Thursday 21 April 2016

घराबाहेर राहण्याचं 'सुख'!



शेवटचा पेपर झाला आणि कॉलेज संपल्याची एक दुखरी जाणीव झाली.. आपापल्या गावाला जाण्याच्या आधी एकदा रात्र गप्पांनी जागवायची म्हणून त्या तिघी ऋचाच्या रूमवर जमल्या.. आशिमा आणि ऋचा होस्टेलवर राहायच्या आणि रेचल लोकलाईट होती.. तसं पाहिलं तर तिघीही वेगवेगळ्या वयाच्या आणि संस्कृतीच्या.. तिघींचा आर्थिक स्तरही सारखा नव्हता.. मात्र गेली काही वर्ष त्यांनी अनेक भावना एकत्र अनुभवल्या होत्या.. अगदी आतल्या गोष्टी एकमेकींना सांगितल्या होत्या.. जॉब लागल्याच्या आनंदापासून, ‘त्याच्या घरचे आमचं प्रेम नाही गं समजून घेणारइथपर्यंत सगळं.. आजूबाजूचं सगळं वातावरण जरा अतीच पुढारलेलं होतं.. शुक्रवार संध्याकाळ (सॉरी Friday night) पब मध्ये साजरी नाही झाली तर आयुष्य वेस्ट आहे अशी मानसिकता असणारं.. अशा सगळ्यांत या तिघी मात्र एखाद्या शांत ठिकाणी जाऊन सूर्यास्त पाहणाऱ्या मागासवर्गातल्या होत्या.. त्यांचं काळाबरोबर नसणं हाच त्यांच्या मैत्रीचा घट्ट धागा होता..
ती रात्र तर त्यांच्या गप्पांना बहर आणणारी होती.. सगळा लेखाजोखा मांडणारी होती.. लहानपणीच्या गमती- जमती सांगत, हसत खेळत रात्र पुढे जात होती.. शाळा, कॉलेजची वळणं घेत गप्पांची गाडी पुढे जात होती.. ऋचा आणि आशिमाची खेचायची म्हणून रेचल सहजच म्हणाली, "तुम्ही तर काय कायम घराबाहेर आहात यार.. कसली मज्जा येत असेल ना.. सगळं स्वतःचं स्वतः करायचं.. मन मानेल तिकडे भटकायला जायचं.. shopping करायचं.. नो constraints.. लकी आहात दोघी.. "
ऋचा आणि आशिमाने एकमेकींकडे पाहिलं.. दोघींचेही डोळे पाणावले.. ऋचा म्हणाली, "रेचल डीअर, दहा वर्षांपूर्वी मी घर सोडलं.. शिक्षण झालं, मनासारखा जॉब झाला.. खूप काही अनुभवलं, खूप काही शिकले.. पण खरं सांगते, नवरी मुलगी घर सोडताना तिला जसं तुटल्यासारखं वाटतं अगदी तसंच प्रत्येक वेळी घरातून इकडे येताना वाटतं.."
तिला दुजोरा देत आशिमा म्हणाली, "दर वेळेस घरी गेलं कि मा-बाबा विचारतात, 'बेटी किती दिवस घरी आहेस तू.. तसं ट्रेनचं तिकीट काढायला..' स्वतःच्याच घरी जाऊन पाहुणी असल्यासारखं वाटतं.."
"मागे आम्ही घर नवीन बांधलं, आदित्यसाठी वेगळी खोली बांधली आणि माझं सामान, माझी लाडकी बुक शेल्फ गेस्ट रूममध्ये ठेवली.. 'तसंही ऋचा काय आता या घरात राहणार नाही.. तिची वेगळी रूम कशाला हवीअसं आई बाबांना म्हणताना मी ऐकलं आणि तेव्हाच घरात परकं असल्याची वाईट जाणीव झाली.."
"मी घरी जाते.. अर्धा जीव घरच्या मंडळींमध्ये असतो.. अर्धा जीव इथे.. मा-बाबांना वाटतं आपली आशिमा सहा वर्षांपूर्वी घर सोडताना जशी हळवी, लाजाळू होती तशीच आहे.. ही मधली गेलेली वर्ष मला काय आणि कशी घडवून गेली आहेत त्यांना पूर्णपणे माहित नाही.. अन मी सगळं सांगूही शकत नाही.. संवादाचा विसंवाद होतो कधी कधी.. चूक कोणाचीच नसते.. पण मधल्या काळाने काहीतरी हिरावून नेलेलं असतं हे मात्र खरं.. "
"मागच्या महिन्यात माझ्या चुलत बहिणीचं लग्न झालं.. तीही अशीच बराच काळ घराबाहेर राहणारी.. आयुष्य स्वतःच्या अटींवर जगायची सवय झालेली.. तिचा काल कॉल आलेला.. ती म्हणत होती, "ऋचा, इतके वर्ष एकटी राहिले.. सुरुवातीला पर्याय नव्हता म्हणून आणि नंतर सवय झाली म्हणून.. आजूबाजूला माणसं असायची सवयच नाही राहिली गं आता.. किचनमध्ये काम करताना सासूबाई मागे उभ्या असतील तर भीती वाटते कि अचानक कोण आलं घरात.. माणसांच्या असण्याची सवय करून घेण्यातच खूप वेळ जाणारे माझा.. तुझ्याकडे वेळ आहे अजून.. माणसांच्या असण्याची सवय करून घे गं राणी"
बिचारी रेचल.. एक भाबडा प्रश्न तिच्या सख्यांना भलतंच हळवं करून गेला होता.. घराबाहेर राहण्याच्या चैनीसाठी एवढी किंमत मोजावी लागते हे तिला आज नव्याने उमगलं होतं..

No comments:

Post a Comment