Thursday 17 July 2014

निसर्ग उपासक कवी - बालकवी!

कधी कधी अस होत न.. एखादी कविता वाचताना मन अगदी भरून जात.. कुठल्या-कुठल्या आठवणींच्या गावाला भेट देऊन येत.. अचानक डोळ्यात पाणी आणत तर अचानक खुदकन हसायला लावत... या सगळ्या उत्फुल्ल भावना जिवंत होतात जेव्हा त्या निसर्ग-कविते मधून आपल्या समोर येतात.. कवितांना मूर्त रूप मिळत.. यासाठी कवितेला रंग, रूप, नाद देणारा कवी अत्यंत तरल मनाचा असावा लागतो.. असेच अतिशय हळुवार मनाचे, अनेक कविता जिवंत करणारे, निसर्गाशी तादात्म्य पावलेले माझे लाडके कवी म्हणजे "बालकवी"
१९०७ सालची गोष्ट.. कविसम्मेलनामध्ये एक किशोरवयीन मुलगा व्यासपीठावर चढला आणि
" अल्पमती मी बालक, नेणे काव्यशास्त्रव्युत्पत्ती..
कविवर्यांनो, मदीय बोबडे बोल धरा परी चित्ती.. "
अस म्हणत त्याने अगदी नम्रपणे पण दिमाखात आपल्या कविता सादर केल्या..
अध्यक्षांनी मुलाला बालकवी काय म्हणाल, तेच बिरुद कायमच त्याला चिकटून बसल...
त्यांच्या कवितेमधून कायम आनंद वाहत असतो..
"आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे"
अस म्हणत म्हणत आपोआप आपण आनंदी होत जातो... त्यांच्या कवितेला एक लय आहे.. एक नाद आहे... आणि तो नाद अत्यंत मोहवणारा आहे... श्रावणात उन पावसाच्या खेळच वर्णन करताना अस वाटत आपल्या समोर तो ऊन सावल्यांचा खेळ सुरु आहे.
"श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे.."
त्यांचा औदुंबर वाचताना तर वाटत.. एखादा सन्यस्त समाधी अवस्थेत बसला आहे.. सारी सृष्टी त्याला साथ देत आहे.. बेटातून वाहणारा झरा वातावरण निर्मिती करत आहे.. काळिमा सुद्धा कसा तर गोड काळिमा... घाबरवणारा नव्हे तर मनाला शांत करणारा...
"ऐल तटावर पैल तटावर हिरवळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन
चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळयांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे
पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे
हिरव्या कुरणांमधुन चालली काळया डोहाकडे
झाकळूनी जल गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकु नी जलात बसला असला औदुंबर"
अनेक उपमा, उत्प्रेक्षा अलंकारांनी नटलेली हि कविता अगदी आपलीशी वाटते..
'निर्झरास', 'तृण-पुष्प', 'हिरवी-कुरणे' हे सगळ काव्य-भांडार म्हणजे सृष्टीच्या मनाचे रंग दाखवतात..
'बालविहग' या कवितेत संध्याकाळच वर्णन करताना ते म्हणतात,
" सांज खुले सोन्यहुनि पिवळे हे पडले ऊन..
चोहीकडे लसलशीत बहरल्या हिरवळी छान..
पांघरली जरतार जांभळी वनमाला शाल...
सांध्यतेज गिरीशिखरी विखरी सम्मोहनजाल.."
हि सगळी नुसती वर्णन नाहीत तर त्यांची अभिव्यक्ती आहे.. चैतन्यदायी अस्तित्व आहे.. कवितेच्या कुन्चल्यामधून निसर्गचित्र अस काही साकारल जात कि वाचणारा थक्क होतो...
द्विरुक्ती साधून ते कवितेला गेयता प्राप्त करून देतात... लय मिळवून देतात...
"गिरिशिखरे वनमालाही दरी दरी घुमवित येई..
कड्यावरुनी घेऊन उड्या खेळ लतावलयी फुगड्या !!
घे लोळण खडकावरती फिर गरगर अंगाभवती..
जा हळू हळू वळसे घेत लपत लपत हिरवाळीत!!!
एक अत्यंत अल्लद प्रेमकथा अल्लड नव्हे.. ती कुमारिका! अगदी लहान, अवखळ.. आणि तो अतिशय राजबिंडा देखणा तरुण.. त्यांच्या नाजूक प्रेमाची हि गोष्ट.. ती तिच्या आई सोबत आनंदाच्या झोक्यावर झुलत आहे.. खाणाखुणांच्या प्रदेशापासून खूप लांब विहरत आहे...
"हिरवे हिरवेगार गालिचे - हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात - अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला - साध्या भोळ्या फुलराणीला ?"
मग असाच कधीतरी हास्य विनोद करता करता..रेशीम गाठी जुळतात.. वचनांचे आदान-प्रदान होत... आणि नंतर ती मंगल घडी येते.. दोन मने एकरूप होतात...
"गाउ लागले मंगलपाठ - सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा - कोकिळ घे तानावर ताना!
नाचु लागले भारद्वाज, - वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर - नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे !
दवमय हा अंतपट फिटला - भेटे रविकर फुलराणीला !"
अहाहा!! किती सुंदर वर्णन आहे हे..  एका कळीच सुर्यविकासी फुलामध्ये होणार रुपांतर इतकासा गाभा.. पण त्याला काय अप्रतिमपणे गुंफल आहे... वाह!! काही तोडच नाही.. हे झाल निर्व्याज, निरलस प्रेम.. पण जेव्हा एखादा राजकुमार वनात जातो.. तिथे विहरणाऱ्या रमणीला भुलतो.. तेव्हा त्यांच्या प्रेमाचा अविष्कार वेगळ्या स्वरूपाचा असतो..
"गर्द सभोंती रान साजणी तू तर चाफेकळी
काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी ?
ती वनमाला म्हणे, "नृपाळा हे तर माझे घर.
पाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदर."
रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतील रमणी, तुला
तू वनराणी, दिसे भुवनी ना तुझिया रूपा तुला
अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालांवरी
भुलले तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरी"
हे सगळ वाचताना कायम जाणवत.. बालकवींची कविता सौन्दार्यासाक्त आहे..इथे सौंदर्य हे फक्त स्त्रीच सौंदर्य एवढ संकुचित नाही तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ज्या काही मनोहारी गोष्टी होतात त्या सगळ्याचं सौंदर्य!!!
झरा हा त्याचा लाडका विषय.. त्याला ते कवीश्वर म्हणतात.. त्या झर्यालाच ते विनंती करतात,
"शिकवी रे शिकवी माते
दिव्य तुझी असली गीते!!"
त्यांना तारकांच संगीत ऐकू येत.. आकाशाची शोभा स्पर्शता येते.. एकूणच काय तर माणूस आणि निसर्ग यांचा भावबंध जोडता येतो... आणि म्हणूनच त्यांना मनाची शांतता अनुभवता येते.. कुठल्याही परिस्थिती मध्ये स्वतःच गाण गाता येत..  आणि ते गात असतानाच संपूर्ण विश्वात मांगल्य नांदावं, ऐक्य रहाव.. अशी मनःपूर्वक प्रार्थना देखील करता येते!!!
"माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे
अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे
सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे
या विश्वाची एकतानता हे माझे गाणे
सर्व धर्म हे, भेद-पंथही सर्व एक झाले
माझे, माझे विश्व, तार ही प्रेमाची बोले
ही मोक्षाची, स्वातंत्र्याची, उन्नतिची माला
सौभाग्याची तार लागलो मी छेडायाला.
हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली !
मंगल मंगल मद्‌गानाची गति ही शेवटली."
पण शेवटी कितीही झाल तरी हा माणूसच न.. मनाला येणारी अस्वस्थता, अशांतता त्यांना थोडीच चुकणार आहे.. फरक इतकाच आपण त्याचा गवगवा करतो आणि यांच्या सारखे महान लोक त्यांना शब्दात बांधून स्वतःपासून वेगळ करून टाकतात.. आणि म्हणूनच सृजनशील राहू शकतात..
"कोठुनी येते मला कळेना उदासीनता या हृदयाला
काय बोचते ते समजेना हृदयाच्या अन्तःहृदयाला.."
अशा कविता वाचल्या कि आपण देखील व्याकूळ होतो..
बालकवींना कुठेतरी काहीतरी खुपत होत.. आणि तेच त्याच्या काही कवितांमधून व्यक्त होत होत..
"शुन्य मनाच्या घुमटात कसले तरी घुमले गीत..
अर्थ कळेना कसलाही विश्रांती परी त्या नाही.."
या व्याकूळ करणाऱ्या गोष्टी कधीही एकेकट्या येत नाही.. आपल्यासोबत सगळे सगे सोयरे घेऊन येतात.. आणि मग आपल्या विचारांची चक्र सुरूच राहतात.. अव्याहत..!!!
अशाच काहीशा विचारचक्रात अडकले असताना, रेल्वे रूळ पार करताना त्यांचा अपघाती अंत झाला.. माणूस स्वतःच्या जीवनाची रूपरेषा आखतो.. इथे बालकवींनी मरण तर येणारच पण ते कस यायला हव ते सुद्धा सांगितल..
"सत्याची स्वप्ने व्हावी | सत्याला स्वप्ने यावी |
स्वप्नीही स्वप्ने बघत | स्वप्नातच व्हावा अंत ||
मरण्याचे स्वप्नही गोड | जगण्याचे स्वप्नही गोड |
येणेपरी सर्वही भास | अमृताचे व्हावे कोश ||
असा हा आमरण बाल्याच वरदान मिळालेला कवी! तुमच्या आमच्या पाहण्यात क्वचितच असायचा!!
बालकवींच्या कविता सार्या मराठी भाषेचा अमुल्य ठेवा आहे.. सार्या महाराष्ट्राचा मानबिंदू आहे.. त्यांचा कवितेमधील निरागस पणाचा वारसा आपल्या सर्वांना मिळावा हीच प्रार्थना..

9 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. कोमल मनाचा कवी...सुंदर लेख तन्मया

    ReplyDelete
  3. सुंदर नेहमीप्रमाणे च !

    गर्द सभोती माझ्या आई ने मला शोधून डाउनलोड करायला सांगितले होते, आणि मला ते मिळाले पण होते

    ReplyDelete
  4. हा blog पाहता पाहता मला असं दिसलं की तू काही कवी आणि लेखकांबद्दल लिहिलं आहेस.. (तू खरंच खूप जास्त मराठी साहित्य वाचलं आहेस! त्यामुळे तुझं मराठी पण खूप चांगलं आहे :p)
    पण तेंव्हाच मला उत्सुकता होती की बालकवींबद्दल आणि विंदा करन्दीकरांबद्दल तू काही लिहिलं आहेस का?? मी भरभर blog search केला.. आणि बालकवी दिसल्यावर लगेचंच वाचलं!
    एकदम बरोबर लिहिलं आहे! अगदी माझ्या मनातलं लिहिलं आहे.. साधारण असंच मलाही त्यांच्या कविता वाचल्यावर वाटलं होतं..
    पण मला माझं एक निरीक्षण/ मत इथे सांगवसं वाटलं म्हणून..

    निरीक्षण असं आहे:

    मला दोन महान कलावंतांमधे खूप साम्य वाटलं.. एक म्हणजे बालकवी आणि दुसरा म्हणजे none other than, one of the greatest music composer in Western classical, Motzart!!!
    तसा या दोघांचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाहिए.. (they were separated by space-time :p , cultural influences and what not..) पण एखादा कलाकार त्याच्या नावागावावरुन ओळखला जात नाही तर तो स्वःताचे अनुभव, विचार, इच्छा, श्रद्धा, भावना - कसे express करतो.. त्याच्या expressions ची ओढ़ कोणीकडे आहे.. यावरुन !

    आणि इथेच मला हे दोघे समान आहेत असं जाणवलं..
    म्हणजे लहान मुलं कशी निष्पाप आनंद वाटत सुटतात तसे आहेत हे दोघे.. बालकवींच्या कित्येक कविता या लहानपणी चं कुतूहल दाखवतात, आकाशात मुक्तपणे झेपावणाऱ्या पक्षांसारखे.. किंवा डोंगरावर पळणाऱ्या लहान मुलांसारखे भाव त्यात असतात.. तसंच अगदी Motzart चे pieces ऐकल्यावर वाटतं!
    त्यांच्या कलाविष्कारांमधे मरगळ कुठे नाही..
    जे वाटलं, ते निर्माण केलं! त्यात त्यांनी कुठे अतिविचार करुन नैसर्गीक निर्मळपणा घालवला नाही..
    मला "फुलराणि" कविता माहिती होती पण मी इतका वाचंत नसल्याने बालकवी माहित नव्हते, पण ती कविता पूर्ण वाचल्यावर रहावंतंच नाही!
    कुणी बनवली असेल?? कोणाला आहे अशी स्वच्छ सौंदर्यदृष्टी!!
    आणि मग सगळ्या कविता शोधायला सुरुवात!
    तसंच झालं Mozart चं,
    Turkish March माहिती होता..
    Twinkle Twinkle little star.. याचे शब्द नाही तर स्वर ऐकायला जेंव्हा शिकलो तेंव्हा समजलं की Motzart किती प्रामाणिक आहे! इतकं साधं संगीत पण किती प्रभावी..
    "इतना ना मुझसे तू प्यार बढ़ा" हे सलिल चं गाणं नसून Motzart's Symphony no. 40 आहे!
    Titan watches च्या advertises चं संगीत त्याचं आहे! आणि मग Motzart ला शोधलं..
    Motzart चं संगीत ऐकताना लहानपण आठवतं, जुने घर.. माती, आईचं relatively तरुण रूप, पाण्यात खेळण्याचे दिवंस.. अशा गोष्टी समोर दिसतात..
    या दोघाही कलावंतांना स्वातंत्र्य आवडतं..

    काही absolute गोष्टी जर खरंच या विश्वात असतील तर त्यापैकी एक म्हणजे- या कलावंतांना त्यांच्या express होण्याच्या पद्धतिवर असणारा विश्वास!

    ReplyDelete
  5. आणि त्यामुळेच ही निर्मिती intellectual / complex enough असो वा नसो, पण आहे Divine!

    ReplyDelete
  6. खूप छान 👌👌👌

    ReplyDelete