Sunday 10 January 2016

लोकलच्या मनातलं!

मुंबई आणि तिची लोकल..
.
मुंबईकराला तिच्या लोकलचा तितकाच अभिमान आहे जेवढा एखाद्या पुणेकराला त्याच्या दगडूशेठचा, एखाद्या कोल्हापूरकराला त्याच्या रंकाळ्याचा किंवा एखाद्या सातारकराला त्याच्या कंदी पेढ्यांचा!! अर्थात कधी कधी तिच्या उशिरा येण्याचा, दोन स्टेशन मध्ये थांबण्याचा राग येतो.. पण मला सांगा.. जवळपास ४६५ किलोमीटर मध्ये पसरलेली ही जेव्हा दररोज सुमारे ७५ लाख लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवते तेव्हा तिला थोडीशी चूकभूल माफ असायलाच हवी ना..
.
हिचं स्वतःचंच एक विश्व आहे.. स्टेशन मध्ये येताना ही एखाद्या राणीसारखी येते.. काही भाबड्या लोकांचा नमस्कार स्वीकारते.. अवघे १५-२० सेकंद थांबते आणि मग भोंगा वाजवत दिमाखात चालू लागते.. तिचा तो आवाज लोकांच्या कानात इतका बसतो कि आयुष्यभर लोकलने प्रवास केलेल्या चाकरमान्यांना निवृत्त झाल्यावर तो आवाज, ती धडधड ऐकली/अनुभवली नाही तर सुखाची झोप येत नाही..
.
या लोकल मधून तुम्ही जर रोज प्रवास केलात तर आपली पर्स, ओढणी/स्कार्फ, छत्री, गळ्यातील चेन/मंगळसूत्र, चप्पल आणि छोटी छोटी बछडी यांना घेऊन जगाच्या पाठीवर कुठेही प्रवास कसा करावा याचे क्लासेस घेऊ शकाल.. आठवा महिना असताना सुद्धा दादरच्या गर्दीत कर्जत पकडण्याची हिम्मत सुद्धा ही लोकल तुम्हाला मिळवून देते.. एक सल्ला मात्र आहे कुठे समारंभाला जायचं म्हणून सुंदर केशभूषा करून गर्दीच्या वेळेला लोकल मध्ये घुसू नका.. "शृंगाराचा" “अवतार” कधी होईल समजणार देखील नाही..
.
हिच्या पोटात एक वेगळंच जग असतं.. इथे तुम्हाला "१० मिनिटात बातम्या" असा talk show ऐकायला मिळेल.. सुगरणीचा सल्ला मिळेल.. "अग, तिथे नको जाऊ.. जेवण अगदीच सुमार आहे" किंवा "तिथे जात असाल ना तर या वेळेतच जा नाहीतर उगाच खूप वेळ जातो" अशा टिप्स ऐकायला मिळतील.. वर फुकटात सामान्यज्ञान वाढेल ते वेगळंच.. परवा याकुबला फाशी दिली गेली तेव्हा "मरेपर्यंत फाशी देणे" या कायद्यातील सुधारणेची कथादेखील मला ऐकायला मिळाली..
.
अगदी सुरुवातीला तुम्ही बिथरून जाल.. 'गाडीत जागा नाही मग कस घुसायचं' असं वाटून गाड्या सोडून द्याल.. पण एकदा का सराव झाला कि मग काय.. "चलो चलो अंदर चलो.. बहुत जगह है" म्हणत गर्दीला न जुमानता, दरवाज्यात विशिष्ट कोनात उभ राहून वारा खायची कला आपोआप साधू शकाल.. फूट बोर्ड वर असताना देखील bag मधून headphones काढून गाणी ऐकायला तुम्हाला अगदी सहज जमू शकेल.. चौथ्या सीट वर बसून सुद्धा एखादी कादंबरी वाचू शकाल.. शेजारच्या डब्यात चालू असलेला भजन enjoy करू शकाल.. आणि उभ्याउभ्या झोपूही शकाल..
.
या लोकलला जाती धर्माची बांधिलकी नाही.. रोज एकाच वेळेला प्रवास करणाऱ्या महिला एकमेकींच्या सख्या कधी होऊन जातात कळतदेखील नाही.. गणपतीला मोदकांची, ईदला शिरखुर्म्याची, ख्रिसमसला केक्सची देवाणघेवाण होऊ लागते.. वाढदिवसांपासून डोहाळेजेवणापर्यंत सगळं साजरं केलं जातं.. मनातली कित्येक गुपितं सांगितली जातात.. आणि तितक्याच तन्मयतेने ऐकलीही जातात..
.
विरार पासून चर्चगेट पर्यंत ८२ किलोमीटर फक्त दीड तासात पोहोचवणारी ही life-line.. जगात टिकून राहायचं असेल तर सतत धावत राहा असे संस्कार करणारी अशी ही मुंबईची सर्वव्यापी लोकल..

No comments:

Post a Comment