Thursday 3 July 2014

माणुसकीचा ताल जपणारा कवी विं. दा.करंदीकर.....



कविता समजण्यापेक्षा ती आपली एका दमात वाचून काढायची अस वाटायचं ते वय... तेव्हा यांची "घेता" वाचली होती...
"देणार्याने देत जावे  घेणार्याने घेत जावे
हिरव्या-पिवळ्या माळाकडून
हिरवी-पिवळी शाल घ्यावी
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.." नंतर उसळलेल्या दर्याकडून प्रेरणा, भीमेकडून शांती घेता घेता ते म्हणाले
"देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे!!!
त्या बाळबोध वयात मला वाटायचं काय कवी आहे, "देणारा देत आहे तर निदान त्याचे हात तरी त्याला राहूदे ते कशाला घ्यायचे.. " जेव्हा नंतर थोडी प्रगल्भता आली तेव्हा अचानक साक्षात्कार झाला.. देणार्याचे हात घ्यावे म्हणजे त्याची दानत घ्यावी.. आणि खर सांगते त्यानंतर या माणसाबद्दल असणारा आदर अनेक पटीने वाढला.. आता हा माणूस कोण हे काही वेगळ सांगायची गरजच नाही... हा म्हणजे माणुसकीला काव्याच्या कोंदणात बसवून त्याची सर्वत्र उधळण करणारा राजा माणूस "गोविंद विनायक अर्थात विं. दा.करंदीकर..."
१९४० च्या दरम्यान रसिकांना रिझवण्यासाठी आलेली त्यांची कविता वयाचे, सामाजिक, राजकीय,
सगळे सगळे पाश तोडून रसिकांच्या अन्तःकरणाला जाऊन भिडली... नव्या गोष्टींचा पुरस्कार करताना तिने कधीच संस्कृतीशी असणार नात तोडलं नाही.. बाल-गीत, प्रेम-कविता, गझल, सुनीत अशा नानाविध प्रकारातून विहरताना कायम वास्तवाशी असणारी नाळ जपून ठेवली..
बालगीत म्हणजे पाऊस, शाळा, आईचे लाड, बाबांचा मार एवढच नसत तर त्या लहान मुलाचं स्वतःच एक छानस विश्व असत त्यात उडणारी घर असतात..तिथे परीक्षा लहान मुल नाही तर म्हातारी माणस देतात.



"तिबेटाच्या जरा खाली हिमालयाच्या जरा वर!
एटू लोकांचा अद्भूत देश प्रत्येकाजवळ उडते घर!
'टींग' म्हणता येते खाली 'टंग' म्हणता जाते वर!
एटूच्या देशात सक्तीचे खेळ मुलांना नसतो शिकायला वेळ
म्हातारे देतात परीक्षा शंभर मेल्यानंतर कळतो नंबर"
सगळच कस सरळ सोप्प बालसुलभ..पण त्यांच्या काही बालकविता मात्र मनात घर करून बसतात..
मोठ्ठ झाल्यावर मी जादुगार होणार अस म्हणताना चिमुरडा म्हणतो..
"खरेच आई, तुला नवी, धडकी लुगडी दोन हवी
कमळीचा परकर सगळा, अगदी बघ फाटून गेला
भाऊला बघ लंगोटी, नकोच का याहून मोठी
बाबांना पंचाबदली, हवी धोतरे लांब भली
पडला पुढती ढीग पुरा, काय कमी जादूगारा??."
असा अगदी निरागस प्रश्न तो आपल्या आईला विचारतो.. बिच्चारी आई काय उत्तर देणार.. जे काय उत्तर द्यायचं ते नंतर परिस्थिती देतेच..
एकूणच काय तर वास्तव आणि काल्पनिकता याचं अद्भुत मिश्रण, लहानग्यांच्या विश्वाशी तादात्म्य पावण्याची कला या सगळ्यांमुळे त्यांची कविता समृध्द झाली आहे..
जसे जसे आपण मोठे होतो तसं कष्टांच महत्व कळत जात...तेव्हा जर यांची कविता सोबत असेल तर
घामाच्या धारांची स्वेद गंगा होते.. जी खर्या-खुर्या गंगेहुनही पवित्र आहे..
"कांचनगंगेहुनही जी सुंदर
भागीरथीहूनही जी पावनतर
परमेशाहून जीवनतत्पर
त्या गंगेतील स्वेद्बिंदुनो
प्रणाम माझा तुम्हा निरंतर....!!!!
असेच कष्ट करत असताना कधी कधी मात्र जगण्यातला तोच तो पण उबग आणतो तेव्हा ते म्हणतात,
"सकाळ पासून रात्रीपर्यंत तेच ते ! तेच ते !
माकडछाप दंतमंजन तोच चहा तेच रंजन..
तीच गाणी तेच तराणे तेच मूर्ख तेच शहाणे..
"सकाळ पासून रात्रीपर्यंत तेच ते ! तेच ते !" आणि मग त्याच वेळी मनाला उभारी देताना म्हणतात,
"घामामध्ये भिजव माती दगडासंगे झुंजव छाती..
आकाशावर मार मुठ उबग-बिबग सर्व झूट.."
यांची कविता नुसतीच वास्तववादी नाही तर दूरदर्शी देखील आहे. येणाऱ्या काळात यंत्र हाच जीवनाचा पाया होणार आहे हे त्यांनी कधीच ओळखल होत.. आणि म्हणून एका नादबद्धतेने यंत्राला आवाहन करताना ते म्हणतात,
ये यंत्रा!! ये यंत्रा!!
मंत्रांना सार्थ करीत स्वप्नांना स्वीकारीत 
उच्चारीत, आकारीत ये यंत्रा!! ये यंत्रा!!
संहारीत नवदानव निर्मित ये नवमानव
उद्घोषित नवमुल्ये उद्घोषित क्रांतीपाठ
ये यंत्रा!! ये यंत्रा!!
वास्तवाच सुंदर वर्णन करणारा हा कवी प्रेम देखील तेवढ्याच ताकदीने मांडतो.. तो तिच्या आठवणींमध्ये झुरत आहे, तिच्या भेटीसाठी व्याकूळ होत आहे.. पण या जन्मी त्यांची भेट नाही.. तिला भेटायचं तर त्याला एक नवीन जन्म घ्यावा लागेल.. ही सगळी अगतिकता सांगताना ते म्हणतात,

"माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी,
लागेल जन्मावें पुन्हा नेण्या तुला मझ्या घरी.
तू बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढे,
मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती काहीतरी.
होशी फुलासह फूल तू अन् चांदण्यासह चांदणे,
ते पाहणे, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करी.
लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें;
हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी."
आणि इकडे ती देखील तिच्या स्वप्नात त्याला तीच सर्वस्व देऊन जाते.. स्वप्न असलं म्हणून काय झाल.. स्वप्नांना कायम पूर्ततेची आशा असते म्हणूनच पाहिलेली स्वप्न केवळ स्वप्न न राहता काही काळासाठी हकीकत होऊन जातात..
"मागु नको सख्या, जे माझे न राहिलेले
ते एक स्वप्‍न होते स्वप्‍नात पाहिलेले !
स्वप्‍नातल्या करांनी, स्वप्‍नातल्या तुला मी
होते न सांग का रे सर्वस्व वाहिलेले ?
स्वप्‍नात वाहिलेले म्हणुनी कसे असत्य
स्वप्‍नास सत्य असते सामील जाहलेले
स्वप्‍नातल्या परीला स्वप्‍नात फक्त पंख
दिवसास पाय पंगू अन्‌ हात शापिलेले
स्वप्‍नात परीला स्वप्‍नात ठेवुनी जा
हे नेत्र घेऊनि जा स्वप्‍नात नाहलेले
जा नेत्र घेऊनि जा स्वप्‍नांध पांगळीचे
आता पहावयाचे काही न राहिलेले"
उत्कट प्रेमासारख त्यांनी कौटुंबिक जीवनातले हृद्य अनुभवही ते सांगून जातात,
"असशील का आता तू  बसलीस अंगणात ?
अन हात दोन चिमणे  असतील का गळ्यात ?
असशील का आता तू  अंगाई गीत गात
घेऊन लाडकीला त्या लाघवी कुशीत..." सगळ कस तंतोतंत डोळ्यांसमोर उभ राहत!!!
एकदा आई झाल कि कायम आई असणारी गृहिणी सगळ्याच जबाबदार्या लीलया पेलते... एकाच वेळेस सुवासिनी, आई आणि त्याच वेळेस बायकोसुद्धा.. तिच्या या सामार्थायची त्याला जाणीव होते आणि तो म्हणतो,
"तू घरभर भिरभिरत असतेस..
लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात..
स्वागतासाठी तू सुहासिनी असतेस..
वाढताना यक्षिणी असतेस.. भरविताना पक्षिणी असतेस...
संसाराच्या दहा फुटी खोलीत
दिवसाच्या चोवीस मात्रा
चपखल बसवणारी तुझी किमया
मला अजूनही समजलेली नाही..." अस कौतुक झाल्यावर ती का खुश होणार नाही!!
त्यांच्या कवितेला सहजतेचा स्पर्श आहे.. अकृत्रिम जिव्हाळा आहे... म्हणूनच त्या आत कुठेतरी भिडतात.. हृदयाच्या तर छेडत राहतात.. कधी कधी अति वास्तवदर्शी होऊन रुक्ष सुद्धा वाटू शकतात.. माणसावरच्या, मानुसाकीवरच्या अपर प्रेमातून त्यांची कविता जन्म घेते.. सर्व रूढ संकेतांना भेदून टाकते.. तिच्या उत्कटतेने रसिकाला भारून टाकते.. हेच तीच वेगळेपण आहे!! आयुष्यभर जपून ठेवाव अस..

4 comments:

  1. मस्त नेहमी प्रमाणे

    ReplyDelete
  2. सुंदर लिहिलं आहेस, मस्तच!!

    ReplyDelete
  3. चांगले लिहिले आहे

    ReplyDelete
  4. छान,शेअर करतो.

    ReplyDelete