Wednesday 30 July 2014

साहित्यसम्राट अर्थात "कुसुमाग्रज"



श्रावण सुरु झाला आणि यांची कविता आठवली नाही असा रसिक विरळाच...
हासरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला
तांबुस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला
मेघांत लावीत सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आला
लपत, छपत, हिरव्या रानात, केशर शिंपीत श्रावण आला
इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी संध्येच्या गगनी श्रावण आला
लपे ढगामागे, धावे माळावर, असा खेळकर श्रावण आला
सृष्टीत सुखाची करीत पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला
अस म्हणताना श्रावण महिना न राहता आपला सखा होऊन जातो.. त्याच्या नुसत्या येण्याने आपण सुखावून जातो.. आणि हि फक्त श्रावणाची कमाल आहे अस नाही तर त्याला आपल्या शब्द कवेत घेऊन गोड, नाजूक बनवणार्या कवीची देखील आहे... हा कवी माणुसकीने ओतप्रोत भरला आहे.. याच्यामध्ये अन्यायाविरुद्ध बंड करण्याची तयारी आहे आणि त्याच्या लेखणी मध्ये ती क्षमता देखील आहे.. उदात्त प्रेमात नाहणारी यांची कविता खूप प्रेरणादायक, आश्वासक आणि सहज सुंदर आहे.. मला वाटत या माणसाची एवढी ओळख पुरेशी आहे.. हे आहेत विविध साहित्य प्रकार अतिशय सहजतेने हाताळणारे साहित्यसम्राट अर्थात "कुसुमाग्रज"
१९३० पासून स्वातंत्र्य प्राप्ती पर्यंतचा काळ... क्रांतीचा जयजयकार करणारा... पारतंत्र्याची शृंखला तोडण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या उर्मीचा काळ... या उर्मीला कार्याची जोड देण्यासाठी यांच्या कवितेचा जन्म झाला होता..
"गर्जा जयजयकार क्रांतिचा, गर्जा जयजयकार
अन्‌ वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार
खळखळु द्या या अदय श्रुंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो, उद्दाम आवळा कसूनिया पाश
पिचेल मनगट परि उरांतिल अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार?
कधीही तारांचा संभार?"
अस म्हणत त्यांनी क्रांतीचा जागर केला...
"कशास आई, भिजविसि डोळे उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते
उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळाखळा तुटणार
आई, खळाखळा तुटणार"
अस सांगत एक सुरेख आशावाद निर्माण केला....
नंतर जेव्हा खरंच वाटल कि आपण मुक्त होणार तेव्हा जस हरवलेल्या बोटीला जेव्हा किनारा दिसू लागता नाविक हर्षविभोर होऊन गाऊ लागतो तसाच यांचं देखील झालं आणि ते गाऊ लागले...
"निनादे नभी नाविकांनो इशारा.. आला किनारा ..
प्रकाशे दिव्यांची पहा माळ ती.. शलाका लाल निळ्या हिंदोळती
तमाला जणू ये अग्नीचा फुलोरा आला किनारा आला किनारा!!!!
स्वातंत्र्य तर मिळाल पण विषमता, पिळवणूक, अन्याय यांचा विळखा पुरता सुटला नव्हता..
सावकारी, स्त्रीची विटंबना हे प्रकार सुरूच होते.. या गोष्टींचा त्यांनी धिक्कार केला नसता तरच नवल..
गरीब बिचारा शेतकरी, सावकारीच्या दुष्टचक्रात अडकलेला.. सर्व वस्तूंचा लिलाव झाल्यानंतर एक बायकोच काय ती उरलेली..
"ऊर तिचे ते न्याहाळूनी
थोर थैलीतील वाजवीत नाणी
'आणि ही रे' पुसतसे सावकार..
उडे हास्याचा चहूकडे विखार" अस म्हणणारा तो नतद्रष्ट आपल्या मनात चीड निर्माण करतो.. हा सगळा प्रकार थांबायला हवा असा त्वेष निर्माण करतो..
" बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते
कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे
कोटि कोटि देहांत आज या एक मनीषा जागतसे
पिवळे जहरी सर्प ठेचणे - अन्य मना व्यवधान नसे
एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे धगधगते"
अशी प्रतिज्ञा करणारे कुसुमाग्रज भारतमातेची होणारी विटंबना, तिच्यावर होणारी आक्रमण यांमुळ नुसते व्यथित होत नाहीत तर "कृतीशील बना" असा संदेश देखील देतात...
वीर रसाने भरलेली त्यांची कविता प्रेमाची नजाकत पेश करण्यात देखील तेवढीच आघाडीवर आहे..
"चांद भरली रात आहे, प्रियकराची साथ आहे
मोगर्‍याच्या पाकळ्यांची मखमली बरसात आहे
मंद वाहे गंध वारा दूर चंदेरी किनारा
अमृताच्या सागरातून जीव-नौका जात आहे
ना तमा आता तमाची वादळाची वा धुक्याची
आजला हातात माझ्या साजणाचा हात आहे"
हे वाचताना संपूर्ण चित्र उभ राहत.. कवितेला जिवंत करण्याची यांची किमया वादातीत आहे!! यांची कविता इतकी आखीव रेखीव आहे कि बस!!!
आपण सामान्य जन.. प्रेम म्हणजे मानवी जीवनापर्यंत सीमित अशी आपली समजूत.. पण या महान कवीने साक्षात पृथ्वीला आणि सूर्याला या नाजूक नात्यात चित्रित केल.. आणि पृथ्वीच प्रेमगीत तयार झाल.. किती विशाल आणि भव्य कल्पना आहे ही!!!!
"युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रीतिची याचना"
तुझी प्रतीक्षा करून आता मी थकले रे.. अस म्हणणारी ती सालांकित होऊन बसली आहे.. पण तिचा शृंगार त्याच्यावाचुन व्यर्थ आहे.. त्याच्याशिवाय तिचं आयुष्य म्हणजे फक्त अंधार आहे...
"दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकिती दिव्य उल्का-फुले
परंतु तुझ्या मूर्तिवाचूनी देवा, मला वाटते विश्व अंधारलेले!"
दोन उत्तुंग जीवनच मिलन म्हणजे खरतर एक सोहळाच.. तो तसाच उत्तुंग असायला हवा.. तसा तो होणार नसेल तर दुरावाच बरा अस म्हणत ती गाते...
"परि भव्य ते तेज पाहून पूजून  घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहुनी साहवे!
गमे की तुझ्या रूद्र रूपात जावे मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठांतली आग प्यावी मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा!"
आणि सर्वात शेवटी या मिलनाची शक्यता धुसर होताना दिसू लागता तिला त्याची थोरवी आणखी स्पष्ट दिसू लागते.. आणि त्याला सर्वस्वाच दान देता देता ती म्हणते...
अमर्याद मित्रा, तुझी थोरवी अन्‌  मला ज्ञात मी एक धूलीकण
अलंकारण्याला परि पाय तुझे  धुलीचेच आहे मला भूषण!"
प्रेमाला वैश्विक बनवण्याचं श्रेय बहुतांशी यांचं आहे.. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीवर आपण प्रेम करू शकतो मग त्या भौतिक गोष्टी असोत वा नसोत...
" प्रेम - कुणावर करावं ? कुणावरही करावं...
प्रेम - योगावर करावं, भोगावर करावं..
आणि त्यातूनही त्यागावर करावं... " वाह!! काय कल्पना आहे!!
सुरांना आळवताना ते म्हणतात माझ मन दूर कुठेतरी हरवलं आहे.. समोर सारा अंधार आहे.. तेव्हा हे सुरांनो फक्त तुम्हीच चंद्र होऊन मला अमृतामध्ये नाहवा!!!!
"हे सुरांनो चंद्र व्हा!
चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा! "
कुसुमाग्रजांच्या कवितांचा संक्षेपाने वेध घेण खूप कठीण काम आहे.. अनेक मोती यातून निसटून जातात..  यांची कविता वाचताना आपण आपले राहत नाही...  तसाच कविता लिहिताना खुद्द ते सुद्धा स्वतःचे राहत नाहीत... सृजनाची अवस्था मांडताना ते म्हणतात,
"मी जेव्हा कवी असतो तेव्हा मी कोणाचाच नसतो!
गगनयानापारी  होतो स्फोटाने विलग मी..."
कवितेच्या प्रांतात अधिराज्य गाजवणारे कुसुमाग्रज पद्य लिहिण्यात हि अग्रेसर होते..
'नटसम्राट' ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती तर होतीच पण त्याचे नाटयप्रयोगही खूप गाजले. नाटयवेडया मराठी रसिकांनी त्यांचे स्वागत केले त्याला तोडच नाही. अत्यंत नाजूक व भावुक विषयाला हाताळणारे हे नाटक वयोवृध्दांचा दृष्टीकोन बदलणारे ठरले
'मराठी माती', 'स्वागत', 'हिमरेषा' यांचबरोबर 'ययाती आणि देवयानी' 'वीज म्हणाली धरतीला' ही नाटके १९६० ते १९६६ साली प्रसिध्द झाली. सार्‍या साहित्य कृतींना राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९४६ साली 'वैष्णव' ही कांदबरी व 'दूरचे दिवे' हे प्रसिध्द झाले.
 ज्ञानपीठ पुरस्काराला गौरवणारे हे कायम स्वतःची वाट चालत राहिले.. जेव्हा अशी वाट मिळाली नाही तेव्हा स्वतःची वाट बनवीत राहिले सगळ्यांना मार्गदर्शन करीत राहिले... आशीर्वाद देत राहिले..
आणि म्हणत राहिले,
"असे हजारोसंगे आहे जडलेले माझे नाते "
अनेक मनांना प्रेरणा देणारे, जीवन ध्येयाचा साक्षात्कार घडवणारे कवी क्वचितच परत जन्म घेतात.. सर्वसमावेशकता असणारी त्यांची कविता मराठी साहित्याला एका वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवते...अशा या कवीला माझा त्यांच्याच शब्दात सलाम..
"आदित्य या तिमिरात व्हा ऋग्वेद या हृदयात व्हा
सुजनत्व द्या, द्या आर्यता अनुदारिता दुरिता हरा
सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा ।
जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणाकरा ॥"

1 comment: