Sunday 23 October 2016

वेगाशी संग.. प्राणाशी गाठ!

अरे संजू हळू.. किती तो वेग.. या वेगाचीच मला भीती वाटते राजा..
आई, एकतर तू मला संजू म्हणत जाऊ नकोस. माझं नाव आहे ना संजय. आधीच ते जुन्या जनरेशन मधलं नाव ठेवून माझी इमेज डाऊन केली आहे तुम्ही, त्यात संजू म्हणजे डायरेक्ट स्टोनएजच.. आणि ते वेगाचं मला काही सांगत जाऊ नकोस. ऍज लॉन्ग ऍज मी स्पीड हॅण्डल करू शकतो, तू कशाला घाबरतेस?
बिचारी सविता, गप्प बसली. तरुण तडफदार अशा संजयची आई म्हणून अभिमानाने मिरवताना तिला खूप छान वाटायचं. तरीही अचानक कधीतरी मुलं वयात येताना त्यांना स्वतंत्र होताना बघून एक द्विधा मनःस्थिती असते ना की 'आपली पिल्लं स्वतःच्या मार्गाने जायला निघणार, स्वावलंबी होणार याचा आनंद आणि त्याच वेळेस त्यांचं आपल्यावर अवलंबून असणं संपत जाणार, सारखं 'आई, कुठे होतीस तू मला तुझी गरज आहे' असं म्हणत भिरभिरणारी पोरं लांब जाणार याचं दुःख' तसंच काहीसं वाटायचं तिला हल्ली. कुठेतरी तरी काहीतरी तुटतंय, काहीतरी बिनसतंय असं वाटत राहायचं.

संजय नुकताच कमावता झाला होता. सगळ्या गोष्टी एकट्याने करायची एक नशाच चढली होती त्याला. परवा तो त्याच्या मित्रांशी बोलताना तिने ओझरतं ऐकलं होतं. संजय म्हणत होता, 'साल्या, घराबाहेर राहतोयस तू. तुला नाही कळणार व्हॉट ऑल वी नीड टू गो थ्रू. शिकत असताना घरी असणं सुख असतं   पण एकदा कामवायला लागलो आणि घरच्यांसोबत राहत असू ना तर कटकट असते आयुष्यात.'
आपण आत्तापासूनच याच्या आयुष्यात कटकट वाटायला लागलो आहोत हे ऐकल्यावर सविताला प्रचंड वाईट वाटलं.

सविताची पिढी म्हणजे दिवसभर नोकरी करून, सकाळ संध्याकाळ घरासाठी राबणाऱ्या, सणासुदीला घरचाच नैवेद्य बनवून शक्य तेवढ्या ताकदीने सगळ्या परंपरा सांभाळणाऱ्या पापभिरू बायकांची पिढी. सकाळी लवकर उठणारी, देवपूजा करणारी, आपला गाव बरा असं म्हणत जगणारी, समोरचा कॉम्प्युटर बघून 'याला चालू कसं करतात रे' म्हणून गोंधळून जाणारी, 'मला ते व्हाट्सअप वगैरे काही जमणार नाही' म्हणत काहीच दिवसात ते सफाईने वापरायला सुरुवात करणारी शांत आणि सुखी पिढी. याउलट संजयची पिढी, कामाच्या ओझ्याखाली दाबून जाणारी आणि मग वर्क हार्ड पार्टी हार्डर म्हणत रात्र रात्र पार्टी करणारी, सदासर्वकाळ फेस्टिव्ह मूड मध्ये असणारी, सगळीकडे काहीतरी हॅपनिंग शोधणारी, माणसांपेक्षा ग्याजेटसमध्ये रमणारी, बालपणाची सुरुवात शुभंकरोतीने करणारी आणि आता 'हफ्तेमे चार शनिवार होने चाहिये' म्हणणारी, वेगवान पिढी. मेळ जमणं अवघडच होत होतं पण म्हणून आपण त्याला कटकट वाटू शकतो असं सविताला चुकूनही वाटलं नव्हतं.

मग मात्र तिने संजयच्या आयुष्यात लक्ष घालणं थांबवलं, लवकर उठ; व्यायाम कर; बाहेरचं खाणं बंद कर असं म्हणणंही थांबवलं. आई म्हणून आपली इतिकर्तव्यता संपली आहे असं तिने स्वतःला पटवून द्यायला सुरुवात केली. आईचं असं तुटक वागणं संजयच्या लक्षात आलं होतं तो मनातून सुखावला होता. आईला काही विचारलं तर भाषण सुरु होईल म्हणून त्याने शिताफीने विषयही काढला नव्हता.

असेच दिवस जात होते संजयचं वेगवान आयुष्य सविताच्या समाधानी आयुष्याला वाकुल्या दाखवत पुढे जात होतं. दर सहा महिन्यांनी जुन्या वस्तू olx वर जात होत्या आणि अमझोनवरून नवीन वस्तूंना घरी आणलं जात होतं. वीकेंडला मजा करू म्हणून आनंदाला पुढे ढकललं जात होतं. कामाच्या रगाड्यात संजयचा व्यायाम थांबला होता, पोटाने पुढे येऊन व्यावसायिक अनुभव दाखवायला सुरुवात केली होती. वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षीच संजय केसांनी जागा सोडल्याने पोक्त दिसू लागला होता. तरीही त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो सुखी होता.

एकेदिवशी सॅटर्डे नाईटआऊट साठी गेलेला संजय रविवारी दुपारपर्यंत घरीच आला नाही. जरावेळाने एक फोन मात्र आला, 'काकू हिरेमठ हॉस्पिटल मधून बोलतोय. संजयला ऍडमिट केलंय. माईल्ड ऍटॅक आला त्याला सकाळी. आता सगळं ठीक आहे, काळजीचं काही कारण नाहीये.' सविता लगेचच हिरेमठांकडे पोहोचली. संजय शुद्धीवर आला होता. शेजारी बसलेल्या आईकडे बघून त्याच्यातला संजू जागा झाला. आईच्या कुशीत तोंड लपवत, मुसमुसत तो म्हणाला, 'आई, कुठे होतीस तू मला तुझी गरज आहे गं, खरंच खूप गरज आहे' सविता त्याला कुरवाळत, शांत करत म्हणाली, 'मला या वेगाचीच मला भीती वाटत होती राजा. मी आहे ना, आता सगळं ठीक होईल.'
जाणत्या पिढीने पुन्हा एकदा वेगवान पिढीला आधार दिला होता. आणि आता तो आधार कधीच कटकट वाटणार नव्हता...

No comments:

Post a Comment