016

"चौघीजणी"



मला आठवतं सर्वात आधी आम्ही ही कादंबरी वाचली ती म्हणजे "आज मी नंबर लावलाय, दिवसात होईल माझं वाचून.. पण मग हिचा नंबर आहे.. एकूण १२ जणींनी नंबर लावलेत.. तुला मिळेपर्यंत महिना-दीड महिना सहज जाईल" अशा वार लावायच्या पद्धतीने.. सुदैवाने आमचं लहानपण 'अवांतर अज्ञानाने व्यवहारात काही अडत नाही' अशा विचारांत खितपत पडलेलं नव्हतं.. मग यथावकाश ही कादंबरी वाचणं, त्यावर मन भरेपर्यंत चर्चा करणं, आणि मुसमुसून रडणं हे सगळे प्रकार झाले.. आणि ही कादंबरी अत्यंत लाडकी बनली.. कायमसाठी..
हिच्याबद्दल सांगायचं झालं तर १८६८ साली लिहिली गेलेली एक कादंबरी.. एक अमेरिकन कादंबरी जी प्रसिद्धीपासूनच लौकिक घेऊन आली.. आज इतक्या वर्षांनंतरही तिची भुरळ कमी झालेली नाही.. जगभरात या कादंबरीने आपले अपरिमित चाहते निर्माण करून ठेवले आहेत.. अजूनही करत आहे.. केवळ एकदा वाचून हातावेगळं केलं असं हिच्या बाबतीत होऊच शकत नाही.. आणि वाचून सोडून दिलं असं तर अजिबातच नाही.. आयुष्यभर ज्या पुस्तकांचा प्रभाव राहतो अशा अव्वल दर्जाच्या पुस्तकांमध्ये अग्रक्रम आहे हिचा.. तसं पाहिलं तर ही कादंबरी म्हणजे एका साध्या बाळबोध अमेरिकन कुटुंबाचं तितकंच साधं-बाधं चित्रण.. लेखिकेने स्वतःच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर निर्माण केलेल्या चार बहिणी त्यांचे अत्यंत सात्विक असे आई-बाबा.. कथानकात प्रेमाचे आणखी गहिरे रंग भरणारे शेजारी.. आणि हे चित्र एकूणच अधिक विलोभनीय बनवण्यासाठी निर्माण केलेली मोजकीच परंतु प्रभावी पात्र-रचना.. एकीचा स्वभाव दुसरीसारखा नाही, वागण्यात समानता नाही आणि तरीही उत्कट प्रेमाने आणि सदाचाराने त्यांना एकमेकींच्या आयुष्याशी कायम बांधून ठेवलं आहे.. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल मी कशाबद्दल बोलत आहे.. ही अजरामर कादंबरी आहे "लुईसा मी अल्कोट" यांची "लिटल वुमेन".. मी जी वाचली ती शांताबाईंनी अनुवाद केलेली "चौघीजणी".. कादंबरी तर सुरेख आहेच पण आपल्या शांताबाईंनी ज्या मधाळपणे अनुवाद केला आहे , प्रेमातच पडतो आपण हिच्या.. यात बाल्य आहे, तारुण्य आहे, प्रेम आहे, प्रेमभंगही आहे.. आई-बाबा त्यांच्या चार मुलींचं सुखी भावविश्व आहे आणि त्यात एखादा स्वार्थाचा खडा टाकून ते ढवळून टाकणारा व्यवहारही आहे.. फक्त सगळं कसं एकदम प्रमाणात आहे. कुठे कमी नाही कि जास्त नाही.. म्हणूनच एकदा का आपण त्या सच्चेपणाने भारून गेलो कि अखेरपर्यंत खिळून राहतो..
मुग्ध शैशवातील चार बहिणी.. सगळ्यांत मोठी मेग, अतिशय सुंदर.. आपल्याच्या सौंदर्याच्या नादात गुंग.. त्याचा गर्व नाही पण सार्थ अभिमान असणारी.. बाईची आई झाल्यानंतरही तिचा हा अभिमान टिकून असतो.. तिचा नवरासुद्धा तिच्यावर, तिच्या सौंदर्यावर तिला आवडेल असं प्रेम करणारा.. कबुतरांचा संसार त्यांचा.. चोचीत चोच टाकली कि जगाचा विसर पडणारं गोग्गोड जोडपं..
दुसरी ज्यो.. आपल्या आई-वडिलांना मुलगा नाही तर ते पुरुषाचं कर्तव्य आपण पार पाडायला हवं अशा विचारांची थोडीशी आगाऊ वाटणारी पण अत्यंत तरल मनाची लेखिका.. आपण मुलगाच असायला हवे होतो म्हणजे आपल्या मार्मी आणि पप्पांना खूप मदत करता आली असती असा ग्रह मनात ठेवून बराच काळ जगणारी.. काही काळ गेल्यानंतर तिला तिच्या स्त्रीत्वाची जाणीव होते.. आणि तिचं तिलाच कळतं आपलं बाईपणसुद्धा तेवढंच कणखर आणि सुंदर आहे.. मार्मी-पप्पांना अभिमान वाटेल असंच आहे..
तिसरी बहिण म्हणजे बेथ.. सोज्वळ, सात्विक.. एखादा छोटुसा संतच जणू.. आयुष्याकडून फार काही दिव्य भव्य अपेक्षा नाहीत.. "ठेविले अनंते"च्या चालीवर जगणारा अतिशय समाधानी, तितकाच लाजरा कोवळा जीव.. जांभळ्या तापाचं निमित्त होऊन बेथ जाते तेव्हा अक्खा रुमाल भिजवला आहे कित्येकांनी.. बेथच्या जाण्यानंतर एकूणच कादंबरी प्रौढ होते, अचानकच..
आणि चौथी, सगळ्यांत धाकटी बहिण म्हणजे एमी.. अतिशय सुंदर, त्या सौंदर्याचं महत्व जाणून असणारी.. जाणत्या वयात युरोप फिरून आलेली.. त्यामुळे साहजिकच अत्यंत नजाकतपूर्ण अशी रेखीव स्त्री.. लौरी, त्यांचा शेजारी, त्याच्या प्रेमात पडून राजा-राणीचा संसार मांडणारी सुरेख एमी ..
आपल्याला उगाचच एखादी बहिण जास्त जवळची वाटू लागते.. जसं जसं वय वाढतं तसं ती आवडणारी बहिणही बदलते..या चौघी बहिणींनी लहान असताना काही स्वप्न पाहिलेली असतात.. कलेशी, खेळाशी निगडीत.. त्यांची सगळीच स्वप्न पूर्ण होत नाहीत.. म्हणून त्या रडत बसत नाहीत..कोवळ्या सुख-दुःखांना कवटाळून बसत नाहीत.. पुढे जातात, आपापल्या परीने यशस्वी होतात.. या कादंबरीने नक्की काय दिलं हे सांगता येत नाही असं.. पण आज कधीही जेव्हा चौघीजणी हातात येतं तेव्हा खूप छान वाटतं.. कितीही वेळा वाचलं तरी दरवेळी नवीन काहीतरी भिडतं.. हा लेखनप्रपंच म्हणजे त्या कादंबरीविषयी वाटणारी कृतज्ञता व्यक्त करायचा एक प्रांजळ प्रयत्न!!

1 comment: