Thursday, 3 October 2019

शेवरीच्या काळजाची पमा आज्जी!


आठवणींचा गोफ कसा बांधला जातो आणि कधी तो अचानक सुटून सगळ्या आठवणी मोकळ्या होतात काssही सांगता येत नाही. काल सुपरमार्केट मध्ये एका बुटक्या, गुटगुटीत, हसऱ्या आजीला पाहिलं आणि पमा आजीची आठवण आली. साडेचार-पाच फुटाची उंची, मूळचा गव्हाळ पण उन्हात राबून रापलेला काळसर वर्ण, कपाळावर गोंदून घेतलेलं भलंमोठ्ठ कुंकू, बसकं नाक, त्यात एक चमकी, पांढरेशुभ्र दात आणि या सगळ्याच्या जोडीला सतत भिरभिरती नजर. पक्ष्याने श्वास घेतला तरी हिच्या नजरेतून ते सुटायचं नाही.
पमा आजीची आणि आमची गाठ पडली ती आम्ही नव्या घरी आलो तेव्हा. नववीत वगैरे असेन मी. आमचा गृहप्रवेश झाला आणि एक पन्नाशीची बाई एका हाताने डोक्यावरचा पदर सावरत शिरा घेऊन हजर. 'तुम्ही आलेले दिसलात, म्हणलं चला, मुहूर्ताला काहीतरी गोड न्यावं. त्यानिमित्ताने ओळख होते.. काय!!' पमा आजी जेव्हा पहिल्यांदा भेटली तेव्हा शेजार आणि सोबत हे समानार्थी शब्द होते. जग फार विस्तारलेलं नव्हतं. बरंच होतं म्हणा एका अर्थी.
पमा आजीची ओळख झाल्यानंतर आजी जवळ नसल्याचा सल बराच कमी झाला. मला आठवतंय, धनत्रयोदशीच्या दिवशी पमा आजी उटणं आणि तेलाची वाटी घेऊन यायची, सकाळी सकाळी. 'पोरींनो, आज बायकांची न्हाणी. चला तेल लावून घ्या पटापट.' म्हणत आमची मालिश करून द्यायची. काय सायीसारखे मऊ हात होते तिचे. एवढं काम करूनही ते इतके मऊ कसे असायचे देवच जाणे. ती म्हणायची, 'पोरींनो, दिवाळी हा असा एकच सण असावा कदाचित ज्यात प्रत्येकाच्या वाटणीला एकेक दिवस आहे. काल गरीब गाईचा झाला, आज आपला आहे.' पमा आजीमुळं आईला सासरीच एक माहेर मिळालं होतं. आम्हा बहिणींना मालिश करून दिलं कि ती आम्हाला खोलीच्या बाहेर काढायची. 'सुधा, चल गं. वर्षभर राबतो आपण आजचा दिवस लाड करून घेऊ.' म्हणत आईलासुद्धा मालिश करून द्यायची. नवीन घरी पहिल्या दिवाळीला हे झालं तेव्हा आईला रडू आवरलं नव्हतं. पमा आजी जे काही बोलायची त्यामागे कुठेतरी, काहीतरी खुपतंय हे आम्हाला जाणवायचं पण काय ते विचारायची कधी हिम्मत व्हायची नाही.
मध्यंतरी, मी बारावीत असताना आमच्या कामवाल्या मावशीने पमा आजीची थोडीफार माहिती आम्हाला सांगितली होती. 'बाई फार धीराची. नवरा कामासाठी म्हणून कायम दुसऱ्या गावी असायचा. शनिवार-रविवार यायचा इकडे. नवरा नाही त्यामुळं सासूने मन भरेपर्यंत सासुरवास लावला तिच्यामागे. पमाचा नवरा घरापासून लांब होता, घरवालीपासून नाही. या एकाच कारणासाठी पमा सगळं सहन करायची. चौकाच्या तोंडावर तिचं किराणामालाचं छोटं दुकान होतं. दिवसभर ती तिकडे राबायची. रात्र व्हायला लागली कि बापे यायचे दारू ढोसून. त्यांना बाईच्या स्पर्शाची भूक असायची. दोन चार चाकलेटं घेऊन हात लावता आला तर बरंच म्हणून ते संधी शोधायचे. पमा गपगुमानं काम करायची. एकदा एकानं जास्तच सलगी करायचा प्रयत्न केला तेव्हा समोर जो होता तो डबा त्याच्या डोक्यावर उलटा करून आरडाओरडा केला तिनं. तेव्हा बाईच्या अब्रूची किंमत होती समाजात. लोक आले धावत आणि त्या बाप्याला बेदम मारलं त्यांनी. तेव्हापासून पमाच्या वाट्याला कोणी गेलं नाही. दुकान आणि घर सांभाळत पमानं पोराला शिकवलं, साहेब बनवलं. संतोष कितीदा बोलावतो हिला नगरला, पण ही जात नाही. म्हणते, 'नवरा कधी नव्हे ते बरोबर आहे राहायला, सासुरवाससुद्धा संपलाय. तुम्ही पोरं राहा सुखानं.' सासू-सुनेचं दुष्टचक्र तोडलं हिनं म्हणून सूनसुद्धा फार प्रेमाने वागते हिच्याशी.'
पुढे मी शिक्षणासाठी म्हणून घर सोडलं आणि पमा आजीचा व माझा संबंध फक्त जेव्हा घरी जाईन तेव्हाच यायला लागला. तिची आठवण मात्र कायम यायची. खास करून पौर्णिमेचा चंद्र बघताना. नवीन घरांत गेल्यावर काही महिन्यातच गावात लोडशेडींग सुरु झालं. अशाच एका पौर्णिमेला गावात दिवे नव्हते, चंद्र नुकता उगवत होता, चांदणं पसरायला सुरुवात झालेली. पमा आजी आली आणि सगळ्यांना अंगणात घेऊन गेली. 'पोरींनो, पौर्णिमेचं, पहिल्या पावसाचं, पानगळीचं आणि तान्ह्या बाळाचं सौंदर्य न बघण्याचं पाप करू नका.' पाप-पुण्याच्या तिच्या कल्पना फारच वेगळ्या होत्या. ती दृष्ट काढायची, मन शांत व्हावं म्हणून स्तोत्र म्हणायची, तुळशीला नमस्कार करायची पण तिने कधी भरमसाठ उपास तापास करून स्वतःला त्रास करून घेतला नाही, मारुतीला, शनीला तेल वाहिलं नाही की कुठे दुधाचा अभिषेक केला नाही. तिच्या घरात आलेल्या कोणालाही उपाशी पोटी मात्र कधीच झोपू दिलं नाही.
पमा आजी आणि आजोबा पत्ते खेळायचे. कोणी आलं साथीला तर त्याला घेऊन नाहीतर दोघंच. २४ तास कमी पडतील असं काम करून थकलेले जीव ते. आता २४ तास खायला उठायचे त्यांना. मग रम्मी, अठ्ठीडाव, डमी खेळाडू घेऊन लॅडीस वगैरे वगैरे.. आम्ही गेलो कि हक्काने आमच्याबरोबर चॅलेंज खेळायचे. आजोबांची जीत ठरलेली. 'जन्मभर खरं बोलला नाहीत. जिंकणारच कि चॅलेंजमध्ये..' हे आजीचे टोमणेही ठरलेले असायचे. एकदा या ठरलेल्या संवादात अचानक आजोबा म्हणाले, 'थांब, आज खरं सांगतो.. 'मला फार आवडतेस तू..'' आजीला कुठं तोंड लपवू असं झालेलं..
मध्ये घरी गेले तेव्हा आई म्हणाली, 'राजा राणीचा डाव अर्ध्यावरतीच मोडला. भातुकलीच्या खेळात राणी गेली, इथे राजा सोडून गेला..' मला फार वाईट वाटलं. आयुष्यभर मधू इथे अन चंद्र तिथे असं जगलेलं जोडपं. 'चालायचं गं, त्याच्यापुढे आपलं काही चालत नसतं..' पमा आजी मलाच समजावत होती. 'आता मी ना, संतोषकडे जावं म्हणते. तो बोलावतोय कधीपासून. तिकडे जाईन, पुस्तकं वाचेन, बागकाम करेन पण इथे नाही राहू शकत. हे घर, हे अंगण, हा पत्त्यांचा कॅट खायला उठेल मला. मला भेटायला येशील ना नगरला?' फार फार आतून भरून आलं मला.
पमा आजी नगरला गेली आणि आमच्या गप्पा फोनवर सुरु झाल्या. विषय तेच. पण माझी फिरकी घ्यायला, मला 'मग, कधी करताय लग्न?' म्हणून त्रास देण्यात तिला मजा यायची. यथावकाश माझं लग्न ठरलं आणि तिला पत्रिका द्यायला मी नगरला गेले. नमस्कार करताना म्हणलं, 'आजी नक्की यायचंय लग्नाला.. तुझ्या लेकीची लेक आहे मी.' कधी नव्हे ते फार शांत आवाजात ती म्हणाली, 'पोरी, वय झालं माझं. आत्ता इथे गाठ पडली. लग्नाचं काही सांगता येत नाही बघ.' तेव्हा हा निरोप शेवटचाच असू शकतो हे जाणवलं आणि माझेच डोळे भरून आले. ते बघून पमा आजी म्हणाली, 'अगं, वेडी का काय, तुझ्या लेकीला न्हाऊ-माखू घातल्याशिवाय कुठे जात नाही मी.' सुदैवाने पमा आजी लग्नाला आली आणि मला हायसं वाटलं. तिने आम्हाला मनापासून आशीर्वाद दिला. आणि नवऱ्याला म्हणाली, 'जावईबापू,' मध्येच माझ्याकडे बघत, 'हसू नको गं, ज्याचा मान त्याला द्यायलाच हवा..' तर जावईबापू, जरा आगाऊ आहे, पण पोरगी गुणी आहे. संसार चांगला करील. फक्त घरात उंचावर काही ठेवणार असाल तर आधीच एक-दोन स्टूल्स आणून ठेवा. पोरीची साथ मात्र कधी कधी सोडू नका. सुखाने नांदा!
आज तीन वर्षं झाली पमा आजीला भेटून. सुदैवाने, तिच्या घरचा गंगाजलाचा गडू सीलबंदच आहे. तिची आणि माझी आता कधी गाठ पडेल देवच जाणे. देवसुद्धा अशा माणसाच्या फार कमी आवृत्त्या काढतो, लोकांना उगाच गोडाचं अजीर्ण नको व्हायला!
-तन्मया

अस्तु!!!


कालच अस्तु पाहिला. बरेच दिवस पाहायचा होता पण मुहूर्त लागत नव्हता.
अस्तु.. सो बी इट. आपल्या मराठीत असो!!
अस्तु पाहिला आणि आयुष्यभर 'अस्तु'च्या चालीवर जगलेले अण्णा आठवले. त्यांना स्मृतीभंश नव्हता. पण ते कायम वर्तमानात जगले म्हणून आठवले.
अण्णा परांजपे. त्यांना साऱ्या जगाने ओळखावं एवढं मोठं नाव असण्याचं काहीच कारण नव्हतं. अण्णांच्या हाताखालून गेलेली मुलं गणितं करताना कॅल्क्युलेटर वापरत नाहीत हीच काय ती त्यांची ख्याती. त्याला कारणही तसंच होतं म्हणा. गावात असलेल्या एकमेव शाळेत छत्तीस वर्ष गणित शिकवलं त्यांनी. वैदिक गणितापासून अबॅकसपर्यंत सगळं. अण्णांच्या वर्गात पोराला घातलं की तीसापर्यंत पाढे, वर्ग, घन, वर्गमुळं, प्रमेयं, क्लृप्त्या, सूत्रं वगैरे सगळं सगळं पोरांना येतं हे अख्या गावाला माहित होतं. त्याकाळी गावात मॅथ्स ऑलिम्पियाडचा एवढा बोलबाला नव्हता नाहीतर अण्णांची खास अकादमी निघाली असती.
मुलं सहावीत गेली की खास हुशार मुलांची म्हणून एक स्कॉलर बॅच काढली जायची शाळेत. सातवीच्या स्कॉलरशिपची तयारी म्हणून. 'अनलर्न अँड रिलर्न' वगैरे प्रकार आमच्या लहानपणी नव्हते. विषय शिकवतानाच त्याचा पाया पक्का केला जायचा. पावकी, दिडकीचा जमाना गेलेला. पण पाढे होते. त्या अखंड चौकोनांच्या वहीत दोन ते तीस पाढे लिहिले नाहीत म्हणून कित्येक मुलामुलींना वर्गाबाहेर जावं लागलेलं आहे. चुकीला माफी नाही हे तत्व होतं. फक्त अण्णांचं नाही तर त्या पिढीचंच. पालकदेखील मुलाच्या अभ्यासात 'पोरगं यत्ता पुढं जात आहे ना म्हणजे बरं चालू आहे' इतपतच लक्ष देणारे होते. तेव्हचा काळच तसा होता म्हणा.
तर, त्या खास स्कॉलर बॅचला पंढरीनाथ राण्यांचं क्लृप्त्या आणि सूत्रे घेऊन अण्णा वर्गात यायचे. वास्तविक ते सगळं पुस्तक त्यांना पाठ होतं. त्यामुळं केवळ आम्हाला गरज लागली तर नाव सांगता यावं यासाठीच ते आणलेलं असावं असंच आम्हाला वाटायचं. अण्णा शिकवायचे मात्र फार छान, मृदू आवाजात. एखाद्याच्या ऋजुतेचासुद्धा धाक असतो. म्हणजे असायचा. तसं होतं अण्णांचं. त्यांचा शांतपणा हीच त्यांची सगळ्यांत मोठी ताकद होती. ते शिकवायला लागले की पंचेचाळीस मिनिटांची तासिका कधी संपायची ते समजायचंच नाही. त्यामुळं इतरांना सगळीकडे गळके हौद, भिंत चढता न येणाऱ्या पाली आणि कामचुकार मजूर दिसत असायचे आणि आम्ही मात्र इतक्या मुद्दलाची, इतक्या टक्के दराने किती वर्षात दामदुप्पट होईल हे चुटकीसरशी सांगायचो. अण्णांमुळेच पुढे अकाउंटला त्रास झाला नाही. त्यांचे कितीतरी विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात CA झाले. अण्णांचा घोकंपट्टीवर विश्वास नव्हता. मुलांना समजेपर्यंत ते वेगवेगळ्या पद्धतीने समजवायचे. आणि मग जे समजलंय ते लिहायला सांगायचे. मध्येच एखाद्याला, 'पाठक, काय लिहिलंय ते जरा वर्गाला सांगा बरं..' म्हणत सामूहिक उजळणी करून घ्यायचे. ते म्हणायचे, 'तर्जनी आणि अंगठ्यात पेन/पेन्सिल/खडू काहीही धरून तुम्ही एखादी गोष्ट गिरवलीत की ती मेंदूत फिट्ट बसते.' परवा एका शोधनिबंधात 'सर्वेक्षणाअंती' निघालेला हाच निष्कर्ष वाचला आणि अण्णांची शिकवण्याची पद्धत अत्यंत योग्य होती याची खात्री पटली.
अण्णांनी या शिक्षण कार्याला आयुष्य वाहून घेतलेलं. त्यांनी माझ्या आत्याला शिकवलं, बाबांना शिकवलं आणि मलाही शिकवलं. बाबांनी नाटकात वगैरे काम केलेलं होतं. ते कदाचित अण्णांना आवडलं नसावं. त्यामुळंच की काय 'त्या नाटकवाल्या वासूची ना गं तू..' असं म्हणतच आमची ओळख झाली. अत्यंत साधे राहायचे अण्णा, त्यांच्या स्वभावाला साजेसं. स्वच्छ, पांढराशुभ्र शर्ट, करड्या रंगाची पॅन्ट, काळ्या रंगाचा जाड फ्रेमचा चष्मा, बारीक कापलेले केस आणि पायात चामड्याच्या चपला. बाबांनी त्यांचं जसं वर्णन केलं होतं तसेच ते होते. बाबांच्या वेळेस सायकलने शाळेत यायचे, आमच्यावेळेस लुना आली हाच काय तो फरक.
आम्ही शाळा सोडली, काही वर्षातच मुलांच्या ज्ञानार्जनाचा उत्साह कमी झाला आणि शाळेच्या ध्येयामध्ये अर्थार्जनाचा नंबर वर लागायला लागला. तेव्हा मात्र अण्णांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि अत्यंत माफक दरात मुलांसाठी शिकवण्या सुरु केल्या. मला आठवतंय, कित्येक वर्षं अण्णांनी एखाद्या गरीब मुलाला स्वतःच्या घरी ठेवून घेतलेलं. त्याचं सगळं शिक्षण होईपर्यंत. ते म्हणायचे, 'या समाजाचं फार मोठं देणं लागतो आपण. जितक्या पद्धतीने ते चुकवता येईल तेवढं चांगलं!' अण्णा कायम वर्तमानात जगायचे. कोणी त्रास दिला तरी वैषम्य नाही, नातेवाईकांनी लुबाडलं तरी त्रागा नाही. खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञ. त्यांच्या या मानसिकतेची बऱ्याचदा चेष्टा व्हायची. 'स्वतःच्या मुलांना खायची भ्रांत असताना हे विकतचं दुखणं कशाला हवंय म्हणून..' पण करत असलेल्या पुण्याची कुठेतरी नोंद होतं असावी. म्हणूनच आज त्यांच्या दोन्ही मुलांचे सांसार उत्तमरीतीने सुरु आहेत. अत्यंत गुणी सुना आहेत. तीन संसार तीन घरात पण एकाच कुटुंबात सुरु आहेत.
माझी शाळा संपून इतकी वर्षं झाली पण अजूनही गावी गेलं की अण्णांची भेट घेतल्याशिवाय मन भरत नाही. त्यांचा तो हळुवार आवाज, शांत डोळे आणि एकूणच समतोल देहबोली आश्वस्त करतात. त्याच्याकडचा तो तासभर पुढच्या भेटीपर्यंत पुरतो.
मध्ये एकदा गेलेले त्यांच्याकडे तेव्हा ते TV बघत होते. Byju's learning Appची जाहिरात लागलेली. मला बघून TV बंद करत अण्णा म्हणाले, 'बघितलंस, काय काय तंत्रज्ञान आहे. चांगलंच आहे म्हणा. पण फक्त हातचा चुकला म्हणून रडणाऱ्या पोरांना समजवायला जमलं की झालं..' माझेच डोळे पाणावले. जराजीर्ण नाही पण वार्धक्याकडे झुकणाऱ्या त्या हाडाच्या शिक्षकाला बघताना मला अभिमानही वाटत होता आणि वाईटही वाटत होतं.
अण्णांची आणि माझी आता वीसेक वर्षांची ओळख. त्यांची स्वतःपुरती एक जनरीत आहे असं मला कायम वाटत आलेलं आहे. कोणी गेलं म्हणून अण्णांनी कधी फार शोक केल्याचं आठवत नाही. ते म्हणायचे, 'येणारा जीव, जाणारच. गेला तो. त्याचा झाला भूतकाळ. येणारा जीव भविष्य घेऊन येत असतो त्याचं कौतुक करायला हवं.' मुलगी जन्माला आली तर त्यांना विशेष आनंद व्हायचा. ते म्हणायचे, 'विश्वाची कूस आहे मुलगी म्हणजे. मुलगा पोशिंदा म्हणता तर मुलगी पालनकर्ता आहे. असा विचार सगळ्यांनी केला तर काय बहार येईल.. अस्तु!!!!'
हा एक अस्तु ह्या एवढ्या आठवणींना घेऊन आला. आता पुन्हा जाईन तेव्हा इराची आणि अण्णांची गाठ घालून द्यायला हवी. तिला भेटल्यावरसुद्धा अण्णा म्हणतील, 'त्या नाटकवाल्या वासूची नात ना गं तू..?' आणि गुरु-शिष्येचं हे नातं असंच अभंग राहील. ते बघताना डोळे टिपायला एखादा रुमाल मात्र आठवणीने न्यायला हवा.. अस्तु!!!
-तन्मया..


शिवराळ मानसिकतेचा उगम!


मुलं लहान असतात तेव्हा एक जण म्हणतो, 'मी आज खेळायला येणार नाही.. आईने काम सांगितलं आहे..'
त्याला एखादा दांडगट उत्तर देतो, 'तुझ्या आईचा घो..' पब्लिक हसतं.
लहान मुलाला वाटतं, आईचा घो' म्हणलं की लोकांना आवडतं..
पुढे मुलं मोठी होतात, शिंगं फुटतात. मुलगा म्हणतो, 'आज मला हे काम जमणार नाही, आई नाहीये घरी. त्यामुळं मला बाहेर पडता येणार नाही. '
तेव्हा उत्तर येतं, 'तुझ्या आईचा भो@&.. दरवेळेस तुझं काहीतरी कारण असतं..'
मुलगा म्हणतो, 'भो@& म्हणजे काय?'
उत्तर येतं, 'अर्थ नाही माहित..'
मुलगा विचारतो, 'अर्थ माहित नसताना बोलायचं कशाला..'
उत्तर येतं, 'अरे भारी वाटतं..'
मुलाला पटतं.. - आईचा भो@& म्हणलं की भारी वाटतं..
आणखी काही वर्षांनी मुलगा नोकरी करायला लागतो. सुट्टीचा प्लॅन बनतो. आणि अचानक ऑफिसचं काम निघतं. मुलगा म्हणतो, ' मला ट्रीपला यायला जमणार नाही.. बॉसने काम सांगितलंय. डेडलाईन प्रेशर आहे..'
तेव्हा उत्तर येतं, 'तुझ्या मॅनेजरच्या आईचा ल$&. आजच काम द्यायचं होतं त्याला.. त्या आईघा%* लाव घो&. आणि चल...' आतापर्यंत मुलाच्या मनावर ठसलेलं असतं की अशा गोष्टींचे अर्थ शब्दशः घ्यायचे नसतात. त्याच्या डोक्यात फिट्ट बसलेलं असतं की कोणी एखाद्याचं नाव सांगून काम होत नाही म्हणलं की त्याच्या आईचा भो@&, $& म्हणलं की भारी वाटतं.. मेंदूचं क्लासिक कंडिशनिंग होत राहतं. एखाद्याचं नाव घेऊन कोणी कामं होऊ शकत नाही म्हणलं की त्याचा आईला शिव्या द्यायच्या. आपल्याला बरं वाटतं.. भारी वाटतं..
आता मला सांगा, या मानसिकतेच्या जोडीला, सत्तेचं पाठबळ, दारूचा अंमल, बेफिकिरी, मग्रुरी असेल आणि अशावेळेस कोणी म्हणलं, 'साहेब दोन दिवसांनी शिवजयंती आहे. काम होणार नाही..' अशावेळेस तो सत्तेवर असणारा काय उत्तर देईल?
जे उत्तर आलं ते आपण ऐकलंच... मग त्याने शिवरायांना शिव्या घातल्या म्हणून गदारोळ झाला. प्रत्येकाने तापल्या तव्यावर पोळी, फुलके, काय हवं ते भाजून घेतलं. महाराजांना शिव्या दिल्या म्हणून आपल्या महाराष्ट्रीय अस्मितेला धक्का पोहोचला. त्या माणसाला कठोर शिक्षा व्हायला हवी वगैरे मागण्यादेखील झाल्या. पण आपण हा विचार केलाच नाही, या सगळ्याचं मूळ कशात असावं? त्याला खरंच महाराजांना शिव्या द्यायच्या असतील का? एकूण परिस्थिती, जनमानसाच्या भावना, राजकारण लक्षात घेता अजूनतरी महाराजांना अर्वाच्य बोलावं अशी कोणाचीही हिम्मत होणार नाही. मग असं का झालं असेल? एकूणच ही अशी उठसूट शिव्या देण्याची मानसिकता का निर्माण होत असेल?
लहानपणापासून आई-बहिणीवरून शिव्या दिल्या नाहीत तो मुलगा पुळचट आहे हे या ना त्या प्रकाराने मुलांच्या मनावर बिंबत असतं. महान व्यक्तीला शिव्या देणाऱ्या माणसाला शिक्षा देण्याची मागणी होते पण येता-जाता आई-बहिणीच्या अंग-प्रत्यंगांचा विशेष उल्लेख करून अर्वाच्य बोलणाऱ्यांना कोणीच कधीच काहीच म्हणत नाही. हे मात्र माझ्या पचनी पडत नाही.
माझा आणि शिव्यांचा संबंध सुदैवाने फार उशिरा आला. इंजिनिअरिंगला असताना आमीरचा देल्ली-बेल्ली आलेला, तेव्हा कोणीतरी सांगितल्यावर मला समजलं की यातल्या एका गाण्यात खुलेआम शिवी वापरली आहे. एवढं माझं ज्ञान अगाध होतं. यात अभिमान वाटावा असं काहीच नाही. पण न्यूनगंड वाटावा असंसुद्धा काही नाही. शिव्या देत नाही म्हणून माझं कोणी ऐकत नाही का? तर असं अजिबात नाही. गोड बोलून, सामंजस्याने घेऊन जितक्या सहजतेने कामं होतात तेवढ्या सहजतेने शिव्या देऊन होत नाहीत.
आई-बहिणीवरून शिव्या देणं, 'अगं, we don't mean it..' वगैरे म्हणून शिव्यांना पाठीशी घालणं हे तर मला कधी समजूच शकत नाही. अशातच मग Parched नावाचा सिनेमा येतो. पुरुषी अहंकाराखाली भरडल्या गेलेल्या बायका गावाबाहेर जाऊन बाप आणि भावावरून शिव्या देतात. 'तुम्ही आई-बहिणीवरून शिव्या द्या.. आम्ही बापा-भावावरून देतो..' हे उत्तर कसं असू शकतं?
गाडी चालवताना कोणी गाडी मध्ये घातली, त्याच्या आई-बहिणीचा उद्धार होतो. कुणी पैसे बुडवले, फसवलं, त्याच्या आई-बहिणीचा उद्धार होतो. फार मोठ्या गोष्टी कशाला? भारत-पाक सामन्याच्या वेळेस आफ्रिदी संघात असुदे नसूदे, त्याच्या आईचा उद्धार होतो. का? म्हणजे एखाद्याने चूक केली किंवा एखाद्याच्या एखाद्या कृतीमुळे तुम्हाला त्रास झाला तर त्याच्या आई-बहिणीला लांच्छन का?? आणि हे बोलून दाखवलं तर 'अशा शब्दांचे अर्थ जसेच्या तसे घ्यायचे नसतात गं..; किंवा 'तुमच्या मनात पाप आहे म्हणून तुम्हाला यामुळं त्रास होतो' वगैरे म्हणून विषयावर पडदा!! का??
मला कायम वाटतं. जोपर्यंत या आई-बहिणीवरून दिल्या जाणाऱ्या शिव्या बंद होत नाहीत तोपर्यंत तुम्ही कितीही डोकी आपटा, स्त्रियांबद्दल आदर निर्माण होऊ शकत नाही. शिव्या देताना कुठे ना कुठेतरी अनादर निर्माण होत असतो. शब्दांमध्ये तेवढी ताकद नक्की असते.
आता सगळ्यांना सुधारायचा मक्ता तर आपण घेऊ शकत नाही. मुलं मोठी होत असताना त्यांच्या कानावर या शिव्या पडणार नाहीत याची हमीही देऊ शकत नाही. परंतु, आपली मुलं(मुलगा आणि मुलगीदेखील) कोणाच्याही आईवरून, बहिणीवरून, तिच्या योनीवरुन शिव्या देऊ नयेत एवढी खबरदारी नक्कीच घेऊ शकतो.
नाहीतर काय??? उत्तर द्यायला काळ समर्थ आहे...!!!
टीप-
१. त्याने महाराजांना शिव्या दिल्या हा अक्षम्य अपराध आहे. त्याचं समर्थन करण्याची दुर्बुद्धी मला झालेली नाही.
२. आजकाल फक्त मुलगेच शिव्या देतात अस नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. मुद्दा लिहायला सोपा जावा म्हणून मुलाचं प्रातिनिधिक उदाहरण घेतलं आहे.
या दोन्ही बाबी लक्षात घेऊन पोस्ट वाचावी, उगाच तलवारी उपसून अंगावर येऊ नये!!
- तन्मया..


विरणाऱ्या नात्याची कविता!


दोघं भेटतात.. त्यांचं मैत्र जडतं.. आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या जातात.. मनात अगदी खोलवर असलेल्या गोष्टींची देवाणघेवाण होते.. आणि अचानक काहीतरी बिनसलं आहे असं वाटतं.. म्हणजे खटके उडून भांडणं होतात असं नाही पण कुठेतरी काहीतरी चुकतंय असं दोघांनाही जाणवतं.. विरु पाहणारं वस्त्र असतं ना तसं.. ते फाटलेलं नसतं पण त्यात कुठलीही गोष्ट धरून ठेवण्याची ताकदच नसते.. तरीही ते वस्त्र टाकवत नाही.. अशावेळेस मग सुरू होते ती असलं-नसलं नातं टिकवण्याची जीवघेणी धडपड..
दोघं भेटायचं ठरवतात.. भेटतात.. आणि त्यांच्या लक्षात येतं, आपल्याकडे बोलण्यासारखं काही राहिलंच नाहीये.. हे 'शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले' असं नाहीये तर एक रितेपणा आहे.. ज्या व्यक्तीशी बोलताना विषयांची जरूरही नव्हती त्या व्यक्तीच्या डोळ्याला डोळा भिडवता येत नाहीये.. मग कधी एकदा इथून बाहेर पडू याची असोशीने वाट पाहिली जाते.. आणि जेव्हा वाटा वेगळ्या होतात तेव्हा जाणवतं.. अजून एक प्रयत्न व्हायला हवा.. नातं टिकवण्यासाठी आणखी एकदा भेटायला हवं..
खरंतर त्या दोघांत जे होतं ते आता नाहीये हे दोघांनाही जेव्हा जाणवतं तेव्हा निमूटपणे बाजूला झालं तर दोघंही सुखी होतात.
"We love each other. But we do it better when are not together.. "
असं म्हणून बाजूला जाणं श्रेयस्कर असलं तरी तो क्षण कोणता असतो हे समजणं फार कठीण आहे.. ज्याला ते जमतं तो या नात्यांच्या गुंत्यात अडकत नाही.. निसटतं पकडून ठेवण्याची वृथा धडपड करत नाही.. असे क्षण माणसाला प्रौढ बनवतात हे मात्र खरं.. त्या क्षणांसाठी ही कविता...
बोलायला निवांत काही हॉटेलामध्ये शिरलो आपण..
आणि कुठल्या उत्साहाने मागावलेही पदार्थ खच्चून...
बोलावे तो तशी नेमकी जाणीव झाली..
कशी विसंगत..
नव्हते काहीच बोलायला..
डोळे होते डोळा चुकवीत...
न्याहाळीत मी जपानी तरुणी..
तूही काढली नोट खिशातून..
अर्धा कपही चहा न सरला..
निमुटपणाने उठलो तेथून...
नकळत वळली दूर पावले..
कशातून तरी सुटलो वाटुनि...
नकळत वळले बाजूस डोळे..
परतायची ओढ लागुनि...
-इंदिरा संत!!