Tuesday 23 September 2014

कोटि-सम्राट पु.ल. अर्थात भाई!!!

आनंदयात्री मध्ये आज वर आपण कवी कवयित्रींना भेटलो.. पण आज आपण भेटणार आहोत अशा एका माणसाला ज्याच्या उल्लेखाशिवाय मराठी साहित्य अपुरं आहे हे सातासमुद्रापार असणार्या लोकांना देखील माहित आहे.. हा माणूस तुफान विनोदी होता.. जातिवंत कलाकार होता.. जितक्या शिताफीने त्यांच्या बोटांनी लेखणी चालवली त्याच्या कैक पटीने जास्त कौशल्याने त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर केला.. यांनी स्वतःला कधीच पुस्तकांमध्ये अडकवून ठेवलं नाही.. चित्रपट, संगीत, नानाविध सफरी, समाजसेवा यांच्या मदतीने स्वतःला सतत समृद्ध केल आणि आपल्यासाठी अक्षय आनंदाचा ठेवा निर्माण केला..असे हे म्हणजे एक अत्यंत खळाळत आणि चैतन्यदायी व्यक्तित्व- अर्थात पु.ल. देशपांडे, आपले लाडके भाई.. सहवासात येणर्या प्रत्येकाला भारून टाकण्याची दैवी कला असलेलं असामान्यत्व घेऊन जन्माला आलेला एक परिस...
पु.लं बद्दल काय आणि किती लिहायचं हा खरचं खूप मोठा प्रश्न आहे..
"आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल." अस हे गुपित त्यांनी फक्त आपल्याला सांगितल नाही तर आयुष्यभर त्यांनी या तत्वाशी इमान राखलं..
हा माणूस लेखक तर होताच त्याच बरोबर सिनेमावाला होता, नाटकवाला होता, तानसेन होता, कानसेन होता,  त्यांच्याच भाषेत सांगायचं तर एक "सफरचंद" देखील होता.. आणि सर्वात महत्वाच म्हणजे एक जिंदादिल माणूस होता... पार्किन्सन झालेला असताना बाबांच्या आनंदवनात जाऊन राहून त्यांना हवी ती मदत करणाऱ्या या माणसाकडे अशी कुठली दिव्य शक्ती होती हे त्या विधात्यालाच माहित...
त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारी माणस आजही त्यांना विसरू शकत नाहीत.. म्हणूनच जेव्हा रेल्वेमधून जाताना नजर पेस्तन काकांना शोधते, पुस्तकी बोलणारा प्रत्येक जण गटणे वाटतो, मलबारहिलवर नंदा दिसतो, हिरव्या डोळ्यांचा मास्तर म्हणजे दामलेच वाटतात आणि वर्गातल्या गोर्या आणि घार्या डोळ्यांच्या मुलीमध्ये गोदाक्का दिसते तेव्हा लक्षात येत कि या माणसाने किती सहजतेने आपल्या रोजच्या आयुष्याला लेखणीबंद केल आहे आणि जाणवत किती अफाट माणूस आहे हा...
त्याचं लेखन आपण नुसत वाचत नाही तर जगतो.. त्यांचा प्रत्येक साहित्य प्रकार वाचताना अस वाटत हा माणूस स्वतः आपल्यासमोर बसून हे सगळ वाचून दाखवत आहे... म्हणून ते लिखाण फक्त लिखित न राहता उच्चारी होऊन जात आणि चिरकाल आपल्या मनात स्थान मिळवून जात.. विनोद हि परमेश्वराची देणगी असते... तो करता येण हे जितकं महत्वाच तितकंच तो समजण हे देखील...  पु.लं चा विनोद समजायला एक विशिष्ट मानसिकता लागते.. मध्यम वर्गीत मानसिकता... त्यासाठी "फोर्ट मधुन फिरताना, विंडो शॉपिंग करताना एखाद आवडलेलं घड्याळ त्याच्या अवास्तव किमतीमुळ घेता न आल्याची चुटपूट असावी लागते.. मलबार हिलवरचा प्रासाद बघताना 'हम्म, इथे घर हव होत.. ते असेल तर बाकी काही नको'..." अस वाटाव लागत, पण त्याच वेळेस "अलिशान प्रासाद असूनही एखाद्या हळव्या क्षणी खांद्यावर डोक ठेवाव अस कोणीच नाही, हा पैसा कुचकामाचा आहे त्याऐवजी एखादा सुहृद पुष्कळ आहे" असा साक्षात्कार व्हावा लागतो..  तरच त्यांचा नंदा प्रधान आणि त्या नंदाचा जिवलग मित्र आपल्याला भिडतो... कोकणची भौगोलिक, सामाजिक , सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी माहित असेल तरच "तिरकस विनोद करणारा, जन्मजात तैलबुद्धी असणारा, सानुनासिक आवाजात बोलणारा, तरीही प्रवासाला जाताना मनापासून शुभेच्छा देणारा, आंब्याला पाड आला नाही तर बायकोच्या आठवणीने गहिवरणारा अंतू बर्वा आपल्याला समजू शकतो...
हजरजबाबीपणा आणि पु.ल हे दोन समानार्थी शब्द आहेत.. त्यांचा हा गुण प्रत्येक ठिकाणी दिसून येतो.. त्यामुळ समोरच्याला गुदगुल्या होतात.. बोचणारे ओरखडे ओढण्याचा हिंसकपणा यांच्या विनोदात नाही.. उदाहरणच घ्यायचं झाल तर..
"माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका. एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखात ऎकत होते. हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, "तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती?" लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या." एखादा असता तर काहीतरी आचरट वाक्य बोलून मोकळा झाला असता पण आपले पु.ल. तसे नव्हते.. ते मोठ्यानं म्हणाले, "अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या 'वर्मा'वर नको रे बोट ठेवुस!"..
कोटि करण्यात तर यांचा हात कोणी धरण्याची सुतराम शक्यता नाही.. आता हेच बघा ना...
"एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पाताळाऎवजी पु.ल. चे 'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, 'प्रिय ___हिस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पाताळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच___!' त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रीकेखाली स्वाकक्ष्ररीनिशी त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच
व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!".. मला सांगा आपल्यापैकी कोणाला हे अस लिहिण सुचलं असत..??
व्यक्तिचित्रण हा पु.लंचा लाडका प्रांत होता.. नाथ कामात घ्या किंवा नारायण घ्या.. चितळे मास्तर घ्या किंवा माझ्या शत्रुपक्षातला कुलकर्णी घ्या... नाक,कान, डोळे हे जितके सहज दिसतात तितक्याच सहजतेने भाई हि सगळी मंडळी आपल्यासमोर उभी करतात.. नंदा मधल्या इंदूचच वर्णन घ्या हव तर... आपण तिला काकू बाई म्हणून मोकळे झालो असतो पण भाई कस सांगता बघा..
" इंग्लिश च्या वर्गात आम्ही सात-आठ जण होतो.. त्यात संपूर्ण देशी असा मी आणि इंदू वेलणकर नावाची एक मुलगी होती.. अर्धमागधीला जायची हि मुलगी फॉर्म भरण्यात चूक झाली आणि इंग्रजीच्या वर्गात अल्ली अस वाटावी अशी.. नऊवारी साडी, अंबाडा, हातात पुरुषांनी बांधव अस लट्ठ घड्याळ, हातावर भाराभर पुस्तकांचा ढिगारा आणि मंगळागौरीच जागरण करून आल्यासारखा चेहरा.. अशी हि वेंधळी मुलगी.." साक्षात काकूबाईपणा डोळ्यांसमोर उभा राहिलाच पाहिजे....
त्यांच्या या अलौकिक व्यक्तिचित्रणामागे दैवदत्त देणगी तर आहेच परंतु त्याचबरोबर प्रचंड निरीक्षण शक्ती आहे.. एखादी गोष्ट पहिली कि तिला योग्य ठिकाणी वापरायची हातोटी आहे..
या माणसाचा व्यासंग अलौकिक आहे.. "गुण गाईन आवडी" वाचताना वाटत एखाद्या माणसाला आयुष्याच सार्थक झाल अस कधी वाटेल जेव्हा यांची लेखणी चार कौतुकाचे शब्द लिहील.. मंगेशकर घराण्याबद्दल हे लिहितात,"परमेश्वराला जेव्हा गात व्हावस वाटल तेव्हा त्यान हे घराणं निर्माण केल.." अहाहा!! क्या बात है!
विनोद, लघुकथा याचं बरोबर नाटक हा देखील त्यांचा आवडता प्रांत... अस म्हणतात त्यांनी बरीच नाटक भाषांतरित केली... पण तसं करताना त्याला संपूर्णपणे मराठीच झबलं-टोपडं चढवल... दुसर्या भाषेचा किंचितही प्रभाव दिसू दिला नाही...त्यांनी  "सुंदर मी होणार"मधल्या बेबीचा झुंजार पणा ज्या ताकदीने मांडला त्याच ताकदीने दिदीची हळुवार प्रेमकथा मांडली.. आणि नावापुरते संस्थानिक असणार्या राजाची अगतिकता क्वचित दांभिकता देखील.. अतिशय सुरेख वाटत सगळ वाचताना.. नाटकाचा अंमल उतरत नाही लवकर... तशीच एक कलाकृती म्हणजे "ती फुलराणी"  "तुला शिकवीन चांगलाच धडा" हे जणू ब्रीदवाक्यच होऊन गेल नंतर...
गद्याबरोबरच पद्य देखील यांना भारी आवडायचं.. त्यांच्या काही खुमासदार ओळी फार प्रचलित आहेत... अत्यंत उथळ गीते लिहिणार्यांना शालजोडीतून मारताना ते अक्षरशः ज्ञानदेवांना म्हणतात..
"अहो ज्ञानियांच्या राजा, कशाला फुकाच्या गमजा..
एकेकाळी रचली ओवी.. व्हाल का हो नवकवी...
मारे बोलविला रेडा.. रेघ बी.ए.ची ओलांडा...
तुम्ही लिहावी विराणी... लिहा पाहू फिल्मी गाणी...
म्हणे अलन्दी गावात.. तुम्ही चालविली भिंत..
चालवून दावा झणी.. एक नाटक कंपनी...
बाप रखुमा देवी वर आमचे च्यालेंज स्वीकारा.."
कायम गुदगुली करणारीच रचना कशाला? कधीतरी अंतर्मुख देखील व्हायला हव... आज टाटा करताना उद्याची शाश्वती नसते हे समजून घ्यायला हवं..
"आताशा बुडणाऱ्या सूर्याला
'बरय उद्या भेटू अस म्हणालं'
कि तो म्हणतो, 'कशावरून?,
मधल्या रात्रीची तुला अजूनही इतकी खात्री आहे?
सूर्य आता म्हातारा झालाय' आणि जाता जाता सांगून जातात उद्यावर काही म्हणजे काही ठेवू नका... काय कल्पना आहे...!!!!
विनोदाचा अखंड वाहत झरा असणारे हे पु.ल.. त्यांचा विनोद सर्वश्रेष्ठ आहे.  कारण त्याला कारुण्याची झालर आहे... त्यांना ऐकताना अस कधीच होत नाही कि लेखाची शेवटची ओळ डोळ्यात पाणी आणत नाही.. मग ती "कुठल्याच चपलांच्या टाचा इतक्या झिजलेल्या नव्हत्या" हि असो किंवा "कोकणातल्या फणसासारखी इथली माणस देखील.. खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात.." हि असो.. उगाचच आत मध्ये काहीतरी हलत.. हळवं बनवत..तरीही सगळ हवहवस वाटत.. हे झाल त्यांच्या विनोदच वेगळ रूप.. परंतु "एक शुन्य मी" मध्ये हे स्वतःच एक वेगळच रूप दाखवून जातात... समाजातल्या काही जाचक गोष्टी त्यांना अत्यंत अशांत बनवतात आणि ते लिहून जातात.. "मानवी इतिहासात हे सदैव असेच चालत आले आहे का? गायन, वादन, नर्तन वगैरे कला देवळांच्या परिसरात वाढल्या म्हणतात. कला आपोआप थोड्याच वाढतात? त्या वाढवणारी हाडामांसाची माणसे असतात. त्या गायिका, त्या गायिका, नर्तिका यांना न गाण्याचे किंवा न नाचण्याचे स्वातंत्र्य होते का? एखाद्या गणिकेच्या कन्येला गावातल्या देवदर्शनाला येणाऱ्या स्त्रीसारखे आपल्या नवऱ्याशेजारी बसून त्या देवाची पूजा करण्याचे भाग्य लाभावे असे वाटले तर तिचे कुणी सालंकृत कन्यादान केल्याचा कुठे इतिहास आहे का? की कुत्र्याच्या जन्मकाळा पासून त्याला हाडकावरच वाढल्यामुळे, पुरणपोळी ही आपल्या खाण्याची वस्तूच नव्हे असे त्याला वाटावे, तसे त्या नर्तकींना लग्न ही आपल्या कामाचीच गोष्ट नव्हे असे आपण वाटायला लावले? अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ उठते. आणि कुठलेही मोहोळ उठले, की अंगावर फक्त डंख उठवणाऱ्या माशांशी मुकाबला करुन प्रत्येक जण त्याचा तो राहतो, तशी काहीशी माझी अवस्था झाली आहे. डोक्याला ही प्रश्नांची सवय लागलीच मुळी कशासाठी? डोळयांवर आघात करणाऱ्या गोष्टी टाळायच्या असतील तर डोळे त्या गोष्टींकडून दुसरीकडे फिरवता यायला हवेत! स्वत:च्या अपूर्णतेची जाणीव होत असताना अपूर्णाची पूर्णावस्था शून्याच्याकडेच स्वत:ला नेताना दिसते." हे वाचताना कुठतरी आपणही अस्वस्थ होतो.. स्वतःची मानसिक अवस्था दुसर्याच्या मानसिक अवस्थेशी कशी जुळवून घ्यावी याचा मोठा
वस्तुपाठ ते देऊन जातात.. अशा या माणसाच स्मरण मला कायम कृतार्थता देत आल आहे.. त्यांच्या शब्द-रत्नांनी कधीच मनात अढळ स्थान मिळवलं आहे.. आणि म्हणूनच यांच्या बद्दल लिहिताना काळवेळेच  भान राहत नाही... तरीदेखील आता थांबायला हव.. इति लेखन सीमा!!!

7 comments:

  1. तन्मया , यथोचित व्यक्तिचित्रण !
    ज्योतीने तेजाची आरती असे म्हण्टल्यास वावगे ठरणार नाही. पु.ल.सारख्या बहुआयामी व्यक्तिरेखेचे बहुतेक सर्व पैलूंना स्पर्श झालाय. भाषाही अगदी ओघवती व फार पांडित्याचे प्रदर्शन नसणारी ,असे असून देखील पु.लंचा अख्खा जीवनप्रवास डोळ्यासमोर तराळतो.

    ReplyDelete
  2. झकासच लिहिला आहेस नेहमी प्रमाणे , पण पुलं असल्याने हा खास आवडला :)

    ReplyDelete
  3. पुलं ही व्यक्ती त्यांच्या साहित्यापेक्षा मोठी होती. म्हणून ते जरा जास्त ग्रेट होते. :-) सुरेख लिहिलंयस

    ReplyDelete
  4. छान जमून आलाय लेख.. अभिनंदन. तुझे इनपुट्स जास्त दिसले यात, हे आवडलं.

    ReplyDelete
  5. पुलंचा इतका सुरेख गोषवारा याआधी वाचनात आला नव्हता ! खूप सुंदर ! (y)

    ReplyDelete
  6. सगळ्यात आधी हेच वाचलं. काही बोलायची गरज मला तरी वाटत नाही.

    ReplyDelete