Tuesday 9 September 2014

संयुक्त महाराष्ट्राचे लाडके बाबुराव!!



आज जे आपल्याला भेटणार आहेत त्यांच्यासारखा माणूस गेल्या दहा हजार वर्षात झालेला नाही आणि इथून पुढे दहा हजार वर्षदेखील होणार नाही... प्रखर वक्तृत्व, अचाट बुद्धिमत्ता, तिखट आणि जिव्हारी लागेल अस लिहिणाऱ्या लेखणीचा स्वामी,  प्रेमाला अत्यंत नाजूक धाग्यात बांधणारा आर्द्र मनाचा कवी... किती आणि कशी ओळख करून द्यावी!!!!! मला वाटत तुम्ही सगळ्यांनी पहिल्याच वाक्यावरून यांना ओळखल असणार.. हे आहेत महाराष्ट्राचे नव्हे तर संयुक्त महाराष्ट्राचे अत्यंत लाडके बाबुराव अर्थात आचार्य अत्रे!!!
अत्रेंना बालकवी व्हायचं होत.. कुसुमाग्रज व्हायचं होत.. पण संपूर्ण महाराष्ट्राच्या हसर्या आरोग्याचा वसा विधात्याने त्यांचा हाती दिला आणि इतर कोणासारख होण्याऐवजी अत्रे केशवकुमार झाले त्यांच्याच शब्दात सांगायचं तर "देवाच्या आळंदीला जाण्याऐवजी चोराच्या आळंदीला गेले.." अर्थात हे वाक्य फक्त त्यांच्या "झेंडूची फुले"साठीच आहे.. बाकी बाबुराव काय होते हे वेगळ सांगायची गरज नाही..
अत्रेंनी फक्त विडंबन काव्य लिहिली नाही तर अनेक नाट्यगीते, चित्रपटगीते देखील लिहिली.. आणि त्यात देखील प्रचंड विविधता आहे.. श्यामची आई मधल आशा बाईंच्या आवाजातलं "भरजरी ग पीतांबर " हे गीत भावाबहिणीच निस्सीम भक्तियुक्त प्रेम दाखवत.. एक एक शब्द तोलून घ्यावा असा आहे..
"भरजरी ग पीतांबर दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण
द्रौपदी बोलली, "हरिची मी कोण?
परि मला त्याने मानिली बहीण
काळजाचि चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देऊन प्रभु राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज!"
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून"

या मानलेल्या परंतु विलक्षण आणि अलौकिक प्रेमाला तोड नाही.. अमुल्य अशी मलमपट्टी झाली... अंतराची खुण पटली मग श्रीकृष्ण प्रसन्न झाले यात नवल ते काय!!!
" प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्‍ती तैसा नारायण
रक्‍ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटलि पाहिजे अंतरीची खुण
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रीती जी करिती जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्‍न"
अशा भावाबहिणीच्या नात्याला उलगडून सांगताना अत्रे जेवढे भावूक होतात तेवढेच ते इतरवेळेस मिश्किल आहेत.. प्रेयसी कशी हवी ते कोणीही सांगेल हो पण अत्र्यांनी बायको कशी हवी ते देखील सांगितल आहे...
"अशी, अशी बायको हवी
मला हो, अशी बायको हवी!
पोर असावी अल्लड भोळी
भाव निरागस लाजरी कळी
रुसवा-फुगवा तिचा असावा लाडिक अन्‌ लाघवी
अशी, अशी बायको हवी!
नार असावी नेक पतिव्रता
तिज लाजाव्या द्रौपदी, सीता
पतिपरायण सती असावी नेत्र न जी चाळवी
अशी, अशी बायको हवी!"
बायको होण्या आधी जेव्हा तो तिला पहिल्यांदा बघतो तेव्हा आपसूकच त्याचा मनात विचार येतात...
"ती पाहताच बाला कलिजा खलास झाला
छातीत इष्क-भाला की आरपार गेला
स्वर्गातल्या पर्‍यांना की वस्‍त्रगाळ करुनी
कमनीय देह विधीने रचिला तिचा छबेला
लावण्य काय सारे उकळोनि वा पिळोनी
त्या मस्त अत्तराचा भरला गमेचि बुधला
डौलात चालता ती, हत्ती वनात झुरती
रस्त्यात गुंड जमती तिज अन्‌ पहावयाला"
हे वाचताना सहज जाणवत कि तिच्या सौंदर्याने अनेक दिल खलास झाले आहेत.. आणि तरीही वर्णनात कुठेही हीन पातळीची तुलना नाही किंवा वाचणार्याला अवघडलेपणा यावा अस काही नाही...
हे सगळ वर्णन झाल तिच्या मागे.. जेव्हा तिला प्रत्यक्ष सांगायची वेळ येते कि " बाई ग, तुझा हा नखरा माझ्यासाठी जीवघेणा आहे तेव्हा शब्द लयकारीची कमाल करतात..
"तू सुंदर चाफेकळी । धमक ग पिवळी,
किती कांति तुझी कोवळी ।
तू नंदनवनीची चुकून अप्सरा आलिस या भूतळी ॥
स्वर्गात उमलली सूर्यफुलाची तू कळी ।
तू लावण्याची तिच्याच का पांकळी ।
वर्णिता तुला ही जीभ पडे पांगळी ।
हे काळीज माझे का चुरडुनी सदा तुझ्या पायदळी ॥"
तिच्या होकारासाठी आसुसलेल्या जीवाला जेव्हा तिच्या निरंतर सहवासाची हमी मिळते तेव्हा त्याचा आनंद एकाच काय सातही आभाळात मावत नाही.. आणि तो गाऊ लागतो,
"आज आपुल्या प्रथम प्रीतिचा संगम हा झाला
प्रेमफुलांच्या गळ्यात घालुनि हिंडुया माळा
नाचती झाडे, नाचती हो वेली
रानपाखरे वेडी झाली!
पृथ्वीवरती स्वर्ग धरेला भेटाया आला!
पहा कोयना इकडून येई
समोरून ही कृष्णामाई!
प्रीतिसंगम सखे असा हा जगामध्ये पहिला!"
अनेक भले भले लोक सांगून गेले हे प्रेमाचं दुखण औषधाने बऱ होत नाही, त्याला दुवाच हवी.. एकदा का दोघांनी प्रेमाची कबुली दिली कि मग या नाजूक जखमेला काही म्हणता काही चालत नाही..
"नाजुक ऐशा या जखमेला दवा नको पण दुवा हवा
निर्लेप अशा हृदयावरती मृदुल करांचा लेप हवा
या जखमेला तुझ्या प्रीतिचा असा मुलायम मलम हवा!
नको कुणी वेदना विशारद, नको कुणी तांत्रिक नवा
नकोच धन्वंतरी कुणी परि प्रणयाचा मांत्रिक हवा! "
हि झाली त्याची मनःस्थिती!! त्याच वेळेस ती देखील म्हणत असते,
"उगवला चंद्र पुनवेचा
मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा
दाहि दिशा कशा खुलल्या
वनिवनी कुमुदिनी फुलल्या
नववधु अधिर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गिचा"
हि प्रेमाची दुधारी सुरी अनेक यातना देते पण बर्याचदा त्या सुखावह असतात हेच सांगताना अत्रे म्हणतात,
"प्रीती सुरी, दुधारी!
निशिदिनी सलते जिव्हारी!
सुखवी जिवास भारी!
मधुर सुखाच्या यातना,
व्याकुळ करिती सतत मनाला!
अमृताहुनी विषारी!"
अशा या प्रेमात यशस्वी होण्याच सुख सगळ्यांना मिळताच अस नाही जेव्हा विफलता हाती येते तेव्हा जाणवत हे प्रेमळ जग फसवं आहे, त्यात राहण्यासाठी फार कठोर व्हाव लागत आणि तेव्हा देखील अत्र्यांचे शब्द आपल्यासाठी धावून येतात,
"प्रेम हे वंचिता । मोह ना मज जीवनाचा!
द्या कुणि आणून द्या प्याला विषाचा!
प्रीतिचा फसवा पसारा
भरली इथे नुसती भुते
कोणि नाही जगि कुणाचा!"
जगात कोणी कोणाच नाही हि जाणीव अत्यंत क्लेशदायक असते.. आपली इतिकर्तव्यता संपली कि या इहलोकाचा कंटाळा येतो.. मन पांडुरंगाच्या सांगावयाची वाट बघू लागत.. संध्यासमयी डोळे पैलतीराची वाट बघू लागतात..
"किती पांडुरंगा वाहू संसाराचा भार?
लक्ष चौर्‍याऐंशींची ही नको आता येरझार
अनाथांचा नाथ तुला बोलतात संत
काकुळती आलो आता नको बघु अंत
कोठे गुंतलासी राया, कोणाला ताराया?
पंढरीच्या राया, तुझ्या दंडवत पाया!"
                अत्रे म्हणजे महाराष्ट्राचा पुरुषार्थ होते.. मराठी अस्मितेच्या राजकारणाला वेगळ वळण देणारे धोरणी होते.. महाराष्ट्राचा स्वाभिमान होते.. अत्रे कलंदर होते क्वचित बिलंदर होते.. ते अष्टपैलू होते.. ज्या ज्या क्ष्रेत्रात ते गेले तिथे तिथे त्यांनी उत्तुंगता प्राप्त केली.. अखंड ३० वर्ष हा चौधाडा दुमदुमत होता.. टाळ्यांच्या गजरात नाहत होता.. रसिकांना मार्गदर्शक ठरत होता.. बर्याचदा ती शैली बेलगाम धावली आहे पण त्यामुळेच तेव्हा अनेक रथी-महारथींच्या डोळ्यात अंजन घातलं गेल आहे..  अशी माणस शतकातून एकदाच जन्माला येतात आणि त्या कालखंडाला स्वतःच नावरूप देऊन जातात.. स्वतःचा आगळा वेगळा ठसा निर्माण करतात ज्याला मिटवण कदापि शक्य नाही...
                                    इति लेखनसीमा..

1 comment:

  1. तन्मया...

    helicopter view असे ज्याला इंग्रजीत म्हणतात तसे तुझे प्रत्येक कवीचे गरुडावलोक्न असते बघ....

    अत्र्यांचे काव्य आमच्या पिढीला जास्त भावले कारण शालेय पाठ्यपुस्तकात त्यांच्या कविता इयत्तेप्रमाणे अर्थाच्या दृष्टीने वरवरच्या असायच्या आणि अशा ह्या अष्टपैलू कवीला लहान मुले फार आवडायची....

    ते मुद्दाम कथामालेत कथा सांगायचे...साने गुरुजी कथामाला ह्यातलीच एक. मी त्यांच्या तोंडून सुंदर कथा ऐकल्या आहेत...

    पण तेव्हाही आणि आजही कुणी मला विचारले की अत्र्यांच्या तुम्हाला आवडलेल्या चार सुरेख कविता सांगा आणि का आवडल्या हेही सांगा तर मी चांगलाच अडखळलो असतो...

    म्हणून तुझे कौतुक..

    आज अत्रे असते तर म्हणाले असते "दहा हजार वर्षात अशी मेधावी मुलगी झाली नाही...होणे नाही...

    ReplyDelete