Sunday 10 January 2016

मुंबईची लाईफलाईन - लोकल!

मुंबई!! ही सदैव धावणारी.. सकाळी सहा असो किंवा रात्री दहा.. कायम तितक्याच निष्ठेने पळणारी.. आणि तिच्या या सततच्या धावपळीमध्ये अनेक दशकांहून अधिक काळ तिला साथ देणारी तिची lifeline - "लोकल"!!! आता, जरासा पाऊस झाला कि थोडा बोजवारा उडतो.. पण एक मात्र आहे ही लोकल दररोज लाख्खो लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्या-आणण्याचं काम अविरतपणे करत असते..
या लोकलचं स्वतःचं एक विश्व आहे.. आणि अर्थातच हे विश्व platform पुरतं मर्यादित नाही.. तर स्टेशनच्या दोन्ही बाजूला साधारण अर्धा किलोमीटर अंतरामध्ये पसरलेलं आहे.. कधी कधी त्याचा विस्तार जास्तदेखील असतो.. मुंबईमध्ये असं एकही स्टेशन नाही कि ज्याच्या बाहेर तुम्हाला खाण्या-पिण्याचे, पान-बिडीचे, कधी कपड्यांचे, पेनाचे, रुमाल-सॉक्सचे, किचेनचे, Headphonesचे छोटे छोटे stalls दिसणार नाहीत.. इथे seasonal गोष्टी सुद्धा असतात.. दिवाळीत फटके येतात, रक्षाबंधन आलं कि राख्या येतात... पावसाळा आला कि छत्र्या येतात.. तसं पाहिलं तर जरी इथे पाऊस पडत असला तरी उकाडा हा असतोच त्यामुळं स्टेशनच्या बाहेर लिंबू-सरबताचा stall हवा म्हणजे हवाच!!
या stall वाल्यांचं सुद्धा ना एक समीकरण असतं.. सकाळच्या वेळी जिथे वडा-चटणी मिळते तिथेच संध्याकाळी पर्सेस मिळतात.. मला सांगा resource management म्हणतात ते आणखी वेगळं काय असतं..
सामान्य माणूस सकाळी या विश्वात घुसतो.. नेहमी प्रवास करणारा असेल तर पास-धारक असल्याने तिकिटाच्या रांगेतल्या माणसांना मनातल्या मनात वाकुल्या दाखवत किती सेकंदांनी ट्रेन येणार आहे याचं गणित मांडत जिन्यावरून खाली येतो.. आपल्या platform वर पळतो.. इथेपर्यंत बायका आणि पुरुष बऱ्यापैकी समान वागतात परंतु एकदा platform वर आलं कि त्यांच्या वागण्यात बदल होतो.. पुरुष मंडळी बऱ्याचदा प्रेक्षणीय स्थळांच्या शोधात किंवा ट्रेन कधी येणार हे वाकून वाकून बघण्यात गुंतून जातात.. आणि बायका "अग, ८:४३ ची मिळेल ग मला.. ४ मिनिट लेट आहे.. निघाली कि सांगते" अशा संभाषणामध्ये व्यग्र होतात.. जर बायका नेहमीच्याच, एकाच वेळेला, एकाच ट्रेनमध्ये चढणाऱ्या असतील तर मग सिरिअलच्या story मध्ये, सासूच्या/नवऱ्याच्या/मुलांच्या गोष्टींमध्ये मग्न होतात.. display board वर गाडीला यायला १ मिनिट आहे हे दिसायला लागलं कि महिलावर्गात चलबिचल दिसायला लागते.. कोणी मोकळ्या केसांचा अंबाडा बांधायला लागते.. कोणी पाठीवर अडकवलेली sack पोटावर घेते.. कोणी ओढणीची गाठ मारते.. आणि सगळी गर्दी compress होऊ लागते.. मग ट्रेन येते आणि जमेल तितक्या लोकांना पोटात घेऊन पुढे जाते.. थोडावेळ स्टेशन 'नुकतीच मुलगी सासरी गेलेल्या लग्नघरासारखं' दिसतं आणि परत हेच चक्र सुरु होत.. सकाळी VT कडे जाणारे platforms गर्दीने तुडुंब भरतात तर संध्याकाळी उलट बाजूचे.. तीनही lines वर थोड्याफार फरकाने हेच चलतचित्र सुरु असत..
संध्यकाळ संपून रात्र सुरु व्हायला लागते तसं स्टेशन सुद्धा थकून जातं.. सगळ्या सामानाची सारवासारव करायला लागतं.. आजूबाजूचे stalls गाशा गुंडाळू लागतात.. आणि येणाऱ्या रात्रीमध्ये दुसऱ्या दिवशीसाठी लागणारी ताकद गोळा करण्यासाठी मुंबई स्वतःचा वेग कमी करू लागते..

No comments:

Post a Comment