Thursday 21 April 2016

मुंबई सोडून जाताना!



You will never be completely at home again because part of your life will always be elsewhere. That is the price you pay for the richness of loving and knowing people in more than one place..
खूप खरं आहे हे.. आज घर सोडून जवळपास साडेसात वर्ष झाली.. पुन्हा एकदा स्वतःच्याच घरी जाताना एक हुरहूर आहे.. इतक्या साऱ्या वर्षांत खूप काही बदललं आहे.. वेगवेगळ्या ठिकाणांनी त्यांची एक ओळख मागे ठेवली आहे.. आणि अर्थातच त्यात वर्चस्व आहे 'माझ्या मुंबईचं'..
साडेतीन वर्षं झाली हिचा आणि माझा सहवास आहे.. घरातून दोन bags आणि दोन मैत्रिणींसोबत मी आयुष्यात पहिल्यांदा इथे आले.. त्याआधी महाराष्ट्राची राजधानी, एक गुंतागुंतीचं शहर एवढीच हिची ओळख होती.. गिरगाव कुठे, बोरीवली कुठे आणि वसई-विरार कुठे.. काssही माहित नव्हतं.. आज जाताना मात्र असं वाटत आहे कि मुंबईचा स्वभाव थोडाफार कळाला आहे.. वेवलेन्थ कायमसाठी जुळली आहे.. बरचं काही मिळालं या शहरामध्ये.. खूप मित्र-मैत्रिणी मिळाल्या.. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळ्या संस्कृतीच्या.. अनेक लोकांशी मैत्र जमलं.. खूप संवेदशील मनं जोडली गेली.. आज त्याचं फक्त 'असणं' ही एक खूप छान भावना आहे..
इथे सुरुवातीला आले तेव्हा पवईहून घणसोलीला कसं जायचं या प्रश्नाने लोकलची आणि माझी ओळख झाली.. आणि नंतर घट्ट मैत्रीच झाली.. शेवटच्या दीड वर्षात तर लोकलने खूपकाही शिकवलं.. कायम साथ दिली.. घरून परत येताना लोकल दिसली कि आपलेपणाची भावना आपोआपच येत गेली.. या लोकलला जाती धर्माची बांधिलकी नाही.. रोज एकाच वेळेला प्रवास करणाऱ्या महिला एकमेकींच्या सख्या कधी होऊन जातात कळतदेखील नाही.. गणपतीला मोदकांची, ईदला शिरखुर्म्याची, ख्रिसमसला केक्सची देवाणघेवाण होऊ लागते.. वाढदिवसांपासून डोहाळेजेवणापर्यंत सगळं साजरं केलं जातं.. मनातली कित्येक गुपितं सांगितली जातात.. आणि तितक्याच तन्मयतेने ऐकलीही जातात.. म्हणूनच ही लोकल आपली वाटते.. कायम वाटत राहिल..
लोकल आणि समुद्र हे मुंबईचे अविभाज्य भाग.. कदाचित अविरत चालू राहण्याची प्रेरणा या दोन गोष्टींमुळेच मिळते मुंबईला.. इतके सी-फेसेस आहेत इथे.. पण का कोणास ठावूक marine drive वर गेल्यावर जसं वाटलं तसं बाकी कुठे वाटलंच नाही.. कट्ट्यावर बसून sunset बघत, हळूहळू दिव्यांनी सजत जाणारा क्वीन्स नेकलेस बघण्यात जी मजा आहे ती दुसरीकडे कुठे कधी आलीच नाही.. तिथला पाउस अनुभवता आला.. थंडीतली सकाळ अनुभवता आली.. गार वाऱ्याच्या झोतात हातात कॉफी, आणि कानात सुंदर गाणी.. एखाद्या सुंदर संध्याकाळी अजून काय हवं असतं!!
मुंबईने कायम लोकांना स्वतःला शोधायला मदत केली आहे.. आपलेच खोल दडी मारून बसलेले गुण-अवगुण दाखवून देण्यात ही माहीर आहे.. इथे माणूस एकटेपणासुद्धा एन्जोय करायला शिकतो.. माणसातील चांगुलपणावर विश्वास ठेवायला त्याला भीती नाही वाटत.. इथे येऊनच मी लोकांना observe करायला लागले.. पुन्हा एकदा लिहायला लागले.. सुदैवाने मनातलं कागदावर येत गेलं.. ते वाचून छान वाटत राहिलं.. इथे राहून अनेक नाटकं-चित्रपट बघता आले.. महान माणसांना भेटता आलं.. आयुष्य समृध्द होत गेलं.. त्या सगळ्यांपुढे घर शोधताना होणारी वणवण, मेसचं जेवण, मुंबईची आर्द्रता, प्रचंड गर्दी आणि अति आधुनिक, पचनी पडणारी मानसिकता हे सगळं मामुली आहे..
आता जगभरात कुठेही गेलं तरी मुंबईचा हा DNA कसलाही त्रास होऊ देणार नाही.. 'सबकुछ ठीक है' असं सांगत राहिल.. ये एक एहसान रहेगा मुंबईका.. सगळ्याच गोष्टी अशा शब्दात सांगता येणाऱ्या नाहीत.. मात्र एक गोष्ट नक्की आहे.. मुंबई डार्लिंग, you will be missed!! आता फक्त एकच इच्छा आहे..
इन रेशमी राहोंमे, एक राह तो वो होगी..
तुम तक जो पहुचती है.. इस मोडसे जाती है!!

No comments:

Post a Comment