Sunday 9 February 2014

बा. भ. बोरकर.



मराठी साहित्यामध्ये सौन्दर्यवाद कधी अवतरला याची नक्की माहिती नसली तरी तो बहरला मात्र यांच्याच कवितेतून..निसर्गातील सौंदर्यावर यांची निष्ठा होती.. शृंगारावर यांची श्रद्धा होती.. धारवाडला गेल्यानंतरही ' गोव्याच्या भूमीसाठी ' झुरणारा हा प्रीतीकवी - 'बाळकृष्ण भगवंत बोरकर अर्थात बाकीबाब!!!
गाथी पोथी वाचून दिवसाची सुरुवात करणार सात्विक, देवभोळ घर.. संध्याकाळी शुभंकरोती सोबत एक अभंग म्हणायचा हा घराचा शिरस्ता.. एक दिवस बा.भ. अभंग पाठ करायला विसरले मग काय म्हणता त्यांनी रचला एक स्वतः आणि 'बाकी म्हणे' अस म्हणून अभंगाचा शेवट केला.. तेव्हापासून ते सगळ्यांचे लाडके 'बाकीबाब' झाले..
गोमांतकाच्या आसमंतात त्याकाळी असणार्या भक्तीच्या सुगंधामुळे असेल कदाचित पण बोरकर अध्यात्मप्रवण होते. म्हणूनच प्रार्थनेचा अमूर्त अनुभव ते व्यक्त करू शकले..
' प्रार्थना तीच जी कवितेसारखी अचल असून स्पंदनशील
शब्दांच्या स्थावर शिल्पात बद्ध न झालेली
ती उगवते झाडासारखी प्राणाचे बीज भेदीत चढत राहते
हिरवीगार अग्निशिखा होऊन सतत सहज
असीम उर्ध्वाचा शोध घेत...'
निर्गुण, असीम, अनंत शक्तीला वंदन करताना ते म्हणतात
"अनंता तुला कोण पाहू शके ?
तुला गातसा वेद झाले मुके.
मतीमंद अंधा कसा तू दिसे ?
तुझी रूपतृष्णा मनाला असे.
तुझा ठाव कोठे कळेना जरी,
गमे मानसा चातुरी माधुरी.
तरूवल्लरींना भुकी मी पुसे,
"तुम्हा निर्मिता देव कोठे वसे ?"
त्यांच्या कवितेत जो भक्ती, सात्विकता या भावाविष्कार मुक्त संचार होतो त्याच श्रेय ते "ज्ञानेश्वरी"ला देतात ते म्हणतात, 'ज्ञानेश्वरी अकराव्या वर्षी माझ्या हातात आली अजूनही मी ती वाचत आहे तेव्हा सारे श्रेय त्या मायमाउलीचे.' ज्ञानदेवांची भक्ती करणारे बोरकर त्यांच्या समाधीचा करून प्रसंग रंगवताना म्हणतात
"ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत
वेद झाले रानभरी गोंधळले संत
ज्ञानदेव गेले तेव्हा ढळला निवृत्ती
आसवांच्या डोही झाली विझू विझू ज्योती
ज्ञानदेव गेला तेव्हा तडा विटे गेला
बाप रखमा देविवरु कटीत वाकला"
त्यांच्या अध्यात्माची परिभाषा जरी भारतीय असली तरी युरोपातील मानवतावादाचा, नव्या जाणिवांचा त्यांच्या मनावर पगडा होता त्यामुळेच ते तत्वज्ञान देखील अगदी सहज सांगून जातात,
"मार्क्सचा मज अर्थ हवा अन फ्रोईडचा मज काम हवा
या असुरांपरी राबवण्या तरी गांधीचा मज राम हवा... " गांधींवर त्याचं विशेष प्रेम! पण हे आकर्षण राजकीय नव्हत तर तो एका महामानवाच्या नैतिक सौंदर्याचा आदर होता त्यांचा गौरव करताना बाकीबाब म्हणतात ,"हरी आला हो हरी आला
भंग्या घरी हरी आला..."
अशा व्यक्तित्वाला प्रीतीकवी असण्याचा साक्षात्कार नवथर तारुण्यामधल्या एका प्रसंगाने झाला अस ते स्वतःच म्हणत.. वर्गातील एका अल्लड बालिकेने हलकेच त्यांना चुंबन दिले आणि कविता झाली,
"असा कसा मी तरुण निरंतर सांगू कैसे तुला
सहज अचानक झाकून डोळे तिने चुंबिले मला"
त्यांनी कधीच शारीर प्रेम नाकारलं नाही पण म्हणून या उत्कट भावनेला बीभत्स, उत्तान रूपही दिल नाही.. प्रेम स्पर्शातून व्यक्त होत यावर त्यांचा विश्वास होता. म्हणूनच ते म्हणतात,
"फुलल्या लाख कळ्या
स्पर्शसुगंधा घन अंधारी फुटल्या ग उकळ्या
ध्वनिकंपित तनुच्या शततंत्री
बंदी मन रतीमोहमंत्री
लय लागुनिया नाचु लागल्या स्वप्नीच्या पुतळ्या"
तारुण्यात प्रवेश करताना बोरकर सोबत असणारा माणूस कधीच अरसिक असू शकत नाही मग ती कविता
"तव नयनांचे दल हलले ग !
पानावरच्या दंवबिंदूपरी
त्रिभुवन हे डळमळले ग !" हि असो किंवा
"आयुष्याची आता झाली उजवण येतो तो तो क्षण अमृताचा.
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब तुझे प्रतिबिंब लाडेगोडे.
सुखोत्सवे असा जीव अनावर पिंजर्‍याचे दार उघडावे."
हि असो!!!
नावातच बाळकृष्ण असल्यामुळ प्रेमकविता हक्काची वाटत असावी त्यांना..
"स्मृती, जपानी रमलाची रात्र, श्यामा' या कविता प्रेमकाव्याची उधळण करतात...
"स्पर्शे तुझिया आणि पियानो थरारला सारा
मज सम त्याच्या कानशिलाच्या झणाणल्या तारा" अस म्हणत भावनांना मोकळ करतात...
कायम अत्तराचा फाया जवळ बाळगणारा, स्वतःच आणि दुसर्याच आयुष्य सुगंधी करणारा हा कवी
"तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे
स्वप्न आहे लोचनी तोवरी पाहून घे..
अस म्हणत स्वप्न बघत, दाखवत राहिला... खरच यांची प्रतिभा, सौंदर्यपिपासा, प्रेम व्यक्त करण्याचा मोकळेपणा मनाला लोभावतो.. त्याचं दिव्यत्व दाखवतो. म्हणून त्यांच्याच शब्दात त्यांना वंदन...
" दिव्यत्वाची जेथ प्रचीती
तेथे कर माझे जुळती " _____/\_____

4 comments:

  1. Mesmerizing...you introduced me to a legend today!

    ReplyDelete
  2. मस्त अभ्यासपुर्ण लेख..अतिशय सुंदर आणि वेचक वर्णन केलेले आहे..आवडले..
    Keep it up :)

    ReplyDelete
  3. Good 1 .. Keep it up.

    Did you forget - 'Jeevan tyaana kalale ...'?
    Here is link - http://www.aathavanitli-gani.com/Song/Jeevan_Tyana_Kalale_Ho
    :-)

    ReplyDelete
  4. अप्रतिम .."जगण्याचा उत्सव" करणारे कवी

    ReplyDelete