Tuesday 11 February 2014

शान्ता शेळके

तुम्ही कधी चष्मा लावलेली, कानाच्यावर दोन बोट ठेवून हसतमुखान समोरच्याशी बोलणारी सरस्वती पहिली आहे??? नाही म्हणता?? अहो आपल्या शांताबाईंना नाही पाहिलत ... साक्षात सरस्वती होत्या त्या...
कथा, कादंबरी, कविता, गीते, लावण्या, व्यक्तिचित्रे, ललित लेख, अनुवाद हे जवळपास सगळे साहित्यप्रकार त्यांच्या लेखणीमधून अवतरले आहेत!! बालगीत, अंगाईगीत, प्रेमगीत, विरहगीत सार काही या एका कवयित्रीने आपल्यासमोर मांडलं आहे...
लहान असताना आपण आपला रुबाब दाखवण्यासाठी
"खोडी माझी काढाल तर
अशी मारी फाईट
घटकेमध्ये विरून जाईल
सारी तुमची ऐट" अस म्हणल आहे...
" मी डोलकर डोलकर
डोलकर दर्याचा राजा" म्हणत नाच सुद्धा केला आहे...
पहिल्या वहिल्या प्रेमाची चाहूल लागताना
"आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे
स्वप्नाहुन जग सुंदर दिसले तुझ्यामुळे !
भाव अंतरी उमलत होते
परि मनोगत मुकेच होते
शब्दांतुन साकार जाहले तुझ्यामुळे !" अशी भावावस्था देखील अनुभवली आहे....
अनेक भावविभ्रम सुरेख शब्दरचनेत साकारणाऱ्या शांताबाईंच्या शब्दांना कधी गेयता मिळते ते कळतही नाही. भावकवितेच भावगीत होत.. तरीही कविता हीच त्यांची सखी राहते,
"हर्षखेद व गुज मनिची
मूक लाजर्या मनोभावना
लपवी ज्या जगपसुनि
प्रकटविते तुजपुढति त्यांना" अस म्हणत तिच्याशी त्या बोलतात, मोकळ्या होतात..
शांताबाईंनी फक्त स्त्रियांच्याच तरल भावना व्यक्त केल्या अस नाही तर
"तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मज समीप तीच तूहि कामिनी !"
अस म्हणत आपल्या सखीची आळवणी करणाऱ्या त्याची आर्तता देखील त्यांनी चित्रित केली..
"मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश" म्हणत भक्तीभाव जपला तर
"शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला" म्हणत आतुर प्रेयसीही जपली...
त्याचं अत्यंत सहजसुंदर काव्य त्यांच्या अतिशय समृद्ध, प्रांजळ, साध्या, सरळ, सहज व्यक्तिमत्वाचा परिपाक आहे...
मुलात मुल होऊन रमणाऱ्या त्यांना "आज्जीची पैठणी" आठवते.. निसर्गाची विविध रूपे अनुभवताना त्याचं मन हळवं बनत.. एखाद्या बुडणाऱ्या संध्याकाळी घराकडे परतणाऱ्या पाखरांच्या रांगा क्षितिजावर अगम्य संदेश लिहितात, सायंकालीन वारे कुजबुजतात तो निरोप त्यांच्या पर्यंत पोहोचतो.. त्यांना थोडासा एकाकी करतो..
तेव्हा त्या म्हणतात,
"सांज आली दूरातून, क्षितिजाच्या गंधातून !
मनी नकार दाटले, हात हातीचे सुटले
मागे वळून पाहता शब्दभाव सर्व पुसले
आले जीवन काळोखे सारे समोर दाटून ! "
जात, धर्म,पंथ सगळ्याच्या पलीकडे जाऊन प्रेम हाच जगाचा पाया आहे हेच त्या सांगतात,
त्या म्हणतात,
" पंथ, जात, धर्म किंवा नाते ज्या न ठावे
ते जाणतात एक प्रेम प्रेमास द्यावे"
इतक सगळ प्रेमळ लिहिताना कधीतरी त्यांच्या हळव्या मनाला अत्यंत त्रास होतो, दुसर्यांच्या वेदनेने वेदना होते.. शब्दांचा होणारा विपर्यास मनाला घर पडतो तेव्हा त्या म्हणतात,
"काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे !
सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ?
चिरदाह वेदनेचा मज श्राप हाच आहे !
काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे !
हा स्‍नेह, वंचना की, काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे !"
एकूणच काय तर पूर्वग्रह नसणारी अतिशय संवेदनशील वृत्ती, जगाबद्दलच उदंड कुतुहूल, आणि सरस्वतीचा वरदहस्त या सार्या त्यांच्या लिखाणाच्या प्रेरणा आहेत..माणसाच्या स्वभावाचे कंगोरे न्याहाळत, सूक्ष्म अनुभव लोकांपर्यंत पोहोचवत त्या लिहित राहतात, गात राहतात..
"जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच रहावे !"
खरचं शान्ताबाई तुमच्या कविता ऐकत गीत ऐकत अनेक पिढ्या घडल्या, घडत राहतील.. तुम्ही आमच्यासाठी "आनंदाचं झाड " आहात तुमचा "लोलक" आमच्या मनात चिरंतन राहील..तुमच्या शब्द्सामर्थ्याला माझा मनापसून सलाम...._____/\_____

3 comments:

  1. तुमच्या शब्द्सामर्थ्याला माझा मनापसून सलाम....

    ReplyDelete
  2. Khupch chhan ani oghavtya shailit lihile aahes..keep it up. :-)
    Would like to read one more such article on Suresh Bhat..

    ReplyDelete
  3. खूपच छान! :-)
    शांता शेळके ह्यांनी मेघदूताचा भावानुवाद केलं आहे..

    ReplyDelete